Wednesday, November 17, 2021

अंमली पदार्थांच्या तस्करीचे मूळ आणि कूळ


अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या व्यसनी लोकांचे आणि समूहांचे त्यांच्यावाचून कसे हाल होतात,हे आपण सिनेमा किंवा अन्य माध्यमातून पाहात आलो आहोत. अंमली पदार्थ मिळवण्यासाठी ही व्यसनी मंडळी कुठल्याही थराला जातात,याचीही कल्पना किंवा त्यांच्या 'स्टोऱ्या' जाणून आहोत. हेरॉईन,चरस, गांजा इत्यादी अंमली पदार्थ  या वर्तुळातल्या लोकांना सहज मिळतात. ग्लॅमर वलय लाभलेल्या किंवा श्रीमंतीचा थाट जगणाऱ्या या क्षेत्रात सहज मिळून जातात. यासाठी मोठमोठी रॅकेटस पसरलेले आहे. सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे हे क्षेत्र असल्याने त्यांना त्याचे अप्रूप आहेच. स्थानिक पातळीवर या पदार्थांची तस्करी आणि अवैध धंदे करणाऱ्या टोळ्यांविरोधातही मोहीम राबविल्याची चर्चा आपल्याला वृत्तपत्र अथवा अन्य प्रासारमाध्यमांच्या माध्यमातून वाचायला- ऐकायला मिळतात.मात्र या अंमली पदार्थांच्या तस्करीची पाळेमुळे खोदून काढून ते नेस्तनाबूत केल्याचे काही ऐकण्यात आले नाही. सुरुवातीच्या काही बातम्या सोडल्या तर कारवाईचा शेवट काय झाला, हे गुलदस्त्यातच राहते. यावरून एक गोष्ट लक्षात येते,ती म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी थांबलेली नाही. यातून अर्थ काय काढून घ्यायचा? तपासयंत्रणा आणि या तस्कर टोळ्या यांच्या संगनमताने सर्वकाही गुपचूप सुरू आहे. 

अलिकडे राज्य सरकार आणि विरोधी भाजप यांच्यात चाललेला कलगीतुरा यातून हेच स्पष्ट होत आहे. कोणाचेही सरकार सत्तेवर आले तरी अशा अवैध धंद्यांना अभय मिळत राहते आणि त्याचा लाभ कुणीतरी उपटत असतो. आता चिंता अशी की या अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचा हा जो भलामोठा कारोबार आहे,तो संपवण्याचा कधी प्रयत्न झाला का? या दिशेने आजवर कोणतेही ठोस प्रयत्न झालेले नाहीत. हे वास्तव आहे. आज  देशाच्या विविध भागातून अमली पदार्थांची तस्करी आणि ते जप्त केल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत, परंतु स्थानिक पातळीवरील काही कारवाया वगळता  या समस्येचे मूळ आणि या व्यवसायाचे खरे स्त्रोत शोधण्यात तपास यंत्रणांना अपयशच आले आहे. असे म्हणायचे का? जर यंत्रणेला अपयश आले तर यंत्रणेत सुधारणा का झाली नाही? सरकारने ही बाब कधी गंभीरपणे घेतलीच नाही का? मग सरकारच्या लोकांचीही यात हात आहेत का? आज जो आरोप प्रत्यारोप होत आहे,ते उगाच होत आहे का? लोकांना मात्र यातले सत्य हवे आहे? ते त्यांच्यासमोर कधी येणार? 

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधून अमली पदार्थ जप्त आणि काहींना अटक झाल्याच्या बातम्या येत आहेत.  शिवाय, नुकत्याच मुंबईत एका क्रूझ जहाजातून अमली पदार्थ जप्त केल्याच्या प्रकरणाने या प्रश्नाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.  सोमवारी गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने सव्वाशे किलोग्राम हेरॉईन जप्त केले आणि तीन जणांना अटक केली.  आंतरराष्ट्रीय बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या कारवाईतील हेरॉईनची किंमत सहाशे कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.  यापूर्वी, गेल्या काही दिवसांत गुजरात पोलिसांनी अमलीपदार्थांच्या दोन मोठ्या खेपा जप्त केल्या होत्या.

त्याच वेळी, गुजरात दहशतवादविरोधी पथकाने 2016 पासून आतापर्यंत एकोणीस हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.  त्यातच यावर्षी नऊशे कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.  यादरम्यान सत्तरहून अधिक जणांना अटकही करण्यात आली.  गुजरातमधील मुंद्रा बंदरातूनच सुमारे तीन हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.  छुप्या गुन्हेगारी कारवाया आणि प्रत्येक स्तरावर पाळत ठेवल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या आणि त्याच्या पोलिसांच्या डोळ्यांसमोर इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे कसे उभं राहिले, हा प्रश्नच आहे!

 गुजरातची किनारपट्टी हा पाकिस्तान, इराण किंवा अफगाणिस्तानमधून भारतात करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीसाठी पसंतीचा मार्ग बनला आहे.  तस्कर पाकिस्तानातून कच्छ किंवा गुजरातमधील भुज समुद्रात अमली पदार्थ घेऊन येतात.  गुजराथमधील अड्ड्यांवर छुप्या पद्धतीने पाठवल्यानंतर अवैध मार्गाने देशातील अन्य राज्यांमध्येही त्याची वाहतूक केली जाते. याला पायबंद घातला जाणार आहे का?-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment