Monday, November 27, 2017

आपली लढाई आपल्यालाच लढायला हवी

     मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमांइड आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईदची पाकिस्तानने दहा महिन्याच्या नजरकैदेतून सुटका केली आहे. यामुळे दहशतवाद्यांविरोधात लढण्याची जी कटिबद्धता पाकिस्तान दाखवत होते, ते आता किती खोटे आहे, हे स्पष्ट झाले आहे. आणि जगासमोर त्याचा खरा चेहराही उजेडात आला आहे. याला आपल्या सरकारने याखेपेला मोठा आक्षेप नोंदवत आपला विरोध दर्शवला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या हाफिज सईदचा खरा चेहरा कोण विसरेल. सईदच्या सुटकेमुळे आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे पाकिस्तान आपल्या देशात आंतकवादच्या दोषी लोकांना आणि संघटनांना शिक्षा ठोठावण्याबाबत अजिबात गंभीर नाही. शिवाय तिथली व्यवस्था आंतकवाद्यांना वाचवण्यात धन्यता मानते. भारताने पाकिस्तान सरकारला आंतरराष्ट्रीय नियमानुसार हाफिज सईदविरोधात ठोस कारवाई करण्याच्या आपल्या मागणीचा पुनर्रुच्चार केला आहे.

     भारतच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशांनी पाकिस्तानच्या या कुकृत्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेनंतर सईदच्या सुटकेनंतर पाकिस्तानबाबतचा वाईट संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला असल्याचे जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय आंतकवाद विरोधात लढण्याच्या पाकच्या कटिबद्धतेविषयी आता प्रश्नचिन्ह उमटत आहेत.पाकिस्तानने सांगितले होते की, तो आपल्या भूमित आंतकवादाला थारा देणार नाही,वाढू देणार नाही, पण सईदच्या सुटकेमुळे त्याचा खरा चेहरा उजेडात आला आहे. अमेरिकेने याचे परिणाम भोगायला तयार राहा, असा पाकिस्तानला इशारा दिला आहे.एवढेच नव्हे तर अमेरिकेने आणखीही पुढे सांगितले आहे की, पाकिस्तानने सईदला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला आरोपी करावे, अन्यथा याचा परिणाम अमेरिका आणि पाकिस्तान संबंधावर होईल. यावरून एक स्पष्ट होते की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांचा दृष्टीकोन माजी अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यापेक्षा थोडा कडक दिसतो आहे. बराक ओबामा आणि त्यांचे काही अधिकारी पाकिस्तानविषयी थोडी नरमाईची भूमिका घेत होते.त्यामुळे पाकिस्तानला थोडी ़ढील मिळाली होती.पण ट्रंप यांची भूमिका अशी नाही. त्यांची भूमिका आंतकवादविरोधात सक्त आहे.त्यामुळे त्यांच्याकडून थोडी फार आशा करायला हरकत नाही. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, जर पाकिस्तानने हाफिज सईदला तात्काळ अटक केली नाही तर, अमेरिका काय भूमिका घेणार आहे? त्याने कोणत्याप्रकारचे परिणाम भोगावे लागतील म्हटले आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.अमेरिका कथनी आणि करणीमध्ये कसा ताळमेळ राखतो, हे आपल्याला पाहावे लागणार आहे. आपण अशी काही आशा करू शकत नाही की, अमेरिकेने ओसामा बिन लादेनविरोधात ज्या प्रकारची कारवाई केली होती, तशा प्रकारची कारवाई सईदबाबत करावी. अमेरिका सईदला भयंकर आंतकवादी मानत असला तरी त्याला ओसामा बिन लादेनइतका आपला मोठा शत्रू मानत नाही. सईदविरोधात अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे, पण आजपर्यंत त्याचे काही वाकडे झाले नाही.
     ओसामा बिन लादेन अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू होता, त्याने अमेरिकेच्या नागरिकांचा जीव घेतला होता.त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्याच्याकडे ठोस असे कारण होते.पण सईद जितका भारताला नुकसान पोहचवत आहे, तितका तो अमेरिकेला पोहचवत नाही. अमेरिकेचा हाफिज सईदपेक्षा अधिक राग हक्कानी नेटवर्कवर  आहे. हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे.हक्कानी नेटवर्कचा खातमा त्यावेळेला होईल,ज्यावेळेला पाकिस्तानी सैन्य त्याला मदत करण्याचे बंद करेल. पाकिस्तानी सैन्य आणि हक्कानी नेटवर्क यांचे संबंध संपवायचे असतील तर पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सत्तेची मुंडी पिरगळायला हवी.यासाठी अमेरिकेने आपल्या आर्थिक मदतीत कपात करायला हवी. या पैशावरच पाकिस्तानी सैन्य मजा मारत आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या अधिकार्यांच्या मुलांना आणि कुटुंब-नातलगांना ज्या अमेरिकेत  शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा दिल्या जात आहेत,त्या रोखायला हव्यातत्याचबरोबर पाक सैन्यातील अधिकार्यांचा अमेरिका आणि अन्य देशातल्या बँकांमध्ये जो पैसा जमा आहे, तोदेखील फ्रीज करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. नाही तर त्यांच्यावर काहीएक परिणाम होणार नाही.
     पण भारताने असे समजू नयेत की, आपली लढाई अमेरिका लढेल. अमेरिका तेच करेल, जे त्याच्या फायद्याचे आहे.तो कधीही आपली लढाई लढणार नाही. आपल्याला आपली लढाई स्वत: ला लढावी लागणार आहे. हाफिज सईदच्या सुटकेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात जे वातावरण तयार होत आहे, त्याचा फायदा उठवायला हवाआंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची काळीकृत्ये ठेवावी लागतील. प्रत्येक देशाने पाकिस्तान आंतकवादी देश आहे, असे म्हणावे, अशा पद्धतीने आपण त्याचे सादरीकरण करायला हवे. आंतकवादी संघटनांना पाकिस्तान आश्रय देत आहे, याचे ठोस पुरावे आंतरराष्ट्रीय मंचावर मांडावे लागतील. संयुक्त राष्ट्रमध्ये आपल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानविरोधात खरेच त्यांचे कौतुक करण्यासारखे भाषण केले. आपली बाजू सफाईदारपणे मांडली. पण आता प्रत्येक देशाच्या राजधानीत जाऊन पाकिस्तानविरोधात आपला राग आळवायला हवा आणि त्यांना ठोस विचारायला हवे की, तुम्ही पाकिस्तानच्या बजूने आहात की भारताच्या! भारतानेही आता निश्चय करायला हवा की, आपल्यासाठी देश आणि नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे का आर्थिक प्रगतीअर्थात आपण आर्थिक फायद्यासाठी आपण आपल्या देशाच्या सुरक्षेविषयी समझोता करू शकत नाही. अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या देशांनादेखील आपल्या बाजारपेठेची आवश्यकता आहे.त्यामुळे आपण त्यांच्यावर सक्त दवाब आणू शकतो.
     सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, आपल्या देशातलील राजकारण्यांमध्ये याबाबतीत निश्चित राजकीय इच्छाशक्ती आहे का? आतापर्यंत तरी याचा प्रत्यय आलेला नाही. आपण जोपर्यंत आंतकवादविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्य देशांवर आपण ठोस दवाब आणू शकत नाही,किंवा आपली इच्छाशक्ती दाखवू शकत नाही, तोपर्यंत पाकिस्तानवर अंकुश लावणे अवघड आहे.

No comments:

Post a Comment