बदल लवकर स्वीकारले जात नाहीत. काळाच्या आगीत त्याला होरपळून निघावे लागते. 2020 च्या कोरोना काळात ओव्हर द टॉप (OTT) चा प्रसार वाढला. लोक घरबसल्या प्रसिद्ध स्टार्सचे बिग बजेट चित्रपट पाहू लागले, तेव्हा व्यावसायिक तज्ज्ञांनी सिनेमा हॉलचे दिवस संपल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली होती. आदित्य चोप्रासारख्या काही प्रतिष्ठित निर्मात्यांनी आकर्षक ऑफर असूनही त्यांनी त्यांचे चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित केले पण OTT साठी चित्रपट दिले नाहीत. आज तोच आदित्य चोप्रा OTT मध्ये 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. म्हणजे बॉलीवूडने ओटीटीचा स्वीकार केला आहे,हेच दिसून येते.
2020 मध्ये बरेच अंदाज बांधले जात होते. कोरोनाच्या काळात सर्व चित्रपटगृहे बंद होते,त्यामुळे यापुढे चित्रपटगृहे कधीच सुरू होणार नाहीत, असे बोलले जात होते. लोक OTT वर घरी बसून चित्रपट पाहू लागले. 12 जून 2020 रोजी अमिताभ बच्चनचा 'गुलाबो सिताबो' आणि 9 नोव्हेंबर 2020 रोजी अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' ओटीटी वर रिलीज झाला तेव्हा या अंदाजला आणखी जोर येऊ लागला. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असताना आता कोणता मोठा स्टार उरला आहे, असे बोलले जात होते.
मात्र असे असतानाही अनेक निर्माते चित्रपटगृहातच चित्रपट दाखवण्यावर ठाम होते. रिलायन्सने घोषणा केली आहे की तो आपला 'सूर्यवंशी' चित्रपट फक्त थिएटरमध्येच दाखवेल, कितीही वाट पाहावी लागली तरी चालेल. आदित्य चोप्रानेही स्पष्ट सांगितले की तो त्याच्या अर्धा डझन चित्रपटांपैकी एकही चित्रपट OTT वर दाखवणार नाही. चोप्रा यांना ओटीटीकडून मोठ्या रकमेच्या ऑफर येत होत्या. पण ते आपल्या मतावर ठाम राहिले. जवळपास एक वर्ष असेच गेले. जेव्हा चित्रपटगृहे अर्ध्या क्षमतेने उघडली गेली, तेव्हा सलमान खानचा 'राधे' चित्रपट 13 मे 2021 रोजी OTT वर आणि चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित केला गेला. हा प्रयोग सपशेल फसला. 'राधे' चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित झाला आणि त्याला चित्रपटगृहांमधून केवळ 18 कोटी रुपये कमावता आले.
चित्रपटसृष्टीत ओटीटीला थिएटरचा शत्रू म्हणून पाहिले जाऊ लागले होते. मात्र निर्मात्यांनाही ओटीटीसाठीही चित्रपट बनवावे लागतील आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल, हे विसरले होते. जवळपास दोन वर्षे उलटून गेल्यानंतर आता चित्रपटसृष्टीलाही कळून चुकले की थिएटर्स आणि ओटीटी दोन्ही मिळून गुण्यागोविंदाने पुढे जाऊ शकतात. पूर्वी टीव्ही, व्हिडीओजही सुरू झाले,तेव्हा त्यांच्या आगमनानंतर आपला व्यवसाय मंदावेल, अशी भीती सिने व्यावसायिकांना होती. घरात बसून सिनेमा बघायला मिळाल्यावर लोक सिनेमागृहाकडे का जातील, असा सवाल उपस्थित होत होता. आता जे सिनेमा व्यवसायापुढे ओटीटीला आव्हान मानत होते,तेच आता 'ओटीटी'मध्ये गुंतवणूक करत आहेत. शाहिद कपूर निर्माता म्हणून ओटीटीसाठी वेब सीरिज बनवत आहे. आदित्य चोप्रा एक स्वतंत्र चित्रपट निर्मिती युनिट तयार करत असून याद्वारे फक्त OTT साठी चित्रपट बनवणार आहे. यासाठी त्याने 500 कोटी राखून ठेवले आहेत. म्हणजे आदित्य चोप्रा या दोन वर्षांत OTT वर एकही चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नव्हता, तो आता 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. आदित्य चोप्रा सारखे अजून बरेच निर्माते आहेत जे OTT साठी चित्रपट बनवणार आहेत. अवघ्या दोन वर्षांत बॉलीवूड निर्मात्यांचा ओटीटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो आहे. आता चित्रपटगृहेही सुरू राहतील आणि लोक OTT वरही चित्रपट पाहत राहतील.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली