Sunday, January 21, 2018

(बालकथा) रंगांची उधळण

     पिंटू कोल्हा दोन दिवसांपासून त्याची जुनी पिचकारी घेऊन घराच्या छतावर बसला होता. तो रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्राण्यांवर रंगांची उधळण करत  'हॅपी रंगपंचमी' म्हणत होता. थंडीत पाण्याचा फवारा ज्या प्राण्यावर उडायचा, तो रागाने वर पाहायचा. तेवढ्यात पिंट्या 'हॅपी रंगपंचमी' म्हणायचा,त्यामुळे तो प्राणी चेहऱ्यावर हास्य आणून पुढे निघून जायचा. 

     यावेळा रंगीत पाण्याचा फवारा उडाला जंगलाचे मामा  माकडावर! त्यांनी मागचा पुढचा विचार केलाच नाही,त्यांनी सुरू केली शिव्यांची लाखोली! पिंट्याच्या बापाला हाक मारायला सुरुवात केली. "ये मरतुकड्या,बाहेर ये. बघ तुझ्या मुलाचे कर्तृत्व. रंगपंचमी बघ त्यांच्या अंगात शिरलीय. जरा बाहेर ये,त्याच्या अंगातली रंगपंचमीच  काढतो  आता बाहेर."
हे ऐकून पिंट्याच्या बाप बाहेर आला. त्याने पाहिले, माकड मामा अगदी सुटा-बुटात होते. पण त्यांच्या कपड्यावर रंगाचे पाणी  पडले होते. त्यामुळे त्यांचा सूट रंगाने भिजला होता. पिंट्याचा बाप म्हणाला," अरे मामा, का इतका गरम झाला आहेस?"
रागाने माकडमामा म्हणाले,"दिसत नाही का, तुझ्या लाडक्या पोराने माझ्या नव्या सुटाची काय अवस्था केली आहे ती ?" आज शिवानी मावशीकडे जेवणाचे आमंत्रण होते, पण आता या कपड्यात कसा जाणार?"
पिंट्याच्या वडिलांनी हाक मारली,"पिंट्या, कुठे आहेस,ये इकडे बरं?" 
वडिलांचा आवाज ऐकून पिंट्या आजीच्या खोलीत जाऊन लपला. आजीने विचारले,"काय झालं रे ?"
पिंट्याने सांगितले,"रंगपंचमीच्या खेळण्याच्या भानगडीत माकडमामांचा सूट खराब झाला. आता बाबा, माझी कणिक तुंबणार!"
आजी मी बघते म्हणत दरवाजाकडे गेली आणि म्हणाली," डब्ब्या, कोण आहे रे दारात.त्याला  आत तर घे."
आजीचा आवाज ऐकून माकडमामा म्हणाले,"नमस्ते आई , कशा आहात?"
आजी म्हणाली,"अरे बाब्या तू ?ये ये, आत ये. आज तुझ्या आवडीचे केळ्यांचे  चिप्स बनवले आहेत. खाऊन जा."
माकडमामाच्या तोंडाला पाणी सुटले.तो लगेच घरात शिरला.टेबलावर केळी चिप्स आणि गरमगरम कॉफी पाहून त्याने लगेच ताव मारायलाही  सुरुवात केली. तेवढ्यात पिंट्याच्या आजीने त्याच्या आईला आवाज देत म्हणाली," पिंट्याच्या बाबाचा एक सूट घेऊन ये.बाब्याचा सूट खराब झाला आहे."
हे ऐकून माकड मामा म्हणाले,"नको आई, मी असाच जाईन. एवढं काही झाले नाही सूटाला, पण पिंटूला समजावून सांगा ,पंचमी अगोदर अशी लोकांवर रंगांची उधळण बरी नव्हे."
      पिंट्याची आजी त्याच्या बोलण्यात सहमती दाखवत म्हणाली,"तू म्हणतोस ते बरोबर आहे.तू सांगतोस ते पिंटू ऐकतो आहे. तो तुझ्या पाठीमागे सोफ्याखाली लपून बसला आहे." आजीने त्याला बाहेर काढले आणि माकड मामासमोर उभे केले. पिंटू कसनुसे तोंड करून म्हणाला,"आय अॅम सॉरी."
     माकडमामादेखील त्याचा मासूम चेहरा पाहून म्हणाले,"चल असू दे! पंचमीच्या दिवशीच रंगपंचमी खेळायची.आपल्या मित्रांसोबत खेळायचे,पाणी जास्त वापरायचे नाही.पुढच्याच आडवड्यात मुलांच्या परीक्षा आहेत, अंगावर जास्त पाणी ओतल्यास मुले आजारी पडतील." असे म्हणून माकडमामा उठले, तेवढ्यात आजीने त्याच्या हातात केळ्यांच्या चिप्सचे पाकीट टेकवले. आणि म्हणाली,"हे पाकीट घरच्यांसाठी आहे.पिंट्याच्या मित्राला-चिपळ्याला नक्की दे." 
पिं ट्याला  आजीचा फार फार अभिमान वाटला.


No comments:

Post a Comment