Saturday, January 27, 2018

युवकांना शिकवायला हवी जीवनव्यवस्था

     जागतिकीकरण आणि आर्थिक सुधारणा यांचा सर्वात मोठा फायदा भारतातल्या व्यावसायिक शिक्षणाला मिळाला आहे. गेल्या काही दशकात व्यावसायिक शिक्षण संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, याचे श्रेय विकास दर वृद्धीकडे जाते. विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात रोजगार योग्य बनवण्यासाठी या संस्थांद्वारा विविध डिग्री आणि डिप्लोमासारखे रोजगारक्षम प्रशिक्षण दिले जात आहे.

     मात्र अशा कोर्समध्ये जीवन व्यवस्था कौशल्य विकासावर अजिबात लक्ष दिले जात नाही. वास्तविक आधुनिक मानवी जीवन संघर्ष,इच्छा आणि महत्त्वाकांक्षा यांच्या ओझ्याने पार दबून गेले आहे. सद्याची कॉर्पोरेट विश्व अनिश्चितता आणि ताण-तणावने घेरले गेले आहे. परस्पर विरोधी गरजांची प्राथमिकता निश्चित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वेळेचे उपयोग आणि व्यवस्था आवश्यक आहे. आपल्याला विविध तर्हेच्या लोकांशी सामना करावा लागतो. कॉर्पोरेट जगतात प्रतिस्पर्धा करण्याअगोदर आपण अपयशाशी कसा सामना करायचा, हे जाणून घेणे सर्वात अधिक महत्त्वाचे आहे. अलिकडच्या काळात अत्याधिक तणावामुळे मानसिक आजार वाढण्याचे प्रमाण या क्षेत्रात अधिक आहे. याशिवाय देशात मधुमेह,हृदयरोग, लठ्ठपणा इत्यादी जीवनशैली संबंधीत आजारांची संख्याही वाढत आहे. आपल्या देशाला मधुमेहींचे घर म्हटले जाते,इतकी मोठी संख्या सध्या या आजाराच्या रुग्णांची आहे. यात सातत्याने वाढ होत आहे.      स्मार्टफोन,टॅबलेट,लॅपटॉपसारख्या इलेकृटॉनिक गॅझेट्सच्या अति वापरामुळे मानसिक आजार वाढत आहेत. भारत एका बाजूला जिथे गरिबांना एकवेळचे जेवण देण्यात असफल ठरत आहे,तिथेच लठ्ठपणामुळे वाढणार्या समस्यांशी तोंड द्यावे लागत आहे.
     अशा परिस्थितीत भावना आणि तणाव यांवर व्यवस्था राखण्याची कला शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या कौशल्याचा आधुनिक व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेत समावेश करण्यात आलेला नाही. कॉर्पोरेट विश्वाची ओळख होण्याबरोबरच युवकांमध्ये जीवनव्यवस्था कौशल्य विकसित करण्याची हीच योग्य वेळ आहे. भविष्यात आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आणि किफायतशीर जीवन व्यवस्था सल्लागार किंवा प्रशिक्षक यांची आवश्यकता भासणार आहे. आज आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यांचा सामना करत असताना आनंदी जीवन कसे जगता येईल, याचे शिक्षण देणे भाग आहे. याकडे शिक्षण संस्था, अभ्यासक्रम बनवणार्या संस्था आणि तज्ज्ञ लोकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
     अपयशाने खचून जाऊ नये, संघर्षाला पर्याय नाही या गोष्टी युवकांमध्ये बिंबवल्या पाहिजेत. स्व-जागरुकता महत्त्वाची आहे.आपल्या गरजा आणि भावना ओळखता आल्या पाहिजेत. मन आणि शरीर रचना आणि त्यांच्यातला ताळमेळ कसा बसवायचा याचे शिक्षण आवश्य मिळायला हवे आहे. अनिश्चित भविष्यामुळे व्यावसायिक शिक्षण घेणार्या युवकांचे मन अस्थिर बनले आहे. त्यांच्यात भिती घर करून आहे. त्यांच्यातली ही भिती दूर करून आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
     जीवनात योग्य आणि चांगली दृष्टी विकसित करण्यासाठी जीवन प्रबंधन आवश्यक आहे. जीवन व्यवस्था कौशल्य एक सकारात्मक व्यवहार आणि दृष्टीकोन विकसित करते. यामुळे कॉर्पोरेट आव्हानांबरोबरच रोजच्या गरजांशी यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी आपल्याला सक्षम बनवले जाते. या कौशल्याचा उपयोग आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी,वेळेचे नियोजन करणे, रचनात्मक विचार, दुसर्यांविषयी सहानुभूती ठेवणे, अपयशांशी सामना करणे आणि आपल्या जीवनाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवणे यासाठी होतो.
आपल्याकडे प्राचीन भारतीय ज्ञानाचा लाभ घेण्याची मोठी संधी आहे. आपण प्राचीन भारतीय व्यवस्थेत जीवन कौशल्याची आवश्यक साधने शोधू शकतो, जसे आध्यात्मिक मूल्य,योग,ध्यान,सचेतन तंत्रज्ञान इत्यादी. भारतात मन-शरीर स्वास्थ्य आणि आध्यात्मिकतेवर आधारित प्राचीन ज्ञानाचे भांडार आहे. विविध देशातले लोक आंतरिक शांततेसाठी भारतात येत आहेत आणि ते आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असलेल्या प्राचीन भारतीय ज्ञानाचा लाभ घेत आहेत. आपण मात्र जगाचे अंधानुकरण करत आहोत आणि मनशांती गमावून बसलो आहोत.

No comments:

Post a Comment