Tuesday, January 16, 2018

मुलांचे मानसिक आरोग्य बिघडतेय

     आज मोबाईल, टॅब, टीव्ही यामध्ये गुंतलेल्या मुलांचे जर बारकाईने निरीक्षण केले, तर त्यांच्यातील अनेक गंभीर प्रकार आपल्याला दिसून येतील. गेल्या काही वर्षांत मैदानी खेळ हा प्रकार लुप्त होत चालल्याने एकूणच मुलांच्या शारीरिक आणि पर्यायाने मानसिक आरोग्यावर याचे खूप मोठे परिणाम जाणवू लागले आहेत. याला अर्थातच शासनाचे धोरण, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची अनास्था, शाळेतील शिक्षण, पालकांची मानसिकता कारणीभूत आहे. हा एकूणच या प्रकाराला वेळीच आवर घातला नाही, तर येत्या काळात त्याचे आणखी दुष्परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

     आज अनेक शाळांना शासकीय नियमानुसार मैदान नाही. मोठ्या शहरात जागा नसल्याने शाळांची मजल्यावर मजली बांधली गेली आहे. जिथे वर्गखोल्यांनाच जागा नाही,तिथे मैदाने कोठून आणणार? असा प्रश्‍न आहे. तालुकास्तरीय शहरांमध्येदेखील आता शाळांसाठी मैदाने नसल्याचे आढळून येत आहे. प्राथमिक शाळां तर अगदी खेड्यातदेखील मैदाने नाहीत. त्यामुळे नियमांच्या पायमल्लीची सुरुवात ही शासकीय शाळांकडूनच होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच  विद्यार्थ्यांना अधिकाधिक खेळाकडे वळवावे, असे आवाहन केले आहे. मात्र, याच शासनाने निर्णय काढत क्रीडा शिक्षकांना पन्नास रुपये ताशी मानधनाचा फतवा काढला आहे. यातच शासनाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. शाळांमध्ये दर महिन्याला योगदिन साजरा करावा हा फतवा जरी योग्य असला, तरीही योगाबरोबरच नैसर्गिकपणे खेळ खेळणे देखील तितकेच गरजेचे आहे. पालकांमध्य याबाबत मोठी जनजागृती होणे गरजेचे आहे. आपले मूल खेळताना पडणार, त्याला ऊन लागणार या गोष्टी पालकांनीही मान्य करून त्याप्रमाणे त्याला मोकळीक देणे गरजेचे आहे, तरच एक चांगला विद्यार्थी पर्यायाने चांगला माणूस तयार होण्यास मदत होईल
क्रीडा शिक्षकांना कवडीमोल मानधन
पूर्वी एका शाळेत एक पूर्णवेळ क्रीडा शिक्षक, तर अन्य बीपीएड व बीएड झालेले दोन तीन शिक्षक असत. ते पूर्णवेळ शिक्षक म्हणून त्यांना पगार मिळत असे. मात्र, शासनाने 23 ऑगस्ट 2015 रोजी ताशी पन्नास रुपये मानधन करत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले. त्यामुळे एखाद्या शाळेला पूर्णवेळा क्रीडा शिक्षक ही संकल्पनाच बंद झाली. या तासिका मानधनावर काही राज्यस्तरीय निवृत्ती खेळाडूंची निवड करावी, असे सांगितले. मात्र, केवळ पन्नास रुपये मानधनासाठी कोणीही मुलांना शिकवण्यासाठी येत नाहीत, अशी माहिती शिक्षकांनी दिली. त्यामुळे काही शाळांमध्ये मैदाने असूनही अनेक शाळांचे मैदानी खेळ क्रीडा शिक्षकाअभावी बंद झाले आहेत.
शाळांना किती मैदान असावे?
प्रत्येक शाळेत मैदान हे असायलाच हवे, असे शाळा मान्यतेच्या कायद्यात म्हटले आहे. तरीदेखील आज शहरातील; तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांना मैदानेच नाहीत. ग्रामीण भागात मैदाने नसली, तरीही किमान मोकळ्या वातावणात वावरण्यासाठी जागा तरी आहे. मात्र, शहरी भागात तर तीही सोय नसते. खरेतर कायद्यात नमूद केल्याप्रमाणे शहरी भागातील शाळांसाठी एक एकर, तर ग्रामीण भागातील शाळांसाठी दोन एकर मैदान असणे गरजेचे आहे. मात्र, शहरांतील शाळांचा आढावा घेतला, तर अनेक शाळांमध्ये एक एकरपेक्षा कमी मैदान आहे.
राज्यभरातील मैदानांची आकडेवारी
2016-17 च्या युडाएसने राज्यभरातील 97 हजार 84 शाळांचे सर्वेक्षण केले असून, 84 हजार 948 शाळांमध्ये मैदान आहे. म्हणजेच 87.5 टक्के शाळांमध्ये मैदान असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठीची मैदानांची टक्केवारी केवळ 84 टक्के एवढीच आहे. मात्र, हीे मैदाने नियमानुसार आहेत की नाही, याबाबत कोणताही उल्लेख नाही. 2013-14 च्या आकडेवारीत शाळांच्या मैदानाचे प्रमाण 82.5 टक्के इतके होते.बहुतांश शाळांनी मैदानाचा बोगस आकडा सादर केला आहे. मैदान नाही म्हणून दाखवल्यास नसती झंझट लागायला नको, असा यामगाचा दृष्टीकोन आहे.
पालकांची मानसिकताही कारणीभूत
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्यामुळे एकाच घरात अनेक मुलं वाढायची. त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी अनेक समवयस्क मित्र असायचे. आता मात्र मुलांबरोबर पालकांनाच खेळावे लागते. कधी एकच मुलगा असल्याने त्याच्या वाट्याला एकटेपणाच येतो. त्याशिवाय अनेक पालक आपल्या एकुलत्या एक मुलांबाबत अतिसंवेदनशील असतात. परिणामी ते मुलाची गरजेपेक्षा जास्त काळजी घेतात. ते मुलांना पाय दुखतील, लागेल, धडपडेल, उन्हाचा त्रास होईल, या काळजीपोटी खेळही खेळू देत नाही. काही पालक तर मुलांनी त्रास देऊ नये, एका जागी शांत बसून राहावे, यासाठी त्याच्या हातात मोबाईल व कॉम्प्युटर खेळावयास देतात किंवा मुलांनी घराबाहेर जाऊ नये, यासाठी पालकच मुलांना कार्टून चॅनेल्स लावून देतात. त्यामुळे या सगळ्याचा एकूणच मुलांच्या सवयींवर परिणाम होऊन मुलं मैदानी खेळ खेळण्यापेक्षा या उपकरणांमध्येच अधिक रमू लागतात.
शारीरिक क्षमता झाली कमी
व्यायाम नसल्यामुळे शारीरिक क्षमता कमी होते. त्यामुळे थोडे श्रम झाले तरी चिडचिडेपणा वाढतो. खेळ खेळल्यामुळे क्षमतेत वाढ होण्यासह मन प्रसन्न राहण्यास मदत होते. मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ ही समप्रमाणात होते. यामुळे मुलांमध्ये एकाग्रता वाढते. खेळ खेळल्यामुळे मुलांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. एका विशिष्ट वयात मुलांमधील ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असते. मैदानी खेळांमुळे या ऊर्जेला एक शिस्तबद्ध वाट करून दिली जाते. त्यामुळे भावनांची कोंडी होत नाही. त्यांच्या भावनांचा चुकीच्या पद्धतीने उद्रेक होत नाही. पालकांनी पुढील काळासाठी मुलांना तयार करायचे असेल, तर अतिसंभाळ, अतिकाळजी कमी करावी. त्यांना सूचना करण्याऐवजी त्यांचे निरीक्षण करून त्यांना पोषक वातावरण निर्माण करून द्यावे. मुलांनी कमीत कमी तासभर खेळलं पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही.त्यामुळे मुलांची शारीरिक क्षमता कमी होत चालली आहे.
आकलन क्षमता मंदावते
मुलं मैदानी खेळ खेळत नाहीत, याचे गेल्या काही वर्षांत फार गंभीर प्रकार समोर आले आहेत. प्रार्थनेसाठी अर्धा तास उभे राहण्याचीसुद्धा मुलांची शारीरिक क्षमता नसते. कित्येक विद्यार्थी प्रार्थना सुरू असताना चक्कर येऊन पडतात. यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. आमच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी असे प्रकार घडून आलेले आहेत. मुलं मैदानी खेळ न खेळल्यामुळे त्यांनी आकलन क्षमता मंदावते, असे दिसून आले आहे. त्यामुळे मुलांच्या एकूणच अभ्यासावरहीच याचा परिणाम होतो; तसेच त्यांच्यातील चिडचिडेपणाही वाढतो असे दिसून आले आहे.
शिक्षक,पालक यांनी जागरुक व्हायला हवे.
मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी किंवा वाढीसाठी शाळा स्तरावर खास प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.दररोज शारीरिक श्रम होईल,यादृष्टीने काही उपाययोजना राबवल्या पाहिजेत.पालकांनी खास करून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यायामाचे महत्त्व मुलांमध्ये बिंबवण्याची गरज आहे. घरी पहाटे योगासनाबरोबरच चालणे,धावणे या गोष्टी मुलांकडून करून घेण्याची आवश्यकता आहे. 


No comments:

Post a Comment