Wednesday, November 29, 2017

थंडीचा महिना,आरोग्याची दैना

        गेल्या चार दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे साहजिक तब्येतीने नाजूक असलेल्या अथवा कान,नाक,घसा यांचे आजार असलेल्या किंवा अस्थमा असलेल्या माणसांना या दिवसांत स्वत:ची काळजी घ्यावीच लागते. प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक लगेच ताप,थंडी,खोकला अशा आजारांच्या कवेत झटकन येतात. त्यामुळे ही मंडळी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला तत्पर तयार असतात. वारंवारच्या आजारपणामुळे असे लोक आपल्याला थंडी सोसवत नाही,याची खात्री करून घेतात आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रयत्नशील राहतात.साहजिकच अडगळीत पडलेली मफलरे,स्वेटर्स,कानटोप्या आता बाहेर यायला लागल्या आहेत. ज्यांचे हे हिवाळी कपडे खराब झाले आहेत किंवा सापडत नाहीत, त्यांनी थेट बाजार गाठून नवी खरेदी करताना दिसतात.त्यामुळे हिवाळा सुरू झाला की, बाजारात हिवाळी कपड्यांना मागणी वाढायला लागते.मोठमोठ्या शहरांमध्ये नेपाळी किंवा अन्य राज्यातले लोक या कपड्यांबरोबर ब्लँकेट,रजई विकायला दाखल होत आहेत. दोन-तीन महिने हा धंदा चालतो.

     हिवाळा वाढला की, साहजिकच दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असते. डॉक्टरांचा व्यवसाय उन्हाळ्यातले काही दिवस सोडले तर इतर दिवसांमध्ये चांगला चालतो. अर्थात दोन-चार दिवस सर्दी,पडसे,खोकला वगैरे आजार शरीरात मुक्कामच करतात. मात्र लोकांना आजार लवकर बरा व्हावा किंवा त्याच्याने आणखी कुठली पिढा लागू नये म्हणून लोक थेट डॉक्टरांना गाठतात. त्यातही अँटीबायोटिक औषधे देण्याचा आग्रह रुग्ण डॉक्टरांना करतात.त्याने हा उपचार कॉमन झाला आहे. मात्र याचे दुरगामी परिणाम वाईट आहेत. उद्या अँटीबायोटिक औषधांना हे आजार जुमानणार नाहीत,तेव्हा काय करायचे असा प्रश्न आहे. अजून त्याचा पुढच्या उपचाराचा शोध लागलेला नाही.त्यामुळे अँटिबायटिक औषधांचा डोस ऊठसूठ घेऊ नये, असे जाण्कार सांगताना दिसत आहेत.
      थंडीच्या दिवसांत हवेतले रोगजंतू ओलावा आणि गारव्यामुळे तग धरून राहतात. उन्हाळ्यात तीव्र सूर्यकिरणांमुळे हेच रोगजंतू तग धरू शकत नाहीत. ते नष्ट होऊन जातात. मात्र हिवाळ्यात या रोगजंतूंचा वावर वाढतो. श्वसनमार्गातून हे रोगजंतू शरीरात जात असल्याने आजार बळावतात. हिवाळ्यात आणखी एक धोका वाढला आहे तो धुळीचा! पावसाळ्यात रस्त्यावर चिखलरुपाने बसलेली माती पाऊस थांबला की, रस्त्यापासून सुटायला लागते. वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे त्याचे बारीक बारीक कण हवेत पसरतात. आणि ते धुळीच्या रुपाने शरीरात प्रवेश करतात. सध्या लहान-मोठ्या शहरात या धुळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. काही लोक मास्क तोंडाला लावून प्रवास करतात. मात्र बरेच कशाला हवा मास्क,इथेच तर जायचे आहे, असे म्हणून आजाराला निमंत्रण देतात. या धुळीमुळे कोरड्या खोकल्याचे प्रमाण वाढत असल्याचा काही तज्ज्ञांनी,डॉक्टरांनी काढला आहे. हवेतल्या प्रदुषणामुळे खोकल्याची तीव्रता वाढत आहे.यासाठी लोकांनी काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे.
     हिवाळी आजार टाळण्यासाठी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. थंडीच्या वातावरणात चेहरा,घसा,छाती झाकली जाईल, असे उबदार कपडे वापरायला हवेत. शक्य तितके आणि जमेल,झेपेल असे गरम पाणी प्यायला हवे. थंड पाणी आणि पदार्थ टाळायला हवेत. रात्री झोपताना अंगाला आणि त्यातही श्वसनमार्गाला थेट थंड वारा लागणार नाही,याची काळजी घ्यायला हवी. सकाळी-संध्याकाळी कोमट पाण्यात मीठ व हळद घालून गुळण्या कराव्यात. थंडीपासून बचाव म्हणून घरासमोर, अंगणात वैगेरे शेकोटी पेटवतात. मात्र त्याच्या धुराचा उलट त्रास होतो. दुचाकी वाहनावरून जाणार्यांनी चेहरा,कान,नाक,घसा झाकला जाईल, अशा प्रकारची व्यवस्था करून प्रवास करावा. रस्त्याकडेला बसणारे फळविक्रेते, भजी,वडा-पाव विकणारे गाडीवाले यांनीही खबरदारी घ्यायला हवी आहे. कारण धूळ त्यांच्या नाकावाटे थेट शरीरात जाते.

Tuesday, November 28, 2017

आर. आश्‍विनची कमाल

     विराट कोहलीच्या संघाने पुन्हा एक सामना सफाईदारपणे जिंकला. मात्र हा सामना खासच ठरला. एक तर भारताने हा सामना एक डाव 239 अशा विक्रमी धावांनी जिंकला आणि दुसरे म्हणजे या सामन्यात भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने 54 व्या सामन्यात सर्वात वेगवान 300 बळी घेण्याचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम साधला. अर्थात हा सामना भारत जिंकणारच होता आणि श्रीलंका हा सामना हरणारच होता. खरे तर हा सामना सुरू झाला तेव्हा जय-पराजयाचा विषयच नव्हता. विषय होता फक्त आर. आश्विनच्या 300 बळी पूर्ण करण्याचा! श्रीलंकेचा शेवटचा बळी आश्विनने टिपला आणि कसोटी सामन्यात सर्वात वेगवान बळी घेण्याचा गोलंदाज ठरला. महान क्रिकेटपटू डेनिस लिली यांना हा टप्पा करताना 56 कसोटी सामने खेळावे लागले होते. रविचंद्रन आश्विनने हा टप्पा 54 कसोटीतच पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बळी घेणार्या मुथैया मुरलीधरनलादेखील यासाठी 58 सामने खेळायला लागले होते.

     सध्याच्या घडीला विराट कोहलीच्या क्रिकेट संघाचा आश्विन महत्त्वाचा भाग बनला आहे. तो चालला की, संघाचा विजय निश्चित मानला जातो.गेल्या काही सामन्यांपासून त्याचे प्रदर्शन चांगले दिसून येत आहे आणि त्यामुळे विराट कोहलीचा संघदेखील उत्तम कामगिरी करत आहे.आश्विनचे नाणे चालते, तेव्हा ते अगदी खणखणीतच चालते. एक-दोन नाही तर तो आठ- नऊ बळी मिळवतो. एकदा सुरू झाला की, मग मागे वळून बघणे नाहीच! समोरच्या संघाला गारद करण्यासाठी,ज्या गोलंदाजाची गरज असते, ती गरज  खरोखरच आश्विनच पूर्ण करतो.त्याच्या गोलंदाजीत कमालीची विविधता आहे.त्याचे ऑफस्पिन झकासच आहे. त्याच्याइतके ऑफस्पिन क्रिकेट जगतात कदाचितच दुसरा कोणी असू शकेल. त्याचा कॅरम बॉल वेगळ्या प्रकारचा आहे.प्रत्येक हंगामानंतर असं वाटतं की, त्याच्या गोलंदाजीत थोडी थोडी सुधारणा होत आहे. तो स्वत: ला उत्तम बनवण्याच्याबाबतीत तो फारच प्रयत्नशील दिसतो.
     या आशिया उपखंडात त्याची गोलंदाजी कमालच करते. पाकिस्तानला तो जाऊ शकला नाही. त्याची कारणे वेगळी आहेत. पण श्रीलंका, बांगला देश आदी ठिकाणी त्याच्या गोलंदाजीने कमालीची कामगिरी केली आहेआश्विनची कामगिरी त्याला महान बनवण्यास हातभार लावणारी आहे.मात्र त्याची ही कामगिरी घराबाहेर फार काही चांगली चालली नाही. श्रीलंका आणि बांगला देश येथील मैदाने पाहिली तर ती त्यांना आपण घरच्यासारखीच म्हणू शकतो. बाहेर जाऊन म्हणजे वेस्ट इंडिजला गेल्यावर त्याच्या गोलंदाजीची प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्याला अजून ऑस्ट्रेलिया,इंग्लंड,दक्षिण आफ्रिका आणि न्यूझिलंडमध्ये चांगली कामगिरी करावयाची आहे. याठिकाणी त्याचे मागचे दौरे विसरण्यासारखेच आहेतखरे तर बाहेरच्या दौर्यामध्ये फक्तच फिरकी गोलंदाज खेळवला जातो. तिथली मैदाने (पिच) फिरकीसाठी नसतातच मूळी! म्हणजे बाहेर त्याची संघातली जागा निश्चितच नसते. आश्विन तसा समजूतदार खेळाडू आहे. आपल्या चुकांमधून तो शिकत असतो. स्वत:वर तो मोठी मेहनत घेत असतोकदाचित तो बाहेरच्या मैदानासाठी तो स्वत:ला तयार करीत असावा. तो स्वत:मध्ये सुधारणा व्हावी,यासाठी इंग्लिश काउंटी क्रिकेट खेळायलाही गेला होता. हे त्याचे पाऊल चांगलेच म्हणायला हवे.
     विराट कोहलीचा क्रिकेट संघ सध्या जगात एक नंबरचा संघ आहे.त्याला नशिबाने आपला संघ आसपासच खेळत आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.त्यामुळे या भारतीय संघाला महान म्हणणे अवघड जाणार आहे. हेच कारण आश्विनच्याबाबतीतही लागू होत आहे. पुढच्या वर्षी या संघाला बाहेरच्या मैदानावर बरेच खेळायचे आहे.तिथे आश्विनची जादू चालली नाही तर भारतीय संघासाठी ते एक वाईट स्वप्न असणार आहे. पण तो यशस्वी झाला तर मात्र भारतीय क्रिकेटसाठी तो एक सुवर्ण काळच म्हणायला हवा. या संघाला आणि आश्विनला महान बनवण्यात पुढील वर्ष फारच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. क्रिकेटवेड्या लोकांना यासाठी पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!


 एका फोर व्हिलरमधून एक फॅमिली निघाली होती.ट्रॅफिक पोलिसाने त्यांना हटकले आणि गाडी थांबवली.
इन्स्पेक्टर: आज सुरक्षा दिवस आहे आणि आपण सीट बेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला 5 हजाराचे बक्षीस देणार आहोत. बरं सांगा,या 5 हजाराचे काय करणार?
पिंट्या: काही नाही साहेब,मी पहिल्यांदा या पैशांतून ड्रायव्हिंग लायसन्स काढीन.
इन्स्पेक्टर: काय?
तेवढ्यात पिंट्याची आई म्हणाली: नाही ओ साहेब, हा दारू पिल्यावर काहीही बरळतो.
इन्स्पेक्टर: ???
तेवढ्यात हा गोंधळ पाहून मागच्या सीटवर झोपलेलेले त्याचे बाबा उठले आणि इन्स्पेक्टर साहेबांना पाहून पिंट्याला म्हणाले: पिंट्या मी तुला सांगितलं नव्हतं... आपण चोरीच्या गाडीतून फार लांब जाणार नाही म्हणून...!
इन्स्पेक्टर: बेशुद्ध!
/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
दोन मुली आपसात बोलत होत्या.
पहिली मुलगी: आजच्यापासून कुठल्याही मुलावर विश्वास ठेवणार नाही. सगळे खोटारडे, धोकेबाज आणि कमिने आहेत.
दुसरी मुलगी: का गं काय झालं? तुझ्या बॉयफ्रेंडने तुला काही म्हटले का?
 पहिली मुलगी: नाव घेऊन नकोस त्या खोटारड्या,धोकेबाज माणसाचं.मी तर आता त्याचं तोंडदेखील पाहणार नाही.
दुसरी मुलगी बुचकळ्यात पडली. ती म्हणाली: असं काय झालं गं? तू त्याला दुसर्या कुठल्यासोबत पाहिलसं का?
पहिली मुलगी: अगं नाही गं! त्याने मला माझ्या दुसर्या बॉयफ्रेंडसोबत पाहिले. त्यानं तर मला सांगितलं होतं की, तो काही दिवस दुसर्या शहरात जाणार होता.

////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
 
मुलगा मुलीला आपल्या फोर व्हिलरमध्ये घेऊन निघाला होता.
मुलगी: आपण कुठं निघालो आहोत?
मुलगा: लॉन्ग ड्राईव्हला.
मुलगी: वॉव! अगोदर नाही का सांगायचं?
मुलगा: मलाही आताच कळलं!
मुलगी: कसं काय?
मुलगा: ब्रेक लागत नाही आहे. ////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

समान शिक्षण,सुदृढ शिक्षण

     अलिकडेच महाराष्ट्र शासनाने डॉक्टर,इंजिनिअरिंगसारख्या व्यावसायिक प्रशिक्षणाकडे जाण्यासाठी ज्या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात, त्या परीक्षांच्या धर्तीवर बारावी (उच्च माध्यमिक) परीक्षा मंडळाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रता परीक्षांमध्ये महाराष्ट्राची मुले मागे पडतात,याची जाणीव झाल्यावर शासनाने हे पाऊल उचलले आहे. अर्थात असा निर्णय घेऊन शासनाने स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांसाठी मुलांना उद्युक्त केले आहे.ही बाब मोठी दिलासादायक म्हटली पाहिजे. कारण आपल्या परीक्षा मंडळांच्या (बोर्डाच्या) परीक्षा आणि अन्य विभागाच्या परीक्षा यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. या परीक्षा आणि अभ्यासक्रमांचा मुलांना पुढे भविष्यात उपयोगच होत नाही. साहजिकच महाराष्ट्रातील मुले अन्य राज्यांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात.त्यामुळे इच्छा असूनही आणि मेहनतीची तयारी असतानाही मुलांना हवे ते फिल्ड निवडताना अडचण येत होती. आता यात बदल होत आहे,ही चांगली बाब म्हटली पाहिजे.

     महाराष्ट्राच्या परीक्षांमध्ये हा बदल होत असतानाच केंद्र सरकार संपूर्ण देशभरात एक अभ्यासक्रम राबवण्याचा विचार करत आहे.पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण सर्वच राज्यांमध्ये सारखे करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.याला अनेक राज्यांनी सहमतीही दर्शवली आहे,त्यामुळे अल्पावधीतच हा निर्णय संपूर्ण देशभरात लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरातल्या राज्यांमधील दहावी,बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आणि त्यांचा अभ्यासक्रम एक राहणार आहे.याचे खरे स्वागत व्हायला हवे.
     आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत शिक्षण व्यवस्थेत सातत्याने परीक्षणे होत आहेत,त्यानुसार त्यात बदलही होत आहेत. कधी परीक्षा नको,कधी परीक्षा हवी किंवा परीक्षेत नापास झाला तरी त्याला वरच्या वर्गात ढकला, असे निर्णय झाले. सध्या परीक्षा पद्धती असायलाच हवी, अशी मागणी जोर पकडत असल्याने पहिली ते आठवीसाठी आता पुन्हा परीक्षा पद्धती लागू केली जाणार आहे. वास्तविक प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. हा पाया मजबूत असायला हवा,यात कुणाचेही दुमत असायचे कारण नाही. आज आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा अभ्यासक्रम आहे. शिक्षणाचा स्तर वेगवेगळा आहे. काही राज्यांमध्ये पासिंग टक्केवारी 33 टक्के तर कुठे 36 टक्के आहे. आपल्या राज्यात 35 टक्के आहे. आता केंद्र सरकारच्या निर्णयानुसार संपूर्ण देशात सरकारी शाळास्तरावर एकच अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. मानव संसाधन मंत्रालयाने सगळ्या राज्यांकडून अभिप्राय मागवले होते. त्यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत.त्यामुळे लवकरच हा निर्णय अंमलात येणार आहे.
     असे झाले तर शिक्षण स्तरावर समानता येणार आहे.एका राज्यातून दुसर्या राज्यात जाणार्या मुलांना एकच अभ्यासक्रम शिकायला मिळणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यातला मानसिक तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. अर्थात हे फक्त सरकारी शाळांमध्ये असणार आहे. मात्र सरकारने देशात सर्वच स्तरावर एकच अभ्यासक्रम लागू करायला हवे. ही समानता निश्चितच देशाला सुदृढ आणि स्थिर शिक्षण पद्धती देईल आणि भविष्यात युवकांना आपला देश,समाज आणि कर्तव्यांविषयी समर्पित भावना जागृत होण्यास मदत होईल. आपल्या देशात शिक्षणासंबंधीत अनेक आयोग,समित्या बनल्या, सगळ्यांनी आपापले उपाय सांगितले, सगळ्यांचे उपाय नोकरशाहीने स्वीकारले.तशाप्रकारचा अभ्यासक्रम राबवत शिक्षणात वेगवेगळे प्रयोग होत राहिले. पूवी आपल्या शिक्षणात फक्त कारकून निर्माण करणारी व्यवस्था निर्माण झाली होती. मात्र अलिकडे कौशल्याधारित अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे.मात्र यासाठी लागणारी साध सुविधा यांची मोठी कमतरता दिसून येत आहे.त्यामुळे यापासूनही फारसा लाभ होताना दिसत नाही. भौतिक सुविधा आणि संबंधीत साधन सामुग्री असणे महत्त्वाचे आहे, नेमका त्याचाच अभाव आपल्याला शाळांमध्ये दिसत आहे.याकडे लक्ष दिल्यास चांगला फायदा होणार आहे.
     1965-66 मध्ये कोठारी आयोगाची नियुक्ती करतेवेळी जपानी शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले होते की, आमच्या देशातील शिक्षण पद्धती राष्ट्रीय उत्पन्नात योगदान देते.त्याचबरोबर त्यांनी सावध करताना सांगितले होते की, राज्यांमधील वेगवेगळी शिक्षण पद्धती पुढे जाऊन राष्ट्रवादाला नुकसान पोहचवेल. आणि संकुचित प्रांतियतेला जन्म देईल. राज्ये पुढे जाऊन स्वातंत्र्याची मागणी करतील. हा इशारा आज तंतोतंत खरा ठरताना आपण पाहत आहोत.केंद्र,राज्य आणि मनुष्यबळ व  संसाधन मंत्रालयाकडून संपूर्ण देशात एकच समान अभ्यासक्रम देण्याच्या निर्णयाला मूर्त स्वरुप आल्यास निश्चितच काही समस्यांचे निराकरण आपोआपच होऊन जाईल. सुकरात यांनी बरोबरच सांगितले होते, सुदृढ शिक्षण, सुदृढ देश निर्माण करते
ainapurem1674@gmail.com

अचूक निर्णय घेण्याची क्षमता

     आजच्या धकाधकीच्या जीवनात काही गोष्टींबाबत पटापट निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे अचूक व झटपट निर्णयक्षमता ही आता काळाची गरज बनली आहे. निर्णय घेणे ही लहानसहान गोष्ट नाही. एक निर्णय हा भविष्य घडवितो. व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर त्याच्या दृष्टीकोनाचाही परिणाम होतो. सकारात्मक दृष्टीकोन असणारी व्यक्ती एखादी गोष्ट करण्यास लगेच तयार होईल, तर नकारात्मक दृष्टीकोन असणार्या व्यक्ती ती गोष्ट करण्यास तयार होणार नाहीत. आपली स्वप्ने जिवंत ठेवण्याची क्षमता व अफाट निर्णयक्षमता आत्मसात करण्याची गरज आहे. आपल्याला निर्णय घेत येत नाही, कारण निवडलेला रस्ता चुकला तर काय, अशी चिंता वाटत असते. अशी चिंता वाटणे चांगलेच आहे, कारण काळजी वाटली तरच आपण निर्णय घेण्यापूर्वी विचार करु. पण कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल, रस्ता निवडवाच लागेल आणि तरच प्रवास सुरु होईल. अशा प्रसंगात आपली निर्णयक्षमता वाढविण्यासाठी आपल्याला विचारकौशल्य उपयोगी पडेल
    विचार कौशल्य म्हणजे विचार करण्याचे, विचार कसा करावा याचे कौशल्य! आपल्याला शाळेत, घरातविचार कसा करावाहे शिकवले जाते. तथाकथित मूल्ये, संस्कार यांची माहिती दिली जाते. पण विचार करण्याचे काही कौशल्य असते, हे शिकवलेच जात नाही. विचार तर आपल्या मनात सतत असतात. विचारांची अखंड धारा. जणू काही नदीचा प्रवाह वाहत असतो. यातले काही विचार भीतीदायक असतात, काळजी वाटायला लावणारे असतात. काही विचारांची आपली आपल्यालाच लाज वाटायला लागते. विचारांच्या प्रवाहात आपण गुदमरत असतो. विचारांच्या भोवर्यात गरगरून आपला जीव कासाविस होतो. सतत अनेक विचार आपल्या मनात येतात, हैराण करतात. याच विचारांच्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता कालवे काढून या विचारांच्या प्रवाहाला दिशा देणे म्हणजे विचार कौशल्य! त्यासाठी जाणीवपूर्वक विचार करायला शिकावे लागते, वेळ द्यावा लागतो.
     जाणीवपूर्वक विचार करण्याची सवय आपल्या मनाला लावता येते. कालवा खणला की पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलता येते, त्याचप्रमाणे विचारांच्या प्रवाहासाठी असे कालवे तयार करावे लागतात. कोणतेही निर्णय घेताना अनेक वेगवेगळे पर्याय कोणते आहेत, याचाच विचार म्हणजे एक कालवा. कोणताही विचार सर्वांग सुंदर नसतो. त्या प्रत्येक पर्यायातील सकारात्मक मुद्दे आणि धोके किंवा नकारात्मक मुद्दे कोणते याचा विचार म्हणजे त्यापुढील टप्पा! आयुष्यात आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. कॉर्मसला जायचे की सायन्सला? कॉल सेंटर जॉईन करायचे की पुढे शिकायचे? अभिनयाकडे, गाण्याकडे अधिक लक्ष द्यायचे की आहे तो जॉब पकडायचा, हे ठरवण्याची वेळ कधी न कधी येतेच! अशा वेळी आपल्याला नक्की काय साधायचे आहे, कोणत्या दिशेला जायचे आहे हे नक्की करावे लागते
     आपल्या शक्ती कोणत्या आहेत, मयार्दा काय आहेत, याचा विचार करावा लागतो. आपण असा विचार करतोही. पण बर्याच वेळा आपल्या मनात एकाच वेळी अनेक, परस्परविरोधी विचार येतात. त्यामुळे मनातील गुंता काही केल्या सुटत नाही आणि निर्णय होत नाही. अशा वेळी हे विचार कागदावर लिहून ठेवणे उपयोगी ठरू शकते. आपल्या समोर असणारे वेगवेगळे पर्याय लिहून काढायचे. जाणीवपूर्वक विचार करताना प्रथम प्रत्येक पर्यायाच्या चांगल्या बाजू, फायदे याचाच विचार करायचा, ते लिहून ठेवायचे. नंतर त्या पयार्यांचे तोटे , धोके अथवा नकारात्मक बाबी यांचा विचार करायचा, ते लिहून काढायचे. केवळ दोनच पयार्यांचा विचार न करता दोन्ही पर्यायातील फायदे अधिकाधिक मिळतील आणि तोटे कमी होतील असा तिसरा अधिक चांगला पर्याय असू शकतो याचाही विचार करायचा. हे सर्व विचार कागदावर लिहून काढल्याने अधिकाधिक स्पष्ट होतात. मनातला गोंधळ, गुंतागुंत कमी होते. निर्णय घेणे सोपे जाते. निर्णय हे प्रत्येकाला घ्यावेच लागतात व त्या निर्णयांची बरी-वाईट जबाबदारी पूर्णपणे आपल्या अंगावर घेतो तोच आपल्या आयुष्यात यशस्वी झालेला दिसतो.त्यामुळे निर्णय घ्यायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही.पण त्यामुळे अनुभव येत राहतात आणि एकादाचे अचूक निर्णय घेण्यात तुम्ही मास्टर होता.

Monday, November 27, 2017

आपली लढाई आपल्यालाच लढायला हवी

     मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमांइड आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईदची पाकिस्तानने दहा महिन्याच्या नजरकैदेतून सुटका केली आहे. यामुळे दहशतवाद्यांविरोधात लढण्याची जी कटिबद्धता पाकिस्तान दाखवत होते, ते आता किती खोटे आहे, हे स्पष्ट झाले आहे. आणि जगासमोर त्याचा खरा चेहराही उजेडात आला आहे. याला आपल्या सरकारने याखेपेला मोठा आक्षेप नोंदवत आपला विरोध दर्शवला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या हाफिज सईदचा खरा चेहरा कोण विसरेल. सईदच्या सुटकेमुळे आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे पाकिस्तान आपल्या देशात आंतकवादच्या दोषी लोकांना आणि संघटनांना शिक्षा ठोठावण्याबाबत अजिबात गंभीर नाही. शिवाय तिथली व्यवस्था आंतकवाद्यांना वाचवण्यात धन्यता मानते. भारताने पाकिस्तान सरकारला आंतरराष्ट्रीय नियमानुसार हाफिज सईदविरोधात ठोस कारवाई करण्याच्या आपल्या मागणीचा पुनर्रुच्चार केला आहे.

     भारतच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशांनी पाकिस्तानच्या या कुकृत्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेनंतर सईदच्या सुटकेनंतर पाकिस्तानबाबतचा वाईट संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला असल्याचे जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय आंतकवाद विरोधात लढण्याच्या पाकच्या कटिबद्धतेविषयी आता प्रश्नचिन्ह उमटत आहेत.पाकिस्तानने सांगितले होते की, तो आपल्या भूमित आंतकवादाला थारा देणार नाही,वाढू देणार नाही, पण सईदच्या सुटकेमुळे त्याचा खरा चेहरा उजेडात आला आहे. अमेरिकेने याचे परिणाम भोगायला तयार राहा, असा पाकिस्तानला इशारा दिला आहे.एवढेच नव्हे तर अमेरिकेने आणखीही पुढे सांगितले आहे की, पाकिस्तानने सईदला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला आरोपी करावे, अन्यथा याचा परिणाम अमेरिका आणि पाकिस्तान संबंधावर होईल. यावरून एक स्पष्ट होते की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांचा दृष्टीकोन माजी अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यापेक्षा थोडा कडक दिसतो आहे. बराक ओबामा आणि त्यांचे काही अधिकारी पाकिस्तानविषयी थोडी नरमाईची भूमिका घेत होते.त्यामुळे पाकिस्तानला थोडी ़ढील मिळाली होती.पण ट्रंप यांची भूमिका अशी नाही. त्यांची भूमिका आंतकवादविरोधात सक्त आहे.त्यामुळे त्यांच्याकडून थोडी फार आशा करायला हरकत नाही. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, जर पाकिस्तानने हाफिज सईदला तात्काळ अटक केली नाही तर, अमेरिका काय भूमिका घेणार आहे? त्याने कोणत्याप्रकारचे परिणाम भोगावे लागतील म्हटले आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.अमेरिका कथनी आणि करणीमध्ये कसा ताळमेळ राखतो, हे आपल्याला पाहावे लागणार आहे. आपण अशी काही आशा करू शकत नाही की, अमेरिकेने ओसामा बिन लादेनविरोधात ज्या प्रकारची कारवाई केली होती, तशा प्रकारची कारवाई सईदबाबत करावी. अमेरिका सईदला भयंकर आंतकवादी मानत असला तरी त्याला ओसामा बिन लादेनइतका आपला मोठा शत्रू मानत नाही. सईदविरोधात अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे, पण आजपर्यंत त्याचे काही वाकडे झाले नाही.
     ओसामा बिन लादेन अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू होता, त्याने अमेरिकेच्या नागरिकांचा जीव घेतला होता.त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्याच्याकडे ठोस असे कारण होते.पण सईद जितका भारताला नुकसान पोहचवत आहे, तितका तो अमेरिकेला पोहचवत नाही. अमेरिकेचा हाफिज सईदपेक्षा अधिक राग हक्कानी नेटवर्कवर  आहे. हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे.हक्कानी नेटवर्कचा खातमा त्यावेळेला होईल,ज्यावेळेला पाकिस्तानी सैन्य त्याला मदत करण्याचे बंद करेल. पाकिस्तानी सैन्य आणि हक्कानी नेटवर्क यांचे संबंध संपवायचे असतील तर पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सत्तेची मुंडी पिरगळायला हवी.यासाठी अमेरिकेने आपल्या आर्थिक मदतीत कपात करायला हवी. या पैशावरच पाकिस्तानी सैन्य मजा मारत आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या अधिकार्यांच्या मुलांना आणि कुटुंब-नातलगांना ज्या अमेरिकेत  शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा दिल्या जात आहेत,त्या रोखायला हव्यातत्याचबरोबर पाक सैन्यातील अधिकार्यांचा अमेरिका आणि अन्य देशातल्या बँकांमध्ये जो पैसा जमा आहे, तोदेखील फ्रीज करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. नाही तर त्यांच्यावर काहीएक परिणाम होणार नाही.
     पण भारताने असे समजू नयेत की, आपली लढाई अमेरिका लढेल. अमेरिका तेच करेल, जे त्याच्या फायद्याचे आहे.तो कधीही आपली लढाई लढणार नाही. आपल्याला आपली लढाई स्वत: ला लढावी लागणार आहे. हाफिज सईदच्या सुटकेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात जे वातावरण तयार होत आहे, त्याचा फायदा उठवायला हवाआंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची काळीकृत्ये ठेवावी लागतील. प्रत्येक देशाने पाकिस्तान आंतकवादी देश आहे, असे म्हणावे, अशा पद्धतीने आपण त्याचे सादरीकरण करायला हवे. आंतकवादी संघटनांना पाकिस्तान आश्रय देत आहे, याचे ठोस पुरावे आंतरराष्ट्रीय मंचावर मांडावे लागतील. संयुक्त राष्ट्रमध्ये आपल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानविरोधात खरेच त्यांचे कौतुक करण्यासारखे भाषण केले. आपली बाजू सफाईदारपणे मांडली. पण आता प्रत्येक देशाच्या राजधानीत जाऊन पाकिस्तानविरोधात आपला राग आळवायला हवा आणि त्यांना ठोस विचारायला हवे की, तुम्ही पाकिस्तानच्या बजूने आहात की भारताच्या! भारतानेही आता निश्चय करायला हवा की, आपल्यासाठी देश आणि नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे का आर्थिक प्रगतीअर्थात आपण आर्थिक फायद्यासाठी आपण आपल्या देशाच्या सुरक्षेविषयी समझोता करू शकत नाही. अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या देशांनादेखील आपल्या बाजारपेठेची आवश्यकता आहे.त्यामुळे आपण त्यांच्यावर सक्त दवाब आणू शकतो.
     सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, आपल्या देशातलील राजकारण्यांमध्ये याबाबतीत निश्चित राजकीय इच्छाशक्ती आहे का? आतापर्यंत तरी याचा प्रत्यय आलेला नाही. आपण जोपर्यंत आंतकवादविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्य देशांवर आपण ठोस दवाब आणू शकत नाही,किंवा आपली इच्छाशक्ती दाखवू शकत नाही, तोपर्यंत पाकिस्तानवर अंकुश लावणे अवघड आहे.

चंदन शेतीला प्रोत्साहन मिळायला हवे

     आपल्या देशात चंदन शेतीला चांगले दिवस असताना आणि यातून शेतकरी आपल्या श्रीमंतीचे स्वप्न साकारू शकत असतानाही आपल्या देशात या पिकाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. केरळ आणि कर्नाटकातच तेवढी चंदनाची शेती मोठ्या प्रमाणात होत आहे. आता पंजाबसह अन्य राज्येही पुढे येऊ लागली आहेत,मात्र यासाठी शासन फारसे उत्सुक दिसत नाही. प्रोग्रेसिव चंदन फार्मर्स असोशिएशनच्या एका आकडेवारीनुसार आपल्या देशात महिन्याला दोन हजार क्विंटल चंदनाच्या लाकडांना मागणी आहे,मात्र प्रत्यक्षात फक्त शंभर क्विंटल लाकडे उपलब्ध होत आहेत. यावरून चंदनाची शेती किती गरजेची आणि शेतकर्यांच्या भरभराटीची आहे, हे लक्षात येईल.चंदनाचे झाडदेखील नारळाच्या झाडासारखेच कल्पवृक्ष आहे, असे म्हणायला हवे. या झाडाचे सगळे भाग उपयोगात आणता येतात. चंदनाच्या लाकडाची आजची किंमत जवळपास 12 हजार रुपये प्रतीकिलो आहे. याचा बाहेरील भाग (खोडाच्या गाभ्याबाहेरचा सालीपर्यंतचा भाग) दीड हजार रुपये प्रतीकिलोने विकला जातो.यापासून दुर्मिळ वस्तू, खेळणी,कॅरम, कॅरम चकत्या (कॉइन) बनवल्या जातात. याच्या मूळापासून मिळणारे तेल तीन लाख रुपये प्रतीकिलो आहे.

बारा वर्षात एकरी सहा कोटी उत्पन्न
चंदनापासून सुगंधी गाभा व त्यापासून तेल काढले जाते. सुगंधी गाभा हा तुरट,कडू,ताप निवारण करणारा,थंड,उल्हासित ,कडक,जड,टिकाऊ,मधुर आणि उग्र वासाचे असते. प्रत्येक रोपापासून 15 ग्रॅम तेल निघते.याच्या फांद्या, पाने यांच्यापासून सौंदर्य उत्पादने आणि अक्षरबत्तीचा लगदा आदी कामांसाठी उपयोगाला येतात. ताज्या पानांपासून फिकट पिवळे मेण मिळते. प्रत्येक एकरामागे बारा वर्षांनंतर सहा कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते. याशिवाय आंतरपिकातून शेतकरी आवळा इत्यादींपासून दरवर्षी पाच लाख रुपयांची करू शकतात. त्याचबरोबर भाजीपाला लागवड करून अतिरिक्त कमाई करू शकतात.
केरळ,कर्नाटक चंदन उत्पादनात आघाडीवर
देशात चंदनाची शेती मुख्यत: केरळ आणि कर्नाटकात केली जाते.पण आता अन्य राज्यातही याचे प्रयत्न होत आहेत.केरळात चंदनाचा ऑइल कंटेंंट चार टक्के आहे तर कर्नाटकात तीन टक्के आहे. आता पंजाबमध्येही चंदन शेती जोर पकडत असून इथे ऑइल कंटेंट 2.80 ते तीन टक्के आहे. ओडिसामध्ये अडीच टक्के, महाराष्ट्रात दोन टक्के आणि मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये दीड टक्के कंटेंट आहेत. आपल्या महाराष्ट्रात चंदन शेतीला चांगला वाव आहे.चंदनाची व्यावसायिक शेती केल्यास चंदनाच्या ऑइलचा कंटेंट तीन टक्क्यांपर्यंत नेला जाऊ शकतो.मात्र यासाठी शासन आणि अन्य स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. यातून मिळणारे उत्पन्न उशिराने मिळत असले तरी त्यातल्या आंतरपिकातून वर्षालाही चांगल्यापैकी विविध उत्पादने काढता येतात.
पंजाबात सध्या चंदन शेतीने चांगलाच वेग घेतला आहे. गहू-तांदूळ चक्रात होत असलेले जमिनीचे नुकसान, टाकाऊ कचरा जाळला जात असल्याने इथल्या लोकांना त्याचा होत असलेला त्रास. आर्थिक तंगीमुळे होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या अशा अनेक समस्यांना इथला शेतकरी तोंड देत आहे. चंदनाची शेती त्यांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह देईल, असे म्हटले जात आहे. अशीच परिस्थिती आपल्या राज्याची आहे. आपल्या राज्यातही या शेतीला प्रोत्साहन दिल्यास आणि यावर अधिक संशोधन झाल्यास चांगलाच लाभ होण्याची शक्यता आहे.यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
आंतरपिकातून उत्पन्न
चंदन अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत शर्विलक असे म्हणतात. शर्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जीवनसत्त्वे स्वत:च्या मूळांद्वारा शोषून घेतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी अन्य झाडांची लागवड करावी लगतात. याठिकाणी दीर्घायुषी,मध्यम आयुष्याची किंवा फळझाडे लावता येतात. साग, सादडा,लिंब,सुरू,पळस,करंज, नीलगिरी,बाभूळ, सुबाभूळ, काशिद आदी  दीर्घायुषी झाडे तसेच हादगा,शेवरी, शेवगा, बांबू,निरगुडी अशी मध्यम आयुष्याच्या झाडांची लागवड करता येते. याशिवाय आंतरपिकांमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, काळमेध,भुईरिंगणी, शतावरी, कोरफड अशी औषधी वनस्पतीही घेता येतात. एका माहितीनुसार एका एकरात चंदनाची 225 झाडे लावली जाऊ शकतात.याशिवाय शंभराहून अधिक आवळा व अन्य झाडांची लागवड करता येते.
रोगकीड नाही
चंदनावर शक्यतो नुकसानकारक जैविक किंवा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र काही किडीचा प्रादुर्भाव झालाच तर औषध फवारणीने तो आटोक्यात येऊ शकतोसाधारणत: खडकाळ,दगडयुक्त व कोरड्या भागातील चंदनापासून मिळणारे तेलाचे प्रमाण हे सुपीक जमिनीपासून मिळणार्या चंदनाच्या तेलापेक्षा अधिक असते.मात्र दोन्हीकडून मिळणारे तेल सारख्याच गुणवत्तेचे असते.चंदनाची शेती ठिबकमधून करता येते. कोकणातल्या लालमातीत तसेच लातूर जिल्ह्यातल्या काही शेतकर्यांनी चंदनाची यशस्वी शेती केली आहे. आज ओढापात्रात, शेतीच्या बांधावर बिया पडून झाडांची उगवण होत आहे.यातून चंदनाची तस्करी करणार्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. या गोष्टी टाळायला हव्यात. आपल्या राज्यात कायद्याचे नियंत्रण असल्याचे सांगण्यात येते. चंदन झाडांची लागवड व तोड यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते.शिवाय झाडांच्या संरक्षणासाठी रक्षकांची नियुक्ती करावी लागेल. मात्र या शेतीतून शेतकर्यांचे आयुष्य बदलणार असेल तर त्याला शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. खते,पाणी यांचा फारसा खर्च नसलेली ही शेती मागणीनुसार वाढण्याची आवश्यकता आहे. झाडे तयार झाल्यावर काही गोष्टींची रिस्क आहे. चंदन तस्करी गृहीत धरून काही उपाययोजना केल्यास शेतकर्याला फायदाच फायदाच आहे. त्यामुळे शेतकर्यांनी या शेतीकडे वळायला काहीच हरकत नाही.

मुलांचे आयुष्य धोक्यात घालू नका

     आज सतत पूर्वीच्या काळातील माणसे आणि आताच्या काळातील माणसे यांच्यात विविध कारणाने तुलना केली जाते. जुनी माणसे तर आमच्या काळात असे होते, तसे होते सांगताना थकत नाहीत.कारण त्यांना आजच्या पिढीचे वागणे,बोलणे पचवताना जड जात आहे. त्यामुळे त्यांची सतत चीडचीड दिसून येते. मात्र त्यांचे काही चालतच नाही. त्यामुळे त्यांना शेवटी आपले तोंड बंदच करावे लागते. वास्तविक सध्याच्या काळात दळवळणाची साधने वाढली आहेत. पूर्वी स्वयंपाक करायला, धुणी-भांडी करायला जे कष्ट पडत आहेत, ते नव्या साधनांनी कमी झाले आहे. दारात वाहने आली असल्याने थोडक्या कालावधीत पाहिजे तिथे जाता येते. म्हणजे लोकांची कामे पटापट होत आहेत. असे असले तरी माणसांना  असलेले सुख  उपभोगता येईना, अशी परिस्थिती आहे.कारण तो अधिकच पैशाच्या मागे लागला आहे. रोजच्या जीवनाचा खर्चदेखील वाढला असल्यामुळे माणूस मिळालेल्या सुख साधनांचा त्याग करत सतत धावपळ करत आहे. त्याची जीवनशैली बदलली आहे. कोण रात्रभर काम करतो तर कोण दिवसभर. या धावपळीत आपल्या मुलांकडे आणि स्वत:कडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. साहजिकच त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आणि त्यामुळेच जुनी माणसे आजच्या पिढीवर राग काढत आहे.

     जीवनशैलीमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलामुळे लोकांच्या शरिरावर आणि मनावर अनेक व्याधींनी कब्जा केला आहे. कारण त्यांना रोजच्या धावपळीत व्यायम करायला वेळच नाही. आधुनिक तंत्रज्ञान अवतरल्याने बहुतांश कष्टाची कामे कमी झाली आहे. त्यामुळे कष्ट कमी झाल्याने ऊर्जा खर्च होत नाही. ती साठून अनेक रोग, आजार त्यांना चिकटत आहेत. यशासाठी धडपणार्या लोकांना अपयश येऊ लागल्याने माणसे डिप्रेशनमध्ये जात आहे. वास्तविक पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारायचा असतो आणि पुन्हा नेटाने कामाला लागायचे असते, हे सांगायला आणि ऐकून घ्यायला कुणाला वेळच नाही. त्यामुळे नवनवे आजार लोकांना होऊ लागले आहेत. शरीराला व्यायाम आणि मनाला शांती मिळत नसल्याने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊन लोक आत्महत्यासारख्या टोकाच्या निर्णयाकडे जात असल्याचे दिसत आहे. मुलांकडे आई-बाबांचे लक्ष नसल्याने मुलेदेखील अनेक वाईट गोष्टींना कवटाळून घेत आहेत आणि त्यात वाहवत जात आहेत. कामानिमित्त आई-बाबा बाहेर जात असल्याने आणि फ्लॅटसंस्कृती वाढत चालल्याने खेळ कमी झाला आहे. घरातच संगणक,लॅपटॉपवर गेम खेळणे आणि टीव्ही पाहात राहणे अशा गोष्टीत मुले गुंतून पडत आहेत. ती एकलकोंडी होत असल्याने त्यांनाही अगदी लहान वयात विविध आजार आणि सवयी जडू लागल्या आहेत. लहानापासून थोरापर्यंत सगळीच या बदलत्या जीवनशैलीच्या आहारी गेले आहेत.
      पूर्वीच्या काळी मोठया कष्टाची कामे करणार्या व्यक्तींना वेगळ्यावेगळ्या व्यायामाची गरजच भासत नसे. अर्थात त्यांना कराव्या लागणार्या कष्टामुळे त्यांच्याकडे इतर गोष्टींसाठी वेळच नसे, हा भागही तितकाच महत्त्वाचा आहे, पण नवनवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आल्यावर दैनंदिन जीवनातही त्याचा वापर वाढला. त्यामुळे वेळेबरोबर कष्ट वाचू लागले. परिणामी कष्टाच्या कामामुळे शरीराला मिळणारा व्यायाम कमी झाला. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी वेगळे उपाय करणे क्रमप्राप्त झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे संपूर्ण जीवनाचा ढाचाच बदलून गेला आहे. त्यामुळे विविध आजारांना आपोआपच निमंत्रण मिळायला लागले आहे. ही बाब खरी असली तरी आई-बाबांनी थोडे थांबून विचार करायला हवा. मोठ्या लोकांचे ऐकायला हवे. आपल्यासारखी धावपळ आणि शारीरिक,मानसिक वेदना, पिढा होऊ नयेत,यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुढच्या पिढीला कष्ट होऊन नये म्हणून माणसे आपले बहुमोल असे आयुष्य धोक्यात घालत आहेत. हे करताना माणसे स्वत:चे नुकसान तर करून घेत आहेतच शिवाय पाल्याचेही नुकसान करत आहेत.
      घरात पैसा असेल तर मुले काम करणार नाहीत, अभ्यास करणार नाहीत, उलट ती ऐतखाऊ होतील.याचा त्यांच्या आयुष्यात संघर्ष घडला पाहिजे. माणूस म्हणून त्याच्याही वाट्याला तुम्हाला ज्या वाट्याला आल्या त्या त्यांच्याही वाट्याला यायला हव्यात. माणसाला काही कामच नसेल तर आणि त्याची सवय नसेल तर ती काय करू शकणार आहेत. कित्येक मोठ्या यशस्वी उद्योजकांची मुले आपल्या आयुष्यात अपयशी झाली आहेत. त्याला कारण त्यांचे आई-वडील जबाबदार आहेत. आपल्यासारखे कष्ट त्यांना करायला लागू नये म्हणणार्या पालकांना मुलांच्या भावी आयुष्यात काय घडणार याची आपल्यावरून कल्पना यायला हवीभावी पिढीचे शारीरिक,मानसिक नुकसान होऊ नये, यासाठी आतापासूनच लोकांनी काळजी घ्यायला हवी.
     एक सजग पालक म्हणून काही तत्त्वांचे पालन आपण आपल्या मुलांसाठी करायला हवे. शालेय वयात मुलांची योग्य रीतीने शारीरिक, मानसिक तसेच भावनिक वाढ होणे आवश्यक असते. वाढत्या वयानुसार वजन व उंचीमध्येही योग्य वाढ होणे गरजेचे असते. या सर्व गोष्टींसाठी शरीराची योग्य हालचाल होणे आवश्यक आहे. शारीरिक हालचालीमुळे वजन तसेच उंचीचे संतुलन राखले जाते. असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
   
 अलीकडे बदललेल्या जीवनशैलीनुसार वाढत्या वयातच मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली आहे. त्यामुळे हा फार मोठा चिंतेचा विषय आहे. मुलांनी दररोज किमान एक तास व्यायाम करणे अथवा घराबाहेर जाऊन मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे, पण शरीराची ही गरज आज पुरवली जात नाही. वाढत्या वयातील मुलांची जीवनशैली दिवसेंदिवस अधिकाधिक बैठी होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. त्यामुळे त्याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा. मुले एकदा शाळेत जायला लागली की, मग शालेय विषयांबरोबरच निरनिराळ्या विषयांच्या शिकवण्यांच्या गराड्यात ती हरवून जातात. त्याचबरोबर सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षकांच्या व पालकांच्या अभ्यासाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांचा अधिक वेळ जातो. त्यामुळे मुलांना खेळायला तसेच बागडायला वेळच उरत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्यामुळे किंवा भ्रमणध्वनी, संगणकावर खेळल्यामुळे सकाळी लवकर उठता येत नाही. त्यामुळे सकाळी व्यायाम करण्याची वेळ निघून गेलेली असते. तसेच संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर मुलांना पुन्हा शिकवणीला जायला लागते. त्यानंतर टीव्हीवर कार्टून बघण्यात वेळ जातो. त्यामुळे मैदानी खेळ खेळता येत नाही. परिणामी शरीराला व्यायामही मिळत नाही. असे अनेक दिवस झाल्यास त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. काहीजणांचा लठ्ठपणा वाढतो.
    वाढत्या शहरीकरणाचा परिणाम मुलांच्या जीवनावर होत आहे, तर मुलांच्या काही गोष्टी शहरी जगण्याशी जोडलेल्या आहेत. मुलांना खेळायची इच्छा असेल तरीही ते रहात असलेल्या इमारतीच्या आवारात खेळायला मोकळी जागाच नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. अशी स्थिती आज अनेक शहरात आहे. त्यामुळे परिसरातील जागेची कमतरता मुलांच्या मनावर परिणाम करते. तसेच त्यांच्या शारीरिक वाढीवरही परिणाम करते.
     शाळेत जाणार्या मुलांनी तसेच त्यांच्या पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतली, तर त्यांना तंदुरुस्त राहता येईल. मुलांनी शाळेत चालत किंवा सायकलवरून गेल्यास त्याचा फायदा त्यांना निश्चितच होईल. जागेअभावी खेळता येत नसलेल्या मुलांना पालकांनी कराटे, बॉक्सिंग, स्वीमिंग, टेनिस अशा खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त करावे. या खेळामुळे मुलांच्या शरीराला सर्वांगसुंदर असा व्यायाम मिळेल. तसेच त्याचा फायदा पुढील आयुष्यात त्यांना होईल. लहान वयामध्ये मुलांना नवीन खेळ व छंद जोपासणे सोपे जाते. त्यामुळे त्यांना तसे वातावरण तयार करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर एकाग्रता वाढविणारे खेळ खेळण्यास मुलांना पालकांनी सुचवावे. नेमबाजी, पतंग उडविणे यासारख्या खेळांचा समावेश यामध्ये करता येईल. अगदी घरातल्या घरात दोरीच्या उड्या मारल्यामुळेही शरीराला चांगला व्यायाम मिळतो. पालकांनी याबाबतीत वेळीच सावध व्हायला हवे.

Sunday, November 26, 2017

तंत्रज्ञानात स्त्री-पुरुष असमानता

     एका सर्वेक्षणानुसार संपूर्ण जगात फक्त 17.7 टक्के स्त्रियाच वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मंत्रिमंडळात, मंत्रिपदावर आहेत. भारतात 12 टक्के स्त्रिया या लोकांच्या प्रतिनिधी म्हणून लोकसभेत किंवा विधानसभेत पोहोचल्या आहेत. जेव्हा आपण रोजगारांची बाजारातील स्थिती पाहतो; तेव्हा असे लक्षात येते की, भारतातील पुरुष आणि स्त्री यातील फरक रोजगारांच्या बाबतीत सुमारे 53 टक्के आहे आणि जगातील इतर देशांच्या तुलनेत हा फरक खूप मोठा आहे. याला भारतातील सामाजिक रचना, रितीभाती, आचार आणि विचार हे नक्कीच कारणीभूत आहेत. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी या क्षेत्रांत स्त्रियांचे प्रमाण जगभरात कमी आहे. जागतिक आर्थिक व्यासपीठ या संस्थेने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून येते की तंत्रज्ञान, अभियांत्रिकी किंवा शास्त्र यात संशोधन करणार्या स्त्रियांची संख्या एक तृतीयांशाहून कमी आहे. पुरुषांना प्राधान्य भारतातील शास्त्र विषयात संशोधन करणार्या संशोधकात सुमारे 14 टक्के स्त्रिया आहेत. याबाबतीत आपण आपले शेजारी श्रीलंका, तसेच पश्चिम आशिया खंडातील देशापेक्षा खालच्या क्रमांकावर आहोत. थायलंड, फिलिपीन्समध्ये हे प्रमाण 52 टक्के, तर प्रगत देशातील जर्मनीमध्ये 26 टक्के, इंग्लंडमध्ये 37 टक्के, रशियामध्ये 40 टक्के, साऊथ आफ्रिकेत 43 टक्के आहे. तसे पहिले तर स्त्रिया अभ्यासू असतात, हे विषय स्त्रियांच्या जास्त ओळखीचे दिसून येतात व या विषयातील स्त्रियांचे प्रावीण्य चांगले आहे, असेही म्हणता येईल. परंतु त्यांना या क्षेत्रात नोकरी मिळत नसल्याचे दिसून आले आहे. याचे एक कारण स्त्रियांपेक्षा या नोकरीकरिता पुरुषांना प्राधान्य दिले जाते, असेही असू शकते. याचे अजून एक कारण सामाजिक रूढी आणि कल्पना हेही असू शकते. कारण आपला समाज मुलींना अभियांत्रिक क्षेत्रात, कारखान्यात काम करण्यास प्रोत्साहन देत नाही. आपले अनेक कामगार कायदेसुद्धा आजपर्यंत स्त्रियांना कारखान्यांत काम करण्याची परवानगी देत नव्हते. कारखान्यातील काम हे श्रमाचे काम आहे व ते पुरुषांनीच करायचे, ही एक पद्धतच होती.      स्त्रियांना या क्षेत्रातील कौशल्यसुद्धा शिकविले जात नाही. शिक्षणातही भेदभाव एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की मुलींच्या शाळेत शास्त्र, गणित इत्यादी शिकवायला चांगले शिक्षक मिळत नाहीत. मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य असल्यामुळे हे सर्व शिक्षक मुलांच्या शाळेत जातात व मुलींच्या शाळेत चांगल्या शिक्षकांचा तुटवडा असतो. काही ठिकाणी तर शास्त्र, गणित हे विषय मुलींकरिता नाहीत, असेच सांगून मुलींना दुसरे विषय देण्यात येतात. सेवाक्षेत्रात महिला दिसून येतात पण एका राष्ट्रीय सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की वित्त, विमा, औद्योगिक सेवा, बांधकाम या क्षेत्रातील महिला कर्मचार्यांचे प्रमाण फक्त सुमारे साडेतेरा टक्के आहे. उद्योग क्षेत्रात काम कमी मोदी सरकारने 16 जानेवारीला स्टार्ट-अप इंडिया या योजनेची घोषणा केली. या योजनेखाली नवीन उद्योजक, नवीन उद्योग बहरतील असा उद्देश आहे.
     नुकताच एका इंग्रजी वृत्तपत्राने सध्या अस्तित्वात असलेल्या स्टार्ट-अपमधील पाचशे उद्योजकांचा सहभाग असलेल्या 187 स्टार्ट- अप कंपन्यांचा अभ्यास केला. त्यातील फक्त 39 स्टार्ट-अप्स या महिलांनी चालू केलेल्या होत्या व यातील सुमारे 8 टक्के कंपन्यांत महिला मुख्य अधिकारी होत्या व यातील बर्याच महिला या उद्योगाच्या सहसंस्थापक होत्या. या स्टार्ट- अपमधल्या फक्त दोन टक्के स्टार्टनी महिलांना मुख्य अधिकारी नेमले आहे. या नवीन कंपन्यांत साधारण 15 टक्के महिला या कंपन्यांच्या विक्री विभागाच्या मुख्य आहेत, 17 टक्के व्यापारवृद्धी या विभागाच्या मुख्य आहेत, सुमारे 11 टक्के उत्पादन विभागाच्या मुख्य आहेत. तर फक्त 7 टक्के महिला वित्त विभागाच्या प्रमुख आहेतमहिलांचा सहभाग जर सर्व क्षेत्रात वाढवायचा असेल तर महिलांच्या शिक्षणाकडे, कौशल्य विकासाकडे लक्ष देणे जरुरी आहे. आज विशेषकरून ग्रामीण भागात अशी स्थिती आहे की शंभरातल्या फक्त 47 मुली उच्च माध्यमिक शिक्षणाचा टप्पा गाठतात. पुढे जाऊन या 47 मधील फक्त 15- 16 मुली महाविद्यालयीन किंवा पुढील शिक्षण घेतात. शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या स्त्रियांपैकी फारच थोड्या नोकरी व्यवसायात पडतात. यामुळे फारच थोड्या स्त्रिया आपल्या आर्थिक व्यवस्थेत योगदान देतात. अर्थात याला आपल्याकडील समाजरचना, सामाजिक विचार, परंपरा मोठ्या प्रमाणावर जबादार आहेत. कौटुंबिक जबाबदारी स्त्रियांवर कौटुंबिक जबाबदार्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत व त्या सांभाळताना त्यांना काही वेळा घराबाहेर पडता येणे शक्य होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार महिलांचा अर्थव्यवस्थेत सहभाग वाढवायचा असेल तर करणे जरुरी आहे.
     स्त्रियांचा आर्थिक व्यवस्थेत सहभाग नक्कीच जरुरी आहे. स्त्रिया आर्थिक बाबतीत स्वावलंबी, स्वतंत्र झाल्या पाहिजेत. याकरिता त्यांच्यासाठी विशेष योजना निर्माण करण्याची जरुरी आहे. यात शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार उपलब्धता, उद्योजकता विकास इत्यादी अनेक गोष्टींचा सहभाग असेल. सरकार व अनेक संस्था याकडे लक्ष देत आहेत.परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. आर्थिक क्षेत्रात सहभाग हवा आज ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या दिसून येत आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातसुद्धा बचत गट मोठ्या संख्येने तयार झाले आहेत व त्यातून अनेक उपक्रम व उद्योग उभे राहिले आहेत. त्यांच्या यशाकडे बघून अनेक महिला प्रेरणा घेत आहेत. भारताची जशी आर्थिक प्रगती होत जाईल तसा महिलांचा या आर्थिक व्यवस्थेत सहभाग वाढत जाईल. येणार्या काळात असंख्य संधी प्राप्त होणार आहेत, त्याचा योग्य तो फायदा महिलांनी उठवणे जरुरी आहे.

आंतरजातीय विवाह: कधी कॉमन होणार?

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही दशकांपूर्वी म्हटले होते की,'जोपर्यंत भारतात जातीप्रथा अस्तित्वात असेल,तोपर्यंत हिंदूंमध्ये आंतरजातीय विवाह आणि जातबाह्य लोकांशी क्वचितच संबंध प्राप्त होतील. जर येथील लोक अन्य प्रदेशांमध्ये,देशांमध्ये जातील,तेव्हा भारतीय जातीपातीची समस्या जगाची समस्या होईल.' भारतात आंतरजातीय विवाहाविषयीची सततची उदासिनता पाहूनच कदाचित डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की,भारतात आंतरजातीय विवाह अनिवार्य केले जाऊ शकत नाही.पण निदान कमीत कमी सरकारी स्तरावर आर्थिकपासून ते सामाजिक स्तरापर्यंत इतके प्रोत्साहित केले जायला हवे की, त्यामुळे आधिकाधिक लोक आंतरजातीय विवाह करण्यास प्रवृत्त होतील.

     स्वतंत्र भारतातले तीन मोठे राजकीय नेते या आंतरजातीय विवाहाच्या बाजूने उभे होते. डॉ. आंबेडकर, पंडित नेहरू आणि लोहिया ही तीन नावे आहेत. तरीही आपल्या देशात आंतरजातीय विवाहाची ठोस अशी संस्कृती विकसित झाली नाही. देशात स्वातंत्र्यानंतर आंतरजातीय विवाहाविषयी जी उदासिनता होती, ती आजही कायम आहे. याचा खुलासा प्रिंस्टन युनिव्हर्सिटीने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या एका अभ्यासामुळे होतो. दोन वर्षांपूर्वी 43 हजार 201 भारतीय कुटुंबांशी अगदी खोलवर जाऊन घेतलेल्या मुलाखतींवर आधारित हे संशोधन आहे.या अभ्यासानुसार वेगाने वाढणार्या शहरीकरणानंतरही भारतात फक्त 11 टक्के आंतरजातीय विवाह होत आहेत. आणि यातील 96 टक्क्यांपेक्षा अधिक विवाह हे प्रेमविवाह असतात. यामुळे हे लक्षात येते की,समाज स्वत: 4 टक्केदेखील अशा विवाहासाठी पूर्णपणे तयार नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होऊन गेली तरी याबाबतीत फारसा बदल झालेला नाही.
      आजही आपण जातीपातीच्या भरभक्कम बेड्यांमध्ये किती अडकून पडलो आहोत,हा त्याचा पुरावाच आहे. शास्त्रज्ञ पुन्हा पुन्हा सांगताहेत की, आंतरजातीय विवाह मनुष्याच्या चांगल्याच्या बाजूने आहे,तरीही याच्या विपरीत आपसातच विवाह करणे अस्तित्वासाठी घातक आहे. एकाच जातीत विवाह होत असल्याकारणाने काही जाती लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. आणि काही जाती तर लुप्त झाल्याही आहेत. अशा काही जाती आहेत, त्याही काही अज्ञात आजारांनी मरत आहेत. अंदमान-निकोबार बेटावरील आदिवासी जनजाती नेहमी संपूर्ण जगाशी अलिप्त राहून एका मर्यादित क्षेत्रातच राहत आहेत. त्यांचे वैवाहिक संबंध आपसातच बनले. यामुळे अनुवंशिक गडबडी झाल्या आणि ते सातत्याने अज्ञात अशा आजारांनी मरत आहेत. असे म्हणणे आहे भारतातल्या जीनोम फिंगर प्रिंटिंगचे जनक मानले जाणारे पद्मश्री शास्त्रज्ञ प्रा. लालजी सिंह यांचे! प्रा. सिंह यांच्या मतानुसार भारतात प्रारंभापासून समगोत्र विवाहाला विरोध केला गेला.पण नंतर लोकांनी जाती आणि समुहवादच्या चलतीमुळे या संकीर्ण विचाराला संपवून टाकले. याचा खुलासा प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाने होतो.
     प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार आज देशात फक्त 11 टक्के विवाह आंतरजातीय होतात आणि यातले सगळ्यात अधिक गोव्यात होतात. इथे होणारे विवाह एकूण विवाहाच्या 20.69 टक्के आहेत. गोव्यानंतर क्रमांक लागतो,तो सिक्कीमचा! इथे होणार्या एकूण विवाहांपैकी 20 टक्के विवाह आंतरजातीय होतात. यानंतर पंजाबचा (19.9) आणि केरळचा (19.65 टक्के) क्रमांक लागतो. आश्चर्याची गोष्ट अशी की, जो तामिळनाडू विकास आणि आधुनिकतेच्याबाबतीत देशातल्या अन्य राज्यांपेक्षा पुढे आहे, तो या आंतरजातीय विवाहात मात्र फारच मागे आहे.इथे फक्त 2.96 टक्के विवाह आंतरराजातीय होतात.मेघालयातही फक्त 2.04 टक्के विजातीय विवाह होतात. आंतरधार्मिक विवाह तर फक्त 2.1 टक्केच होतात. प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे भारतात जसजसे साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे, तसतसा लोकांचा दृष्टीकोन संकुचित होत चालला आहे. कारण 1958 मध्ये 51 टक्के भारतीय पालक मुलांसाठी आंतरजातीय विवाह योग्य असल्याचे समजत होते.पण आता 25 टक्क्यांपेक्षाही कमी आई-वडील असे आहेत, जे आंतरजातीय विवाहाच्या बाजूने आहेत. विशेष म्हणजे 1958 पासून ते आतापर्यंत शिक्षण,शहरीकरण आणि आर्थिक परस्थिती सुधारली आहे. त्यामुळे  शेवटी आपले शिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास आपल्या विचाराला पुढे नेत आहेत का मागे, असा प्रश्न उपस्थित होतो.

निर्णय घेताना आतला आवाज ऐका

     आपलं जीवन वेगवान झालं आहे. आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की, निर्णयदेखील पटकन घ्यावे लागतात. हे निर्णय चुकीचे आहेत की, बरोबर आहेत यापेक्षा निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. कारण योग्य वेळेला निर्णय घेतला नाहीत तर फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. आलेली संधी गमावणं भारी पडू शकतं. आता निर्णय घेतल्याच्या दोन शक्यता असतात. एक तर हा घेतलेला निर्णय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो किंवा तोट्याचा! योग्य असेल तर तुमचा फायदा हा होणारच असतो. मात्र,निर्णय चुकला असेल तर त्यातून तुमचं नुकसान होणार असलं तरी त्यातून आपला एक फायदाही होत असतो, ते म्हणजे यातून तुम्हाला शिकायला मिळते. आपलं आयुष्य योग्य प्रकारे जगायचं असेल तर निर्णय घेण्याच्या कलेत प्राविण्य मिळवायला हवं. यासाठी काही खास प्रयत्न करावे लागणार आहेत.त्या कोणत्या गोष्टी आहेत,त्या पाहू.

चुकीचे असले तरी बरोबरच!
ज्यांना नेहमी योग्य निर्णय असावा, असे वाटतं, असे लोक नेहमी निर्णय घेण्यास असमर्थ ठरतात. असे लोक मागेच राहतात. खरे तर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की, आपण माणूस आहे. चुकणे हा आपला स्वभागधर्म आहे. आणि पुढे पाऊल टाकल्याशिवाय ते पाऊल चुकीच्या ठिकाणी पडले आहे, हे कसे कळणार? यातूनच आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णयाला अत्यांधिक सावधानता बाळगणं योग्य नाही. काही लोक तुम्हाला सणकी म्हणतील.मात्र सुरुवातीला तुमचे निर्णय चुकीचे ठरतील, सारखे नाही. कारण त्यातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आणि चुकीच्या निर्णयाची शक्यता गृहीत धरल्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आपण करू शकतो.
गोंधळात पडू नका
बरेच लोक निर्णय घेण्याच्या अगोदरच पार गोंधळून जातात. होणार्या परिणामांच्या शक्यतेने इतका विचार करतात की, त्यात ते पार गुंतून जातात. चक्रव्युहात अडकून पडतात. एखाद्या छोट्याशा गोष्टीचे विश्लेषण करण्यात अडकून पडल्याने ते साधा निर्णय घेण्यास असमर्थ ठरतात. यामुळे त्यांचे दोन प्रकारे नुकसान होते.एक म्हणजे त्यांच्या डोक्यात द्वंद्व सुरू राहतं. उसरे म्हणजे ते स्वत:च निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अडकून पडल्याने याचा फायदा प्रतिद्वंद्वी घेतो. अनेक विकल्पांवर विचार करून करून आपण आपली ऊर्जा गमावतो. ही माणसे विरोधकांचा छोटासा डावदेखील हाणून पाडू शकत नाहीत.
आपल्या मनाचा आवाज ऐका
कित्येकदा माणसे स्वत:चा वाजवीपेक्षा जास्त विचार करतात आणि गोंधळात अडकून पडतात. तुम्हाला तुमच्या स्वत:च्या  समजुतीनुसार निर्णय घेता आला पाहिजे. दिखावेपणा दाखवण्याच्या नादात आपल्या आतल्या आवाजाला दाबून ठेवू नका. आपल्या आतून आलेल्या आवाजात खरेपणा असतो. मनाचा आवाज तोच खरा आवाज असतो. याच्या आधारावर तुम्ही जो निर्णय घ्याल, तो कधीही चुकीचा असू शकत नाही.
डेडलाइन निश्चित करा
महत्त्वपूर्ण निर्णय घेताना फायद्या-तोट्याचा विचार तर करायलाच हवा,मात्र त्याच्या विश्लेषणात अडकून पडून निर्णय घेण्याची योग्य वेळ गमावून बसणे, हे योग्य नव्हे. यापासून बचाव करताना स्वत:साठी एक डेडलाइन निश्चित करा. निश्चित डेडलाइनपर्यंत निर्णय आवश्य घ्यायला हवा. यानंतर तुम्हाला आपल्या निर्णयावर विचार करण्याची आवश्यकता नाही.