मराठी विश्वकोश हा मराठी भाषेतला प्रयत्नपूर्वक
संकलित केलेला माहितीचा खजिना आहे.
या खजिन्याचा उपयोग मराठी अभ्यासकांना तर होत आहेच,शिवाय आता तो जगभरातल्या मराठी अभ्यासकांनाही सहज आणि सुलभरित्या उपलब्ध होणार
आहे. या मराठी विश्वकोशाचे अॅप बनवण्यात आले असून ते विनामूल्य लोकांना उपलब्ध झाले आहे. या विश्वकोशाचे 20 खंड असून त्यात
151 विषय,312 सूची, 18 हजार
163 लेख इतके ज्ञानभांडार सामावलेले आहे. जगभरातले
ज्ञान मराठी भाषेत उपलब्ध व्हावे,यासाठी विकिपिडिया प्रयत्नशील
आहे. यात काम करणारे काही मराठी लोक सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
या विश्वकोश अॅपमुळे यात
आणखी भर पडणार आहे.
या विश्वकोशाची मोठी जाडजाड पुस्तके पाहून
काहींना हा आपला विषय नाही, अशीच भावना व्हायची. मोठा आकार आणि वजन यामुळे त्याचा संग्रह फक्त ग्रंथालयांमध्येच पाहायला मिळायचा.
20 खंड सांभाळणे, त्याची हाताळणी करणे,
त्यातील माहितीचा शोध घेणे खरे तर मोठे जिकिरीचे काम होते. शिवाय आपल्याला पाहिजे असलेली माहिती मिळवण्यासाठी हे विश्वकोश कोठे उपलब्ध होतील, याचा शोध घेऊन तिथपर्यंत पोहचावे
लागत होते. पण अलिकडच्या काही वर्षात नव्या तंत्रज्ञानामुळे हे
विश्वकोश नवनव्या रुपात लोकांच्या समोर आले. तंत्रज्ञानात जसजसे बदल होत गेले, तसतसे ते बदलत गेले.
विश्वकोश निर्मिती मंडळाने याविषयी पूर्ण आस्था
दाखवून त्यासाठी प्रयत्न केले, यासाठी मंडख कौतुकास पात्र आहे.
पुस्तक स्वरुपात
उपलब्ध झाल्यानंतर हे विश्वकोश अगदी अलिकडच्या काळात संगणकावर उपलब्ध झाले. नंतर
सी डॅकच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले. आता पुढच्या पिढीचा विचार करता हे सगळे विश्वकोश मोबाईल
अॅपवर उपलब्ध झाले आहेत.त्यामुळे लोकांना
आता त्यातले शब्द, संबंधित माहिती कुठेही पाहता येणार आहे.
आणि त्याचा उपयोग करता येणार आहे. आगामी काळात
या विश्वकोशांची ऑडिओ काढण्याचा मानस असल्याचे मंडळाने सांगितले
आहे. अलिकडे वाचन कमी झाले आहे, ही तक्रार
लक्षात घेऊन ऑडिओची संकल्पना पुढे आली आहे, ही चांगलीच बाब म्हटली
पाहिजे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या विश्वकोशाचे नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बदल करून ते लोकांपर्यंत पोहचवण्याचे
काम स्तुत्य असले तरी या विश्वकोशाच्या पुढच्या भागाची निर्मितीही
होणे आवश्यक आहे,यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
वास्तविक या जगात माहितीचे आणि ज्ञानाचे मोठे भांडार उपलब्ध आहे.
ते सगळे मराठी भाषेत उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. नव्या सुधारणा होत आहेत.नवी निर्मिती होत आहे.
नवनव्या गोष्टींचा शोध लागत आहे. त्यामुळे ज्ञानाची
आणि माहितीची कक्षा रुंदावत आहे. त्याचा समावेश आपल्या या विश्वकोशात व्हायला हवा. नव्या विश्वकोशाच्या निर्मितीसाठी वेगाने हालचाली व्हायला हव्या आहेत.यासाठी महाराष्ट्र शासन आणि मराठी विश्वकोश निर्मिती
मंडळ तत्पर असायला हवे आहे.
No comments:
Post a Comment