अन्न आपल्या शरीराची गरज आहे. अन्नाशिवाय
आपल्याच काय अन्य प्राणी, वनस्पतींचे काही चालत नाही.
मात्र अलिकडे आपल्यालाच काय, प्राणी,वनस्पतींना कीटकनाशकयुक्त, हायब्रीड अन्न खायला मिळत
आहे. शरीर तंतुरुस्त ठेवणारे आजचे अन्न नाही तर ते पोट भरण्याचे
अन्न आहे.यामुळे आरोग्यात मात्र सतत गडबडी होत राहते आणि पुन्हा
आपल्या शरीरावर औषधांचा मारा सुरू होतो. पूर्वीचा माणूस काटक
होता.सत्तरीकडे झुकला तरी त्याच्या शरीराला इंजेक्शन,गोळ्या, सलाईन अशा कसल्याच गोष्टी माहित नव्हत्या.
हरभर्याची दाणे कडाकडा फोडून खायचा.ऊसावर ताव मारायचा. मांसाहारी बेत असल्यावर हाडं फोडून
खायचा आणि जेवण झाल्यावर पानासोबत कडाकड सुपारी फोडायचा. मात्र
आज सगळेच नाजूक झाले आहेत. आजचा तिशीतलाच तरुण दाताला काही तरी
होईल,म्हणून हरभर्याची दाणे आणि ऊसापासून
लांब राहतात.आज आहार बदलला आहे. त्यातले
पोषण नाहिशे झाले आहे. आज चाळशी पार केलेला मनुष्य औषध-गोळ्यांवर जगायला लागला आहे. त्याला अन्नाची गरजच उरली
नाही. अर्थात त्या अन्नात आहेच काय, ते
खाण्यासारखे. असे म्हटले जाते की, खाल तसे
व्हाल. तसाच प्रकार सध्या आहे. हायब्रीड,कीटकनाशकयुक्त आहारामुळे माणूसदेखील हायब्रीड बनला आहे.
अन्न पोषणयुक्त असेल तर शरीर सुदृढ राहते. त्यावर मानसिक आरोग्य अवलंबून असते. आणि ते चांगले असेल
तर सामाजिक आरोग्य उत्तम राहते. अशी ही साखळी एकमेकांवर अवलंबून
आहे. त्यामुळे आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते आरोग्य म्हणजे ‘शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्टया संपूर्णत: सुदृढ स्थिती होय.
म्हणजे माणसाला रोग-व्याधी नाही किंवा त्यांची
लक्षणे नाहीत म्हणजे आरोग्य नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे.
शरीर पोषकतत्त्वावर अवलंबून असते. अन् ही पोषकतत्त्वे
मिळतात रोजच्या अन्नातून, आहारातून. म्हणूनच
म्हणतात, ‘खाल तसेच व्हाल’, असे म्हटले
जाते. ज्यांना योग्य समतोल आहार मिळतो, ज्यांची पचनक्षमता उत्तम असते, पचलेल्या अन्नाचे शोषण
उत्तम होते आणि अशा जीवनद्रव्याचा विनियोग उत्तम होतो त्यांचा पोषणदर्जा उत्तम असतो.
पोषणदर्जा ही शारीरिक अवस्था आहे. ती रोजच्या आहारावर
अवलंबून असते. म्हणूनच नित्य बदलू शकते. रोजचा आहार चांगला तर पोषणदर्जा चांगला, आरोग्य उत्तम. याउलट पोषकतत्त्वाच्या असमतोलामुळे
वा अभावामुळे किंवा अधिक्यामुळे पोषणदर्जाचा दर्जा खालावतो.
आता
फक्त आहार उत्तम असून चालत नाही. कारण खाल्लेले ऊर्जेत रुपांतर
व्हायला हवे. मेदात नव्हे. त्यामुळे शरीराला
व्यायाम महत्त्वाचा आहे. शरीराला कष्ट हवे आहेत. चालणे-फिरणे असायला हवे. म्हणजे
व्यायामही महत्त्वाचा आहे. आपल्याला माहित आहेच, तो कमीअधिक झाला तर त्याचा परिणाम शरीरावर, पर्यायाने
पोषणदर्जावर होतो. आहार-विहार उत्तम असेल
तर मनाची शांती व्यवस्थीत राहते. मन आनंदी राहतं. सगळे काही चांगले आहे,पण मनस्वास्थ्य ठीक नसेल तर त्या
खाल्ल्याचा काही उपयोग होत नाही. खाल्लेले अंगाला लागायला हवे
ना! त्यासाठी मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. म्हणूनच अन्नातील, आहारातील पोषक वा आनंदी वृत्ती,
शरीराला घडणारा वा घडवला जाणारा व्यायाम व मानसिक स्वास्थ्य या त्रिसूत्रीवर
शरीराची स्थिती अवलंबून आहे. जरी पोषणदर्जाचे परिणाम लवकर दिसत नसले
तरी कालांतराने ते आपल्याला दिसणारच आहेत.वेगवेगळ्या व्याधी शरीराला
चिकटायला लागतील, तेव्हा आपल्याला कळून चुकेल. तोपर्यंत वेळ गेलेली असेल. त्यामुळे वेळीच सावध व्हा
आणि उत्तम अन्न सेवन करा, व्यायाम करा, मनस्वास्थ्य प्रसन्न ठेवा आणि दीर्घायुष्य राहा, असे
मग सांगायची गरजच राहणार नाही.
हरितक्रांतीद्वारा
अन्नधान्याचे उत्पादन निश्चितच वाढले. अर्थात यामागे
शास्त्रज्ञ व संशोधक, कृषितज्ज्ञ यांचे परिश्रम आहे. पाणी अडवून, पावसाचे पाणी साठवून वापरणे, खते-रसायने-उत्कृष्ट बियाणे यांचा
वापर, कीटकनाशकांची फवारणी याचा उत्तम फायदा झाला. वर्षांतून एकाऐवजी दोनदा पिके घेणे, कणीस जास्त भरीव
व भरपूर दाणे असलेले असणे, त्याचा भार पेलवेल इतकी क्षमता देठात
असणे अशा संशोधनाच्या फलिताचा परिणाम छानच झाला. फळे,
भाज्या यांचेही उत्पादन वाढले. पण पोषणमूल्य वाढले
का हे महत्त्वाचे आहे. यामुळे फक्त भरले, ढेकर दिले, असेच झाले का? आज सेंद्रिय
शेतीचा मोठा गवगवा होत आहे. त्याचे क्षेत्र वाढत आहे.
मागणीही वाढत आहे. असे का होत आहे? मात्र याची मागणी वाढत आहे, तसा पुरवठा होत नाही.
पोषणमूल्यासाठी मूल्यही अधिक चुकते करावे लागत आहे. हरितक्रांती झाली. हे चांगले झाले, कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला
अन्न पुरवठा झाला नसता. भलतीच मोठी समस्या
उभी राहिली असती. पण पोषणमूल्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते,
तितके ते देता आले नाही.
आता
दुसरा प्रश्न असा की, आपल्याकडे आपल्या
देशातल्या लोकसंख्येला पुरेल एवढे पिकते.पण ते सर्वांपर्यंत पोहचत
नाही, हा तो प्रश्न आहे. आजही 30 टक्के लोक अर्धौपवाशी आहेत. त्यांना भरपेट अन्न मिळत नाही. याला कारण आहे ते अन्न-धान्याची प्रचंड प्रमाणात होणारी नासाडी! ही नासाडी काढणी,
मळणी, पाठवणी, साठवण अशा
विविध टप्प्यांवर होत असतेच. शिवाय ते अन्न शिजवून आपल्या पोटात
जाईपर्यंत सुरूच असते. लग्न समारंभासह अनेक कार्यक्रमात मोठ्या
प्रमाणात अन्नाची नासाडी होत आहे. एकिकडे मुबलक प्रमाणात अन्न
मिळते तर दुसरीकडे त्याच अन्नासाठी लोकांना दारोदार भटकत राहावे लागत आहे. ही आपल्या देशाची दुर्दशा आहे. ही अन्नाची नासाडी प्रत्येक
टप्प्यावर थांबवायला हवी. फळे-भाज्या-दूध-अंडी असे घटक नाशवंत आहेत. ते लवकर खराब होतात. ते खराब होऊन त्याची नासाडी होऊ
नये,यासाठी त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात उभारले
जायला हवेत. शिवाय जिथे कच्चा माल उपलब्ध होतो,त्याठिकाणी हे उद्योग उभारायला हवेत. यामुळे आपला आणखी
एक फायदा होणार आहे,तो म्हणजे तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध
होणार आहेत. जॅम-जेली, सरबते, गोठवलेल्या भाज्या, सॉस,
केचप, चीज, दूध, मासे व अंडयाची भुकटी बनविणे वगैरे इतर उपाय फायद्याचे ठरणार आहेत.
नासाडी थांबतेच शिवाय
मेतकूट, पापड, सांडगे,
पापड, चटण्या यामुळे आहाराचा दर्जा वाढतो.
यामुळे पारंपरिक पदार्थांना चांगले दिवस येतील.
आपल्याला
अन्नाच्याबाबतीत अजून बर्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत. आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण आपण
निसर्गावर मात करू शकलो नाही. सुनामी, अवेळी
पाऊस, गारपीट, पूर येणे, अवर्षण अशा नैसर्गिक संकटांचे पहाड कोसळतात.उत्पादने
वाढविण्यात त्यामुळे निश्चितच खीळ पडली. शिवाय मानवनिर्मित भ्रष्टाचार, साठेबाजी यामुळेही आपल्याला
मोठा फटका बसत आहे. एकिकडे अन्नउत्पादन वाढले, पण खाणारी तोंडेपण वाढली. लोकसंख्यापण झपाटयाने वाढू
लागली. त्यावरचे उपाय तितकेच फलदायी झाले नाहीत. लोकसंख्या आटोक्यात आणण्याची महत्त्वाची गरज आहे,पण कोणताही
राजकीय पक्ष आपल्या अस्तित्वाला आव्हान देणारे कृत्य करायला तयार नाही. मात्र छोटे कुटुंब, सुखी कुटुंब याची आज प्रकर्षाने गरज
आहे. काहींना तर एवढ्यासाठी तरी निदान देशात हुकूमशाही यावी,
असे वाटते आहे, यात काही चूक नाही.
आज
स्वच्छतेच्याबाबतीत भारत सजग झाला आहे. ती सजगता अगदी
प्रत्येक घरातल्या लहान मुलांपर्यंत दिसायला हवी आहे. आरोग्याचा
अस्वच्छता एक अडसर आहे. रोगराइवर,, र्निजतुक
पाणी व परिसर यावर उपाय योजले जात असले तरी ते कमीच पडत आहेत.यंदा तर डेंगू,मलेरिया, स्वाईन
फ्लूसारख्या आजारांनी सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. रोज नवनवे
रोग उदयास येत आहेत. यांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरात
तशी शक्ती उभी राहायला हवी आणि ती प्रतिकारशक्ती उभी राहण्यासाठी आपल्याला उत्तम अन्न,
व्यायाम याची गरज भासणार आहे. याची व्यवस्था काटेकोरपणे
करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार पातळीपासून प्रयत्न व्हायला
हवे आहेत. शासनाने मुलांना पोषणयुक्त अन्न मिळावे,म्हणून शालेय पोषण आहार सुरू केला आहे.पण त्याच्याबाबतीतही
प्रश्नचिन्ह उभे आहे. शिवाय शालाबाह्य
मुलांची संख्यादेखील मोठी आहे, त्यांच्या पोषणाचे काय?
यासाठी समाजसेवी संस्था, सरकार आणि स्वत:
व्ययक्तिक या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने माणूस तंदुरूस्त राहण्यास
मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment