Friday, November 24, 2017

स्वामी विवेकानंदांच्या तीन गोष्टी

     स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन चरित्रच प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग मिळतो.प्रेरणा मिळते. अशाच जीवनाचा मार्ग दाखवणार्या त्यांच्या जीवनातल्या तीन गोष्टी आहेत,त्या इथे देत आहे.
लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा

स्वामी विवेकानंद अमेरिकेत असताना एकदा फिरत निघाले होते. एका नदीच्या पुलावर त्यांना काही युवक नदीच्या पाण्यात असलेल्या केळीच्या सालीवर बंदुकीचा नेम धरताना पाहिले. एकाही मुलाचा नेम साधला नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून बंदूक मागून घेतली आणि नेम साधला. गोळीचा निशाणा बरोबर लागला. असे एका पाठोपाठ एक 12 वेळा यांनी अचूक निशाणा साधला. ती मुले आश्चर्यचकीत झाली. त्यातला एकजण म्हणाला, हे तुम्हाला कसे साध्य झाले?
स्वामी विवेकानंद म्हणाले, तुम्ही जे काही करत आहात, ते अगदी मन लावून करायला हवे. तुमच्या डोक्यात फक्त एकच विचार असला पाहिजे. आपले संपूर्ण लक्ष त्या लक्ष्यावर असले पाहिजे.मग तुम्ही चुकणार नाही. निशाणा बरोबर साधला जाईल.

  भितीला तोंड द्या
कदा स्वामी विवेकानंद वाराणशीत दुर्गा मंदिरापासून निघाले होते. तेवढ्यात तिथल्या माकडांनी त्यांना घेरले. ते त्यांच्या जवळ जाऊन भिती घालू लागले. स्वामीजी घाबरले आणि स्वत़:ला त्यांच्यापासून वाचवण्यासाठी पळू लागले.मग माकडे तर सोडतात का? तेही त्यांच्या मागेमागे पळाले. स्वामीजी धावतच राहिले. माकडांपासून आपली सुटका कशी होणार प्रश्न त्यांना पडला. जवळच उभा राहिलेल्या वृद्ध माणसाने ते पाहिले. त्यांनी स्वामीजींना अडवले आणि तो माणूस त्यांना म्हणाला,थांब.त्यांना तोंड दे.
स्वामी विवेकानंद लगेच मागे फिरले आणि माकडांवर धावून जाऊ लागले. असे करताच सगळी माकडे पळून गेली. या घटनेमुळे स्वामीजींना एक गंभीर शिकवण मिळाली. काही वर्षांनी त्यांनी एका संवाद कार्यक्रमात लोकांशी बोलताना सांगितले की, जर तुम्हाला एकाद्या गोष्टीपासून भिती वाटत असेल तर घाबरून जाऊ नका. त्याच्यापासून पळून जाऊ नका. मागे फिरा आणि आलेल्या संकटाला तोंड द्या.

 वर्गात खरे बोलण्याचे धाडस
स्वामी विवेकानंद प्रारंभीपासूओनच प्रशंसाप्राप्त विद्यार्थी होते. सगळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि वाणीवर प्रभावित होते. ज्यावेळेला ते आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना काही सांगत,त्यावेळेला सगळेच मंत्रमुग्ध होऊन त्यांना ऐकायचे.
एके दिवशी दुपारच्या सुट्टीत ते वर्गातल्या काही मित्रांना गोष्ट सांगत होते. सगळे इतके तल्लीन होऊन त्यांचे बोलणे ऐकत होते की, कधी शिक्षक वर्गात येऊन शिकवत नाहीत,याचा त्यांना पत्ताच लागला नाही. शिक्षकांनी आपले शिकवणे सुरू केले होते,तोच त्यांना काही तरी खूसपूस ऐकायला मिळाली.
कोण बोलत आहे? त्यांनी मोठ्या आवाजात विचारले. सगळ्यांनीच स्वामीजी आणि त्यांच्या मित्रांकडे इशारा केला.
ते ऐकून शिक्षक संतापले.त्यांनी लगेच त्या विद्यार्थ्यांना पुढे बोलावून घेतले आणि पाठाशी संबंधित एक प्रश्न विचारू लागले. ज्यावेळेला कोणीच उत्तर दिले नाही,त्यावेळे शेवटी शिक्षकांनी स्वामीजींना तोच प्रश्न विचारला.स्वामीजींनी सहजपणे त्याचे उत्तर दिले.हे पाहून त्यांची खात्री झाली की, स्वामीजींचे लक्ष पाठाकडे होते. आणि बाकीचे मात्र बोलण्यात दंग होते, असा समज होऊन शिक्षकांनी स्वामीजींना सोडून बाकीच्या मित्रांना बेंचवर उभे राहण्याची शिक्षा दिली. सगळे विद्यार्थी एक एक करत बेंचवर उभे राहिले. दृवामीजींनीही तेच केले.
तेव्हा शिक्षक म्हणाले,नरेंद्र,तू बस जा.
नाही गुरुजी, मलाही उभे राहावे लागेल.कारण तो मीच होतो,जो या विद्यार्थ्यांशी बोलत होतो. स्वामीजींनी आग्रह केला आणि सांगितले की, ते स्वत: बोलत होते आणि बाकीचे विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला होता.त्यामुळे शिक्षेचा खरा हक्कदार मीच आहे. अशा प्रकारे त्यांनी असे उदाहरण ठेवले की, कसल्याही परिस्थितीत खर्यापासून दूर जायचे नाही.

No comments:

Post a Comment