Monday, January 15, 2018

दुधातील भेसळीमुळे आरोग्य धोक्यात

दिवसेंदिवस दुधाचा घसरता दर्जा लक्षात घेता लहान-थोरांचे  आरोग्य बिघडते की काय? अशी स्थिती आहे. दर वाढवा, जादा पैसे मागून घ्या पण दूध चांगलं घाला, असे आर्जव माता - भगिनी दूधवाल्यांकडे करताना दिसून येत आहेत.  काही वेळेला तर ‘ये दूध है या पाणी’ असाच प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. 

अनेक पारंपरिक व्यवसाय करणारे गवळी  व अन्य व्यावसायिक गेल्या कित्येक वर्षांपासून दूध व्यवसाय करत आहेत. 100 हून अधिक वर्षे एकाच घराण्यात दूधाचा रतीब असणारेही काही दूधवाले आहेत. त्यांनी पूर्ण विश्‍वास संपादन केला असताना आज बदलत्या जगात  भेसळखोरांचे फावले आहे. शेतकर्‍यांकडून घेतल्या गेलेल्या दर्जेदार दुधात भेसळ करून निकृष्ट प्रतीचे दूध ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. 
उत्तम दर्जाचे दूध म्हैशीचे दूध, चांगले फॅट असलेले दूध देऊ असे सांगून दुसर्‍या ठिकाणचे दूध कमी दराने घेऊन जादा दराने विक्री करण्याचा उद्योग सुरू आहे. दूधात पाणी मिश्रण करून प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न अधिक पैसा कमविण्यासाठी होत आहे. गाई-म्हैशीचे दूध मिश्रण करणे, संकरित म्हैशी व गाईचे दूध एकत्र करून ग्राहकांना देणे अशा प्रकारामुळे दुधातील स्निग्ध  पदार्थ कमी होत असून प्रथिने साखर यांचेही प्रमाण घटत आहे.
दूधाचे बदलते रंग आपणाला धोक्याची घंटा देत आहेत. दुधाची साई लुप्त होत असून पातळ चिकट थर बेचव लागत आहे. दुधाला  फॅट आणण्यासाठी व दूध सफेद दिसण्यासाठी काहींनी शक्कल सुरू केली आहे. अशा दुधापासून दही, ताक व तूप करणे दूरच राहते. कारण दूध दीर्घकाळ टिकतच नाही. बाळासाठी दर्जेदार दूध असणे आवश्यक आहे. असंख्य टी स्टॉलधारक पॅकिंग दूध उत्पादनाचा वापर करून आपला व्यवसाय करत आहेत. दूध विक्रेत्यांनी आपला दूध व्यवसाय प्रामाणिकपणे करून पारंपरिक नाते जोपासले असले तरी पुढे या दुधामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. अन्न व औषध प्रशासनाने याबाबत पावले उचलण्याची गरज आहे.


No comments:

Post a Comment