Wednesday, November 29, 2017

थंडीचा महिना,आरोग्याची दैना

        गेल्या चार दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे साहजिक तब्येतीने नाजूक असलेल्या अथवा कान,नाक,घसा यांचे आजार असलेल्या किंवा अस्थमा असलेल्या माणसांना या दिवसांत स्वत:ची काळजी घ्यावीच लागते. प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक लगेच ताप,थंडी,खोकला अशा आजारांच्या कवेत झटकन येतात. त्यामुळे ही मंडळी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला तत्पर तयार असतात. वारंवारच्या आजारपणामुळे असे लोक आपल्याला थंडी सोसवत नाही,याची खात्री करून घेतात आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रयत्नशील राहतात.साहजिकच अडगळीत पडलेली मफलरे,स्वेटर्स,कानटोप्या आता बाहेर यायला लागल्या आहेत. ज्यांचे हे हिवाळी कपडे खराब झाले आहेत किंवा सापडत नाहीत, त्यांनी थेट बाजार गाठून नवी खरेदी करताना दिसतात.त्यामुळे हिवाळा सुरू झाला की, बाजारात हिवाळी कपड्यांना मागणी वाढायला लागते.मोठमोठ्या शहरांमध्ये नेपाळी किंवा अन्य राज्यातले लोक या कपड्यांबरोबर ब्लँकेट,रजई विकायला दाखल होत आहेत. दोन-तीन महिने हा धंदा चालतो.

     हिवाळा वाढला की, साहजिकच दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असते. डॉक्टरांचा व्यवसाय उन्हाळ्यातले काही दिवस सोडले तर इतर दिवसांमध्ये चांगला चालतो. अर्थात दोन-चार दिवस सर्दी,पडसे,खोकला वगैरे आजार शरीरात मुक्कामच करतात. मात्र लोकांना आजार लवकर बरा व्हावा किंवा त्याच्याने आणखी कुठली पिढा लागू नये म्हणून लोक थेट डॉक्टरांना गाठतात. त्यातही अँटीबायोटिक औषधे देण्याचा आग्रह रुग्ण डॉक्टरांना करतात.त्याने हा उपचार कॉमन झाला आहे. मात्र याचे दुरगामी परिणाम वाईट आहेत. उद्या अँटीबायोटिक औषधांना हे आजार जुमानणार नाहीत,तेव्हा काय करायचे असा प्रश्न आहे. अजून त्याचा पुढच्या उपचाराचा शोध लागलेला नाही.त्यामुळे अँटिबायटिक औषधांचा डोस ऊठसूठ घेऊ नये, असे जाण्कार सांगताना दिसत आहेत.
      थंडीच्या दिवसांत हवेतले रोगजंतू ओलावा आणि गारव्यामुळे तग धरून राहतात. उन्हाळ्यात तीव्र सूर्यकिरणांमुळे हेच रोगजंतू तग धरू शकत नाहीत. ते नष्ट होऊन जातात. मात्र हिवाळ्यात या रोगजंतूंचा वावर वाढतो. श्वसनमार्गातून हे रोगजंतू शरीरात जात असल्याने आजार बळावतात. हिवाळ्यात आणखी एक धोका वाढला आहे तो धुळीचा! पावसाळ्यात रस्त्यावर चिखलरुपाने बसलेली माती पाऊस थांबला की, रस्त्यापासून सुटायला लागते. वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे त्याचे बारीक बारीक कण हवेत पसरतात. आणि ते धुळीच्या रुपाने शरीरात प्रवेश करतात. सध्या लहान-मोठ्या शहरात या धुळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. काही लोक मास्क तोंडाला लावून प्रवास करतात. मात्र बरेच कशाला हवा मास्क,इथेच तर जायचे आहे, असे म्हणून आजाराला निमंत्रण देतात. या धुळीमुळे कोरड्या खोकल्याचे प्रमाण वाढत असल्याचा काही तज्ज्ञांनी,डॉक्टरांनी काढला आहे. हवेतल्या प्रदुषणामुळे खोकल्याची तीव्रता वाढत आहे.यासाठी लोकांनी काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे.
     हिवाळी आजार टाळण्यासाठी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. थंडीच्या वातावरणात चेहरा,घसा,छाती झाकली जाईल, असे उबदार कपडे वापरायला हवेत. शक्य तितके आणि जमेल,झेपेल असे गरम पाणी प्यायला हवे. थंड पाणी आणि पदार्थ टाळायला हवेत. रात्री झोपताना अंगाला आणि त्यातही श्वसनमार्गाला थेट थंड वारा लागणार नाही,याची काळजी घ्यायला हवी. सकाळी-संध्याकाळी कोमट पाण्यात मीठ व हळद घालून गुळण्या कराव्यात. थंडीपासून बचाव म्हणून घरासमोर, अंगणात वैगेरे शेकोटी पेटवतात. मात्र त्याच्या धुराचा उलट त्रास होतो. दुचाकी वाहनावरून जाणार्यांनी चेहरा,कान,नाक,घसा झाकला जाईल, अशा प्रकारची व्यवस्था करून प्रवास करावा. रस्त्याकडेला बसणारे फळविक्रेते, भजी,वडा-पाव विकणारे गाडीवाले यांनीही खबरदारी घ्यायला हवी आहे. कारण धूळ त्यांच्या नाकावाटे थेट शरीरात जाते.

No comments:

Post a Comment