Friday, November 5, 2021

(बोधकथा) गुरुज्ञान


जगातील विविध भाषा- संस्कृतींमध्ये अशा अनेक लोककथा आहेत, ज्या आजही वाचल्या आणि ऐकल्या जातात आणि लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतात.  अशीच एक गुरु आणि त्यांच्या दोन शिष्यांची कथा आहे.  एक शिष्य अभ्यासात खूप हुशार होता आणि दुसरा आळशी. साहजिकच हुशार शिष्याची सर्वत्र स्तुती आणि सन्मान केला जात असे.  दुसऱ्या शिष्याकडे लोक दुर्लक्ष करत आणि  त्याच्याविषयी काहीही बोलत.  एके दिवशी दुसरा शिष्य रागाने गुरूंकडे गेला आणि म्हणाला, 'गुरुजी!  त्याच्या आधीपासून मी तुमच्याकडे शिकत आहे. तरी पण तुम्ही त्याला माझ्यापेक्षा जास्त शिकवलंत.'

गुरुजी थोडा वेळ गप्प राहिले आणि म्हणाले, 'आधी तू एक गोष्ट ऐक. एक वाटसरू कुठेतरी चालला होता.  वाटेत त्याला तहान लागली.  थोड्या अंतरावर त्याला एक विहीर दिसली. तिथे बादली होती, पण दोरी नव्हती.  म्हणून तो पुढे गेला.  थोड्या वेळाने दुसरा वाटसरू तिथे पोहोचला.  विहिरीवर दोरी न दिसल्याने त्याने आजूबाजूला पाहिले.  जवळच मोठे गवत वाढले होते. त्याने गवत उपटले आणि त्याची दोरी वळू लागला.

थोड्या वेळाने एक लांबलचक दोरी तयार झाली, त्याच्या साहाय्याने त्याने विहिरीतून पाणी शेंदले आणि आपली तहान भागवली.’ गुरुजींनी शिष्याला विचारले, ‘आता तूच सांग कोणता वाटसरू जास्त तहानलेला होता?’ शिष्याने उत्तर दिले,'दुसरा!'

गुरुजी म्हणाले, 'दुसऱ्या वाटसरूला जास्त तहान लागली होती, असं आपण म्हणू शकतो कारण त्याने आपली तहान शमवण्यासाठी परिश्रम घेतले.  त्याचप्रमाणे तुझ्या वर्गमित्राला ज्ञानाची तहान आहे. ती शमवण्यासाठी तो कठीण मेहनत करतो. तू मात्र असं काही करत नाहीस.'

दुसऱ्या शिष्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.  तोही मग मेहनत करू लागला. वास्तविक, जिज्ञासा, ज्ञान आणि कृती हे तिन्ही शब्द एकाच धाग्यात गुंफलेले आहेत.  यापैकी एक जरी नसेल तर मानवी जीवन निरर्थक होऊन जाते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment