Saturday, November 18, 2017

भावना आणि व्यवसाय

     सध्या जिकडेतिकडे संजय लीला भन्साळीच्या पद्मावतीचीच चर्चा आहे.या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशा मागणीचा दबाव सरकारवर येत आहे. राजस्थानमधल्या चित्तोडगढ किल्लाच तिथल्या स्थानिकांनी पर्यटकांसाठी बंद पाडला.फक्त राजस्थानच नाही तर दिल्ली, उत्तर प्रदेश,गुजरात, आणि मध्य प्रदेश या राज्यातूनही या चित्रपटाला प्रचंड प्रमाणात विरोध होत आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर पद्मावती पाहायला चित्रपटगृहात जाणार्‍यांनी जाताना आपला विमा काढून जावा, असा सल्लाही दिला आहे.याचा सरळ अर्थ असा की, चित्रपट पाहणार्‍याचा जीव धोक्यात आहे. प्रेक्षकांना धमकी देण्याअगोदर पद्मावती चित्रपटाचा दिगदर्शक संजय लीला भन्साळी आणि यात राणी पद्मावतीची भूमिका साकारणार्‍या दीपिका पदूकोण हिलादेखील धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या एका राजपूत करणी नेत्याने संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणार्‍यास पाच कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. तर दीपिका पदूकोणचे नाक शूर्पणखेप्रमाणे कापण्याची धमकी देण्यात आली आहे.या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. सध्या चित्रपटातील कलाकार प्रचंड तणावाखाली असून त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे संजय लीला भन्साळीच्या पदमावतीचे काय होणार, असाच प्रश्‍न जिकडेतिकडे विचारला जात आहे. 

     यात आणखी भर खुद्द सेन्सॉर बोर्डाने घातली आहे. त्यांनी पद्मावतीच्या टीमला माघारी पाठवले आहे. सेन्सॉरकडे अगोदर पाठवलेल्या प्रिंटमध्ये काही दोष असल्याचे सांगितले जात आहे. बोर्डाने अद्याप चित्रपट पाहिला नाही. सध्या या चित्रपटाविरोधात जो गदारोळ उठला आहे, तो पाहून बोर्डाने सर्व स्तरावर चित्रपटाची समीक्षा करणार आहे,मगच चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवण्यात येईल, असा पवित्रा घेतला आहे. साहजिकच या चित्रपटाचा 1 डिसेंबर हा निश्‍चित झालेला प्रदर्शन दिवस पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुणी ही तारीख 12 जानेवारी 2018 असेल, असे सांगितले आहे. एकूण काय तर प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत जी उत्सुकता होती,ती आणखी ताणली जाईल, असेच सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. 
     चित्रपटांना विरोध हा आपली परंपरा आहे.मात्र या चित्रपटाचा विरोध वेगळेच वळण घेत आहे.किल्ला पाहायला जाणार्‍या पर्यटकांना तो पाहायला मज्जाव करणं, निदर्शने करणं अशा प्रकारचा विरोध आपण समजू शकतो,मात्र दिग्दर्शकाचा शिरच्छेद करण्याचे आदेश,प्रेक्षकांना मारण्याची धमकी आणि आपल्या देशात महिलांचा सन्मान केला जातो, त्याच देशात एका महिला कलाकाराचे नाक उडवण्याची धमकी देणं कितपत उचित आहे? वास्तविक या चित्रपटाला चित्रिकरण सुरू होण्यापासूनच विरोध सुरू झाला आहे. चित्रपट उद्योग ऐतिहासिक पात्रांना गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप आहे. आण्इ काही अंशी तो खराही आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच त्याला विरोध करणे, हे कोणत्या मापात बसते, समजायला कारण नाही.  मात्र या चित्रपटाला फक्त एवढ्यावरूनच विरोध होत आहे का, हेही तपासून पाहावे लागणार आहे. जो चित्रपट सार्वजनिक करण्यात आलेला नव्हता,तेव्हापासूनच याला विरोध सुरू आहे. काही दृश्ये आणि तत्त्वे यांना आक्षेप आहे.मात्र हा चित्रपट पाहिल्यावरच या चित्रपटात काय आहे आणि काय नाही,हे समजणार आहे. आणि विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची नियुक्ती करण्यात आली आहे. ते त्यांचे काम पाहतील. त्यांनाही समाजात धार्मिक क्षेत्रात किंवा जातीधर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही,याची काळजी आहेच.सध्याचे वातावरण पाहता सेन्सॉर बोर्डाने सर्व स्तरावरून चित्रपटाची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलकांनी सबुरीने घ्यायला हवे.लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये. आंदोलनाशिवाय शांततेच्या मार्गाने प्रश्‍न सोडवता येतात. संबंधित आंदोलनकर्त्यांच्या संघटनेने अगोदर चित्रपट पाहावा,मगच प्रदर्शनासाठी सज्ज ठेवायला हरकत नाही.
     पद्मावती हा चित्रपट 180 कोटीचा भव्यदिव्य चित्रपट आहे. या चित्रपटाशी अनेकांची अनेक प्रकारे नाते जुळलेले आहे. संजय लीला भन्साळीसह अनेकांचे करिअर डावावर लागले आहे. पैशांची मोठी गुंतवणूक आहे. या चित्रपटाच्या संबंधित लोकांच्या रोजगारीचा प्रश्‍न आहे. मागे या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे ठिकाण राजस्थानमध्ये तोडण्यात-फोडण्यात आले.तेथील चित्रिकरण बंद करून ते  महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात आणले व इथे याचे चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले. इथेही चित्रपट सेट जळण्याचा प्रकार घडला. सुरुवातीपासून या चित्रपटाला पणवती लागली असली तरी संजय लीला भन्साळी यांनी तेवढ्याच उत्साहाने चित्रपट पूर्ण केला. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.भन्साळी यांना आपण या कचाट्यातून सहिसलामत सुटू शकतो,याचा आत्मविश्‍वास आहे. कारण त्यात त्यांना वावगं काहीच वाटत नाही. कर नाही तर डर कशाला? असा त्यांचा पवित्रा दिसत आहे.
     या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच विरोध होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या चित्रपट उद्योगाची परिपक्वता. ऐतिहासिक पात्रे आणि कथानक याबाबतीत संधोधनात्मक चित्रपट आपल्या चित्रपट सृष्टीने बनवले नाहीत. उथळ,मनोरंकजनात्मक ढंग अशीच भूमिका त्यांनी घेतली असल्याचे आजवरच्या ऐतिहासिक चित्रपटांवरून दिसून येत आहे. व्यवसाय हा त्यांचा मुख्य हेतू राहिला आहे. असे नसते तर आपल्या चित्रपटांनी कधीच दोन-चार ऑस्कर पटकावले असते.संजय लीला भन्साळी हेदेखील याला अपवाद नाहीत. त्यांनी याअगोदर ज्या चित्रपटांची निर्मिती केली आहे, त्यावरून त्यांची भूमिका संशयास्पद वाटते. सत्यजीत रे सारखी काही क्वचित उदाहरणे आपल्याकडे आहेत, ज्यांनी 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या सोनार केल्ला या आपल्या चित्रपटात विरक्ती दाखवण्यासाठी बरेच संशोधन करून राजस्थानी संगीताचा आश्रय घेतला होता. जे लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत,त्यांना महाराणी पद्मावती यांचे चरित्र फारच हलक्या तर्‍हेने घेतल्याचे वाटते आहे. दुसरा आक्षेप आहे तो अल्लाऊद्दीन खिलजीचे उदातीकरण करण्यात आले आहे, असे वाटते. परंतु, या चित्रपटात काही आपत्तीजनक असेल तर ते पाहण्याचे काम सेन्सॉर बोर्डाचे आहे. चित्रपटाला विरोध करण्याच्या नावावर कायदा हातात घेण्याचा कुणाला अधिकार नाही. चित्रपट निर्मात्यांनीदेखील ऐतिहासिक पात्रांना गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. त्यांचे ज्या क्षेत्रात योगदान आहे, पावित्र्य आहे, ते आबाधित ठेवण्याची जबाबदारीदेखील त्यांची आहे. कुणाच्या भावना दुखावण्याचा अधिकार त्यांना नाही.

No comments:

Post a Comment