Friday, November 3, 2017

जे काही होते...

     डॉ. मार्क नावाचे एक कॅन्सर तज्ज्ञ होते. एकदा ते दुसर्या शहरात होणार्या महत्त्वाच्या कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेण्यासाठी निघाले होते.या कॉन्फ्रेंसमध्ये त्यांना मेडिकल रिसर्चवर महत्त्वाचे काम केल्याबद्दल अॅवार्ड दिले जाणार होते. ते फारच खूश होते कारण त्यांनी रिसर्चवर फारच मेहनत घेतली होती.
     ते विमानात बसले, काही वेळाने विमान कसल्याशा  तांत्रिक कारणामुळे दुसर्या एका विमानतळावर उतरवण्यात आले.मार्कला वाटलं आता आपण कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेऊ शकणार नाही. ते लगेच विमानतळावरच्या रिसेप्शनवर पोहचले आणि दुसर्या फ्लाइटची वेळ विचारली. तिथे त्यांना कळले की, पुढची फ्लाइट दहा तासांनी आहे.
 
   रिसेप्शनवर डॉ. मार्क यांना सांगण्यात आले की, फ्लाइटची वाट पाहात बसण्यापेक्षा कारने त्या शहरात जा. चार तासांत पोहचाल. दुसरा कुठला पर्याय नसल्याने त्यांनी कार भाड्याने घेतली  आणि त्या शहराच्या दिशेने निघाले.
     काही अंतर गेल्यावर मोठे वादळ आले.त्यांना पुढचे काहीच दिसत नव्हते. या सगळ्या गोंधळात त्यांचा मार्ग चुकला. त्यांना ज्या वळणावर वळायचे होते, ते मागे गेले. ते भरकटले. खूप वेळ गाडी चालवल्याने ते पुरते थकले होते. ते घराचा शोध घेऊ लागले. त्यांना आराम करण्याची गरज होती. भूकही लागली होती.
     काही वेळाने त्यांना एक घर दिसले. त्यांनी दरवाजा ठोठावला. एका सुंदर मुलीने दरवाजा उघडला. डॉ. मार्क यांनी त्यांना सगळा प्रकार सांगितला आणि फोनसाठी विनंती केली.त्या मुलीने आपल्याकडे फोन नसल्याचे सांगितले. ती म्हणाली, जोपर्यंत मोसम ठीक होत नाही,तोपर्यंत तुम्ही थांबू शकता.
     घरात आल्यावर मुलीने त्यांना गरम गरम चहा दिला.यानंतर तिने मार्कला प्रार्थना सभेत सामिल होण्याची विनंती केली. मार्क म्हणाले,माझा मेहनतीवर विश्वास आहे, तुम्ही प्रार्थनेला जा. डॉ. मार्क तिच्या प्रार्थनेचे निरीक्षण करत राहिले. तिच्याशेजारी एक लहान मुलगादेखील बसला होता.ती उशिरापर्यंत प्रार्थना करत होती, त्यामुळे त्यांना वाटले की, तिला कशाची तरी मदतीची आवश्यकता आहे. तिची प्रार्थना झाल्यावर तिला विचारायचे त्यांनी ठरवले.
     डॉ. मार्कनी तिला विचारलं, तू परमेश्वराकडे काय मागितलंस? शिवाय त्यांनी त्या मुलाविषयीही विचारलं. मुलीने हसत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ती म्हणाली, तिच्या मुलाला कॅन्सर आहे. आणि तो  फक्त मार्क नावाचे डॉक्टरच बरे करू शकतात. पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे उपचार करू शकत नाही.
     ती मुलगी पुढे म्हणाली, परमेश्वर एक दिवस नक्की माझी प्रार्थना ऐकेल आणि काही ना काही मार्ग काढेल.हे ऐकून डॉ. मार्कच्या डोळ्यांत अश्रू आले.ते शांत झाले. त्यांनी मनातल्या मनात म्हटले, परमेश्वर महान आहे आणि अगोदर घडलेली घटना ते आठवू लागले.
तात्पर्य: जे काही होते, त्यामागे काही ना काही कारण असते.



No comments:

Post a Comment