आजच्या धकाधकीच्या जीवनात काही गोष्टींबाबत पटापट निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे अचूक व झटपट निर्णयक्षमता ही आता काळाची गरज बनली आहे.
निर्णय घेणे ही लहानसहान गोष्ट नाही. एक निर्णय
हा भविष्य घडवितो. व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर त्याच्या दृष्टीकोनाचाही
परिणाम होतो. सकारात्मक दृष्टीकोन असणारी व्यक्ती एखादी गोष्ट
करण्यास लगेच तयार होईल, तर नकारात्मक दृष्टीकोन असणार्या व्यक्ती
ती गोष्ट करण्यास तयार होणार नाहीत. आपली स्वप्ने जिवंत ठेवण्याची
क्षमता व अफाट निर्णयक्षमता आत्मसात करण्याची गरज आहे. आपल्याला
निर्णय घेत येत नाही, कारण निवडलेला रस्ता चुकला तर काय,
अशी चिंता वाटत असते. अशी चिंता वाटणे चांगलेच
आहे, कारण काळजी वाटली तरच आपण निर्णय घेण्यापूर्वी विचार करु.
पण कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल, रस्ता निवडवाच
लागेल आणि तरच प्रवास सुरु होईल. अशा प्रसंगात आपली निर्णयक्षमता
वाढविण्यासाठी आपल्याला विचारकौशल्य उपयोगी पडेल.
विचार कौशल्य
म्हणजे विचार करण्याचे, विचार कसा करावा याचे कौशल्य!
आपल्याला शाळेत, घरात ’विचार
कसा करावा’ हे शिकवले जाते. तथाकथित मूल्ये,
संस्कार यांची माहिती दिली जाते. पण विचार करण्याचे
काही कौशल्य असते, हे शिकवलेच जात नाही. विचार तर आपल्या मनात सतत असतात. विचारांची अखंड धारा.
जणू काही नदीचा प्रवाह वाहत असतो. यातले काही विचार
भीतीदायक असतात, काळजी वाटायला लावणारे असतात. काही विचारांची आपली आपल्यालाच लाज वाटायला लागते. विचारांच्या
प्रवाहात आपण गुदमरत असतो. विचारांच्या भोवर्यात गरगरून आपला
जीव कासाविस होतो. सतत अनेक विचार आपल्या मनात येतात,
हैराण करतात. याच विचारांच्या प्रवाहाबरोबर वाहत
न जाता कालवे काढून या विचारांच्या प्रवाहाला दिशा देणे म्हणजे विचार कौशल्य!
त्यासाठी जाणीवपूर्वक विचार करायला शिकावे लागते, वेळ द्यावा लागतो.
जाणीवपूर्वक
विचार करण्याची सवय आपल्या मनाला लावता येते. कालवा खणला
की पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलता येते, त्याचप्रमाणे विचारांच्या
प्रवाहासाठी असे कालवे तयार करावे लागतात. कोणतेही निर्णय घेताना
अनेक वेगवेगळे पर्याय कोणते आहेत, याचाच विचार म्हणजे एक कालवा.
कोणताही विचार सर्वांग सुंदर नसतो. त्या प्रत्येक
पर्यायातील सकारात्मक मुद्दे आणि धोके किंवा नकारात्मक मुद्दे कोणते याचा विचार म्हणजे
त्यापुढील टप्पा! आयुष्यात आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात.
कॉर्मसला जायचे की सायन्सला? कॉल सेंटर जॉईन करायचे
की पुढे शिकायचे? अभिनयाकडे, गाण्याकडे
अधिक लक्ष द्यायचे की आहे तो जॉब पकडायचा, हे ठरवण्याची वेळ कधी
न कधी येतेच! अशा वेळी आपल्याला नक्की काय साधायचे आहे,
कोणत्या दिशेला जायचे आहे हे नक्की करावे लागते.
आपल्या शक्ती कोणत्या आहेत, मयार्दा काय आहेत,
याचा विचार करावा लागतो. आपण असा विचार करतोही.
पण बर्याच वेळा आपल्या मनात एकाच वेळी अनेक, परस्परविरोधी
विचार येतात. त्यामुळे मनातील गुंता काही केल्या सुटत नाही आणि
निर्णय होत नाही. अशा वेळी हे विचार कागदावर लिहून ठेवणे उपयोगी
ठरू शकते. आपल्या समोर असणारे वेगवेगळे पर्याय लिहून काढायचे.
जाणीवपूर्वक विचार करताना प्रथम प्रत्येक पर्यायाच्या चांगल्या बाजू,
फायदे याचाच विचार करायचा, ते लिहून ठेवायचे.
नंतर त्या पयार्यांचे तोटे , धोके अथवा नकारात्मक
बाबी यांचा विचार करायचा, ते लिहून काढायचे. केवळ दोनच पयार्यांचा विचार न करता दोन्ही पर्यायातील फायदे अधिकाधिक मिळतील
आणि तोटे कमी होतील असा तिसरा अधिक चांगला पर्याय असू शकतो याचाही विचार करायचा.
हे सर्व विचार कागदावर लिहून काढल्याने अधिकाधिक स्पष्ट होतात.
मनातला गोंधळ, गुंतागुंत कमी होते. निर्णय घेणे सोपे जाते. निर्णय हे प्रत्येकाला घ्यावेच
लागतात व त्या निर्णयांची बरी-वाईट जबाबदारी पूर्णपणे आपल्या
अंगावर घेतो तोच आपल्या आयुष्यात यशस्वी झालेला दिसतो.त्यामुळे
निर्णय घ्यायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही.पण त्यामुळे अनुभव येत राहतात आणि एकादाचे अचूक निर्णय घेण्यात तुम्ही मास्टर
होता.
No comments:
Post a Comment