Monday, January 29, 2018

मुलांच्या भाषणाला दाद देणारे गावकरी


      मी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकुंडी (ता.जत) शाळेत हजर झालो होतो. तिथले दोन शिक्षक माझीच वाट पाहात होते. कारण त्यांची त्यांच्या जिल्ह्यात बदली झाली होती आणि त्यांना मुक्त करायला कुणी तरी अनुभवी शिक्षक हवा होता.त्यात मुख्याध्यापक चार्ज असलेल्या शिक्षकालाही मला सोडावे लागणार होते. साहजिकच माझ्याकडे मुख्याध्यापक चार्ज येणार होता. माझ्या अगोदर फक्त चार दिवस दोन नवे फ्रेश शिक्षक इथे हजर झाले होते. एक नांदेड आणि एक बीडचा होता. अगोदरच्या स्टाफमधला एकच शिक्षक उरला होता. तो खानापूर    ( जि.सांगली) तालुक्यातला  होता. ते दोन वर्षापूर्वीच या शाळेत होते. म्हणजे मला सगळं नवं होतं,गाव,शाळा आणि शिक्षक.

     काही दिवसांतच 15 ऑगस्ट होता. कळलं की, शाळेच्या  ध्वजारोहणविषयी वाद होतात.पण नियमाने चालले की, काही होत नाही. त्यामुळे तो वाद फार मनावर घेतला नाही. 15 ऑगस्टची तयारी झाली. त्या दिवशी झकासपैकी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. शाळेचा ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर ग्रामपंचायत कार्यालय आणि सोसायटीचा ध्वजारोहण पार पडला आणि पुढचा कार्यक्रम पुन्हा जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणांवर होणार होता. अगोदर मी विचारून घेतले होते, या ठिकाणी काय काय होतं. मुलांची छोटी छोटी भाषणं,काही देशभक्तीपर गाणी होतात,हे कळलं होतं. आम्ही मुलांना भाषण लिहून द्यायचं ठरलं होतं,पण मुलंच म्हणाली, आमचं आम्ही भाषणाची तयारी करतो. मलाही बरं वाटलं होतं. कारण बऱ्याच मुलांना भाषण लिहून द्यायचं म्हणजे एक दिव्यच असते. 
     लहान मुलांना मात्र शिक्षकांनी भाषणे लिहून दिली होती. 15 ऑगस्टदिवशी मी फक्त निरीक्षण करण्याचेच काम करत होतो. कारण माहीत आहेच,मी तिथे नवीन होतो. हायस्कूलची मुले आणि आमची मुले एकत्रित भाषणे करणार होती. इथे तसा पायंडा पडला होता. हायस्कूलच्या एका पोराने भाषणाला सुरुवात केली.गड्याने अगदी जोशपूर्ण भाषण केले. मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. त्याचे भाषण संपले आणि तो त्याच्या जागेवर जाऊ लागला.मात्र इकडे निवेदक शिक्षक अमुक यांच्याकडून दहा रुपये,तमुक यांच्याकडून दहा रुपये ..... मुलगा  जाता जाताच थांबला. जवळपास सात-आठ जणांनी दहा-वीस रुपये करत दीडशेवर रुपये दिले होते. भाषण केलेल्या मुलाने  मान्यवरांचे आभार मानत पैशांचा स्वीकार केला. मग माझ्या लक्षात आलं की,इथे काही वेगळंच प्रकरण आहे.
     प्रत्येक मुलाच्या भाषणानंतर व्यासपीठावर बसलेल्या प्रतिष्ठित लोकांच्या खिशात हात जात होते. हायस्कूल आणि आमच्या शाळेतील मुलांनी मिळून 30-35 मुलांनी भाषणे केली होती आणि त्या सर्वांना बक्षीसाच्या रूपाने शंभर-दीडशे रुपये मिळाले होते. मग माझ्या लक्षात आले की, मुलं उत्स्फूर्तपणे भाषण किंवा गाणी यात सहभाग का घेत होते. आम्हाला त्यासाठी काही तयारी करावीच लागत नव्हती. वेळ होतोय म्हणून काही मुलांच्या भाषणाला कात्री लावली होती.ती मुलंदेखील नाराज दिसत होती. पण नाईलाज होता.
     26 जानेवारीला याबाबत थोडे नियोजन करण्याचे ठरवले.त्यानुसार आम्ही या खेपेला सर्व वर्गातून भाषण,गाणी म्हणणाऱ्या मुलांची यादी तयार केली. विशेष म्हणजे वरच्या वर्गातल्या मुलांना याही वेळी भाषण लिहून द्यावे लागले नाही. मात्र आम्ही फिल्टर लावून मोजकीच मुले निवडली. मुलांनी इंग्रजी,हिंदी आणि मराठी भाषेत भाषणाची तयारी केली होती. राष्ट्रीय नेत्यांची चरित्रे, राष्ट्रीय सण, प्रजासत्ताक दिन, अंधश्रद्धा,मुलगी वाचवा,व्यसन, आई अशा किती तरी विषयावर मुलांनी भाषणे केली. भाषणाची उत्तम झाल्याने कार्यक्रम छान झाला. व्यासपिठावरील प्रतिष्ठित लोकांनी या भाषणाला दाद देत आपल्या खिशात हात घालून मुलांवर बक्षीसांचा वर्षाव करत होते.
     यात एका माजी सरपंचाच्या मुलीने जोरदार, आवेशपूर्ण भाषण केले. तिचे भाषण झाल्यावर निवेदकाने तिथे उपस्थित असलेल्या तिच्या वडिलांना उद्देशून म्हटले, 'दादा,आता तुम्ही रिटायर्डमेंट घ्यायला हरकत नाही. तुमची जागा घ्यायला माणसे तयार होत आहेत.' लोकांनी त्याला टाळ्या वाजवून दाद दिली. पण त्याचे म्हणणे  खरेच होते. राजकारणी यातून घडो अथवा न घडो मात्र यातून नक्कीच एकादा वक्ता तयार होईल. आम्ही फक्त त्याला खतपाणी घालण्याचे ठरवले आहे. गावकऱ्यांच्या  नकळत घडणाऱ्या प्रोत्साहनाने इथे वक्त्यांची पिढी घडणार आहे. गावाला याची कल्पना नसावी.

No comments:

Post a Comment