जरा विचार करा की, आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर काम करत आहोत. आपण त्याची
भरपूर तयारी केली आहे, सराव केला आहे, आपले
सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे आणि काम उत्तमच होणार,याबाबतीत
आपण पूर्णपणे आशावादीही आहोत. आणि आणि आता त्या परिणामाची वेळ आली आहे. पण हे काय?
जो काही विचार केला होता,त्याच्या अगदी उलटे
झाले! आपल्या प्लॅनमध्ये काहीतरी गडबड झाली आणि त्या चुकीचा परिणाम असा झाला की,
आपण आपले सर्वोत्तम दिले असतानाही जसे व्हायला पाहिजे होते, तसे काम झाले नाही. आता आपल्यावर चुकीचा ठपका बसणार. आता काय करायचं?
आपण मानसिकरित्या मोडून पडतो. एकदा मोडून पडलेला माणूस पुन्हा सावरत
नाही.पुन्हा अशी मोठी रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही. अशा परिस्थितीतून गेलेले
लोक पुन्हा दुसरी रिस्क घ्यायला तयार होत नाहीत. घाबरून जातात. त्यानंतर धाडस
करण्याचा प्रवास तिथेच थांबतो. आयुष्यभर जेमतेम जीवन जगत राहतो. आशा, आकांक्षा,इच्छा सगळ्या मेलेल्या असतात. मग फक्त जगणं
होतं. त्याला ना ध्येय असते ना किनारा! या जगात अशी खूप माणसे असतात,ज्यांना ध्येय नसते. पण याला माणसाचे जीवन म्हणत नाहीत. कुत्री,मांजरेसुद्धा जगतातच. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय राहिला?इथे आपली मानसिकता महत्त्वाची आहे.
पण अशी उमेद न हारता पुन्हा
नव्याने प्रवास सुरू केल्यास, चुका शोधून
त्या दुरुस्त केल्यास आयुष्याला पुन्हा उभारी येते. त्यासाठी आपली मानसिकताच उलटी
करायची! आणि काही खास आयडिया स्वीकारून आपण आपल्या आयुष्यात सराव केल्यास जी चूक
झाली आहे, त्याच्याबाबतीत आपला विचार पूर्ण बदलून जातो.
पुन्हा नव्याने विचार करायला लागतो.यासाठी काही गोष्टींची गरज आहे. त्यातली पहिली
गोष्ट म्हणजे चुका वारंवार व्हायला नकोत. जर प्रत्येक वेळेला आपल्या चुका नव्या
आहेत,तेव्हा समजायचं की, आपण योग्य
दिशेने निघालो आहोत.आपण अनुभव, धाडस, नव्या
गोष्टी जाणून घेण्याबाबत, शिकण्याबाबत आणि त्याचबरोबर आपण
अशा गर्दीतून बाजूला होत आहोत, ज्यात आपण चूक केल्यावर
थांबतो. बस्स झाले आता, असे म्हणतो. आता मग ती चूक आपल्या
करिअरमधे असेल किंवा नात्यात अथवा व्यापारात असेल. काही नवे करतानाही आपल्या चुका
होतात. पण आपल्याला आलेले अपयश हा एक अनुभव आहे. तो मूल्यवान आहे. हा अनुभवच
आपल्याला पुढे नेत असतो. पुढे जाण्यासाठी, गतीशील होण्यासाठी
या अनुभवाची शिदोरी करा आणि सोबत न्या. पण पुढे सरकताना वारंवार चुका होऊन नयेत,याची खबरदारी घ्यायला हवी. आपल्या प्रत्येक चुकांमध्ये नाविण्य असायला
हवे.कारण चुका करता करता कंटाळा यायला नको, आपल्या शिकण्यात
नवेपण हवे. तुम्ही चुका करत आहात.त्याबद्दल तुमचे अभिनंदन.तुम्ही योग्य तेच
करण्याचा प्रयत्न करत आहात.
दुसरी गोष्ट म्हणजे
चुकांच्याबाबतीत बोलायला शिका. ते जाहीर करायला शिका. खरे तर आपण प्रत्येक वेळेला
चुका लपवण्याचा प्रयत्न करतो.ते उघड करण्यात आपल्याला भिती वाटते.जर आपण त्या चुका
लोकांना सांगायला सुरुवात केली तर एक वेगळाच अनुभव तुमच्या गाठीशी येईल. लोकं नावे
ठेवतील,पण त्यातून तुम्हाला चूक सुधारण्याची
आयडियादेखील येईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. आपण आपल्या
व्यवहारात संकोच किंवा भिती बाळगत न बसता उघडपणे, धैर्याने
आणि संयमाने सामना करायला शिकले पाहिजे. असे अनुभव लोकांशी शेअर करा.
तुमच्याबरोबरच अन्य लोकदेखील शिकतील आणि त्यातूनच तुम्ही हळूहळू सेल्फ मोटीवेट व्हाल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपल्या चुका अशा माणसांशी शेअर करा,जे आपल्याला
उत्साहित आणि मोटीवेट करतील. नकारात्मक मानसिकता असलेल्या माणसांना आपल्या चुका
सांगू नका. अशावेळेला नकारात्मक विचारांच्या माणसांशी संबंध ठेवू नका.
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट
म्हणजे आपल्यात शिकण्याची महत्त्वाकांक्षा असायला हवी.कोणतेही काम करताना असा दृष्टीकोन ठेवा की, हे काम आपले
कसल्याही परिस्थितीत अनुभव वाढवणारे असायला हवे. जर ते
योग्य झाले तर मी यातून कोणती पद्धत योग्य आहे, चुकीचे झाले
तर हे शिकेन की, कोणती पद्धत योग्य नाही. बरोबर नाही. चूक
झाली तर ते कोणत्यादृष्टीने अयोग्य आहे, हे जाणून घ्यायला
हवे. चूक झाली तरी पुढेच जाईन आणि योग्य झाले तरी आपली योजना घेऊन पुढेच जाईन,
ती थांबवणार नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, एकादे काम हाती घेतले तर ते एक तर बरोबर होईल, यशस्वी
होईल किंवा चुकीचे होईल. चुकणे हा माणसाचा धर्म आहे, हे
लक्षात घेतले तर त्यातून शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आपल्यात शिकण्याची
महत्त्वाकांक्षा असेल तर आपल्याला यश हे नक्की मिळणार!
No comments:
Post a Comment