फार पूर्वी एका गावात दोन मित्र राहत होते. त्यांची नावं होती हरिबा आणि जोतिबा. दोघंही एकत्र लहनाचे मोठे होत होते. हरिबाची इच्छा होती खूप श्रीमंत बनण्याची, परंतु जोतिबाला लोकांची सेवा करायची होती. मोठा झाल्यावर हरिबा आपल्या वडिलांच्या कारभारात हातभार लावू लागला. जोतिबा मात्र लोकसेवा करायची असल्याने एखाद्या वैद्याकडे शिक्षण घेण्याची खटपट करत होता. परंतु, जोतिबा गरीब असल्याने त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तेव्हा हरिबाने आपल्या मित्राला मदत करत त्याला काही पैसे दिले. जोतिबाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दिवाळीच्या दिवशी गावाबाहेर असलेल्या ग्राममंदिरात भेटण्याचं दोघांचं ठरलं.
वडिलांसोबत काम करता करता हरिबाच्या मनात धनलोभ वाढत चालला, तर इकडे जोतिबा वैद्यांच्या आश्रमात राहून आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा मन लावून अभ्यास करू लागला. त्याच्यात एका चांगल्या वैद्याचे गुण उतरू लागले.
एका वर्षानंतर दोघंही एकमेकांना भेटायला निघाले. रात्र गडद होत चालली होती. हरिबा ग्रामदेवतेच्या मंदिरात जोतिबाची प्रतीक्षा करत होता. त्याच मंदिरात एका कोप-यात एक भिकारी अंगावरच्या फाटक्या वस्त्रांनिशी तसाच कुडकुडत पडला होता. थंडीचा कडाका वाढत चालला होता. हरिबाने त्याला पाहिलं होतं, पण त्याच्या अवस्थेची त्याला काही दया येत नव्हती.
इतक्यात जोतिबा तिथे आला. त्याने भिकाऱ्याची अवस्था पाहिली. तो त्याच्याजवळ गेला. त्याने आपली शाल त्याला पांघरायला दिली. आपल्याजवळची शिदोरी त्याला खायला दिली, आणि इतक्यात एक चमत्कार घडला. तिथला भिकारी गायब झाला आणि त्याच्या जागी ग्रामदेवता प्रकट झाली. तिला पाहून दोघांनीही नमस्कार केला. ग्रामदेवता जोतिबाला म्हणाली, ‘तू फार दयाळू आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे’.
तिच्या हातात दोन रोपटी होती. एक होतं आंब्याचं तर दुसरं होतं लिंबाचं. ग्रामदेवता म्हणाली, ‘ही दोन्ही रोपटी चमत्कारी आहेत. आंब्याच्या रोपटय़ाला जितकी पानं लागतील, तितकेच त्याला आंबे लगडतील. आणि हे रोप वर्षभर फळ देईल. िलबाच्या रोपटय़ाची पानं औषधांत मिसळल्यास औषधाची गुणाची मात्रा द्विगुणित होईल. जोतिबा, यापैकी तुला हवं ते रोपटं तू घेऊ शकतोस’.
जोतिबा म्हणाला, ‘देवा, तुम्ही मला लिंबाचंच रोपटं द्या. कारण याने वैद्याची गुणवत्ता वाढेल, त्याचा लाभ लोकांनाच होईल’.हे ऐकल्यावर हरिबा मात्र मनोमन चांगलाच सुखावला. त्याने विचार केला, आंब्याचं रोपटं मोठं झाल्यावर मला आणखी धनवान करेल. मी देशातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेन. त्यानं हळूच अंब्याचं रोपटं लंपास केलं.
काही काळ लोटला. रोपट्यांचे वृक्ष झाले. आंब्याला जितकी पानं, तितकीच फळं लागायची. िलबाच्या झाडाची पानं ज्या औषधात घातली जात, त्याच्या सेवनानं रुग्ण खडखडीत बरे होत. पण इकडे हरिबाचा धनाचा लोभ दिवसेंदिवस वाढत चालला. अधिक धन कसं मिळेल या काळजीने तो आजारी पडला. अनेक वैद्य झाले, पण त्याला कोणी आजारातून उठवू शकला नाही. मृत्युपंथाला लागलेल्या हरिबाला शेवटी आपल्या मित्राची-जोतिबाची आठवण झाली. आता तो संपूर्ण देशातला एक प्रसिद्ध वैद्य बनला होता.
आपल्या मित्रांची भयंकर अवस्था ऐकून जोतिबा हळहळला. तातडीनं तो हरिबाकडे आला. त्याच्यावर उपचार सुरू केले आणि त्याच्या प्रयत्नाने काही दिवसांतच हरिबा खडखडीत बरा झाला. आता त्याच्या लक्षात आलं की, संपत्तीच्या लोभापायी आपण आपल्या आरोग्याकडे लक्षच दिलं नाही. रोगी शरीर असेल तर या धनाचा उपयोग काय, याची त्याला जाण आली.आता हरिबादेखील जोतिबाप्रमाणे आपले जीवन लोककार्यात व्यतीत करू लागला. प्रसन्न राहू लागला.
prahaar,mumbai 22/2/2013