Saturday, November 13, 2021

महिला खेळाडूंवरील अत्याचार थांबतील कधी?


हरियाणात व्यवस्थेच्या पातळीवर विचित्र विरोधाभास दिसून येत आहेत. घोषणा काही वेगळ्या दिल्या जातात, पण घडतंय मात्र उलटंच.  मुला-मुलींच्या गुणोत्तर प्रमाणात सर्वाधिक तफावत असल्याचा कलंक हरियाणाला आजही सोसावा लागत आहे.  म्हणूनच पंतप्रधानांनी  'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजना तिथून  सुरू केली. आता ही घोषणा संपूर्ण देशात दुमदुमत आहे, पण कदाचित हरियाणा सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही.  त्यामुळे महिला खेळाडूंवर बलात्कार आणि हत्येच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत.

याचे ताजे उदाहरण म्हणजे सोनीपत येथील कुस्तीपटू आणि त्याच्या भावाची झालेली हत्या.  खेळाडूच्या आईलाही गोळी लागली असून ती गंभीर जखमी झाली आहे.  कुस्तीचे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूचा स्पोर्ट्स अकादमीच्या मालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला तिच्याशी अनैतिक संबंध ठेवायचे होते. त्याला विरोध केल्यावर त्याने त्या खेळाडूवर हल्ला केला.  यात तिचा आणि तिच्या भावाचा जीव गेला. या प्रकरणी अकादमीचा मालक फरार असला तरी त्याची पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी अटक केली आहे.  या घटनेनंतर साहजिकच परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हरियाणातली ही काही नवीन घटना नाही.  महिला खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकांकडून अन्यायकारक वागणूक दिल्याचे अनेक किस्से,घटना आहेत.  महिला खेळाडूंवरील विनयभंग आणि हिंसक हल्ल्याची घटना घडत नाही, असे वर्ष क्वचितच गेले असेल.  या वर्षाचेच बोलायचे झाले तर, फेब्रुवारी महिन्यात रोहतकमध्ये एका महिला वेटलिफ्टरची हत्या झाली होती. तिच्या प्रशिक्षकाला तिच्याशी अवैध संबंध ठेवायचे होते आणि तिने विरोध केल्यावर तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.  तसेच सप्टेंबर महिन्यात चरखी दादरी येथे एका कुस्तीपटूची तिच्याच प्रशिक्षकाने हत्या केली होती.  हरियाणात खेळाविषयी फक्त मुलांमध्येच नाही तर मुलींमध्येही खूप आकर्षण आहे.

तेथील अनेक मुलींनी ऑलिम्पिक आणि इतर राष्ट्रीय खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.  हे पाहता तेथील सरकार खेळाडूंना प्रोत्साहन देताना थकत नाही.  तसेच क्रीडा अकादमींना प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न करते.  पण जर त्या अकादमींमधील महिला खेळाडू सुरक्षित राहणार नसतील आणि, त्यांचे प्रशिक्षक प्रामाणिक आणि सच्चरित्र राहणार नसतील तर  मुली आणि त्यांचे पालक खेळाविषयी कसे उत्साही राहतील?.

हरियाणातच रुचिका गिरहोत्रा ​​प्रकरण तर इतके ढवळून निघाले होते की, त्यामुळे हरियाणा सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते.  तत्कालीन केंद्र सरकारलाही अपमान सहन करावा लागला होता. त्यावरून तेव्हा वाटले होते की, हरियाणातील क्रीडा अकादमीचे प्रशिक्षक आणि मालक काही तरी धडा घेतील, पण त्याचा काही एक परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. रुचिका गिरहोत्रा ​​ही लॉन टेनिसपटू होती आणि त्या क्रीडा अकादमीचा प्रभारी एक पोलीस अधिकारी होता.  त्या अधिकाऱ्याने रुचिकावर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ केला आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली.

त्यानंतर त्या अधिकाऱ्याने त्याच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.  क्रीडा अकादमी आणि अशा इतर संस्थांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचे नावच घेत नाहीत.  कारण हरियाणा सरकार अशा घटना गांभीर्याने घ्यायलाच तयार नाही. निदान आता तरी सरकार जागे हवे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असा इंतजाम करायला हवा. अकादमी संचालक,मालक यांच्या डोक्यात पुन्हा असे पापी कृत्य येऊ नये, अशा पद्धतीची शिक्षा मिळायला हवी आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment