आजोबांचा चष्मा फुटला होता. याकडे घरातल्या एकाही सदस्याचे लक्ष नव्हते. राजू खूप दिवसांपासून आजोबांचा फुटलेला चष्मा पाहात होता.त्याला खूप वाईट वाटत होतं. फुटलेल्या चष्म्यातून ते कसे पाहत असतील? त्यांना फारच त्रास होत असेल. त्यानं ठरवलं, आजोबांना नवीन चष्मा आणून द्यायचा. रविवारी दुपारी आजोबा जेवण करून झोपले असताना राजूने त्यांचा फुटलेला चष्मा हळूच घेतला आणि चष्म्याच्या दुकानात गेला. जुना चष्मा दुकानदाराला दाखवून नवीन चष्मा बनवायला सांगितला. दुकानदाराने नवीन चष्मा बनवून राजूला दिला. तो चष्मा घेऊन घरी आला.
इकडे आजोबा घरात चष्मा न मिळाल्याने हडबडून गेले होते. राजूला पाहताच त्यांनी विचारले, ''बेटा, तू माझा चष्मा पाहिलास का? मी झोपण्याआधी टेबलावर ठेवला होता. परंतु मला जाग आल्यावर पाहिलं तर तिथे चष्मा नाही. मला चष्म्याशिवाय काहीच नीट दिसत नाही."
राजूने पिशवीतून नवा चष्मा काढला आणि आजोबांच्या हातात दिला आणि म्हणाला, ''हा घ्या तुमचा चष्मा.''
आजोबांनी चष्मा घातला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी राजूला विचारले, ''बेटा, माझा चष्मा तुटलेला होता. हा तर नवीन चष्मा आहे. हा कुठून आला?''
राजू आजोबांना म्हणाला, "आजोबा, तुम्ही झोपला होतात तेव्हा मीच तुमचा जुना चष्मा घेऊन गेलो होतो. दुकानदाराला जुना चष्मा दाखवून तुमच्यासाठी नवीन चष्मा आणला. तुम्हाला फुटलेल्या चष्म्यातून बघायला खूप त्रास व्हायचा ना? आता तो होणार नाही.''
राजूचा हा समजूतदारपणा पाहून आजोबा भावूक झाले, म्हणाले, "बेटा, एवढा पैसा आणलास कोठून? नवा चष्मा बनवायला खूप पैसे लागले असतील."
आजोबांच्या प्रश्नावर राजू हसला आणि म्हणाला, 'आजोबा, माझ्या पिगी बँकेत खूप पैसे जमा झाले होते. त्यातून मी तुम्हाला नवीन चष्मा बनवून आणला."
राजूचे उत्तर ऐकून आजोबांचे डोळे पाणावले. त्यांनी राजूला मिठी मारली आणि म्हणाले, 'शाब्बास बेटा! तू माझं मन जिंकलेस."
''आजोबा, अजून एक सरप्राईज बाकी आहे.'' राजू हसत म्हणाला. 'ते काय बेटा?' आजोबांनी उत्सुकतेनं विचारलं.
राजूने बॉक्समधून केक काढला आणि म्हणाला, ''हॅपी बर्थडे डिअर आजोबा...''
राजूने आजोबांच्या हस्ते केक कापला. राजूचा समजूतदारपणा पाहून त्यांना फार आनंद झाला. आजोबांनी राजूला विचारले, 'बेटा, हे सर्व काम करण्यासाठी तुला पैसे वाचवण्याची प्रेरणा कुठून मिळाली?'
राजू लगेच म्हणाला," तुमच्याकडूनच आजोबा..."
" तुम्हीच मला मागच्या वर्षी बचतीचा पाठ शिकवलात आणि छोटी छोटी बचत करायला सांगितलंत. तेव्हाच मी माझ्या आई-बाबा आणि नातेवाईकांकडून मिळणारे पैसे गोळा करायला सुरुवात केली. बघता बघता पिग्गी बँकेत एवढा पैसा जमा झाला की, त्यातून तुमच्यासाठी नवीन चष्मा आणि केक घेऊ शकलो."
आजोबांना राजूचा खूपच अभिमान वाटला. त्यांनी राजूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि म्हणाले, 'खूप छान बेटा! बचत वेळेवर कामी येते. काही अडचण आली तर आपल्याला सावरते. आपण थोडे थोडे करून खूप पैसे वाचवू शकतो. थेंबा थेंबाने घागर भरते."
तेवढ्यात राजूचे आई-बाबादेखील बाजारातून खरीददारी करून आले. राजूने आजोबांसाठी फुटलेल्या चष्म्याऐवजी नवीन चष्मा आणल्याचे कळताच त्यांनाही त्याचा खूप अभिमान वाटला. मात्र वडिलांच्या फुटलेल्या चष्म्याकडे आपले लक्ष का गेले नाही,या विचाराने ते खजील झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment