राजस्थानातल्या
जयपूर शहरातल्या विराटनगर भागात राहणार्या राकेश मिश्राने सव्वा लाख झाडे लावून एक नवा आदर्श निर्माण केला
आहे. सव्वा लाख झाडे लावल्याशिवाय घरला जाणार नाही, पायात चप्पल घालणार नाही आणि फक्त दिवसातून एकवेळ जेवण करण्याचा संकल्प सोडला
होता. त्याचा संकल्प लोकांना भावला आणि लोकांनी त्याला मदतीचा
हात दिला. त्यामुळे अल्पावधीतच त्याचा हा संकल्प सिद्धीस गेला.
पण एवढ्यावर तो थांबला नाही. शहरातल्या झोपडीतल्या
मुलांना तो आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम करत असतानाच पर्यावरण राखण्यासाठीची त्याची
चळवळ पुढे चालूच आहे.
सध्या त्याचं वय
अवघं तीस आहे. त्याचे वडील
रस्ताबांधणीच्या कामात सरकारी कर्मचारी होते.गेल्याचवर्षी त्याचे
वडील सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचे आजोबादेखील सरकारी कर्मचारी
होते.मात्र ते नेहमीच समाजसेवा कामात व्यस्त असायचे. त्यांच्या सहवासात असताना या लहानग्या राकेशला आजोबा सामाजिक समस्या आणि त्यांच्या
कारणांबाबतची माहिती देत असायचे. त्यामुळे लहानपणीच राकेशची ओढ
समाजसेवेकडे राहिली. कदाचित त्यामुळेच 2012 मध्ये पदवी मिळवल्यावर राकेश पत्रकारितेच्या क्षेत्रात आला. दोन वर्षे त्याने या क्षेत्रात घालवली. मात्र इथे त्याचे
मन रमले नाही. त्याला त्याच्या लक्ष्याकडे जाण्यासाठी इथून मार्ग
दिसत नव्हता. योगायोगाने त्याचा चुलत भाऊ एका संस्थेच्यामाध्यमातून
समाजकार्याशी जोडला गेला होता. त्याने आपल्या कार्याची सुरुवात
पोलिओमुक्त अभियानाने केली होती. या अभियानाच्यामाध्यमातून तो
चौकाचौकात पथनाट्याच्या सादरीकरणातून पोलिओ विरोधात लोकांना जागृत करायचा. राकेशला वाटले की, त्याच्याबरोबर काम केल्याने आपल्याला
काही तरी करता येईल. मात्र त्याच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती.
तरीही भावासोबत राहून त्याने आपल्या पसंदीच्या कामाचा शोध घेत होता.
गावातल्या स्त्रिया
रानावनातून, डोंगरातून
घरातील चूल चालण्यासाठी लाकूडफाटा आणायच्या. एकदा त्याचे लक्ष
या स्त्रियांकडे गेले. यावर त्याने अगदी गंभीरपणे विचार करायला
सुरुवात केली. अशा प्रकारे झाडे तोडली गेली तर, शेवटी विनाशच
होणार! त्यावेळी त्याने पक्का विचार केला, पर्यावरणासाठी काही ना काही करायचे. त्याच्या मोठ्या
भावाच्या संस्थेच्या बॅनरखाली त्याने लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक राहण्याचे धडे
द्यायला सुरुवात केली. याशिवाय त्याने स्वत: संकल्प केला आणि झाडे लावण्याचा निश्चय केला.
पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी त्याने चार संकल्प
सोडले. जोपर्यंत सव्वा लाख झाडे लावून होणार नाहीत, तोपर्यंत घरी जाणार नाही. पायात चप्पल घालणार नाही.
दिवसभरात एकवेळच जेवण करेन आणि नवीन कपडे घालणार नाही. हे ते चार संकल्प. अशाप्रकारे तो एकादया संन्यासारखं
झाडांचं जग वसवायला बाहेर पडला.
स्वत:ला कष्ट देणार्या संकल्पांचा लोकांवर जबरदस्त परिणाम झाला. पुष्कळ माणसे
त्याच्याबरोबर आली. आणि बघता बघता ठरवलेल्या कालावधी आधीच त्याचा
सव्वा लाख झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण झाला. त्याने डोंगरात
होणार्या अवैध खनन माफियांविरोधातदेखील आंदोलम केले.
या आंदोलनात त्याला अनेक आव्हानात्मक संकटांचा सामना करावा लागला.कित्येकदा खनन माफियांनी त्याच्यावर हल्ले केले. मात्र
त्याने यातून माघार घेतली नाही. या आंदोलनाला लोकांचाही पाठिंबा
मिळाला.
सध्याला राकेश
त्याच्या संस्थेच्या माध्यमातून जयपूरच्या झोपडपट्टी भागात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये
राहणार्या मुलांसाठी रात्रीची शाळा चालवत
आहे.या शाळेत दिवसभर भीक मागून पोट भरणार्या मुलांना शिकवले जाते. सध्या या शाळांमध्ये आठशे विद्यार्थी
शिक्षण घेत आहेत.त्याचबरोबर सध्या राकेशने लोकांच्या साहाय्याने
आणि देणगीतून एक वृद्धाश्रम आणि बाल आश्रम बनवण्याचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी ज्यांना त्यांच्या नातेवाईकांनी बाहेर काढले आहे, अशा वयोवृद्ध लोकांना आणि निराधार मुलांना आश्रय दिला जाणार आहे. समाजाशी जोडलेल्या गेलेल्या या कामाबरोबरच त्याचा जो मूळ उद्देश आहे,
झाडे लावण्याचा,ते कामही सुरूच राहणार आहे.
आणखी सव्वा लाख झाडे लावण्याचा संकल्प आहे, त्याचीही
सध्या तयारी सुरू आहे. राकेशकडून आपणही काही तरी शिकायला हवे.
आज वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत आहे. त्यामुळे
वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. उष्णता वाढत आहे.
प्रदूषण माणसांचा जीव घेत आहे. जितकी जास्त झाडे
लावाल, तितका लाभ आपल्या पदरात पडणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच झाडे लावण्याचा संकल्प करण्याबरोबरच तो सिद्धीस नेण्यासाठी
प्रयत्न केला पाहिजे.
No comments:
Post a Comment