Wednesday, November 15, 2017

सुमार मुलांची गोष्ट

     काही यशस्वी लोकांच्या मुलाखती वाचल्यावर किंवा ऐकल्यावर असे लक्षात येते की, ही माणसं लहानपणी फार हुशार किंवा अति हुशार नव्हती. ही माणसं आपल्या कार्यकर्तृत्वावर मोठी झाली आहेत. परवा सोलापुरात बालदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची लहानग्या पत्रकारांनी मुलाखत घेतली.त्यावेळी त्यांनी आपल्या बालपणाच्या आठवणी सांगितल्या. त्यात त्यांनी शाळेतील परीक्षा त्यांना साडेसाती वाटायची, अशी स्पष्ट कबुली दिली.ते दहावीतही नापास झाले होते.मात्र त्यांनी पुढे जाणीवपूर्वक अभ्यासाकडे लक्ष दिले. दिवसा काम आणि रात्री घासलेटच्या दिव्याखाली असा अभ्यास करत त्यांनी महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण घेतले. इंग्रजीत सामान्य असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी प्रयत्न करून त्याच्यावर प्राबल्य मिळवले. पुढे त्यांच्या आयुष्याचा पट आपल्याला माहितच आहे. म्हणजे अशी किती तरी माणसे आहेत,की ज्यांची लहानपणी साधारण बुद्धीमत्ता होती,मात्र त्यांनी पुढे खूप मोठे यश मिळवले. आपल्यापैकी बर्याचजणांनी नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक वाचले असेल,यात अगदी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजकपूर, यशवंतराव चव्हाण, अल्बर्ट आइस्टाइन,गुलजार अशी किती तरी मंडळी आयुष्यात शाळेतल्या इयत्तेत नापास झाली आहेत. पण हीच मुले पुढे कर्तृत्ववान ठरली. त्यामुळे आपली मुलं अभ्यासात कच्ची आहेत,म्हणून आजच्या पालकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. पण त्यांच्यावर योग्य संस्कार करा.मेहनत करण्याची सवय ठेवा. जिद्द,चिकाटी असे गुण त्यांच्यात पेरा. नक्कीच चांगले पीक आल्याशिवाय राहणार नाही.

     आज आपण बघतोय, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंताघरची मुले अगदी बिझी असतात. सकाळी डान्स तास, दिवसभर शाळा, नंतर सायंकाळी शाळेच्या अभ्यासाचा तास,मग कराटे, गायन,चित्रकला असे कितीतरी प्रकारचे क्लास ही मुलं अटेन्ड करत असतात. पालकांना वाटत असतं, आपल्या मुलाने सगळ्या क्षेत्रात सर्वोत्तम असावे.यासाठी पालकाची नुसती धडपड चालू असते. पालक सतत त्याच्या मागे लागत असतो. त्याला विविध क्लासला आणण्यासाठी-सोडण्यासाठी स्वत: कष्ट उपसत असतो. खरे तर अशा पालकांनी नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक वाचायला हवे. लहानपणी सगळ्या गोष्टी त्यांना करायला लावल्यावर ही मंडळी कशातच रमणार नाहीत. त्यांना त्यांची आवड जोपासू द्या. त्यासाठी त्यांना मोकळीक द्या. तरच ही मुले उभ्या आयुष्यात काही तरी बनतील. ज्या गोष्टी त्याला जमत नाहीत, त्या त्याच्याकडून करवून घेताना त्यांना त्याचा त्रास होत असतो. पुढे त्याच्यात न्यूनगंड यायला लागतो. आणि मग तो भलतीकडेच वाहवत जातो.त्यामुळे मुलांच्या कललने घेतल्यास तुमचा आणि त्याचाही फायदा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कारण लहानपणी मुले अभ्यासात कच्ची असली तरी ते पुढे आपले कर्तृत्व कशात ना कशात दाखवू शकतात.
   
 बिल गेट्स यांचीदेखील कामगिरी लहानपणी सुमार होती. आईबरोबर त्यांची यावरून सारखे भांडणे होत. त्यांच्या घरच्यानी शेवटी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचा निर्णय घेतला होता.पण ज्यावेळेला बिल गेट्स यांना सॉफ्टवेअरविषयी खरी आवड सापडली आणि तिथून त्यांचे आयुष्यच बदलले. डिस्नेचे मुख्यकार्यकारी अधिकारी बनलेले मायकल आयस्नर यांच्या आयुष्यात काही ध्येयच नव्हते.त्यांची बहीण शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायची. त्यावेळेला मायकल यांची तिच्याशी तुलना व्हायची. आजचे त्यांचे कर्तृत्व पाहिल्यावर त्यांच्या लहानपणीचा काळ पाहिलेल्या लोकांना विश्वासच बसणार नाही. त्यांना एकदा मनोरंजन क्षेत्रातली त्यांची आवड सापडली आणि चमत्कार झाला.
     बेन साँडर्स यांनी उत्तर ध्रुवावर एकट्याने स्किइंग करणारी सर्वात तरुण व्यक्ती म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे.त्यांनी तर त्यांचे एक जुने प्रगतीपुस्तक आपल्या कामाच्या ठिकाणी फ्रेम करून लावले आहे. त्याखाली त्यांनी लिहिले आहे, आयुष्यात ठोस काही तरी करण्याची आंतरिक ऊर्जाच बेनकडे नाही. यातूनच त्यांना त्यांच्या साहसी आयुष्याचा शोध लागला. वास्तुरचनाशास्त्रतज्ज्ञ फ्रँक गेहरी,लेखक जॉन ग्रिशॅम, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल, सोनी पिक्चर्सचे सरव्यवस्थापक लिंडा कीलर अशी किती तरी मंडळी अभ्यासात सुमार होती. पण जिद्द,मेहनत आनि चिकाटीच्या जोरावर या मंडळींनी गगनभरारी घेतली. या माणसांना त्यांची आवड सापडली आणि यशाचे शिखर गाठले.

     एखादी गोष्ट करण्याची तळमळ तुमच्यात असते. ते करायची संधी मिळाली की, पण आपोआप यशाच्या वाटेने तुम्हीची पावले पडायला लागतात. त्यामुळे इथले आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आवड तुम्हाला सापडायला हवी. मात्र ही आवड काहींना लवकर सापडते तर काहींना उशिराने एवढेच! आपली आवड सापडणे म्हणजे गाडीच्या टर्बोचार्जरवर थाप मारण्यासारखे आहे. इंजिन तेच राहते,मात्र अधिक शक्तीमान होते. इथे सांगायचा मुद्दा असा की, मुलांची प्रगती लहानपणी कमी असली तरी काही बिघडत नाही. पालकांनी घाबरून जायचे कारण नाही. कोण कधी उभारी घेईल, काही सांगता येत नाही. माझ्या मेव्हण्याचा मुलगा आहे,तो वयाच्या पाचव्यापर्यंत बोलू शकत नव्हता,मात्र पुढे तो इतका बोलघेवडा बनला की, त्याच्या लहानपणीचा काळ ज्याला माहित आहे, ते त्यावेळी म्हणत होते, हा काही बोलणार नाही. पण झाले उलटेच.
     पालकांनी मुलांची चिंता करावी पण किती करावी,याला मर्यादा आहेत. आपल्या समाजातही काही मुले आपण आपल्यासमोर पाहतो. अगदी वेंधळी किंवा वेडपट वाटणारी मुलं आज उत्तम व्यवसाय,धंदा करताना दिसतात. आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याला सगळ्या गोष्टीत पारंगत करण्याची धडपड करण्यापेक्षा त्याला कोणत्याही एकाच गोष्टीत असा बनवा की, त्यात तो मास्टरच झाला पाहिजे.मात्र त्यावेळी त्याचा कल, आवड याकडे लक्ष द्या.एकाद्या क्षेत्रात सखोल ज्ञान मिळवण्यासाठी त्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. आई-बाबांनी त्याला त्याचा यशाचा मार्ग सापडण्यासाठी सहकार्य करायला हवे.

No comments:

Post a Comment