चतुरसेन राजा आणि दामोदर नगरशेठ यांच्यात दाट मैत्री होती. तो रोज भेटायचे. दामोदर चंदनाच्या लाकडाचा व्यापारी होता. एकदा व्यापारात त्याला नुकसान झाले. नुकसान कसे भरून काढायचे याचा तो विचार करू लागला. एक दिवस त्याच्या डोक्यात विचार आला. 'जर का राजाच्या मृत्यू झाला; तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी चंदनाची लाकडे माझ्याकडूनच खरेदी करावी लागतील. मग यातून मला काही तरी लाभ होईल.'
संध्याकाळी नेहमीसारखा दामोदरशेठ राजाच्या भेटीला गेला. त्याच्यासारखाच राजाच्यादेखील मनात विचार आला,' दामोदरने माझ्या मैत्रीचा लाभ उठवत बरीच माया गोळा केली आहे. आपण असा कुठला तरी कायदा बनवायला हवा, जेणेकरून त्याची सगळी संपत्ती सरकारी खजिन्यात जमा व्हावी.'
दोघेही मित्र रोज भेटायचे, परंतु त्यात आता फारशी आपुलकी, जिव्हाळा राहिला नव्हता. दोघेही एकमेकांच्या वाईटाचाच विचार करत असल्याने भेटीतला उत्साहदेखील संपला होता. एक दिवस दामोदरने राजाला विचारलेच," गड्या मित्रा, गेल्या काही दिवसांपासून पाहतोय, आपल्या नात्यात काही तरी कमी असल्यासारखे जाणवते आहे. असं तुलाही जाणवत का? "
राजानेदेखील ही गोष्ट मान्य केली. " असं का जाणवतं आहे?" दामोदरनं राजाला विचारलं. राजा म्हणाला," नगराबाहेर एक साधू महात्मा आला आहे. चल, त्यालाच विचारू!"
दोघेही त्याच्याकडे गेले. साधू म्हणाला," तुम्ही दोघेही पहिल्यासारखे रोज भेटता, हे खरे असले तरी दोघांच्याही मनात एकमेकांविषयी द्वेषभावना निर्माण झाली आहे. यामुळेच दोघांमध्ये पहिल्यासारखी पवित्र मैत्री राहिलेली नाही."
साधूला त्यांनी आपापल्या मनातल्या भावना सांगितल्या. तो दामोदरशेठला म्हणाला," तू राजाच्या मृत्यूऐवजी राजा लाकडाचा महाल बांधणार आहे आणि त्यामुळे तुझा व्यापार होईल, असा का तू विचार केला नाहीस? विचारशुद्धतेमुळे गोडी राहते. तू राजाविषयी वाईट विचार केलास, चुकीची भावना बाळगलीस, त्यामुळे राजाच्या मनातदेखील वाईट विचार आले. चुकीच्या विचाराने दोघांच्या संबंधांमध्ये दरी निर्माण झाली. आता दोघीही सच्चा मनाने प्रायश्चित घ्या म्हणजे मैत्रीचे सुख पुन्हा अनुभवता येईल."
दोघांनीही साधूला प्रणाम केला आणि माघारी परतले. त्यानंतर दोघांच्या मैत्रीत कधी अंतर आले नाही.
No comments:
Post a Comment