Sunday, January 21, 2018

राम गणेश गडकरी

गोविंदाग्रज या टोपण नावाने अप्रतिम काव्य लिहिणारे ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी झाला. गडकरी म्हणजे मराठी नाट्य-साहित्य क्षेत्रातला चमत्कारच. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किलरेस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किलरेस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला. खरे तर गडकर्‍यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकर्‍यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. 

राम गणेश गडकरी या नावाने नाटके लिहिणार्‍या, गोविंदाग्रज नावाने काव्यलेखन करणार्‍या या प्रतिभावंत साहित्यकाराने 'बाळकराम' या नावाने विनोदी लेखनही केले. 'संपूर्ण बाळकराम' या पुस्तकात त्यांचे विनोदी लेखन संकलित केले गेले आहे. 'एकच प्याला', 'भावबंधन' या नाटकांमधील बळीराम व धुंडीराज यांच्यामार्फत त्यानी विनोद प्रकट केला आहे. गंभीर आशय आणि वैचारिक विवेचनाला विनोदाची झालर लावण्याची हातोटी त्यांना साधली होती. त्यांचे 'ठकीचे लग्नही खूप गाजल. मा.गडकर्‍यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापयर्ंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment