एक गाव होतं. त्या गावात रमाकांत नावाचा एक गरीब माणूस राहत होता. रोजच्या गरजा भागवण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसल्यानं, तो सतत काळजीत असायचा. एक दिवस जंगलात तो इकडे-तिकडे भटकत असताना त्याला परिराणी भेटली. म्हणाली, ‘रमाकांत, मला माहितेय, तू मोठ्या काळजीत आहेस. मी तुला मदत करू इच्छिते. मी तुला सहा वस्तूंची नावं सांगेन. त्यातल्या कुठल्याही एका वस्तूची निवड तुला करावी लागेल. ती नावं ऐक, बुद्धी, बळ, आरोग्य, सौंदर्य, दीर्घायुष्य आणि धनदौलत. यापैकी तुला काय हवंय ते मला सांग’.
रमाकांतला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आता आपलं दैन्य सरणार या कल्पनेनंचं त्याचं मन हवेत तरंगायला लागलं. मागचा-पुढचा काहीच विचार न करता तो म्हणाला, ‘या जगात पैशापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. तू मला धनदौलत देऊन टाक’.
त्याचा आततायीपणा पाहून ती हसली, म्हणाली, ‘रमाकांत तुझी निवड यथोचित नाही. पुन्हा विचार कर’. परंतु, रमाकांतला तर पैशाशिवाय काहीच नको होतं. कारण पैशाच्या जोरावर काहीही मिळवता येऊ शकत होतं,अशी त्याची पक्की धारणा झाली होती. परिराणीने त्याला एक अद्भुत थैली दिली. त्यात दहा सोन्याच्या मोहरा होत्या. त्या थैलीचं वैशिष्ट्य असं की, त्यातून कितीही वेळा मोहरा काढल्या तरी त्यांची संख्या दहापेक्षा कधीच कमी होणार नव्हती. थैली देऊन परिराणी अदृश्य झाली.
मोहरांची थैली मिळाल्यानं रमाकांत अक्षरश: आनंदानं नाचायला लागला. आता तो खूप श्रीमंत झाला होता. तो आनंद साजरा करत असतानाच तिथे आणखी दोन प-या अवतरल्या. त्यांना पाहून तो एका झाडामागे लपला आणि हळूच तिथून सटकला. कारण आता त्याला कशाचीच गरज वाटत नव्हती. तो घरी निघून आला.
तिकडे जंगलात अवतरलेल्या प-यांमधील एक सुष्ट आणि एक दृष्ट परी होती. त्या जंगलात त्यांच्या गुणावगुणांनी भरलेल्या फळ-झाडांचं रोपण करायला आल्या होत्या. दुष्ट परीनं एक बियाणं टोचताच तिथे रसदार फळांनी लगडलेला एक वृक्ष अवतरला. फळं मोठी मोठी आणि मधुर होती. सुष्ट परीनं टोचलेल्या वृक्षाला मात्र छोटी छोटी फळं लागली. हे पाहून दुष्ट परी सुष्ट परीची टर उडवत हसत सुटली. सुष्ट परी म्हणाली, ‘ठीक आहे, तुझ्या मार्गाने चाललेल्यांना प्रारंभी लाभ होतो पण, शेवटी विजय चांगल्याचाच होतो. आपण आपापले काम करत राहू. पाहू, कोण जिंकतं ते? ’ असं म्हणत दोघी वेगवेगळ्या दिशांना निघून गेल्या.
इकडे भरपूर पैसे हातात आल्यानं संपूर्ण देश फिरून येण्याचं रमाकांतने ठरवलं. सोनेरी मोहरांच्या थैलीच्या जिवावर रमाकांतचा प्रवास अगदी मजेत चालला होता. तो जिथे जिथे जाई, तिथे तिथे त्याचं स्वागत मोठय़ा आदबीने आणि दिमाखात होई. एकदा फिरत फिरत रमाकांत एका नगरात पोहोचला. तिथल्या राजाला भेटायला गेला. राजाला त्याने अमूल्य अशा वस्तू नजराणा म्हणून दिल्या. राजाने अतिथी म्हणून त्याला राजवाडय़ात राहण्याची परवानगी दिली. राजाला एक कन्या होती. ती खूपच धूर्त अणि लबाड होती. तिला गुप्तहेरांकडून कळाले होते की, या आलेल्या पाहुण्याकडे जादूची थैली आहे. राजकन्येला ती थैली मिळवण्याचा मोह आवरता आला नाही. तिने रमाकांतशी प्रेमाचं नाटकं सुरू केलं. रमाकांत तिच्या वागण्याला भुलला. राजकन्येचं रमाकांतवर प्रेम बसलं आहे ही गोष्ट राजाच्या कानी गेली. त्याला रमाकांत चांगला माणूस वाटला. राजाने राजकन्येचं लग्न धूमधडाक्यात रमाकांतशी लावून दिलं.
लग्नानंतर काही दिवस राजकन्या त्याच्याशी अतिशय प्रेमानं वागली. रमाकांतशी प्रेमानं वागून, गोड बोलून तिनं ती थैली मिळवली. त्यानंतर राजाला रमाकांतबद्दल खोटंनाटं सांगून तिनं रमाकांतला राजवाडय़ातून हाकलून लावलं. पुन्हा कफल्लक झालेला रमाकांत जंगलात भटकू लागला.
भटकता भटकता तो एका झाडापाशी आला. ते एक सुंदर फळांचं झाड होतं. त्याला रसरशीत सुंदर गोड-मधुर फळं लगडलेली होती. त्याला भयंकर भूक लागली होती. त्यानं धावत जाऊन त्यातलं एक फळ तोडलं आणि खाऊ लागला. आणि काय आश्चर्य! त्याच्या डोक्यावर काळीकुट्ट शिंगे उगवली. तो अतिशय विद्रूप दिसू लागला. ते फळ दुष्ट परीने लावलेल्या झाडाचे होते. रमाकांतला पाहून ती जोरजोरानं हसू लागली.
सुष्ट परीदेखील तिथेच होती. तिला रमाकांतची अवस्था सहन झाली नाही. तिने लावलेल्या झाडाचं फळ तोडून त्याला खायला देत ता म्हणाली, ‘घाबरु नकोस. हे फळ खा, सगळं ठीक होईल’. त्यानं ते छोटंसं फळ खाल्लं. दुस-याच क्षणी त्याच्या डोक्यावरची शिंग गायब झाली. त्यानंतर दोन्ही प-यांना विचारून रमाकांतने जंगलातल्या चांगल्या आणि वाईट झाडांवर फुल्ल्या केल्या. मग काही तरी विचार करून त्यानं दुष्ट परीच्या झाडावरची फळं तोडली आणि ती घेऊन राजकन्येला भेटायला गेला. तो तिला फळे देत म्हणाला, ‘तु माझ्याशी कसंही वागली असलीस तरी माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. म्हणून हे जादूचं फळं मी तुझ्यासाठी आणलं आहे’.
राज्यकन्येनं फळ घेतलं. फळं खाल्ल्यावर राजकन्येच्या डोक्यावर दोन शिंग उगवली. तोपर्यंत रमाकांत अद्भुत थैली घेऊन महालाबाहेर आला होता. पुन्हा जंगलाच्या वाटेनं घराकडे जात असताना त्याला परिराणी भेटली आणि राजकन्येशी वाईट वागल्याबद्दल तिने त्याच्या हातातली अद्भुत थैली काढून नेली. रमाकांतला आपली चूक उमगली. आपण पैशापेक्षा बुद्धी मागितली असती तर तिच्या बळावर आपण श्रीमंत झालो असतो. ती संपत्ती आपल्याला आयुष्यभर पुरली असती आणि राजकन्येसारखं कोणाशीही वाईट वागण्याची वेळ आपल्यावर आली नसती असं त्याला वाटलं. आपण केलेली चूक सुधारण्यासाठी रमाकांतने चांगल्या झाडाची फळं तोडली व वैद्याचा वेश धारण करून पुन्हा राजमहालात आला. राजकन्येने रडून रडून मोठा गोंधळ घातला होता. वैद्याचे रूप घेतलेल्या रमाकांतने तिला आपल्याजवळचे फळ खायला दिले. राजकन्येने फळ खाल्ल्यावर लगेच तिच्या डोक्यावरची शिंगे गायब झाली. सगळे ठिकठाक झाल्यावर रमाकांतने आपले खरे रुप प्रकट केले. राजकन्येला माफ केले. राजकन्येलाही आपली चूक उमगली. तिनं रमाकांतची माफी मागितली. त्यानंतर ते दोघेही सुखानं संसार करू लागले.
No comments:
Post a Comment