Saturday, February 9, 2013

बुद्धिमान मंत्री

     फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. जयंतनगर नावाच्या राज्याचा एक राजा होता. त्याला एक दिवस देश पाहण्याची लहर आली. त्याने देश भ्रंमतीची योजना आखली. आणि तो देशाटनाला निघाला. काही दिवसांत सारा देश फिरून झाला. परत आल्यावर त्याच्या पायाचं काहीतरी दुखणं सुरू झालं, आणि बळावलं. त्याने आपल्या मंत्र्यांपुढे ते कथन केलं. रस्त्यात भले मोठे दगड, खड्डे होते. त्यामुळे प्रवासात त्याला भयंकर त्रास झाला. यासाठी काही तरी करायला हवं, असंदेखील राजाने मंत्र्यांना सुचवलं.
     बराच वेळ विचार केल्यावर त्याला यावर एक उपाय सापडला. त्याने तत्काळ आपल्या मंत्र्यांना आणि सनिकांना आदेश दिला, ‘ताबडतोब देशातले सगळे रस्ते कातडय़ांनी झाकून घ्या’. राजाचा हा आदेश ऐकून सारे जण चपापले. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. पण एकाचीदेखील तोंडातून ब्र काढण्याची िहमत झाली नाही. या कामासाठी मुबलक पैशांची गरज होतीच, शिवाय इतक्या सगळ्या रस्त्यांसाठी कातडे कुठून आणायचे? एवढं करूनदेखील रस्त्यांना त्याचा त्याचा किती उपयोग होणार, हे कोण सांगणार? त्यामुळे एकूणच या योजनेचा देशातील रस्त्यांसाठी किती फायदा होईल, याची सा-यांना चिंता वाटत होती. मात्र आता राजाचा आदेश म्हटल्यावर अंमलात तर आणावाच लागणार! इतकी मोठी अडचण असतानादेखील कोणाचं उलटून बोलण्याचं धारिष्टय़ झालं नाही. सगळे जण मुकाटय़ाने आपापल्या घरी गेले. मात्र सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, राज्याची सगळी तिजोरी या कामी ओतली तर अन्य विकासकामांचं काय होणार?
     दुस-या दिवशी पुन्हा दरबार भरला. राजाने हुकूम सोडला, ‘रस्ते करण्यासाठी कारागिरांना बोलावण्यात यावं’. सगळ्यांची खात्री झाली की, आता योजनेच्या अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही. राज्याच्या दरबारात एक वृद्ध मंत्री होता, त्याने अनेकदा आपल्या अनमोल सल्ल्याने राज्यावर ओढवलेली अनेक संकटे सोडवली होती. अनेक समस्यांचं निराकरण केलं होतं. शेवटी त्याने बोलण्याचा निश्चय केला. तो आसनावरून उठून राजाजवळ गेला, ‘महाराज, क्षमा असावी, पण मी तुम्ही आखलेल्या योजनेवर काही सांगू इच्छितो’. वृद्ध मंत्र्याचं बोलणं ऐकून राजा काहीसा चकीत झाला. त्याला सल्ला ऐकून घ्यायची सवय नव्हती. कारण तेवढं धाडस आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. पहिल्यांदा तर राजाला मंत्र्याचा थोडा रागच आला. परंतु, मंत्र्याने आपल्या बुद्धिचातुर्याने राज्याला अनेकदा संकटसमयी मदत केली होती. त्यामुळे त्याचा आदर करत राजा म्हणाला,‘बोला, महाशय, काय बोलायचं आहे ते निर्धास्तपणे बोला’
     मंत्री म्हणाला, ‘महाराज, आपण सगळे रस्ते कातडय़ांनी आच्छादून घेतले तर सरकारी तिजोरी झटक्यात रिकामी होईल’. पुढे मंत्री म्हणाला, ‘आपल्याला रस्ते कातडय़ांनी आच्छादायचे असतील तर आपला शाही खजिना मोकळा होईल. आपल्याला पैशाचा अपव्यय करायचा नसेल तर मी एक उपाय सुचवू शकेन’
     काय? राजानं विचारलं.
     मंत्री म्हणाला, ‘आपण कातडय़ांनी देशातले संपूर्ण रस्ते झाकण्यापेक्षा एका कातडय़ाच्या उपयोगाने चपला शिवून आपल्या पायांना झाकता येईल आणि पायांना संरक्षण देता येईल. यामुळे आपल्या पायांना इजा तर होणार नाहीच शिवाय आपला शाही खजिनादेखील रीता होणार नाही. हा उपाय राजाला बेहद्द आवडला. मग त्याने स्वत:साठी कातडय़ापासून एक चप्पल जोड बनवून घेतला. राज्याचा पैसा तर वाचलाच पण महत्त्वाचं म्हणजे लोकांना पायांच्या संरक्षणासाठी चपला नावाची एक नवी वस्तूदेखील मिळाली.
prahaar,mumbai

No comments:

Post a Comment