Friday, November 5, 2021

आनंदी राहण्याचा मार्ग


मला आजही आठवते की दर रविवारी आजी एक आणे म्हणजे सहा पैसे द्यायची.  आम्हा सर्व भावा-बहिणींना सारखाच आणा यायचा. त्या एक आण्यासाठी आम्ही तो रविवार कधी येईल याची आतुरतेने वाट पहायचो.  त्या एक आण्यात आमची खूप सारी स्वप्ने असायची.  दुपारपासून संध्याकाळपर्यंत बाजारात फिरत असताना आमच्याकडे मोठा खजिना आहे आणि  त्या बाजारात सर्व काही खरेदी करता येते, असा विश्वास वाटायचा.

सुट्टीचा दिवस असायचा.शाळा आणि पुस्तकं विसरून जायचो. आम्ही ग्रुप करून बाजारात जात असल्याने पालकांनाही काळजी नसायची.  बाजार हे आमचे आनंदाचे ठिकाण होते.  एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, दुसऱ्याकडून तिसऱ्या, तिसऱ्यापासून चौथ्या आणि पाचव्या..!  अशा रीतीने एका भेटीत आपल्या आवडीचे सर्व काही खरेदी होईल या आशेने संपूर्ण बाजारपेठेची चक्कर मारायचो. खरं तर त्याकाळी एक आणा ही सर्वात लहान रक्कम होती.  तरीही अशाप्रकारे बाजारात फेरफटका मारण्यात आनंद वाटायचा.  त्यामुळे उरलेल्या सहा दिवसांसाठी उपयोगी पडेल अशी नवीन उर्जाही त्यातून मिळायची.  बाजारात ना शिक्षकांची 'काठी' असायची ना बापाची 'बारीक' नजर. स्वतंत्र पक्ष्यासारखा मोकळ्या आकाशात असल्यासारखं वाटायचं.

पालकांनाही फारशी काळजी घ्यावी लागत नव्हती. खरं  तर त्यांच्या अपेक्षा फार माफक होत्या. परिधान करण्यासाठी कपडे, वेळेवर जेवण आणि चांगल्या शाळेत शिक्षण एवढीच त्यांची कर्तव्ये होती. आजच्या पालकांप्रमाणे मुलाने लंडन, अमेरिकेला जावं, अशी त्यांची कुठली अपेक्षा नव्हती. त्यांना फक्त  मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं, अशी अपेक्षा होती. त्यांनी मुलांवर ना कलेक्टर होण्याचे स्वप्न लादले ना डॉक्टर, इंजिनियरचे!

हेच त्यांच्या 'हॅपिनेस'चे म्हणजेच आनंदी राहण्याचे रहस्य होते.  आज मात्र पालकांना सर्व प्रकारची चिंता आहे.  आणि त्यांच्यासोबत मुलांनाही!  कारण लहानपणापासूनच स्वप्नांची जाडजूड 'बॅग' मुलाच्या खांद्यावर असते.  या प्रवाहात वाहणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न आहे - तुम्ही मोठे होऊन काय बनणार आहात, डॉक्टर की इंजिनियर?  तीच मोठी स्वप्ने मुलांच्या सुप्त मनात भरायला लागतात.

आणि स्वप्ने यशस्वी झाली नाहीत तर निराशेच्या अंधकारात मुलं हरवून जातात.अनेकदा मला वाटतं की या मुलांची किती स्वप्नं त्यांची आहेत आणि किती त्यांच्या डोक्यावर लादलेली आहेत!  आपल्या मुलांना चांगला, समजूतदार आणि संवेदनशील माणूस बनवण्याऐवजी त्यांना 'मोठा माणूस' बनवण्याचे स्वप्न दाखवून ते स्वप्न पूर्ण करण्याचे ओझे मुलांच्या डोक्यावर लादून पालक त्यांच्यावर कोणता सूड उगवत आहेत? मुलं  या परक्या स्वप्नांचे ओझे किती समर्थपणे पेलतात, हे आजच्या मुलांच्या चेहऱ्यावर खऱ्याखुऱ्या सुख-दु:खाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं.  शेवटी आज आनंद जगण्याऐवजी लक्षात ठेवण्याचा विषय होत आहे?

आजकाल 'हॅपीनेस इंडेक्स' म्हणजेच आनंदाच्या निर्देशांकाची चर्चा जोरात सुरू आहे.  मध्यप्रदेश ते पहिले राज्य आहे, जिथे या उद्देशाने 'आनंद भवन' स्थापन करण्यात आलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात 'हॅपिनेस'मध्ये तो प्रदेश मागे राहिला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.  या शर्यतीत मिझोराम, अंदमान आणि निकोबारसारखी छोटी राज्ये आघाडीवर आहेत.  वैवाहिक स्थिती, वय, शिक्षण आणि उत्पन्न यांचा थेट आनंदाशी संबंध असतो. त्याचबरोबर कामाच्या आधारावर उत्पन्न, कुटुंब, नातेसंबंध, शारीरिक आणि मानसिक आरोग्य हेही महत्त्वाचे आहे. सामाजिक स्तरावर धार्मिक आणि अध्यात्मिक पैलू हे त्याचे निकष आहेत.

प्रश्न असा आहे की आपण कमी खर्चात किती आनंद घेऊ शकतो!  याच संदर्भात त्या एका आण्यात आम्ही कधी पतंग विकत घेऊन यायचो  तर कधी भोवरा खरेदी करायचो.  कधी गोल फिरणाऱ्या पाळण्यात बसायचो, कधी मिठाई गल्लीतल्या मिठाईच्या दुकानातून आवडीची मिठाई आणायची आणि मग मिळून वाटून खायची.  कधी सुट्ट्यांमध्ये  गावातल्या नदीवर आंघोळीला जात असे तर कधी गावात भरलेल्या जत्रेत. घरच्यांकडून कसलेही बंधन नव्हते आणि त्यांना चिंता-काळजीही नव्हती.  आनंदी-आनंदी होते सगळे… सगळा वेळ आनंदात घालवत असे.

आजच्या परिस्थितीत मात्र पालक जास्त चिंतेत आहेत. त्यांना  मुलाला नेहमी डोळ्यांसमोर ठेवायचे आहे.  अशा प्रकारे मुलाला  एका घट्ट बांधलेल्या कंटाळवाण्या चक्रात फिरायला  बांधील केलं आहे.  बंधनात कसलं आलंय  'हॅपिनेस' किंवा सुख? त्याच्या मनात नेहमी जाडजूड पुस्तकं, शाळा आणि कोचिंग इन्स्टिट्यूट असतात, जिथून शिक्षण घेतल्यानंतर त्याला चैनीचे जीवन जगायचे असते.

रात्रंदिवस त्याच मृगजळात धावत राहतो.  किंवा काहीवेळा त्याच्या 'कथित' आनंदासाठी त्याला मोठ्या शहरात किंवा परदेशात पाठवले जाते, जिथे त्याच्या वयाची बहुतेक वर्षे पालकांशिवाय घालवावी लागतात  आणि या घाई-गडबडीतच 'हॅपिनेस'… 'खरा आनंद' मागे राहून जातो.  तथापि, त्याच्या आजूबाजूला आनंद घेण्याची अनेक माध्यमे असतात.  ही साधनेदेखील त्याला व्यावहारिक बनवतात.  शिक्षणाचा उद्देश असा नाही की मुलाने पुस्तकांकडे डोळे फाडून पाहात राहावं… तो त्याच्या आनंदापासून विचलित व्हावा, जे त्याच्या-आपल्या आसपास आहे, सर्व उपलब्ध आहे. आणि  कोणताही एक पैसा खर्च न करता मिळणारे आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment