Sunday, January 21, 2018

भूईकोट किल्ला सोलापूरचा

     मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले.

     सोलापूरचा किल्ला नेमका कोणी बांधला याबाबत अजूनही तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गावान यानेन दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ला अनेक राजवटीचे आर्शय स्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे सोलापूरचा किल्ला हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे. ही नोंद एकदा नाही तर दोनवेळा आहे. 
     अहमदनगर येथे बुर्‍हाण निजामशहा गादीवर होता. तर, विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुर्‍हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे, इ.स. १५२३ मध्ये हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून 'सोलापूरचा किल्ला' देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसर्‍यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबीबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुर्तजा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.
सोलापूरचा किल्ला बहमनी, आदिलशाही, निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्लच्या परिसरात गेला. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठय़ांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
पाहण्यासारखे काय?
     सोलापूरचा किल्ला दुहेरी तटबंदीचा आहे. खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे. याच्या बाहेरील तटबंदीमध्ये चार कोपर्‍यांवर चार बलदंड बुरूज आहेत. या बुरुजांना एकमेकांना जोडणार्‍या तटबंदीमध्ये आणखी २२ बुरूज बांधून बुरुजांची एकभक्कम साखळीच निर्माण करण्यात आली. साधारण तीस फूट उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजागी मार्‍यासाठी छिद्रे केलेली दिसतात. बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे. याच्याही चार कोपर्‍यांवर चार बुरूज असून ते अधिकच उंच बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवरून दूरवर टेहळणी करता येत असे. किल्ल्याच्या एका बाजूला सिद्धेश्‍वर तलावामुळे नैसर्गिकपणा आला आहे. इतिहास आणि भक्कम बांधकाम यामुळे सोलापूरचा किल्ला आपल्या स्मरणात राहातो.


No comments:

Post a Comment