Sunday, February 18, 2018

बोधकथा



रात्री उडणारी वटवाघळे 
कोणे एकेकाळी प्राणी व पक्षी एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यांच्यात वारंवार लढाया होत असत. गंमत म्हणजे आपण का लढतोय ते त्यांच्यापैकी कोणालाच माहीत नव्हते. या सर्व लढाया पाहणार्‍या वटवाघळाने पक्ष्यांच्या गटात सामील व्हायचे ठरविले. याचे कारण पक्ष्यांचे पारडे जड आहे, असे त्याला वाटले. मात्र पक्ष्यांनी त्याला सुरुवातीला नाकारले. 

तू काही पक्षी नाहीस. आम्ही तुला आमच्या गटात घेऊ शकत नाही! सर्व पक्षी एका सुरात म्हणाले. असं काय करता? पहा माझ्याकडे! मलाही तुमच्यासारखे पंख आहेत. वटवाघूळ म्हणाले. ठीक आहे, कावळा म्हणाला, याला आपल्यामध्ये सामील होऊ द्या. याची आपल्याला मदतच होईल. वटवाघूळ पक्ष्यांच्या गटात सामील झाले. युद्ध सुरूच राहिले. कालांतराने प्राण्यांची सरशी होऊ लागली. वटवाघळाला पराजितांच्या गटात राहायचे नव्हते. ते लगेच प्राण्यांकडे गेले. मी तुमच्या गटात येऊ शकतो का? त्याने हत्तीला विचारले. आम्ही प्राणी आहोत, पक्षी नाही. हत्ती जोरात हसत म्हणाला. आम्ही पक्ष्यांना आमच्या गटात घेत नाही. चित्ता हत्तीची री ओढत म्हणाला. पण मी एक प्राणी आहे. पहा, मला तुमच्यासारखे दात आहेत. असे म्हणून वटवाघळाने त्याचे दात दाखविले. मात्र प्राण्यांना त्याचा युक्तिवाद पटला नाही. त्यांनी वटवाघळाला हाकलून लावले. कदाचित मला पक्ष्यांकडे पुन्हा जायला हवे, ते मला पुन्हा त्यांच्या गटात घेतील. वटवाघूळ स्वत:शीच म्हणाले. मात्र, आता पक्षीही त्याला त्यांच्या गटात घेऊ इच्छित नव्हते. आम्ही तुला प्राण्यांकडे त्यांच्या गटात सामील करण्याची याचना करताना पाहिले आहे. गरुड म्हणाले. आम्ही पराभूत होत असताना तू आम्हाला सोडून पळून गेलास. येथून निघून जा व परत येऊ नकोस, म्हातारा कावळा रागावून म्हणाला. तेव्हापासून स्वत:ची लाज वाटू लागल्यानेच वटवाघूळ नेहमी दिवसा दिवाभीतासारखे लपून राहते व रात्रीच उडते, जेव्हा त्याला कोणी पाहत नाही.
......................... 
पाण्याचा एक थेंब 
एका तरुण मुलाला त्याच्या आई-वडिलांनी एकदा झेन आर्शमात झेन तत्त्वज्ञान शिकण्यासाठी पाठविले. विख्यात झेन गुरू गिसान यांचा तो आर्शम होता. त्या तरुणाचा दिवसातील बराचसा वेळ प्रार्थना करणे व झेन सूत्रांचा अभ्यास करणे यात जायचा. इतर वेळी तो भाताच्या शेतीवर काम करायचा किंवा मंदिरात ध्यान करायचा. एके दिवशी गुरू गिसान यांनी मुलाला आंघोळीसाठी पाणी गरम करण्यास सांगितले. मुलाच्या दुर्लक्षामुळे पाणी फारच गरम झाले व उकळू लागले. गिसानने थोडे थंड पाणी आर्शमाच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीतून आणून गरम पाण्याच्या भांड्यात ओतण्यास मुलाला सांगितले. मुलाने दोन बादल्या थंड पाणी आणले व त्या भांड्यात तो पाणी ओतू लागला.

गरम पाण्यात बोटे बुडवून गिसान यांनी पाण्याचे तापमान योग्य आहे का ते तपासले. त्यांना ते योग्य वाटल्यावर त्यांनी मुलाला थांबण्याचा इशारा केला. बादलीत थोडे पाणी शिल्लक होते. क्षणभरही विचार न करता त्या मुलाने उरलेले पाणी जमिनीवर फेकून दिले. हे काय केलेस, मूर्खा? गिसान त्या मुलावर क्रोधीत होत म्हणाले, हे पाणी तू एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा फुलांच्या ताटव्यामध्ये ओतू शकला नसतास? तू पाण्याचा अपव्यय करायला नको होतास. त्या मुलाच्या डोळ्यांत अर्शू आले. त्याचे गुरू त्याला म्हणाले, मुला, हे पावसाळ्याचे दिवस नाहीत. पाणी मिळणे फार कठीण झाले आहे. पाण्याचा एक थेंबही मौल्यवान आहे. त्याक्षणी त्या मुलाला झेन तत्त्वज्ञानाची नवी ओळख झाली. त्याने स्वत:चे नाव बदलून 'टेकिसुई' असे ठेवले. या नावाचा अर्थ होतो पाण्याचा एक थेंब. टेकिसुई पुढे फार मोठा झेन गुरू बनला.
.........................
कासवाला कवच मिळाले 
कोणे एकेकाळी संपूर्ण पृथ्वी दुष्काळाने होरपळून निघाली होती. त्या काळात स्वर्गातील देवांनी पृथ्वीवरील सजीवांना मेजवानीचे आमंत्रण दिले. यामुळे पक्ष्यांना फार आनंद झाला. कारण केवळ तेच उडून आकाशात जाऊ शकत होते. कासवाने मेजवानीला उपस्थित रहायचे ठरविले. पण, तो उडणार कसा? आपण कासवाच्या पायांना पक्ष्यांची पिसे लावू, मग तो उडू शकेल. बुद्धिमान घुबड म्हणाले. घुबड व पोपटाने जेवढी मिळतील तेवढी पिसे गोळा केली व कासवाच्या पायाला बांधली.

स्वर्गातील देवांना सांगा की मी सर्व पक्ष्यांचा राजा आहे. कासवाने हवेत उडत असताना पक्ष्यांना विनंती केली. स्वर्गात पोहोचल्यावर सर्व पक्ष्यांचे देवांनी स्वागत केले व त्यांना मेजवानीच्या टेबलावर नेले. कासवाने अधाशीपणाने मेजवानीतील बहुतांश पक्वान्ने फस्त केली. पक्ष्यांसाठी थोडेच अन्न ठेवले. सर्व पक्षी यामुळे संतप्त झाले. त्यांनी कासवाच्या पायांवरील पिसे काढून घेतली. कासवाने मग आपल्या पत्नीला मऊ गवताचे आवरण जमिनीवर तयार ठेवण्यास स्वर्गातून मोठय़ाने ओरडून सांगितले.
जेणेकरून स्वगार्तून खाली जमिनीवर पडल्यावर त्याला दुखापत होणार नाही. मात्र कासवीण बाईने गवताऐवजी दगड शब्द ऐकला. तिने दगडांचे आवरण बनविले. कासव स्वर्गातून जमिनीवर धप्पदिशी दगडांवर पडला. त्याचे एकसंध कवच तुटले व त्याचे अनेक तुकडे झाले. कासविणीने कसेबसे ते तुकडे गोळा केले व कासवाच्या पाठीवर चिकटवले. तेव्हापासून कासवांचे कवच कधीही एकसंध नसते.

No comments:

Post a Comment