आजकाल पैसा महत्त्वाचा
झाला आहे. पैशाशिवाय काही चालतच नाही.
त्यामुळे सध्याला पैसा कसा मिळवायचा,हे सांगणारे
लोक,माध्यमे तयार झाले आहेत. यावर भरपूर
पुस्तकेही निघाली आहेत. मात्र नुसती पुस्तके वाचून किंवा कुणाचे
ऐकून कोणी श्रीमंत झाला असता तर सगळ्यांनीच तोच कित्ता गिरवला असता आणि आपल्या देशात
मूठभर गरीब राहिले असते आणि पसाभर लोक श्रीमंत झाले असते. आज
काही मूठभर लोक धनाढ्य आहेत. पण त्यांच्याकडे एकूण संपत्तीपैकी
75 टक्के संपत्ती आहे. उरलेली 25 टक्के संपत्ती ही उरलेल्या कोट्यवधी लोकांच्यात विभागली गेली आहे. असे फक्त आपल्या भारतातच घडू शकतं. असो सांगायचा मुद्दा
असा की, वाचून किंवा कुणी सांगून श्रीमंत होता येत नाही.
त्यासाठी मोठी मेहनत,जिद्द,चिकाटी असायला हवी आहे. त्यासोबत त्या क्षेत्रात आवड
असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याशिवाय गाडी पुढं सरकत नाही.
परवा सोलापुरात
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण शाखेच्यावतीने मसाला किंग धनंजय दातार यांची
मुलाखत घेण्यात आली होती. गणित आणि भूमिती विषयात दोन आकडेही गाठू न शकलेले दातार आज दुबईतले नामांकित
उद्योगपती म्हणून ओळखले जातात. आपण आणखी एक गोष्ट ऐकली किंवा
वाचलीय का पाहा, जी व्यक्ती प्रसिद्ध उद्योगपती अथवा व्यावसायिक
झाली आहे, ती फारशी शिकलेली नाही. लक्ष्मणराव
किर्लोस्कर,धीरुभाई अंबानीपासून सुरुवात करून किती तरी नाव घेता
येतील. यात या दातारांचाही समावेश आहे, बरं का! साध्या कपड्यासह गेलेले दातार आज 38 साखळी स्टोअरचे मालक आहेत. त्यांना परदेशातले आकर्षण
मोठे होते.त्यामुळे त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षीच पासपोर्ट काढून ठेवला होता. यावरून त्यांचा
ओढा तिकडे किती जबरदस्त होता, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
त्यांनीच सांगितल्यानुसार दुबईत दुबईत 75 टक्के
लोक उद्योजक आहेत. आणि त्यातले 40 टक्के
लोक अशिक्षित आहेत. मात्र त्यांनी आपल्या आयुष्यात इतके मोठे
यश मिळवले आहे,त्याला त्यांच्याकडे असलेल्या जबरदस्त व्यवहार
ज्ञानाकडे श्रेय जाते.
मराठी माणूस उद्योगात
यशस्वी होत नाही,याला तेही अपवाद आहेत.म्हणजे अलिकडे आपल्याला अनेक मराठी
माणसे उद्योगात अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसतात. मात्र उद्योगात
यश मिळवताना त्यांना कष्ट तर सोसावे लागले आहेच. माणूस आपल्याच
माणसांमध्ये गुंतून राहिला तर आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. घर, संसार आणि व्यवसाय-उद्योग यात
फरक केला पाहिजे. आयुष्यात यश मिळवताना काही गोष्टींचा त्याग
हा केलाच पाहिजे. आई-बायको, मुले यांच्या भावनिक बंधनात अडकला तर तुम्ही कधीच आयुष्यात यशस्वी होणार नाही.
मुलांनाही कष्टाची सवय लावली पाहिजे. त्यांनाही
त्यांच्या स्वत:च्या हिकमतीवर यश मिळवायला सांगितले पाहिजे.
मुलांसाठी पैसा साठवून ठेवू नका,कारण मग त्याला
कष्टाची सवय लागणार नाही आणि तो ऐतखाऊ होऊन जाईल. आयुष्यात अपयशी
होईल. खरे तर आयुष्यात शून्यातून मोठे यश मिळवलेल्या लोकांच्या
मुलांना आपल्या वाडवडिलांचा व्यवसाय किंवा उद्योग सांभाळता आला नाही. याला कारण म्हणजे बापाने त्याला कष्टाची सवय लावली नाही. आपल्या आयुष्यात चटके बसले आहेत, ते आपल्या मुलांना बसू
नयेत म्हणून त्याच्यासाठी पायघड्या अंतरण्यास तयार होतो.इथेच
मुलगा आयुष्यातून उठतो. तो त्याचे कर्तृत्व उभे करण्याचेच विसरतो.
दातार यांनी व्यवसायाला
सुरुवात केल्यावर ते चहा पिण्यासाठी रोज समोरच्या एका हॉटेलात जात असत. तो हॉटेलचा मालक दोन डब्यात दिनार
(दुबईचा रुपया) जमा करायचा. त्याला एकदा त्यांनी विचारल्यावर काही खास हेतूने दिनार काडून ठेवत असल्याचे
समजले. त्यानुसार दातारदेखील तसेच करू लागले. दोन डब्यात 500-500 दिनार जमा होऊ लागले. वर्षाकाठी जमा झालेल्या पैशांतून दुसर्या शहरात दुकान
सुरू केले. त्या दुकानातून अशाच पद्धतीने पैसे बाजूला काढून ठेवण्याची
सवय लागली.त्यामुळे त्यांच्या स्टोअरची साखळी दुकाने तयार झाली.
इज्जत माणसाला नाही तर पैशाला असल्याचे ते सांगतात. कारण तसा त्यांना अनुभवच आला होता. एका ते जेवणाच्या
पंगतीत त्यांना व्हीआयपी बसणार आहेत,म्हणून जेवणाच्या ताटावरून
उठवण्यात आले होते. खरे तर त्या गोष्टी त्या त्या वे़ळच्या असतात.
ते मोठा झाल्यावर त्या लोकांना दातारांना भेटण्यासाठी वेळ घ्यावा लागला.
पण यातून अहंकार येता कामा नये. आपल्या आयुष्यात
असे घडले म्हणून आपणही तसे वागून चालणार नाही. प्रत्येकाला आदराने
वागवले पाहिजे.
व्यवसायातून विशिष्ट
रक्कम बाजूला काढण्याची सवय लावा, असा सल्ला त्यांनी उद्योजक, व्यावसायिक होणार्यांना दिला आहे. कर्ज घेताना त्याच्या व्याजावर लक्ष
ठेवायला हवे. 100 कोटी आणि 1 हजार कोटीचा
व्यवहार करणार्या माणसांचा नफा सारखाच असेल तर 100 कोटींचा व्यवहार करणारा माणूस कधीही चांगला. परंतु,
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पैसा कमवा पण जीवनाचा आनंद घेण्यासाठीही खर्च
करायला हवा. आपल्या उत्पादनाच्या क्वालिटीबरोबर त्याची व्हरायटी
असणे महत्त्वाचे आहे.फक्त डिस्काऊंटचे बोर्ड लावून लोक येत नाहीत
तर तुमच्या दुकानात नाविन्य असायला हवे. त्यामुळे उद्योजक असो
वा व्यावसायिक त्यांनी सतत नाविण्याचा शोध घेतला पाहिजे. आज नाविण्याला
अनन्यसाधारण महत्त्व आहे.
No comments:
Post a Comment