Saturday, January 20, 2018

शेतीत नवे तंत्रज्ञान यावे

देशातल्या शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या कमी करण्यात आपल्याला अपयश आले आहे. अजूनही 60 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना अधिक सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे. आज नवे तंत्रज्ञान व स्वयंचलीत यंत्रे यांचा वापरही वाढला आहे,पण शेतकऱ्याला स्थैर्य नाही. बेभरवशाचा पाऊस, वाढती महागाई यामुळे शेतकऱ्याचा व्यवहार आतबट्ट्याचा सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शेतीत काही तरी बिघडले आहे, हे जाणून घेऊन त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती साधली जाणार आहे.  यासाठी कृषी क्षेत्रात नव्याने संशोधन होण्याची गरज आहे.
     आजच्या पिढीला हवे व गरजेचे असलेले संशोधन केवळ अत्यल्प काळामध्येच कालबाह्य होत आहे. त्यामुळे नव्याने व कल्पनेपलीकडील संशोधन गरजेचे असून आजच्या पिढीपुढे हे एक मोठे आव्हान आहे. आज आपण हवामान बदलांच्या आव्हांनांना सामोरे जाऊनदेखील आपल्या देशाने कृषी उत्पादनात विविध विक्रम केले आहेत.तरुणांनी कृषी किंवा कृषी पूरक क्षेत्रात पुढे यायला हवे. यापुढे कृषी क्षेत्रालाच भविष्य आहे ,हे लक्षात घेतले पाहिजे.
   जगाच्या वेगवान आणि बदलत्या संकृतीत भविष्यात आपल्यासमोर बरेच आव्हाने येणार आहेत. या आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी नवीन संशोधन आणि कल्पकता हे शिक्षणाचा अविभाज्य भाग होणे गरजेचे आहे.या वेगवान बदलत्या युगात कृषीला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यायलाच हवा आहे. देशाचे भविष्य तरुणांच्या संशोधनावर अवलंबून आहे. नवे  उपक्रम तरुणांच्या संशोधन बुद्धीला चालना देतील.



No comments:

Post a Comment