Friday, February 9, 2018

'गिधाड संवर्धन' गरजेचे


       गिधाडे हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा समजला जातो. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्यात गिधाडे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मात्र अलीकडे या गिधाडांची संख्या कमी होत आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे. त्यांची संख्या कमी झाली तर मृत जनावरे खाण्यासाठी मोकाट श्‍वानांची संख्या वाढेल, अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होईल, शिवाय रोगराई बळावण्याची भीती आहे. 

       सृष्टीचे सफाई कामगार म्हणून गिधाडांची ओळख आहे. गिधाडांची संख्या कमी होण्यामागे प्रत्येक विभागानुसार भिन्न कारणे आहेत. शिकार, विषप्रयोग, खाद्याची कमतरता, अधिवासाची ठिकाणे नष्ट होणे, यामुळे गिधाडांचे बळी जात आहेत. अंधश्रध्दा हादेखील गिधाडाच्या र्‍हासासाठी महत्त्वाचा घटक ठरला आहे. तसेच विजेच्या तारांमध्ये अधिक पंखविस्तार असलेली गिधाडे मृत होण्याचे प्रमाण अधिक आहे. काही आदिवासी जमाती खाद्यासाठी गिधाडांची शिकार करतात.
     जनावरांसाठी ( Diclofenac) वेदनाशामक औषध वापरले जाते. हे औषध अन्नसाखळीव्दारे मृत जनावरांमुळे गिधाडांच्या शरीरात जाते, ज्यामुळे गिधाडांच्या किडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होतो. भारतामध्ये २00६पासून (Diclofenac) या औषधावर बंदी घालण्यात आली असली तरी मानवी वापरासाठी या औषधावर बंदी नाही. मात्र, मानवासाठी वापरण्यात येणार्‍या औषधाचा काही ठिकाणी जनावरांसाठी वापर होतो. डोंगरातील कडेकपारी, पुरातन वास्तू, उंच झाडांवर गिधाडांचे वास्तव्य आढळते. परंतु पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे गिधाडे मृत्यूमुखी पडतात. संरक्षित क्षेत्रातसुध्दा गिधाडे मृत होत आहेत. संरक्षित क्षेत्राच्या बफर झोनमध्ये राहणार्‍या लोकांचे पाळीव जनावर वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत झाल्यास भविष्यातील वन्यप्राण्याचा हल्ला टाळण्यासाठी स्थानिक मंडळी मृत प्राण्याव्दारे वन्य प्राण्यावर विषप्रयोग करतात. असे वन्यप्राणी मृत होतात, त्यावेळी अन्नसाखळीव्दारे गिधाडेसुध्दा बळी पडत आहेत. अशा विविध प्रकारे गिधाडांची घटणारी संख्या वाचवणे काळाची गरज आहे. 

No comments:

Post a Comment