Wednesday, January 31, 2018

भुरट्या चोर्‍या आणि आपण


     चोरी करणार्याला कुठली वस्तू वर्ज्य नाही. काय मिळेल ते ढापायचा धंदा सध्या सुरू आहे. घराला कुलूप दिसले की, त्यादिवशी घर फोडलेच समजायचे. चोरी करणार्या लोकांना घराला कुलूप आहे, याचा सुगावा लागतोच कसा आणि आजूबाजूला असलेल्या लोकांना आपल्या भागात दिवसभरात कुणी येऊन गेला असेल, याची गंधवार्तादेखील कशी काय लागत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. मी, माझा या नादात माणूस आपलेच नुकसान करून घेत आहे. स्वत:चे बघताना एकवेळ अशी वेळ आपल्यावर येणार आहे,याची त्याला कल्पना का येत नाही? शेजारधर्म पाळताना शेजारच्या घरात कोण डोकावते आहे, याची तसदी घ्यायला नको का? शेजारी किंवा आजूबाजूला कोण येतो,कोण जातो,याची चौकशी करायला हवी. सावधानता बाळगायला हवी. एकमेकांना साह्य न करण्याच्या वृत्तीमुळे शहरातल्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहणार्या लोकांना चोरीच्या भयाने घर सोडून कुठे जाता येत नाही. नाही तर आपल्या विश्वासातल्या कुणाला तरी घरात झोपवावे लागते. समाजात राहताना इतरांची मदत घेतल्यास चांगला फायदा होतो,मात्र स्वत:च स्वत:चे रक्षण करताना अडचणी या येतातच.त्यामुळे जिथे इतरांच्या मदतीची गरज आहे, तिथे आवश्य त्यांची मदत घ्यायला हवी.

     आमच्या शेजारी पती-पत्नी शिक्षक राहतात. शेजार्याशी बोलायचे नाही.त्यांच्याकडे काय चालले आहे, याची विचारपूस करायची नाही. एकदा रात्री त्यांच्या घरातून सोन्याची चैन, अंगठी वगैरे चोरीला गेली. त्यांनी बाहेर येऊन फार दंगा- आदळआपट केली. पण लोकांना त्यांच्यात चोरी झाली की नाही,याबाबत शंका येऊ लागली. लोकांच्यात राहिल्यावर त्यांना त्यांची सहानुभूती मिळणार असते. नाही तर असा कोडगेपणा राहतो. लोकांच्या अशा स्वभावाचाच फायदा चोरटे घेत असतील. त्यामुळे समाजात वावरताना पैशांची घमेंड बाळगून चालत नाही. पैसा काय आज आहे,उद्या नाही.पण माणुसकी महत्त्वाची आहे.ही माणुसकी जपण्याची आवश्यकता आहे.
     अलिकडच्या काळात चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी चोरटे चोरी करायचे,पण कुणावर हात उचलत नव्हते.कुणावर हत्यारांनी वार करत नव्हते.पण आता चोरटे लोकांचे मुडदे पाडून चोरी करत आहेत. इतके लोक निर्ढावले आहेत. क्रूर बनले आहेत. आता वाटमारी वाढली आहे. शहरात सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढत आहे. या चोर्या पोट भरण्यासाठी कमी आणि चैनी करण्यासाठी जास्त, असा प्रकार होत आहे. त्यामुळे हाताला येईल,ते लांवायचे,अशा गोष्टी आढळून येत आहेत. पूर्वी फक्त ठराविक समाजच चोरी करायचा,पण आजकाल चैनीसाठी पैसे कमी पडू लागल्याने कोणीही चोरी करू लागला आहे.यात साहजिकच युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.
     घराच्या दारात,पाठीमागे वगैरे एकादी वस्तू पडली तर ती काही वेळात दिसूनही येत नाही. पाणी तापवण्याचे पितळी बंब वापरण्याचे प्रमाण अलिकडेच याचमुळे कमी झाले आहे. भुरट्या चोर्या तरुण वर्ग,शाळकरी मुले,दारुडे करताना दिसत आहेत.अलिकडच्या काही वर्षात पेट्रोल चोरीचा प्रकारही वाढला आहे. यात युवकांचा समावेश आहेच,शिवाय दहा-बारा वर्षाची पोरेदेखील आपला हात आजमावताना दिसत आहेत. किराणा दुकाने फोडणे,पानटपर्या फोडणे, छोटी हॉटेल्स,बॉयलर कोंबड्याची दुकाने फोडून कोंबड्या पळवणे असे कितीतरी प्रकार आजूबाजूला घडताना दिसतात. लोखंडी साहित्य चोरण्याचा प्रकारही वाढला आहे. भांडी-कुंडी,सायकल,मोटारसायकली, स्लॅबचे लोखंडी गज, गाडीच्या टायरी,रीम असे कितीतरी वस्तू हातोहात लंपास होत असतात.
     या भुरट्या चोर्यांमध्ये पेट्रोल चोरीचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. घरापुढे लावलेल्या गाडीतून रात्री- अपरात्री सहज पेट्रोल काढून नेले जात आहे. पोलिसांचा रात्रीचा गस्त असला तरी या पेट्रोल चोरीला आळा बसवणे अवघड झाले आहे. यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. सकाळी लवकर उठून कुठे तरी जाण्याचा प्लॅन ठरवा आणि गाडी सुरू होऊ नये, असा अनेकांना अनुभव आला असेल. या घटना पोलिस लोक अजिबात गंभीरपणे घेत नाहीत. त्यांना यात काहीच स्वारस्य नसते. यामुळे चोरटे मात्र मोकाट राहातात. त्यांच्या चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ होतराहते. अशा वेळेला आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. खरे तर नागरिकांनी अंगणात,पार्किंगमध्ये दिवे रात्री सुरू ठेवावेत. पेट्रोल टाकीपासून इंजिनकडे जाणार्या पाईपला लॉक बसवून घ्यायला हवे. त्यामुळे वाहन चोरीचा धोका कमी होतो. घर, इमारतीचा परिसर, पार्किंग, अंगणात शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यायला हवेत,यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्रितरित्या येऊन व वर्गणी काढून अशी सीसीटीव्ही युनिट्स बसवायला हवीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेजारी शेजारी यासाठी जात-धर्म,भेदभाव,गरीब- अमीर असा कसलाच भेद मनात न आणता एकमेका सहाय्य करू। अवघे धरु सुपंथ या संतांच्या विचाराचे अनुसरण करायला हवे.

Monday, January 29, 2018

मुलांच्या भाषणाला दाद देणारे गावकरी


      मी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकुंडी (ता.जत) शाळेत हजर झालो होतो. तिथले दोन शिक्षक माझीच वाट पाहात होते. कारण त्यांची त्यांच्या जिल्ह्यात बदली झाली होती आणि त्यांना मुक्त करायला कुणी तरी अनुभवी शिक्षक हवा होता.त्यात मुख्याध्यापक चार्ज असलेल्या शिक्षकालाही मला सोडावे लागणार होते. साहजिकच माझ्याकडे मुख्याध्यापक चार्ज येणार होता. माझ्या अगोदर फक्त चार दिवस दोन नवे फ्रेश शिक्षक इथे हजर झाले होते. एक नांदेड आणि एक बीडचा होता. अगोदरच्या स्टाफमधला एकच शिक्षक उरला होता. तो खानापूर    ( जि.सांगली) तालुक्यातला  होता. ते दोन वर्षापूर्वीच या शाळेत होते. म्हणजे मला सगळं नवं होतं,गाव,शाळा आणि शिक्षक.

     काही दिवसांतच 15 ऑगस्ट होता. कळलं की, शाळेच्या  ध्वजारोहणविषयी वाद होतात.पण नियमाने चालले की, काही होत नाही. त्यामुळे तो वाद फार मनावर घेतला नाही. 15 ऑगस्टची तयारी झाली. त्या दिवशी झकासपैकी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. शाळेचा ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर ग्रामपंचायत कार्यालय आणि सोसायटीचा ध्वजारोहण पार पडला आणि पुढचा कार्यक्रम पुन्हा जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणांवर होणार होता. अगोदर मी विचारून घेतले होते, या ठिकाणी काय काय होतं. मुलांची छोटी छोटी भाषणं,काही देशभक्तीपर गाणी होतात,हे कळलं होतं. आम्ही मुलांना भाषण लिहून द्यायचं ठरलं होतं,पण मुलंच म्हणाली, आमचं आम्ही भाषणाची तयारी करतो. मलाही बरं वाटलं होतं. कारण बऱ्याच मुलांना भाषण लिहून द्यायचं म्हणजे एक दिव्यच असते. 
     लहान मुलांना मात्र शिक्षकांनी भाषणे लिहून दिली होती. 15 ऑगस्टदिवशी मी फक्त निरीक्षण करण्याचेच काम करत होतो. कारण माहीत आहेच,मी तिथे नवीन होतो. हायस्कूलची मुले आणि आमची मुले एकत्रित भाषणे करणार होती. इथे तसा पायंडा पडला होता. हायस्कूलच्या एका पोराने भाषणाला सुरुवात केली.गड्याने अगदी जोशपूर्ण भाषण केले. मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. त्याचे भाषण संपले आणि तो त्याच्या जागेवर जाऊ लागला.मात्र इकडे निवेदक शिक्षक अमुक यांच्याकडून दहा रुपये,तमुक यांच्याकडून दहा रुपये ..... मुलगा  जाता जाताच थांबला. जवळपास सात-आठ जणांनी दहा-वीस रुपये करत दीडशेवर रुपये दिले होते. भाषण केलेल्या मुलाने  मान्यवरांचे आभार मानत पैशांचा स्वीकार केला. मग माझ्या लक्षात आलं की,इथे काही वेगळंच प्रकरण आहे.
     प्रत्येक मुलाच्या भाषणानंतर व्यासपीठावर बसलेल्या प्रतिष्ठित लोकांच्या खिशात हात जात होते. हायस्कूल आणि आमच्या शाळेतील मुलांनी मिळून 30-35 मुलांनी भाषणे केली होती आणि त्या सर्वांना बक्षीसाच्या रूपाने शंभर-दीडशे रुपये मिळाले होते. मग माझ्या लक्षात आले की, मुलं उत्स्फूर्तपणे भाषण किंवा गाणी यात सहभाग का घेत होते. आम्हाला त्यासाठी काही तयारी करावीच लागत नव्हती. वेळ होतोय म्हणून काही मुलांच्या भाषणाला कात्री लावली होती.ती मुलंदेखील नाराज दिसत होती. पण नाईलाज होता.
     26 जानेवारीला याबाबत थोडे नियोजन करण्याचे ठरवले.त्यानुसार आम्ही या खेपेला सर्व वर्गातून भाषण,गाणी म्हणणाऱ्या मुलांची यादी तयार केली. विशेष म्हणजे वरच्या वर्गातल्या मुलांना याही वेळी भाषण लिहून द्यावे लागले नाही. मात्र आम्ही फिल्टर लावून मोजकीच मुले निवडली. मुलांनी इंग्रजी,हिंदी आणि मराठी भाषेत भाषणाची तयारी केली होती. राष्ट्रीय नेत्यांची चरित्रे, राष्ट्रीय सण, प्रजासत्ताक दिन, अंधश्रद्धा,मुलगी वाचवा,व्यसन, आई अशा किती तरी विषयावर मुलांनी भाषणे केली. भाषणाची उत्तम झाल्याने कार्यक्रम छान झाला. व्यासपिठावरील प्रतिष्ठित लोकांनी या भाषणाला दाद देत आपल्या खिशात हात घालून मुलांवर बक्षीसांचा वर्षाव करत होते.
     यात एका माजी सरपंचाच्या मुलीने जोरदार, आवेशपूर्ण भाषण केले. तिचे भाषण झाल्यावर निवेदकाने तिथे उपस्थित असलेल्या तिच्या वडिलांना उद्देशून म्हटले, 'दादा,आता तुम्ही रिटायर्डमेंट घ्यायला हरकत नाही. तुमची जागा घ्यायला माणसे तयार होत आहेत.' लोकांनी त्याला टाळ्या वाजवून दाद दिली. पण त्याचे म्हणणे  खरेच होते. राजकारणी यातून घडो अथवा न घडो मात्र यातून नक्कीच एकादा वक्ता तयार होईल. आम्ही फक्त त्याला खतपाणी घालण्याचे ठरवले आहे. गावकऱ्यांच्या  नकळत घडणाऱ्या प्रोत्साहनाने इथे वक्त्यांची पिढी घडणार आहे. गावाला याची कल्पना नसावी.

Sunday, January 28, 2018

महाराष्ट्र सरकार नोकरी देण्यात अपयशी


     आज खूप मोठी संख्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. अलीकडच्या काही वर्षात नव्याने  शासकेय स्तरावर नोकरभरती करण्यात आली नाही. त्यामुळे आजची युवापिढी चिंतेच्या गर्तेत सापडली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्या तीन वर्षाच्या सत्ता काळातही बेरोजगारांना आशेचा किरण दिसला नाही. या सरकारने रोजगारनिर्मितीवर भर आणि शासकीय नोकर्‍यांमध्ये तरुणांना संधी देण्याची वल्गना केली होती. मात्र ती फक्त वल्गनाच राहिली आहे. उलट नुकताच शासकीय नोकर्‍यांमध्ये 30 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामु़ळे बेरोजगारांच्या आशेवर पाणी फिरले आहे. सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय आणि कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सगळीकडे भितीचे वातावरण पसरले आहे. हे वातावरण सर्वच क्षेत्रात असून लोकांना भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे,याची चिंता सतावत आहे.

     राज्य सरकारने सर्वच क्षेत्रात नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. सध्या सरकारने पैसे कमावण्याचे नवीनच तंत्र विकसित केले आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काही ठराविक जागांसाठीच जाहिरात काढून, परीक्षा शुल्काच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करण्यात येत आहे. परंतु, एका माहितीच्या अधिकारातून शासनाच्याच विविध प्रशासकीय विभागांमध्ये सरळसेवा भरती व पदोन्नतीच्या तब्बल 1 लाख 77 हजार 259 जागा रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. रिक्त जागा जिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही बाब समाज दूषित करण्याचे काम सुरू आहे.
      सरकारी नोकरीच्या जागा न भरण्याचा निर्णय घेतला गेल्याने त्याचा वेगळाच परिणाम यायला लागला आहे. शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय विभागातील अ, , , ड या प्रवर्गातील सरळसेवा आणि पदोन्नतीच्या जागा भरल्याच जात नाहीत. त्यात सध्या तर तब्बल 30 टक्के नोकरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे; परंतु अपुर्‍या मनुष्यबळामुळे कामाचा बोजा वाढल्याची तक्रार सरकारी कर्मचार्‍यांकडून होत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट असून, विकासकामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘वित्तीय स्थैर्यासाठी’ या गोंडस नावाखाली राज्य सरकारकडून नवीन कर्मचार्‍यांची भरतीच करण्यात येत नसल्याचे वास्तव आहे.
      शासनाला प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील गटनिहाय (अ, , , ड) मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे यासंदर्भातील माहिती, बाबासाहेब रमेश कांबळे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागितली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेल्या माहितीमध्ये शासनाच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असून, शासनाने कर्मचार्‍यांची भरती करण्याची आवश्यकता असल्याचे दिसत आहे.  माहिती अधिकारातील माहितीनुसार, शासनाच्या गृह विभागाच्या 23 हजार 978 जागा रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 18 हजार 261 जागा रिक्त आहेत. जलसंपदा विभागाच्या 14 हजार 616 जागा रिक्त आहेत. कृषी विभागाच्या 11 हजार 907 जागा रिक्त आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात 3 हजार 236 जागा रिक्त आहेत. महसूल आणि वनविभागाच्या 9 हजार 239 जागा रिक्त आहेत.
      तसेच महसूल आणि वनविभागाच्या मदत आणि पुनर्वसन विभागात 700 जागा रिक्त आहेत; ज्या सरळसेवेने भरल्या जात नाहीत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात 6 हजार 478 जागा, वित्त विभागात 6 हजार 377 जागा, आदिवासी विकास विभागात 6 हजार 584 जागा, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात 3 हजार 280 जागा, सार्वजनिक बांधकाम विभागात 4 हजार 382 जागा, सहकार आणि पणन विभागात 2 हजार 640 जागा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात 2 हजार 447 जागा, उद्योग आणि ऊर्जा विभागात 2 हजार 814 जागा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 2 हजार 646 जागा, महिला व बालविकास विभागात 1 हजार 242 जागा, विधि आणि न्याय विभागात 926 जागानगरविकास विभागात 728 जागा, नियोजन विभागात 498 जागा, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात 4 हजार 688 जागा, ग्रामविकास आणि जलसंधारण विभागात 120 जागा, पर्यटन विभागात 256 जागा, सामान्य प्रशासन विभागात 2 हजार जागा, गृहनिर्माण विभागात 312 जागा, अल्पसंख्याक विकास विभागात 14 जागा, पर्यावरण विभागात 2 जागा, मराठी विभागात 65 जागा, तर जिल्हा परिषदेच्या 46 हजार 351 जागा रिक्त आहेत. अशा सरळसेवेच्या 1 लाख 29 हजार 16, तर पदोन्नतीच्या 48 हजार 243 जागा मिळून एकूण 1 लाख 77 हजार 259 जागा रिक्त आहेत. या जागा शासनाकडून भरण्यात येत नाहीत. परंतु काही ठराविकच जागा काढून पदभरतीचे गाजर दाखविले जाते आणि परीक्षा शुल्काच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली जात असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा, तसेच अन्य परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी केला जात आहे.
     राज्य सरकार बेरोजगारांना नोकरी देण्यात अपयशी ठरले आहे. सध्या पेट्रोल-डिझेल यांच्यासह भाजीपाला,धनधान्य,प्रवास, वीज,पाणी महाग होत चालले आहे. देशच काय राज्यदेखील अराजकतेच्या दिशेने सुरू आहे. कुठेच समाधानी चित्र नाही.खासगी क्षेत्रातदेखील मंदी आल्याने लोकांचा राज्य आणि मोदी सरकार यांच्यावरचा विश्वास उडत चालला आहे. हा विश्वास परत मिळविणे सध्या तरी कठीण दिसत आहे.
     राज्य सरकारने  शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी करण्यात झालेला कमालीचा उशीर शेतकऱ्यांना लाभाचा ठरला नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला हमीभाव मिळत नाही.बोंड अळीने कापूस उत्पादकाचे कंबरडेच मोडले आहे.त्यांना मदतीचा अजून पत्ता नाही. खासगी क्षेत्रात नोकऱ्या तयार होत नसल्याने परवा एका एमबीए युवकाने शिपाई पदासाठी अर्ज केला असल्याची बातमी वाचनात आली. ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. अनेक ठिकाणी दहावी-बारावी किंवा डिप्लोमा शिकलेल्या युवकांच्या हाताखाली इंजिनियर शिकलेले युवक कमी पगारात काम करत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या देशात युवापिढीची संख्या अन्य वयाच्या माणसांपेक्षा फार मोठी आहे. सुमारे 40 टक्के युवा वर्ग आपल्या देशात आहे. या लोकसंख्येला रोजगार मिळाला नाही,तर काय होऊ शकते, याचा अंदाज लावणे अवघड आहे.

तीन गोष्टी


खादाड कोळी 
     अनासी नावाचा कोळी गावाजवळच्या एका बाओबाब वृक्षाच्या ढोलीत राहत होता. तो फार आळशी होता. स्वत:साठी अन्न मिळवायलाही तो ढोलीच्या बाहेर फारसा पडायचा नाही. इमिनाथी नावाच्या मुलीला तो दररोज जंगलात जाताना पाहायचा. परत येताना तिची टोपली रसाळ द्राक्षे, लाल बोरे, पिवळीधम्मक केळी व मधाने काठोकाठ भरलेली असायची. तिच्याजवळून जंगल्यातील या मेव्याचे ठिकाण जाणून घेण्याचा निश्‍चय आळशी अनासीने मनाशी केला. बाओबाब जवळून ती जात असताना अनासीने तिच्या टोपलीत स्वत:ला जाणूनबुजून झोकून दिले. काही अंतर गेल्यावर तो इमिनाथीला हळूच म्हणाला, इमिनाथी, सर्व गावाला माहीत आहे. तू जशी सुमधुर फळे शोधतेस तसे कोणी करू शकत नाहीस. त्या सुमधुर फळांची जागा मला दाखवशिल का? मी वचन देतो की ती जागा मी इतर कुणाला दाखविणार नाही. इमिनाथी तर चिंतेत पडली कारण तिला अनासीचा लबाड स्वभाव माहीत होता. ठीक आहे, पण केवळ एकदाच मी तुला ती जागा दाखवीन. ती कोळ्याला म्हणाली. ते दोघे जंगलाच्या एका अतिशय घनदाट भागात गेले. तेथे फळांने लगडलेले अनेक वृक्ष होते. जागा कळल्यावर अनासीने इमिनाथीची पर्वा न करता प्रथम संत्री व बोरांवर ताव मारला. नंतर तो केळीच्या झाडावर चढला व सर्व केळी खाऊन टाकली. त्याचे पोट तुडुंब भरले होते पण खादाड कोळ्याला अजून मधाचा स्वाद चाखायचा होता.
इमिनाथीने एका झाडाच्या ढोलीकडे बोट दाखविले व ती म्हणाली, ह्लया ढोलीत मधाचे एक पोळे आहे. अनासीने लगेच त्या ढोलीत जाऊन पोळ्यातील मधावर ताव मारला. मधाचा शेवटचा थेंबही त्याने सोडला नाही. 
.................................................................................................................................................................................
कोल्हा आणि कोंबडा 
एका शेतकर्‍याने कोल्हय़ास पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता, त्यात सकाळीच एक भला मोठा कोल्हा सापडला. ती मौज दुरून एका कोंबड्याने पाहिली, परंतु कोल्हय़ासारख्या लबाड व दुष्ट शत्रूवर एकाएकी विश्‍वास ठेवणे बरे नव्हे, म्हणून तो हळूहळू भीत भीत सापळ्यापाशी आला आणि कोल्हय़ाकडे पहात उभा राहिला. कोल्हय़ाने त्यास पाहिले, तेव्हा तो मोठा संभावितपणाचा आव आणून त्यास म्हणतो, मुला, पहा मी कसा संकटात सापडलो आहे; आणि हे सगळे केवळ तुझ्यामुळे झाले; मी सकाळीच पलीकडल्या कुंपणांतून घराकडे जात असता, तुझा शब्द माझ्या कानी पडला, तेव्हा तुझी कशी काय हालहवाल आहे, ते विचारून मग जावे, अशा विचाराने मी इकडे आलो, तो या चापात अडकलो.आता कृपा करून तू जर मला एक बारीक काठी आणून देशील, तर ती या सापळ्यात घालून, मी आपली सुटका करून घेईन. हे तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि सापळ्यात कोल्हा अडकला आहे, असे त्याने आपल्या धन्यास सांगितले. तो शेतकरी एक मोठा सोटा घेऊन आला आणि त्याने त्या त्या कोल्ह्याची पाठ अशी मऊ केली की, त्या माराने तो कोल्हा ताबडतोब मरण पावला.
.................................................................................................................................................................................

राक्षस चोर आणि पुजारी 

एके दिवशी एका यजमानने त्या गरीब पुजार्‍याला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्याचं दैन्य पळाले. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोरीचा गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारले.चोर म्हणाला, मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस? अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. हय़ा ब्राह्मणाने मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचे, माझे अन्न-पाणी तोडले, पण आज मी त्यालाच खाणार आहे. झाले! दोघांचही लक्ष एक निघाले. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघे त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू! तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू? राक्षसाचे हे म्हणणे चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असे करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठय़ा आवाजचे भान राहिले नाही.


हसत जगावे 12


रिझल्ट
दामू:बाबा, उद्या माझा रिझल्ट आहे.                                  

बाबा:खूप छान!
दामू: जर मी पास झालो तर तुम्ही मला काय गिफ्ट देणार?
बाबा:एक कप चहा आणि एक केक.
दामू: आणि नापास झालो तर....?
बाबा:वीस चहाचे कप आणि वीस केक!
दामू: असं का?
बाबा: कारण त्यातून तू तुझे चहाचे दुकान सुरू करू शकशील.

रात्री उन्हात 
रुग्ण:डॉक्टर साहेब, मी जेवलो नाही तर भूक लागते आणि जास्त काम केले तर थकायला होतं. मला काय करायला हवं?
डॉक्टर: रात्रभर उन्हात बस. बरा होशील.

रुमाल 
रवीना:मला गेल्या दोन-चार दिवसांपासून सर्दी आहे.चांगला उपायच सापडत नाही.
अभिमन्यू: काही वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर डॉक्टर या निर्णयापर्यंत पोहचले आहेत की, सर्दीवर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ..... रुमालच आहे.

कोल्ड ड्रिंक 
वाघ: थांब, मी तुझे रक्त पिणार आहे.
म्हातारा: अरे, माझं रक्त थंड पडलय.एकाद्या तरुणाचं गरम रक्त पी.तुला त्याचा फायदाच होईल.
वाघ: गप्प बस! आज मला कोल्ड ड्रिंक पिण्याचा मूड आहे.

अंथरुण
शिक्षक: 'अंथरुण पाहून पाय पसरावे' याचे एक वाक्य बनवा.
रमेश:माणसाने अंथरुण पाहून पाय पसरावे, नाही तर थंडी वाजेल.

साप 
राजू: चला, आज खेळ इथेच थांबू. मला घरी जायचं आहे.
विजू: का रे! इतकी काय गडबड आहे.काही खास काम आहे का?
राजू: हो, अरे, तुला माहीत नाही का? आज टीव्हीवर 30 फूट लांब साप दाखवणार आहेत.
विजू: मला तर गड्या पाहताच येणार नाही.
राजू: का रे
विजू: अरे, आमचा टीव्ही 21 इंचाचा आहे.

ढोल 
एक मदारी रस्त्याच्या कडेला ढोल वाजवून माकडांचा खेळ दाखवत होता. जसजसा मदारी ढोल वाजवायचा, तसतसे माकड पंचवीस फूट बांबूवर पटापट चढायचा आणि ऊतरायचा.हे पाहून दोन चोरांनी विचार केला की, जर हे माकड आपल्याजवळ असते तर आपल्याला दरवाजा तोडण्याची गरजच नाही. माकड वर चढून आत जाईल आणि कडी काढेल.त्यांनी मदारीकडून माकड मोठ्या किंमतीला विकत घेतले. नंतर त्यांनी घरांच्या छतावर कसे चढायचे, आत जाऊन कडी कशी काढायची याचे प्रशिक्षण दिले. सगळी तयारी झाल्यावर एके रात्री  ते एका बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूला गेले.त्या॑नी बांबू भिंतीला लावला आणि ते बाजूला उभे राहिले. माकड चार फूट वर चढला आणि तिथेच थांबून चोरांकडे पाहू लागला. एका चोराने त्याला शिवी देत वर चढायला सांगितले. 
दुसरा चोरही रागाने म्हणाला,"नालायका, बघतोस काय आमच्याकडे!चढ लवकर वर."
माकडाने 'नालायक' शब्द ऐकून खाली उडी घेतली आणि म्हणाला,"गाढवांनो, मी चढणार कसा? तुम्ही ढोल कुठे वाजवलाय!"


'पंजाब केसरी' लाला लजपतराय


भारतीय स्वातंत्र्य चळवळतील एक महान क्रांतीकारक म्हणून ओळखले जाणारे लाला लजपतराय यांना 'पंजाब केसरी' म्हणूनही गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी १९२८ मध्ये 'सायमन कमिशनवर' सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता, नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनी निदर्शनाचे नेतृत्व केले. जमाव पांगवण्यासाठी ब्रिटीशांनी मोच्र्यावर लाठीहल्ला केला. लालाजींवरही लाठीहल्ला करण्यासाठी ब्रिटीश जराही कचरले नाही. लाठी हल्ल्यात झालेल्या जबर मारहाणीने १७ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पण लालाजींचे बलिदान क्रांतीकारकांनी व्यर्थ जाऊ दिले नाही, त्यांच्या बलिदाननंतर स्वातंत्र्याची चवळवळ अधिक प्रकषार्ने वाढू लागली. लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिलत धुंढिके गावात २८ जानेवरी १८६५ रोजी झाला. लहानपाणापासूनच ते अत्यंत हुशार होते. अरबी, उर्दू अशा अनेक भाषांचे त्यांना सखोल ज्ञान होते. एल. एल. बी. ची ची पदवी मिळवलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले. बाल विवाह, हुंडा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षणाचे ते सर्मथक होते. बंगालच्या विभाजनाला लालाजींनी तीव्र विरोध केला. सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोठा जमाव लाहोरमध्ये जमला होता. ब्रिटीश पोलिस अधिकारी सांडर्स यांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्जचे आदेश दिले यात झालेल्या मारहाणीत लालाजी आजारी पडले आणि काही दिवसांत त्यांच्या मृत्यू झाला. एक महिन्यातच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांनी लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. ब्रिटींशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लालाजींचा वाटाही तितकाच मोठा होता.

'राष्ट्रपिता' महात्मा गांधी


     महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना 'महात्मा' (अर्थ : महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना 'राष्ट्रपिता' असे संबोधले, असे म्हणतात.

     गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या तीन पत्नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. करमचंद हिंदू मोध समाजातील होते तर पुतळीबाई वैष्णणव समाजातील. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. जैन धार्मिक असलेल्या आईमुळे मोहनदास वर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- १८८८ मध्ये हरीलाल, १८९२ मध्ये मणिलाल, १८९७ मध्ये रामदास आणि १९00 मध्ये देवदास जन्माला आले. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
     १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधी आजीवन साम्प्रदायीकतावादाचे विरोधक होते आणि ते मोठय़ा प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. १९३0 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४00 कि.मी. (२५0 मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध 'भारत छोडो' आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वत:ही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३0 साली त्यांची 'अर्धनग्न फकीर' म्हणून निर्भत्सना केली. स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.३0 जानेवारी १९४८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.     अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना 'महात्मा' (अर्थ : महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना 'राष्ट्रपिता' असे संबोधले, असे म्हणतात.
     गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या तीन पत्नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. करमचंद हिंदू मोध समाजातील होते तर पुतळीबाई वैष्णणव समाजातील. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. जैन धार्मिक असलेल्या आईमुळे मोहनदास वर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- १८८८ मध्ये हरीलाल, १८९२ मध्ये मणिलाल, १८९७ मध्ये रामदास आणि १९00 मध्ये देवदास जन्माला आले. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
     १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधी आजीवन साम्प्रदायीकतावादाचे विरोधक होते आणि ते मोठय़ा प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. १९३0 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४00 कि.मी. (२५0 मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध 'भारत छोडो' आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वत:ही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३0 साली त्यांची 'अर्धनग्न फकीर' म्हणून निर्भत्सना केली. स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.३0 जानेवारी १९४८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


कल्पना चावला


     कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै १९६२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने 'मोट' असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले.

     कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकार्‍यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.
     शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून त्यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवड वाढू लागली. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. १ फेब्रुवारी २00३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Saturday, January 27, 2018

युवकांना शिकवायला हवी जीवनव्यवस्था

     जागतिकीकरण आणि आर्थिक सुधारणा यांचा सर्वात मोठा फायदा भारतातल्या व्यावसायिक शिक्षणाला मिळाला आहे. गेल्या काही दशकात व्यावसायिक शिक्षण संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, याचे श्रेय विकास दर वृद्धीकडे जाते. विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात रोजगार योग्य बनवण्यासाठी या संस्थांद्वारा विविध डिग्री आणि डिप्लोमासारखे रोजगारक्षम प्रशिक्षण दिले जात आहे.

     मात्र अशा कोर्समध्ये जीवन व्यवस्था कौशल्य विकासावर अजिबात लक्ष दिले जात नाही. वास्तविक आधुनिक मानवी जीवन संघर्ष,इच्छा आणि महत्त्वाकांक्षा यांच्या ओझ्याने पार दबून गेले आहे. सद्याची कॉर्पोरेट विश्व अनिश्चितता आणि ताण-तणावने घेरले गेले आहे. परस्पर विरोधी गरजांची प्राथमिकता निश्चित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वेळेचे उपयोग आणि व्यवस्था आवश्यक आहे. आपल्याला विविध तर्हेच्या लोकांशी सामना करावा लागतो. कॉर्पोरेट जगतात प्रतिस्पर्धा करण्याअगोदर आपण अपयशाशी कसा सामना करायचा, हे जाणून घेणे सर्वात अधिक महत्त्वाचे आहे. अलिकडच्या काळात अत्याधिक तणावामुळे मानसिक आजार वाढण्याचे प्रमाण या क्षेत्रात अधिक आहे. याशिवाय देशात मधुमेह,हृदयरोग, लठ्ठपणा इत्यादी जीवनशैली संबंधीत आजारांची संख्याही वाढत आहे. आपल्या देशाला मधुमेहींचे घर म्हटले जाते,इतकी मोठी संख्या सध्या या आजाराच्या रुग्णांची आहे. यात सातत्याने वाढ होत आहे.      स्मार्टफोन,टॅबलेट,लॅपटॉपसारख्या इलेकृटॉनिक गॅझेट्सच्या अति वापरामुळे मानसिक आजार वाढत आहेत. भारत एका बाजूला जिथे गरिबांना एकवेळचे जेवण देण्यात असफल ठरत आहे,तिथेच लठ्ठपणामुळे वाढणार्या समस्यांशी तोंड द्यावे लागत आहे.
     अशा परिस्थितीत भावना आणि तणाव यांवर व्यवस्था राखण्याची कला शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या कौशल्याचा आधुनिक व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेत समावेश करण्यात आलेला नाही. कॉर्पोरेट विश्वाची ओळख होण्याबरोबरच युवकांमध्ये जीवनव्यवस्था कौशल्य विकसित करण्याची हीच योग्य वेळ आहे. भविष्यात आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आणि किफायतशीर जीवन व्यवस्था सल्लागार किंवा प्रशिक्षक यांची आवश्यकता भासणार आहे. आज आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यांचा सामना करत असताना आनंदी जीवन कसे जगता येईल, याचे शिक्षण देणे भाग आहे. याकडे शिक्षण संस्था, अभ्यासक्रम बनवणार्या संस्था आणि तज्ज्ञ लोकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
     अपयशाने खचून जाऊ नये, संघर्षाला पर्याय नाही या गोष्टी युवकांमध्ये बिंबवल्या पाहिजेत. स्व-जागरुकता महत्त्वाची आहे.आपल्या गरजा आणि भावना ओळखता आल्या पाहिजेत. मन आणि शरीर रचना आणि त्यांच्यातला ताळमेळ कसा बसवायचा याचे शिक्षण आवश्य मिळायला हवे आहे. अनिश्चित भविष्यामुळे व्यावसायिक शिक्षण घेणार्या युवकांचे मन अस्थिर बनले आहे. त्यांच्यात भिती घर करून आहे. त्यांच्यातली ही भिती दूर करून आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
     जीवनात योग्य आणि चांगली दृष्टी विकसित करण्यासाठी जीवन प्रबंधन आवश्यक आहे. जीवन व्यवस्था कौशल्य एक सकारात्मक व्यवहार आणि दृष्टीकोन विकसित करते. यामुळे कॉर्पोरेट आव्हानांबरोबरच रोजच्या गरजांशी यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी आपल्याला सक्षम बनवले जाते. या कौशल्याचा उपयोग आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी,वेळेचे नियोजन करणे, रचनात्मक विचार, दुसर्यांविषयी सहानुभूती ठेवणे, अपयशांशी सामना करणे आणि आपल्या जीवनाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवणे यासाठी होतो.
आपल्याकडे प्राचीन भारतीय ज्ञानाचा लाभ घेण्याची मोठी संधी आहे. आपण प्राचीन भारतीय व्यवस्थेत जीवन कौशल्याची आवश्यक साधने शोधू शकतो, जसे आध्यात्मिक मूल्य,योग,ध्यान,सचेतन तंत्रज्ञान इत्यादी. भारतात मन-शरीर स्वास्थ्य आणि आध्यात्मिकतेवर आधारित प्राचीन ज्ञानाचे भांडार आहे. विविध देशातले लोक आंतरिक शांततेसाठी भारतात येत आहेत आणि ते आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असलेल्या प्राचीन भारतीय ज्ञानाचा लाभ घेत आहेत. आपण मात्र जगाचे अंधानुकरण करत आहोत आणि मनशांती गमावून बसलो आहोत.

Monday, January 22, 2018

युगपुरुष सुभाषचंद्र बोस

     नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशा मध्ये कटकच्या एका बंगाली कुटुंबात झाला. नेताजींच्या वडिलांचे नाव जानकीदास बोस आणि आईचे नाव प्रभावती. सुभाषचंद्र बोस भारतीय इतिहासातील एक असे युग पुरुष होते ज्यांनी भारतीय स्वतंत्रता लढय़ाला एक नवीन भरारी दिली. नेताजींनी आजाद हिंद फौज तयार करून इंग्रज सरकारला हादरून सोडले. सुभाषचंद्र बोस आज भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहेत. २३ जानेवारी त्यांच्या जन्मदिनी त्यांनी रंगून येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणाची आठवण करून देणे गरजेचे आहे.

     ते आपल्या भाषणात म्हणाले होते, 'सहकार्‍यांनो स्वातंत्र्य बलिदान मागतं. आपण सर्वांनी स्वातंत्र्यासाठी आतापर्यंत खूप त्याग केला आहे, पण आपल्या प्राणांचे बलिदान अजून बाकी आहे. आपल्या शत्रूने आपले खूप रक्त आटवले आहे. त्याचा प्रतिशोध केवळ रक्तानेच घेतला जाऊ शकतो. त्यासाठी 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा' अशी प्रतिज्ञा त्यांनी सहकार्‍यांकडून लिहून घेतली. ज्याला आपल्या देशाला स्वतंत्र पाहायचे आहे त्याला प्राणाची पर्वी नक्कीच नसणार.' त्यांच्या या भाषणाने नेताजींची प्रतिमा आणखी उजळून निघाली. 
     नेताजी आणि महात्मा गांधीजींचे विचार परस्परभिन्न होते, पण ध्येय्य मात्र एकच होते. ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. हिंदुस्थानचे महान देशभक्त म्हणून देखील नेताजींना ओळखले जाते. नेताजी आयसीआय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी शपथ घेण्यास नकार देऊन वरिष्ठ अधिकारीच्या नौकरीकडे पाठ फिरवून भारतीय स्वतंत्रता आंदोलनात १९२१ मध्ये स्वत:ला झोकून दिले. नेताजी हे महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा व सत्याग्रह या विचारांशी समरस झाले नाहीत. महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज हे नेताजींचे आदर्श होते. 
     १९२७ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा नेताजींनी सायमन कमिशनच्या विरोधात आवाज उठविला. त्याकाळी नेताजींच्या आचार, विचार व कतरुत्वाने तरुणवर्ग भारावून गेला होता. १९३८ साली राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद घेण्याचा बहुमान नेताजींना मिळाला. नेताजींनी हिटलर-मुसोलिनीची भेट घेवून भारतीय स्वातंत्र्याबाबत विचारविनिमय केला होता. फ्री इंडिया आर्मी आणि लिबेरेशन आर्मी नेताजींनी तयार केली. रासबिहारी बोस यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली. जुलै १९४३ मध्ये 'हिंदी स्वातंत्र्य संघा'ची व 'आजाद हिंद फौजे'ची सूत्रे नेताजींच्या हाती दिली. त्यामुळे नेताजी हिंदी स्वतंत्र संघाचे अध्यक्ष व आजाद हिंद फौजेचे सरसेनापती झाले. नेताजींनी आपल्या संघटन कौशल्याच्या तसेच कतरुत्वाद्वारे आजाद हिंद सेनेत कार्यक्षमता निर्माण केली. लोकांनी प्रेमाने सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही बिरुदावली बहाल केली. 'तिरंगा ध्वज' हे आजाद हिंद सेनेचे निशाण होते, तर 'जयहिंद' हे अभिवादनाचे शब्द होते. कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा हे आजाद हिंद सेनेचे समरगीत होते.
     अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा व ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि १0 ऑगस्ट १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली. जपानच्या पराभवाने नेताजींना जबरदस्त धक्का बसला. देश स्वातंत्र्य करण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. नेताजी १८ ओगस्ट १९४५ रोजी बँकॉककडून टोकियोकडे विमानाने निघाले. मार्गामध्ये चीनजवळील फामोर्सा बेटामधील ताय पै विमानतळावर त्यांच्या विमानास अपघात होऊन त्यामध्येच नेताजींचा अंत झाला. हा जपान सरकारने दिलेला वृत्तांत आहे. अर्थात हा वृत्तांत भारतीयांना खरा वाटला नाही. त्यामुळे स्वतंत्र भारत सरकारने नेताजींच्या मृत्यूबाबत दोन स्वतंत्र चौकशी समित्या नेमल्या. पण त्यांनाही नेताजींच्या मृत्यूचे गूढ पूर्णपणे उकलविता आले नाही. भारतीय नेते सत्यनारायण सिंह यांनी स्वत: फामोर्सास भेट दिली, अनेकांच्या साक्षी घेतल्या व त्यांनी १८ ऑगस्ट १९४५ रोजी फामोर्सातील ताय पै विमानतळावर अपघाताची कोणतीच नोंद नसल्याचे सांगितले. 
     सत्यनारायण सिंह यांच्या मते नेताजी मांचुरियात डिरेन येथे गेले. जपानच्या शरणागतीमुळे रशियाने मांचुरियावर ताबा मिळविला यावेळी ते रशियन सैन्याकडून पकडले गेले व रशियन सरकारने त्यांना सैबेरियात ठेवले. ते तेथेच असावेत किंवा मृत्यू पावले असावेत. नेताजींच्या मृत्यूचे गूढ रहस्य शेवटपयर्ंत रहस्यच राहिले. त्यांनी प्रज्वलित केलेली देशभक्तीची मशाल अशीच तेवत राहावी एवढीच अपेक्षा! 


गरिबांच्या मुलांसाठी अंगणवाडी चालवली

     सुशिला कोळी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अब्दुललाट गावातल्या लक्ष्मीनगरवस्तीत राहतात. त्यांना त्यांच्या लग्नाच्या वयात बाबूराव कोळी यांचा लग्नाचा प्रस्ताव आला होता.मात्र ते विधुर होते. त्यांना पहिल्या बायकोची दोन मुले होती. हा प्रस्ताव सुशिला यांच्या घरच्यांनी नाकारला,पण त्यांनी मात्र बाबूराव यांच्याशीच लग्न करण्याचा निश्चय केला. त्यांचा स्वभावच वेगळा होता. लग्न केले तर बाबूरावशीच, असा निग्रह करतानाच त्यांनी फक्त त्यांच्याशी विवाह करणार नाही तर त्यांच्या मुलांचेदेखील पालनपोषण करीन, असे आपल्या घरच्यांना निक्षून सांगितले. शेवटी त्यांनी घरच्यांचा विरोध जुगारून बाबूराव यांच्याशी विवाह केला.

     सुशिला यांना शिक्षणाचे महत्त्व माहित होते.त्यांना वाटत होते की, त्यांच्या मुलांनीही चांगलं शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटे. पण त्या वस्तीत राहत होत्या, तिथे लहान मुलांना शिकण्यासाठी अंगणवाडी किंवा शाळा नव्हती.त्यामुळे मुलांची इच्छा असूनही त्यांना शिकता येत नव्हते.त्यांना शेतात काम करावं लागत होतं. मुलांना वस्तीतल्या मुलांना शिक्षण मिळत नाही, याचे त्यांना दु:ख होत होते.त्या शिकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनीच विचार केला की, आपणच का नाही आंगणवाडी चालवायची? यासाठी त्यांनी सरकारी मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली.शेवटी त्यांनी 1991 मध्ये स्वत:च आपल्या घरात अंगणवाडी सुरू केली. सुरुवातीला सुरुवातीला त्यांच्या घरात शिक्षण घ्यायला येणार्या मुलांची संख्या फार कमी होती. बहुतांश पालक त्यांच्या पाल्याला शेतात काम करायला न्यायचे,त्यामुळे मुले अंगणवाडीत शिकायला येत नव्हते. मग त्यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचे अभियान उघडले.
     त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागला. मुलांची संख्या वाढू लागली.मुले शिकायला लागली. त्यांच्यातला जोश त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी किती आस्था आहे, ते दाखवत होते. काम करणे ही त्यांची मजबुरी होती. लागोपाठ दोन वर्षे घरातच मुलांना शिकवत असताना मुलांची संख्या वाढू लागली. घरातली जागा कमी पडू लागली. शेवटी त्यांनी जवळच्या एका मंदिरात अंगणवाडीची सोय केली.
जवळपास आकरा वर्षे मुलांना शिकवत राहिल्या. या कालावधीत त्यांनी सुमारे अडीचशे मुलांना शिक्षण दिले. पायाभूत शिक्षण त्यांनी अगदी मोफत दिले. पैसे म्हणून त्यांनी कुणाचे घेतले नाहीत. मात्र काही पालक धान्य वगैरे आणून देत. शेवटी त्यांच्या अंगणवाडीचे रुपांतर सरकारी बालवाडीत झाले,त्यावेळेला त्यांचे शिकवण्याचे काम थांबले. नंतर तिथे जिल्हा परिषदेची शाळादेखील सुरू झाली. सरकारी लोकांना इथे शाळेची गरज आहे, याची जाणीव झाल्यावर त्यांनी शाळा सुरू केली असावी, असे सुशिला कोळी सांगतात.
     सुशिला यांच्या पतीची दोन्ही मुले उच्च शिक्षित आहेत. त्यातला एक शिक्षक तर एक पोलिस इन्स्पेक्टर आहे. बाबूराव आणि त्यांचीही एक मुलगी आहे. ती भूगोलची प्राध्यापिका असून सध्या पी.एचडी करत आहे. आकरा वर्षे मुलांना शिकवताना जो आनंद मिळत होता, तितका आनंद त्यांना कधीच मिळाला नाही, असे त्या सांगतात. शिक्षण कुणालाही खरे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम करते. त्या आयुष्यात एकदा तरी शिक्षक व्हावं, असं लोकांना सांगत असतात.