पुढच्याला ढेच,मागचा शहाणा, या म्हणीनुसार माणसाने अनुभवातून बोध घ्यायला हवा. अनुभव
हा माणसाला धडा शिकवतो. हा अनुभव मग आपल्याला आला असेल अथवा दुसर्याला! त्यातून बोध घेऊन आपली वाटचाल चालू ठेवली पाहिजे.
दुसरा खड्ड्यात पडला म्हणून आपणही पडायला जाऊ नये. काही माणसं फार धुर्त असतात. एकाद्या गोष्टीत स्वत:
नुकसानीत गेले, असतील पण त्यातून दुसर्याला चांगले सांगणार नाहीत. उलट त्याला त्यात फार फायदा
आहे,असे सांगून तुम्हाला खड्ड्यात घालायला मोकळे असतात.
त्यामुळे दुसर्याचे ऐकत असताना आपण सावध असले
पाहिजे. अंधळेपणाने अनुकरण करणे धोक्याचे असते.
माणूस अनुभवाने
शहाणा होतो, असे म्हटले
जाते,मात्र पहिल्यांदा अनुभव तरी घेतलाच पाहिजे. सगळ्या कामात धोके असतात. यश मिळवयाचे तर काट्याकुट्यातून
चालावे लागणारच आहे. यश काही सहजासहजी मिळत नाही. यशासाठी तपश्चर्या करावी लागते. मेहनत,जिद्द,चिकाटी असल्याशिवाय
आपण त्याच्या पासंगालाही जाऊ शकणार नाही.त्यामुळे कुठलेही काम
करताना धाडसही असायला हवे. दुसर्याला एकाद्या
गोष्टीत नुकसान आले,म्हणून त्या वाटेला जायचे नाही. असे म्हणून चालणार नाही. तो तोट्यात का गेला,
त्याचे नुकसान का झाले? का तो परीक्षेत नापास झाला?
याचा सांगोपांग विचार केला पाहिजे. यालाच अनुभवातून
शिका, असे म्हटले जाते. कदाचित तो चुकला
असेल, पण तुम्ही आत्मविश्वासाने त्यात
पडला तर तुम्ही पुढे
जाऊ शकता.त्यामुळे आपण कुठलेही पाऊल उचलताना कान,नाक आणि डोळे उघडे ठेवूनच मार्गक्रमण केले पाहिजे.
वास्तविक आपल्याला
पदोपदी अनुभव येत असतात. काही क्लेश देणारे असतात. काही संताप आणणारे असतात.
मात्र आपण यातून शांतपणे पुढे सरकत असताना आपला निवडलेला मार्ग सोडता
कामा नये. अनुभव येत राहतील. वाईट अनुभव
आला म्हणून खचून जायचं नसतं आणि चांगला अनुभव आला म्हणून फार आनंदूनही जायचं नसतं. आजच्या तंत्रज्ञान युगात मरणाची स्पर्धा आहे. चांगल्या
वाईटाचे अनुभव पदोपदी येत राहतात.त्यामुळे आपला समतोल वावर असला
पाहिजे.
चुकांमुळे बराच
फायदा होत असतो.चुकल्याशिवाय
काय चुकलं आहे, हे समजणार नाही. माणूस आहे,म्हटल्यावर चुका या होणारच.हे ग्रहीत धरले तरी वारंवार
होणार्या चुका मात्र तुम्ही त्यातून काहीच शिकला नाही,
हेच सांगते. एखाद्या व्यक्तीने मला पहिल्यांदा
फसवले असेल, तर त्याला तेव्हा लाज वाटायला हवी. पण त्याच व्यक्तीने मला दुसर्यांदा फसवले,तर मात्र मला त्यावेळी लाज वाटायला हवी. लाज यासाठी की,
एकदा फसवणूक झाली तरी मी त्यापासून काहीच धडा घेतला नाही आणि पुन्हा
फसवलो गेलो. या गोष्टी टाळायच्या तर त्रयस्थ होऊन वाटचाल करता
आली पाहिजे. भावनिक होऊन स्वत:चे नुकसान
करून घेता कामा नये.
एक क्षुल्लक चूकदेखील
खूप मोठ्या सुधारणेचे कारण होऊ शकते, याचेही भान असायला हवे. आपल्या अनुभवाचा
लाभ घेणार्या माणसाला चतुर म्हणतात. यशस्वी
व्यक्ती मात्र दुसर्याच्या अनुभवाचा फायदा करून घेत असतात.
असं म्हटलं जातं की, अनुभव घेण्यासाठी आपल्याला
अनेक पटीने अधिक किंमत चुकवावी लागते,परंतु, त्यापासून आपल्याला मिळणारी शिकवण दुसर्या कशापासूनही
मिळू शकत नाही.
अनुभव म्हणजे तरी
काय? तुम्हाला जे हवे असते, त्याच्याऐवजी तुम्हाला दुसरेच काही मिळाले तर त्याला अनुभव म्हणतात.
तुम्हाला दुसर्या व्यक्तीचा अनुभव कळला असेल तर
तुमच्यासाठी तोदेखील एक अनुभव आहे. असं म्हटलं जातं की,
दुसर्याच्या अनुभवातून शिका आणि शक्य होईल तितका
त्याच्यापासून लाभ मिळवा. अशा प्रकारे वागत गेलात तर तुम्हाला
लोक बुद्धिमानांच्या रांगेत नेऊन उभा करतात. एक लक्षात ठेवा,
ओव्या लहान असतात,पण त्यांची रचना करण्यासाठी खूप
मोठा अनुभव लागत असतो.
No comments:
Post a Comment