Monday, January 1, 2018

(अध्यात्म) सारांश जीवन प्रवासाचा!


एका चौकात तीन प्रवासी एकमेकाला भेटले. तिघांच्याही खांद्यावर दोन-दोन झोळ्या होत्या. एक पुढे तर दुसरी मागे लटकत होती. आपल्या लांबच्या प्रवासामुळे तिघे प्रवासीही थकले होते,पण त्यातल्या एका प्रवाशाच्या चेहर्यावर प्रसन्नता आणि उत्साहाचा भाव होता. दुसरा प्रवाशी कष्टाने थकला होता,पण निराश नव्हता. परंतु, तिसरा मात्र कमालीचा थकलेला दिसत होता. तिघांनी एकमेकांची विचारपूस करायला सुरुवात केली. कोण कोठून आला आहे,कुठे चालला आहे,कुणाच्या झोळीत काय आहे, याची चौकशी सुरू झाली. एकाने सांगितले की, त्याने आपल्या मागच्या झोळीत कुटुंब आणि त्याच्या उपकारी मित्रांच्या चांगल्या गोष्टी भरून ठेवल्या आहेत. समोरच्या झोळीत त्यांच्या वाईट गोष्टी ठेवल्या आहेत. दुसर्याने आपल्या समोरच्या झोळीत आपल्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या चांगल्या गोष्टी लटकवल्या होत्या. वाईटाच्या गोष्टींची झोळी मागे लटकवली होती. त्या गोष्टी पाहून तो स्वत:ला नशीबवान समजत होता आणि आनंदी होत होता. शेवटी तिसर्या प्रवाशाला त्या दोघांनी विचारले,तुझ्या झोळीत काय भरले आहे? समोरची झोळी तर चांगली भरलेली दिसते. आणि मागची झोळी हलकी! त्याने सांगितले की, समोरच्या झोळीत त्यानेही चांगल्याच गोष्टी ठेवल्या आहेत आणि मागे वाईट गोष्टी! मात्र मागच्या झोळीला एक छिद्र आहे. त्यातून वाईट गोष्टी गळून पडतात. झोळीत राहत नाहीत. त्या एक एक करत खाली गळून पडतात.त्यामुळे मागच्या झोळीचे वजन हलके राहते. तो आनंदी होता,कारण चालताना त्याची दृष्टी नेहमी चांगल्या गोष्टींवरच पडते. वाईट गोष्टी तर तो विसरूनच जातो. त्या गोष्टी वाटेत हळूहळू गळून पडत होत्या. परंतु, ज्या प्रवाशाने वाईटाची झोळी समोर ठेवली होती आणि चांगल्याची मागे, तो नेहमी थकलेला आणि निराश दिसत होता. हाच जीवन प्रवासाचा सारांश तत्त्व होय.

No comments:

Post a Comment