Tuesday, January 16, 2018

थर्माकोलचे घर साकारतेय

     घर बांधावं हे सगळ्यांचंच स्वप्न असतं. आयुष्यभर पुंजी गोळा करून शेवटी एकदाचे घर बांधले जाते. पण भूकंप आणि आग यापासून घराचे संरक्षण कसे करायचे,हा प्रश्न मोठा असतो. विशेष म्हणजे भूकंप प्रवण क्षेत्रात हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो. यावर काही संशोधने झाली आहेत. त्या पद्धतीने घरांची रचना वगैरे करून घरे बांधलीही जात आहेत. मात्र राजस्थानमधल्या बुरहानपूरमध्ये एक असे घर उभारले जात आहे, ते थर्माकोलचे आहे. भूकंप किंवा आग यापासून अत्यंत सुरक्षित असे घर दोन मजली बनवले जात आहे. मुंबईतल्यातच एका कंस्ट्रक्शन कंपनीकडून ते उभारले जात आहे. या घराकडे अनेकांच्या नजरा लागल्या असून लोक उत्सुकतेने हे घर पाहायला गर्दी करत आहेत. हे घर यशस्वी झाल्यास नक्कीच अशा प्रकारच्या घरांना मागणी वाढेल, असे इथले लोक बोलू लागले आहेत.

     मध्यप्रदेशमधल्या उन्हाळ्याची कल्पना आपल्या असेलच! भट्टीसारखे तापणारे तापमान लोकांना कासाविस करून सोडते,मात्र हे घर उन्हाळ्यात थंडगार राहणार आहे. सध्या या घराचे ग्राऊंड फ्लोर बांधून पूर्ण झाला असून दुसर्या मजल्याचे काम सुरू आहे. साधारणपणे दोन मजली घर बनवण्यासाठी 100 क्युबिक मीटर काँक्रिट लागते. हे घर बनवण्यासाठी 50 क्युबिक मीटर काँक्रिटचा उपयोग होणार आहे. अशाप्रकारच्या घराच्या बीम-क़ोलमसाठी 20 टनापेक्षा अधिक सळई लागते. मात्र या बांधकामात सळ्यांचा वापरच करण्यात आला नाही. तारांच्या थ्रीडी जाळीमुळे बांधकाम अधिक मजबूत होणार आहे.
     चार महिन्यात पूर्ण होणारे हे घर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण इंगळे बांधत आहेत.त्यांना इंजिनिरर्सकडून या नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. शहरात उन्हाळा कडक असतो. या तंत्राने घर तर मजबूत होणार आहेच शिवाय उन्हाळाही जास्त भासणार नाही. या घरासाठी थर्माकोलचे 200 पॅनेल उपयोगात आणले गेले आहेत. एक पॅनेल 11 फुटाचा आहे. रुंदी 4 फूट आहे. जाडी 3.5 इंच आहे. भिंतीची जाडी 5 इंच आहे.
     विजय शील कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक प्रणव पाटील, या घराची निर्मिती करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार थर्माकोलबरोबर तारांच्या थ्रीडी जाळींमुळे घराला मजबुती येणार आहे. थ्रीडी तारांच्या जाळींमुळे याचा प्रत्येक बॉक्स आपले वजन स्वत: पेलणार आहे. नेहमीच्या घरांमध्ये वजन पिलवर पडते. यामुळे छत काही वर्षात खराब होऊन जाते. पण या घरांमधील छत हलके असल्याकारणाने जास्त वर्षे टिकते. शिवाय या घरांच्या निर्मितीसाठी जास्त परिश्रम घ्यावे लागत नाहीत.



No comments:

Post a Comment