स्थळ: मार्केट यार्डसमोर,वेळ सकाळी 10.10
एसटी स्टँड आणि
मार्केट यार्ड दरम्यान विजापूर रस्त्यावर ट्रॉफिक जाम झालेले. वाहने उभारलेली. एक तरुण गाडीची काच खाली करून रस्त्यावरच थुंकतो. शेजारील
दुचाकीवाला त्यास म्हणतो, दिसता सुशिक्षित मात्र, कुठे थुंकावे हे कळत नाही का? निर्विकार चेहर्याने थुंकणारा सॉरी म्हणतो. गाडीची काच वर घेतो,
जसे काही घडलेच नाही.
प्रसंग दुसरा
स्थळ: संभाजी चौक दुपारी 1
दुचाकीवर चौकात
तिघे जण तरुण. तोंडात मावा
भरलेला. रहदारीच्या चौकात तिघांच्याही पिचकार्या. ते पाहून एक ज्येष्ठ व्यक्ती बोलती झाली,ए पोरांनो, असे रस्त्यावर थुंकता का? त्यावर उत्तर होते, एवढेच वाईट वाटतेय तर शर्ट काढ आणि
पुसून घे. अक्कल शिकवू नको.
तिसरा प्रसंग
स्थळ: एसटी बसथानक दुपारी 3
तंबाखू मळतच चालक
एसटी बसमध्ये बसतो. थोडे अंतर गेल्यावर केबिनमध्ये पायापाशीच थुंकतो. ठराविक
वेळेनंतर पुन्हा तेच. न राहून गाडीत का थुंकता? असे विचारल्यावर, मग कुठं थुंकायचं, असे उत्तर.
शहर असो अथवा गाव
असे अनेक ठिकाणी थुंकणारे दिसतात.मात्र, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याने जंतुसंसर्ग आणि रोगराई
पसरते,याचे भान त्यांना नसते. अशा पोरांवर
संस्कारच झालेले नाहीत, अशी बेपर्वाई,मग्रूर
तरुण काय देशाचं भलं करणार, असा प्रश्न
पडतो. तोंडात मावा नाही तर गुटखा कोंबून जागोजागी थुंकत जाणे,
हेच त्यांचे काम. हीच त्यांची देशसेवा.
यांना अक्कल शिकवायला जाणेही अवघड. कसाही पाणौतारा
करायला तयार. कुचकामी कायदा आणि अंमलबजावणीच्या नावाने शंख,
यातूनच थुंकणार्यांचे फावते. कायदे केले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारेच मावा,गुटखा खाऊन रस्ता खराब करीत असतात. त्यांनाच कोण सांगणार,
असा प्रश्न. थुंकणार्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईची तरतूद आहे,मात्र त्यांच्यावर
लक्ष ठेवून पकडणार कसे, हाही प्रश्न आहे.
थुंकणार्यांवर अद्याप कुठेच आणि कुणी कारवाई
केलेली नाही. ग्रामपंचायत,पालिका,
शाळा-कॉलेज, सार्वजनिक सिनेमा
थिएटर,नाट्यगृह, बसस्थानक अशा किती तरी
ठिकाणी बिनधास्त थुंकण्याचा कार्यक्रम होत असतो. आणखी एक म्हणजे
परिसर स्वच्छ असेल तर थुंकणाराही विचार करील. त्यामुळे स्वच्छता
ही सामुहिक जबाबदारी आहे. याचे भान प्रत्येकाने बाळगणे गरजेचे
आहे. स्वयंशिस्तीचा अभाव आणि बेपर्वाई यांना आळा घालण्यासाठी
कायदा करून भागणार नाही,तर सामाजिक जागृती आणि दबाव गट निर्माण
होण्याची गरज आहे, अन्यथा सामाजिक स्वास्थ्यापुढे जटील प्रश्न भविष्यात निर्माण होईल,हे नक्की.
सार्वजनिक अस्वच्छतेमुळे
लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचा परिणाम म्हणजे क्षयरोग,न्यूमोनिया,स्वाईन फ्लू, श्वसनाचे आजार,
कर्करोग,पुनरुत्पादन क्षमता कमी होणे,असे आजार जडतात.शिवाय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते,
ते वेगळेच! ॠार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे,थुंकणे,तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन,जाहिरात, साठवण, पुरवठा,विक्री करण्यास बंदी आहे.परंतु,याची अंमलबजावणीच होत नाही.
सरकारी आकड्यानुसार
भारतात दरवर्षी क्षयरोगाच्या 19 लाख नवीन केसेस नोंदवल्या जातात. जगात भारतामध्ये क्षयरोगाचे
रुग्ण सर्वात जास्त आढळतात.या सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या मंडळींवर नैतिक दबावगट निर्माण व्हायला हवे आहे. त्याचबरोबरच
कडक कायदा करण्याची गरज आहे. शिवाय कायद्याची किंवा कारवाईची
प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
सामाजिक भान आणि स्वयंशिस्त महत्त्वाची आहे, यांच्यामुळे रस्त्यावर
थुंकणार्याला आळा बसण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment