Sunday, November 14, 2021

क्रिकेटर आणि शेतकरी


स्टेडिअममध्ये देश जिंकणे जितके आवश्यक असते, त्यापेक्षा शेतकऱ्यानं हिरव्यागार शेतात जिंकणं महत्त्वाचं आहे.  क्रिकेट सामन्यात एक एक विकेट जशी महत्त्वाची आहे,तसेच शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचे असे एक महत्त्व असते.  आज देशाची भूक मिटवणारे असंख्य शेतकरी उपासमार, असहाय्यता, कर्ज अशा विविध समस्यांमुळे आत्महत्या करत आहेत.आपला जो कोणी आवडता खेळाडू  असतो,त्याने शतक झळकावे म्हणून आपण देवाकडे साकडे घालतो, पण आपण कधी आपल्या आजूबाजूच्या किंवा ओळखीच्या शेतकऱ्यासाठी शंभर पोती धान्य पिकवावे म्हणून देवाकडे प्रार्थना केली आहे काय?  एक-दोन तास बॅट घेऊन मैदानात खेळणारा खेळाडू आपल्या नजरेत देव बनतो, पण आयुष्यभर आपल्या पोटाची भूक भागवणारा शेतकरी मात्र त्याला माणूस म्हणावं म्हणून तळमळत असतो.  हां, मात्र निवडणुकीच्या वेळी देशाचा कणा असलेल्या या अन्नदात्याला शब्दांच्या दागिन्यांनी मढवले जाते, ही  गोष्ट वेगळी. नंतर मात्र त्याची पुढच्या निवडणुकीपर्यंत साधी आठवण देखील काढली जात नाही.

देशाला जिंकण्यासाठी कमी चेंडूत जास्त धावा हव्यात हे पाहून आपण तणावाखाली येतो.  आम्ही अस्वस्थ होतो.  देशाला जिवंत ठेवणाऱ्या नद्या, तलाव, सरोवरे आणि जलस्रोत हळूहळू कोरडे होऊ लागले म्हणून क्रिकेटप्रमाणेच आपल्याला ताण येतो का?  कधीच नाही.  हाच तणाव आपल्यात निर्माण झाला असता, तर देशातील गावांची आणि शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाली नसती.  आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्याचे चाहते म्हणून  सर्वतोपरी प्रयत्न करतो.  त्याचबरोबर आपली भूक मिटवण्यासाठी जीवाची बाजी लावणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देणे तर दूरच, त्यांचा विचार करण्याची तसदीही घेत नाही.

जगभरातल्या किक्रेटच्या स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे? याची आपल्याला खडा न खडा माहीती असते.  गोलंदाजी किंवा फलंदाजीसाठी कोणती खेळपट्टी योग्य आहे हे आपल्याला माहीत असते. पहिल्यांदा फलंदाजी केल्याने जिंकतो की  गोलंदाजी करून जिंकतो, याचा सगळा आढावा काढलेला असतो,मात्र  दुर्दैवाने आपल्याच गावची बाजारपेठ कशी आहे, याची आपल्याला अजिबात माहित नसते. ती कोणत्या स्थितीत आहे, तिथे पिकाचा बाजारभाव काय आहे? बाजारपेठेतील कारभार कसा चालतो किंवा तिथे शेतकऱ्यांची कशाप्रकारे फसवणूक केली जाते, याची आपल्याला यत्किंचितही कल्पना नसते.

पाकिस्तानच्या संघाला भारतात खेळू द्यावं की नाही,यावर किस पाडला जातो, पण कधी विचार केला आहे का की आपण खाणारे धान्य देशी आहे की विदेशी?  ती आयात केली जाते की निर्यात केली जाते?  तुमच्या मौल्यवान वेळेतून कधी एक क्षण काढला आहे का याचा विचार करण्यासाठी?  नाही ना? कसा काढणार?  जोपर्यंत वेदनेची आग हृदयाला जाळत नाही, तोपर्यंत मन या सगळ्याचा विचार करण्यापासून दूरच पळते.  देशाच्या क्रिकेट मंडळाने किंवा संघाने केलेल्या चुकांचा आम्ही बारकाईने आढावा घेतो, पण शेतीत कुठे चूक होते आहे आणि कोणाला दोषी ठरवायचे आहे हे शोधण्याचा आणि मोहीम राबवण्याचा कधीही प्रयत्न केला जात नाही. याला काय म्हणायचे?

ज्यांना समस्या आहे त्यांनीच त्यासाठी आवाज उठवायचा, अशी आमची आजवर धारणा झाली आहे. होत आहेही तसेच. शेतकरी आपल्या अस्तित्वासाठी स्वतःची लढाई स्वतःच लढत आहे.  दुर्दैवाने कोणत्या राज्यात किती शेतकरी मरत आहेत हेही आपल्याला माहीत नसते. का मरत आहेत?  कसे मरत आहेस?  हे सर्व आपल्याला निरर्थक आणि वेळेचा अपव्यय करणारे आहे, असे वाटते.

आधारभूत किंमत, खत, पाणी, वीज यासाठी लाठ्या-काठ्यांनी जखमी झालेले शेतकरी तुम्ही कधी पाहिले आहेत का?  कोणत्या देशाचा गोलंदाज कशी गोलंदाजी करतो, कोणत्या युक्त्या दाखवतो याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे.  दुर्दैवाने दलालांकडून केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या लुटीची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही.  शेतकर्‍यांची फसवणूक कशी होते आहे, फसवणुकीला ते कसे बळी पडत आहेत, हे जाणून घ्यायला किंवा ऐकायला आपल्याकडे वेळ नाही.

आपण कॉमेंट्री ऐकत टीव्हीवर टक लावून क्रिकेट पाहत असतो, त्यासाठी आपण चक्क कामाला किंवा ऑफिसला दांडी मारलेली असते, पण  शेतकऱ्यांबद्दलची चर्चा ऐकण्यासाठी कधी आपण वेळ काढला आहे का?  अकरा खेळाडूंनी खेळलेल्या खेळासाठी आपल्यापैकी लाखो लोक एक होतात.  त्याचवेळी करोडो लोकांची भूक मिटवणाऱ्या शेतकऱ्यासाठी मात्र आपण काही करतो का?  शेती करणे म्हणजे पुण्याचे काम मानले जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून हीच शेती देशोधडीला लागत आहे, याकडे आपले लक्ष आहे का?  हिरव्यागार शेतात हा अन्नदाता सुखी राहील,यासाठी आपण काही करणार आहे की नाही? त्याच्यासाठी याआपला थोडा वेळ देणार  आहोत की नाही? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

No comments:

Post a Comment