Monday, January 22, 2018

गरिबांच्या मुलांसाठी अंगणवाडी चालवली

     सुशिला कोळी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अब्दुललाट गावातल्या लक्ष्मीनगरवस्तीत राहतात. त्यांना त्यांच्या लग्नाच्या वयात बाबूराव कोळी यांचा लग्नाचा प्रस्ताव आला होता.मात्र ते विधुर होते. त्यांना पहिल्या बायकोची दोन मुले होती. हा प्रस्ताव सुशिला यांच्या घरच्यांनी नाकारला,पण त्यांनी मात्र बाबूराव यांच्याशीच लग्न करण्याचा निश्चय केला. त्यांचा स्वभावच वेगळा होता. लग्न केले तर बाबूरावशीच, असा निग्रह करतानाच त्यांनी फक्त त्यांच्याशी विवाह करणार नाही तर त्यांच्या मुलांचेदेखील पालनपोषण करीन, असे आपल्या घरच्यांना निक्षून सांगितले. शेवटी त्यांनी घरच्यांचा विरोध जुगारून बाबूराव यांच्याशी विवाह केला.

     सुशिला यांना शिक्षणाचे महत्त्व माहित होते.त्यांना वाटत होते की, त्यांच्या मुलांनीही चांगलं शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटे. पण त्या वस्तीत राहत होत्या, तिथे लहान मुलांना शिकण्यासाठी अंगणवाडी किंवा शाळा नव्हती.त्यामुळे मुलांची इच्छा असूनही त्यांना शिकता येत नव्हते.त्यांना शेतात काम करावं लागत होतं. मुलांना वस्तीतल्या मुलांना शिक्षण मिळत नाही, याचे त्यांना दु:ख होत होते.त्या शिकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनीच विचार केला की, आपणच का नाही आंगणवाडी चालवायची? यासाठी त्यांनी सरकारी मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली.शेवटी त्यांनी 1991 मध्ये स्वत:च आपल्या घरात अंगणवाडी सुरू केली. सुरुवातीला सुरुवातीला त्यांच्या घरात शिक्षण घ्यायला येणार्या मुलांची संख्या फार कमी होती. बहुतांश पालक त्यांच्या पाल्याला शेतात काम करायला न्यायचे,त्यामुळे मुले अंगणवाडीत शिकायला येत नव्हते. मग त्यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचे अभियान उघडले.
     त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागला. मुलांची संख्या वाढू लागली.मुले शिकायला लागली. त्यांच्यातला जोश त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी किती आस्था आहे, ते दाखवत होते. काम करणे ही त्यांची मजबुरी होती. लागोपाठ दोन वर्षे घरातच मुलांना शिकवत असताना मुलांची संख्या वाढू लागली. घरातली जागा कमी पडू लागली. शेवटी त्यांनी जवळच्या एका मंदिरात अंगणवाडीची सोय केली.
जवळपास आकरा वर्षे मुलांना शिकवत राहिल्या. या कालावधीत त्यांनी सुमारे अडीचशे मुलांना शिक्षण दिले. पायाभूत शिक्षण त्यांनी अगदी मोफत दिले. पैसे म्हणून त्यांनी कुणाचे घेतले नाहीत. मात्र काही पालक धान्य वगैरे आणून देत. शेवटी त्यांच्या अंगणवाडीचे रुपांतर सरकारी बालवाडीत झाले,त्यावेळेला त्यांचे शिकवण्याचे काम थांबले. नंतर तिथे जिल्हा परिषदेची शाळादेखील सुरू झाली. सरकारी लोकांना इथे शाळेची गरज आहे, याची जाणीव झाल्यावर त्यांनी शाळा सुरू केली असावी, असे सुशिला कोळी सांगतात.
     सुशिला यांच्या पतीची दोन्ही मुले उच्च शिक्षित आहेत. त्यातला एक शिक्षक तर एक पोलिस इन्स्पेक्टर आहे. बाबूराव आणि त्यांचीही एक मुलगी आहे. ती भूगोलची प्राध्यापिका असून सध्या पी.एचडी करत आहे. आकरा वर्षे मुलांना शिकवताना जो आनंद मिळत होता, तितका आनंद त्यांना कधीच मिळाला नाही, असे त्या सांगतात. शिक्षण कुणालाही खरे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम करते. त्या आयुष्यात एकदा तरी शिक्षक व्हावं, असं लोकांना सांगत असतात.

1 comment:

  1. सर, मस्‍तच, आज तुमचे तीन ब्‍लॉग वाचले, अगदी हरवून जाते वाचताना

    ReplyDelete