आपल्या लहानपणी
आपण कोणकोणत्या खेळण्यांशी खेळलो, हे आठवत असेल तुम्हाला.फुगे,कुडमूड,
लाकडी, प्लॅस्टिकची खेळणी, बासरी,पिपाणी अशा किती तरी वस्तूंशी आपण खेळलो आहे.पण आता ही खेळणी हद्दपार झाली आहेत.ती जागा आता मोबाईल,व्हिडिओ आणि आभासी गेम्सनी घेतली आहे. कागदी नाव,विमान करून, त्याचबरोबर मातीची खेळणी बनवून खेळण्याचे
दिवस संपले आहेत. ही खेळणी शाळेत कधीतरी शिक्षक कार्यानुभवच्या
तासाला शिकवतात. बाकी त्यांच्याशी खेळण्याचा मुलांचा संबंधच येत
नाही.
घरोघरी पूर्वी
लहान बाळासाठी लाकडी घोडा असायचा. त्यावर बसवून बाळाला झोके दिले जायचे. त्यावेळेला बाळ
फार छान हसायचे. लकडी की काठी,काठी पे घोडा
हे गाणेदेखील ऐकले असेल.पण आज यातले काहीच राहिले नाही.
तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्याच्या आहारी गेलेल्या माणसांना नव्या जमान्यातल्या
खेळण्यांनी आकर्षित करून टाकले. अर्थात ही खेळणी तर कोणती?
स्मार्टफोन आणि व्हिडिओ गेम. यांमध्ये आभासी गेम्सचा
भरणा अधिक आहे.जे प्रत्यक्षात करता येत नाही,खेळता येत नाही,ते यावर आपली बोटे नाचवून बिनधास्त खेळता
येते. मात्र ही खेळणी मुलांचा विकास करत नाहीत तर विनाश करत आहेत.
मुले तणावग्रस्त होऊ लागली असून त्यांच्यात या गेम्समुळे चीडचीडपणा वाढला
आहे. ब्लू व्हेल सारख्या जीवघेण्या आभासी खेळाने तर बालपणच गिळून
टाकले आहे.
पूर्वी देशी खेळण्यांचा
बाजार अगदी समृद्ध होता. गावातल्या बाजारात किंवा यात्रा-जत्रांमध्ये अशा खेळण्यांचा
बाजार फुललेला असायचा. मुलांना खेळणी पाहिल्यावर काय घेऊ न काय
नाही, असे होऊन जायचे. मुलं हट्ट करायची.पालक त्यांच्या हट्टापुढे हार पत्करून त्यांना खेळणी घेऊन द्यायची.
आता गावोगावचा बाजार बदलला आहे. यात्रांचेही रूप
पालटले आहे. अगोदर फुगे,बासरी,पिपाणी, शिटी विकायला लोक गावात यायचे. केसावर फुगे, अशा आरोळ्या ऐकायला आल्या की चिमुरडी पोरं
गोळा केलेले केस घेऊन धावत जायचे. आता फुगे आहेत,पण ते खेळायला नाही तर, सजवायच्या कामी येत आहेत.
आता लाकडी खेळणी पाहायला तर मिळतच नाहीत,पण प्लॅस्टिकची
गाडी,बाहुली वगैरे खेळणीदेखील कमी झाली आहेत. आता रिमोट चालणारी गाडी,हेलिकॉप्टर,विमान अशी खेळणी पाहायला मिळत आहेत. ही सगळी खेळणी चिनी
बनावटीची आहेत. विकत घेतल्यावर काही तासातच त्यांचा खेळ खल्लास!
अशा खेळण्यातून मुलांची हौसही भागत नाही.त्यामुळे
पालकही अशी खेळणी घेऊन द्यायला मागे-पुढे करतात.परंतु, या खेळण्यांचे आकर्षणही फार कमी झाले आहे.कारण आजकाल शेतकरी,हमाल,मजूर यांच्या
हातातही स्मार्टफोन आला आहे. त्यात गेम्स असतात, हे आता सर्वश्रुत झाले आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षाची मुलेदेखील स्मार्टफोन सहज हाताळण्याबरोबरच गेम खेळताना दिसत आहेत.
बापालाही फार हौस आणि मौज असते. आपला चिमरुडा मोबाईलवर
गेम खेळतोय,याचं अप्रूप तो सगळ्या गावाला दाखवत सुटतो.
पूर्वी आपल्या
देशात खेळणीची समृद्ध परंपरा होती. संस्कृती होती. यामुळे गावातल्या सुतार,कुंभार, लोहार यांसारख्या कष्ट करणार्या समाजाला रोजगार उपलब्ध होत होता. सिंधू संस्कृतीकालीन
भाजलेल्या मातीच्या खेळण्यांमध्ये जनावरांच्या आकृत्या, घराघरात
वापरात येणारी मातीची भांडी उत्खननात आढळून आली आहेत. ऋग्वेदात
बाहुल्यांचा उल्लेख आहे.पाटणा मथुरा, कौशांबी
आणि राजघाट येथील खोदकामात मौर्य आणि गुप्तकालीन मातीची खेळणी आढळून आली आहेत.
अशी खेळणी आपल्या देशातल्या काही संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात.
शुंग काळातील साच्यातील खेळणी सापडली आहेत. साच्यातली
मेंढी,मगर खूप सुंदर आहेत. एकूण काय तर
मुलांची खेळणी बैलगाडीसह जनावरांच्या आकृत्या मुलांना निसर्ग आणि त्यांच्या मातीशी
जोडली जात होती. टेराकोटाची खेळणी सिंधू घाटी संस्कृतीची देण
आहे.
आपल्या पारंपारिक
खेळण्यांमध्ये मातीची खेळणी कुंभार, लाकडाची खेळणी सुतार आणि लोखंडी खेळणी लोहार बनवू द्यायचा.
काष्ठकलेत कधीकाळी वाराणसी आणि आयोध्या आघाडीवर होते. तर राजस्थानच्या कठपुतळ्यांना पर्यायच नव्हता.धातूची
खेळणी बनवण्यात बस्तर पुढे होता. जुन्या कपड्यांपासून खेळणी बनवण्यात
हिमाचल प्रदेश आणि पंजाब यांचा हात कुणी धरत नव्हता. केरळमध्ये
लाकडाच्या नृत्य करणार्या बाहुल्या, आंध्रप्रदेशात
नवविवाहित जोडप्यांच्या मूर्ती तर बंगालमध्ये देवा-देवता लाकडांपासून
बनवल्या जात होत्या. जपानमध्ये आपल्या आरोग्याला धोकादायक ठरू
शकणार्या प्लॅस्टिकऐवजी कागदी खेळणी बनवली जात होती.ओरोगामी कला प्रसिद्ध आहे. म्हणजे आपल्याला ठिकठिकाणच्या
कला,त्यांची विशेषता तिथली खेळणी पाहिल्यावर समजत होती.
मुलेदेखील खेळण्यांच्याबाबतीत सृजनात्मक होती. खेळणी पाहून तशी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असे.त्यामुळे
प्रांताप्रांतातली खेळणी संपूर्ण हिंदूस्थानभर झाली.
असा खेळण्यांचा
समृद्ध वारसा काही देशांनी जपला आहे.त्यांना आपल्या संग्रहालयांमध्ये स्थान दिले आहे. ही कला टिकून राहावी,यासाठी तिथे खास प्रयत्न केले जात
आहेत. पर्यटकांना अशा खेळण्यांचे आकर्षण वाटावे,यासाठी खास योजना अंमलात आणल्या जात आहेत.फिलिपिन्सची
राजधानी मनिलामधील एका संग्रहालयात तब्बल सात हजार प्रकारची खेळणी पाहायला मिळतात.दिल्लीतदेखील एक संग्रहालय आहे, ज्यात अनेक देशांची खेळणी
पाहता येतील. भूतानच्या एका संग्रहालयातसुद्धा खेळण्यांनी स्थान
मिळवले आहे.
देश-विदेशातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक
परंपरांना जोडणार्या देशी खेळण्यांचा मुलांच्या मानसिक आणि सामाजिक
विकास करण्यामध्ये अदभूत योगदान राहिले आहे. पण आज आपण ही समृद्ध
परंपरा लयाला नेत आहोत. त्याऐवजी आपण ब्लू व्हेलसारख्या जीवघेण्या
खेळांच्या हातात मुलांचे बालपण सोपवत आहोत.त्यांची संवेदना आणि
समज आपण अमानवीय बनवत आहोत. यामुळे आपण स्थानिक कुटीर उद्योग
उदवस्त करून अशा खेळाला-खेळण्यांना चालनाच देत आहोत. या कुसंस्कृतीमध्ये आपल्या मुलांचे काय हित असणार आहे? अशा खेळांमुळे आतापासूनच मुले ताणतणाव,चीडचीडसारख्या
आजारांना सामोरे जात आहेत. मग मुलांचे भविष्य काय असणार आहे?
No comments:
Post a Comment