एक मोठे तलाव होते. त्यात छोटे- छोटे मासे, जळू, खेकडे आणि बेडूक राहत. याच तलावात अंगानं हिरवेगार असलेले दोन मोठे बेडूकही राहत. त्यांची नावे होती, चंगू आणि मंगू. तलावात तरंगायची तेव्हा शेवाळच तरंगतय, असं वाटायचं. पळायची तर अगदी सुर्रकन ! एका काठावरनं दुसर्या काठावर पोहोचली कधी कळायचंसुद्धा नाही. त्यांच्या उड्या खूप खूप लांब पडायच्या.
तलावात सारे प्राणी गुण्यागोविंदाने, हसत्-खेळत आणि मजेत राहत. एखादा बगळा आला की, चंगू बेडूक आपले गोल-गोल डोळे चौफोर फिरवायचा आणि लगेच पाण्यात डुबकी मारायचा. सगळ्या माशांना सावध करत पळायचा. मग मासे तलावाच्या तळाशीच पोहत. ते वर यायचेच नाहीत. बगळा मात्र काठाला तासनतास ताटकळत उभा राहायचा. त्याला एकही मासा मिळायचा नाही. मग जळफळटत हात चोळत निघून जायचा. तो गेल्यावर चंगू सगळ्यांना शिकारी गेल्याची वर्दी देत सर्रकन धावत सुटायचा. मग सगळे आनंदाने उड्या मारत, दंगा-मस्ती करत वर यायचे. खेळायचे, हुदडायचे.
कोळी आला की, चंगू माशांना लपायला सांगायचा. मग मासे शेवाळ, वेली-झुडुपांमध्ये लपून राहत. अशा ठिकाणी कोळी जाळे फेकायचा नाही. फेकले तर जाळे अडकून फाटून- तुटून जायचे. एकही मासा जाळ्यात आडकायचा नाही. जळूंमुळे कोळी पाण्यात उतरायचे नाहीत. मंगूला मात्र असले काम आवडायचे नाही. त्याला वाटे, का म्हणून दुसर्याला धोक्याच्या सूचना देत फिरायचं ?
"एकमेकाला मदत केली पाहिजे. आपल्यावरही संकट येईल तेव्हा तेही आपल्या मदतीला येतील", असे चंगू त्याला समजावून सांगायचा. " मला कोण कशाला पकडेल? एक उडी घेतली की, दुसर्या टोकाला जातो, मग मला कोण पकडेल." असे म्हणत मंगू एक मोठी उडी घ्यायचा. त्याला चंगूचा सल्ला आवडायचा नाही.
एकदा मंगू आजारी पडला. तो केवळ चिखलात पडून राहू लागला. एक दिवस काही मुलं खेळत- खेळत तलावाच्या काठावर आली. त्यातला एकानं मंगूला पाहिलं. " तो पहा केवढा मोठा बेडूक! चला, त्याला पकडू आणि शाळेत घेऊन जाऊ. त्याचे ऑपरेशन करू", मुलगा म्हणाला.
मुलाचं बोलणं ऐकून तलावातल्या सार्या प्राण्यांना समजून चुकलं की आता मंगूचं काही खरं नाही. मंगूला त्यांच्या तावडीतून सोडवायचं कसं तेही त्यांना सुचेना. इतक्यात एक मासा उसळी घेऊन मंगूजवळ जाऊन पडला. मुलगा मंगूला प़कडण्यासाठी पाण्यात उतरला होता. पण त्याच्या हाताला मासा लागला. माशाने मग आपल्या पाठीवरचा काटा त्याच्यात हातात घुसवला. मुलगा वेदनेने किंचाळला. त्याने हात झ्टकल्यावर मासा पाण्यात पडला. चिखलात बसलेला जळू मुलाच्या पायाला जाऊन चिकटला. मोठ्या मुश्किलीने त्याने त्याच्यापासून सुटका करून घेतली. इतक्यात एक खेकडा त्याच्या पायाकडे सरकू लागला. मुलाने त्याला पाहिले आणि त्याने काठाचा दिशेने जोरात धूम ठोकली. पुन्हा कुणा मुलाचे तलावात उतरण्याचे धाडस झाले नाही.
भुरकट माशाच्या औषधाने मंगू बरा झाला. मंगूही दुसर्यांना मदत करू लागला. पण त्याला लवकरच त्याचा कंटाळा आला. हे काम त्याला बेकार वाटू लागले. तो चिखलात बसून डोळे मिचकावत पडून राहयचा किंवा पाण्यावर आरामात तरंगत राहायचा. तो चंगूला म्हणायचा, " तू फक्त दुसर्याचीच सेवा करत राहा. स्वतः चं काही पाहू नकोस." " आपण एकमेकांना मदत केली पाहिजे." चंगू म्हणायचा आणि मंगू एक मोठी उडी घेऊन दूरवर कोठे तरी निघून जायचा.
एके दिवशी मंगू गवतावर डोळे मिटून बसला होता. दूरवर असलेल्या सापाने त्याला पहिले. सापाच्या तोंडाला पाणी सुटले. तो मंगूला धरायला सरपटत निघाला. तलावाच्या काठाला आलेल्या चंगूची नजर सापावर पडली. तो मंगूच्या दिशेने जात असल्याचे पाहिले. " बाप रे! आता मंगूची काही धडगत नाही. " काही तरी विचार करून चंगूने पटकन उडी घेतली आणि तो सापाजवळ गेला. दुसरी उडी घेतली ती सापाच्या पाठीवर! पाठीवर बसलेल्या बेडकाला पकडण्यासाठी त्याने झडप घातली. पण त्यापूर्वीच चंगूने लांब उडी घेऊन तलावाचे किनार गाठले. आता मंगूनेही सापाला पाहिले. त्याने पटकन तलावात उडी घेतली. आपण चंगूमुळे बचावलो, हे मंगूला कळून चुकले. त्याने चंगूचे आभार मानले. आता त्याने दुसर्याला मदत करण्याचे पक्के ठरवले. आणि तसा वागूही लागला. दुसर्याला मदत करायचा आता त्याला कंटाळा येत नाही.
No comments:
Post a Comment