Wednesday, January 31, 2018

भुरट्या चोर्‍या आणि आपण


     चोरी करणार्याला कुठली वस्तू वर्ज्य नाही. काय मिळेल ते ढापायचा धंदा सध्या सुरू आहे. घराला कुलूप दिसले की, त्यादिवशी घर फोडलेच समजायचे. चोरी करणार्या लोकांना घराला कुलूप आहे, याचा सुगावा लागतोच कसा आणि आजूबाजूला असलेल्या लोकांना आपल्या भागात दिवसभरात कुणी येऊन गेला असेल, याची गंधवार्तादेखील कशी काय लागत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. मी, माझा या नादात माणूस आपलेच नुकसान करून घेत आहे. स्वत:चे बघताना एकवेळ अशी वेळ आपल्यावर येणार आहे,याची त्याला कल्पना का येत नाही? शेजारधर्म पाळताना शेजारच्या घरात कोण डोकावते आहे, याची तसदी घ्यायला नको का? शेजारी किंवा आजूबाजूला कोण येतो,कोण जातो,याची चौकशी करायला हवी. सावधानता बाळगायला हवी. एकमेकांना साह्य न करण्याच्या वृत्तीमुळे शहरातल्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहणार्या लोकांना चोरीच्या भयाने घर सोडून कुठे जाता येत नाही. नाही तर आपल्या विश्वासातल्या कुणाला तरी घरात झोपवावे लागते. समाजात राहताना इतरांची मदत घेतल्यास चांगला फायदा होतो,मात्र स्वत:च स्वत:चे रक्षण करताना अडचणी या येतातच.त्यामुळे जिथे इतरांच्या मदतीची गरज आहे, तिथे आवश्य त्यांची मदत घ्यायला हवी.

     आमच्या शेजारी पती-पत्नी शिक्षक राहतात. शेजार्याशी बोलायचे नाही.त्यांच्याकडे काय चालले आहे, याची विचारपूस करायची नाही. एकदा रात्री त्यांच्या घरातून सोन्याची चैन, अंगठी वगैरे चोरीला गेली. त्यांनी बाहेर येऊन फार दंगा- आदळआपट केली. पण लोकांना त्यांच्यात चोरी झाली की नाही,याबाबत शंका येऊ लागली. लोकांच्यात राहिल्यावर त्यांना त्यांची सहानुभूती मिळणार असते. नाही तर असा कोडगेपणा राहतो. लोकांच्या अशा स्वभावाचाच फायदा चोरटे घेत असतील. त्यामुळे समाजात वावरताना पैशांची घमेंड बाळगून चालत नाही. पैसा काय आज आहे,उद्या नाही.पण माणुसकी महत्त्वाची आहे.ही माणुसकी जपण्याची आवश्यकता आहे.
     अलिकडच्या काळात चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी चोरटे चोरी करायचे,पण कुणावर हात उचलत नव्हते.कुणावर हत्यारांनी वार करत नव्हते.पण आता चोरटे लोकांचे मुडदे पाडून चोरी करत आहेत. इतके लोक निर्ढावले आहेत. क्रूर बनले आहेत. आता वाटमारी वाढली आहे. शहरात सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढत आहे. या चोर्या पोट भरण्यासाठी कमी आणि चैनी करण्यासाठी जास्त, असा प्रकार होत आहे. त्यामुळे हाताला येईल,ते लांवायचे,अशा गोष्टी आढळून येत आहेत. पूर्वी फक्त ठराविक समाजच चोरी करायचा,पण आजकाल चैनीसाठी पैसे कमी पडू लागल्याने कोणीही चोरी करू लागला आहे.यात साहजिकच युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.
     घराच्या दारात,पाठीमागे वगैरे एकादी वस्तू पडली तर ती काही वेळात दिसूनही येत नाही. पाणी तापवण्याचे पितळी बंब वापरण्याचे प्रमाण अलिकडेच याचमुळे कमी झाले आहे. भुरट्या चोर्या तरुण वर्ग,शाळकरी मुले,दारुडे करताना दिसत आहेत.अलिकडच्या काही वर्षात पेट्रोल चोरीचा प्रकारही वाढला आहे. यात युवकांचा समावेश आहेच,शिवाय दहा-बारा वर्षाची पोरेदेखील आपला हात आजमावताना दिसत आहेत. किराणा दुकाने फोडणे,पानटपर्या फोडणे, छोटी हॉटेल्स,बॉयलर कोंबड्याची दुकाने फोडून कोंबड्या पळवणे असे कितीतरी प्रकार आजूबाजूला घडताना दिसतात. लोखंडी साहित्य चोरण्याचा प्रकारही वाढला आहे. भांडी-कुंडी,सायकल,मोटारसायकली, स्लॅबचे लोखंडी गज, गाडीच्या टायरी,रीम असे कितीतरी वस्तू हातोहात लंपास होत असतात.
     या भुरट्या चोर्यांमध्ये पेट्रोल चोरीचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. घरापुढे लावलेल्या गाडीतून रात्री- अपरात्री सहज पेट्रोल काढून नेले जात आहे. पोलिसांचा रात्रीचा गस्त असला तरी या पेट्रोल चोरीला आळा बसवणे अवघड झाले आहे. यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. सकाळी लवकर उठून कुठे तरी जाण्याचा प्लॅन ठरवा आणि गाडी सुरू होऊ नये, असा अनेकांना अनुभव आला असेल. या घटना पोलिस लोक अजिबात गंभीरपणे घेत नाहीत. त्यांना यात काहीच स्वारस्य नसते. यामुळे चोरटे मात्र मोकाट राहातात. त्यांच्या चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ होतराहते. अशा वेळेला आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. खरे तर नागरिकांनी अंगणात,पार्किंगमध्ये दिवे रात्री सुरू ठेवावेत. पेट्रोल टाकीपासून इंजिनकडे जाणार्या पाईपला लॉक बसवून घ्यायला हवे. त्यामुळे वाहन चोरीचा धोका कमी होतो. घर, इमारतीचा परिसर, पार्किंग, अंगणात शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यायला हवेत,यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्रितरित्या येऊन व वर्गणी काढून अशी सीसीटीव्ही युनिट्स बसवायला हवीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेजारी शेजारी यासाठी जात-धर्म,भेदभाव,गरीब- अमीर असा कसलाच भेद मनात न आणता एकमेका सहाय्य करू। अवघे धरु सुपंथ या संतांच्या विचाराचे अनुसरण करायला हवे.

No comments:

Post a Comment