Monday, November 27, 2017

चंदन शेतीला प्रोत्साहन मिळायला हवे

     आपल्या देशात चंदन शेतीला चांगले दिवस असताना आणि यातून शेतकरी आपल्या श्रीमंतीचे स्वप्न साकारू शकत असतानाही आपल्या देशात या पिकाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. केरळ आणि कर्नाटकातच तेवढी चंदनाची शेती मोठ्या प्रमाणात होत आहे. आता पंजाबसह अन्य राज्येही पुढे येऊ लागली आहेत,मात्र यासाठी शासन फारसे उत्सुक दिसत नाही. प्रोग्रेसिव चंदन फार्मर्स असोशिएशनच्या एका आकडेवारीनुसार आपल्या देशात महिन्याला दोन हजार क्विंटल चंदनाच्या लाकडांना मागणी आहे,मात्र प्रत्यक्षात फक्त शंभर क्विंटल लाकडे उपलब्ध होत आहेत. यावरून चंदनाची शेती किती गरजेची आणि शेतकर्यांच्या भरभराटीची आहे, हे लक्षात येईल.चंदनाचे झाडदेखील नारळाच्या झाडासारखेच कल्पवृक्ष आहे, असे म्हणायला हवे. या झाडाचे सगळे भाग उपयोगात आणता येतात. चंदनाच्या लाकडाची आजची किंमत जवळपास 12 हजार रुपये प्रतीकिलो आहे. याचा बाहेरील भाग (खोडाच्या गाभ्याबाहेरचा सालीपर्यंतचा भाग) दीड हजार रुपये प्रतीकिलोने विकला जातो.यापासून दुर्मिळ वस्तू, खेळणी,कॅरम, कॅरम चकत्या (कॉइन) बनवल्या जातात. याच्या मूळापासून मिळणारे तेल तीन लाख रुपये प्रतीकिलो आहे.

बारा वर्षात एकरी सहा कोटी उत्पन्न
चंदनापासून सुगंधी गाभा व त्यापासून तेल काढले जाते. सुगंधी गाभा हा तुरट,कडू,ताप निवारण करणारा,थंड,उल्हासित ,कडक,जड,टिकाऊ,मधुर आणि उग्र वासाचे असते. प्रत्येक रोपापासून 15 ग्रॅम तेल निघते.याच्या फांद्या, पाने यांच्यापासून सौंदर्य उत्पादने आणि अक्षरबत्तीचा लगदा आदी कामांसाठी उपयोगाला येतात. ताज्या पानांपासून फिकट पिवळे मेण मिळते. प्रत्येक एकरामागे बारा वर्षांनंतर सहा कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते. याशिवाय आंतरपिकातून शेतकरी आवळा इत्यादींपासून दरवर्षी पाच लाख रुपयांची करू शकतात. त्याचबरोबर भाजीपाला लागवड करून अतिरिक्त कमाई करू शकतात.
केरळ,कर्नाटक चंदन उत्पादनात आघाडीवर
देशात चंदनाची शेती मुख्यत: केरळ आणि कर्नाटकात केली जाते.पण आता अन्य राज्यातही याचे प्रयत्न होत आहेत.केरळात चंदनाचा ऑइल कंटेंंट चार टक्के आहे तर कर्नाटकात तीन टक्के आहे. आता पंजाबमध्येही चंदन शेती जोर पकडत असून इथे ऑइल कंटेंट 2.80 ते तीन टक्के आहे. ओडिसामध्ये अडीच टक्के, महाराष्ट्रात दोन टक्के आणि मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये दीड टक्के कंटेंट आहेत. आपल्या महाराष्ट्रात चंदन शेतीला चांगला वाव आहे.चंदनाची व्यावसायिक शेती केल्यास चंदनाच्या ऑइलचा कंटेंट तीन टक्क्यांपर्यंत नेला जाऊ शकतो.मात्र यासाठी शासन आणि अन्य स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. यातून मिळणारे उत्पन्न उशिराने मिळत असले तरी त्यातल्या आंतरपिकातून वर्षालाही चांगल्यापैकी विविध उत्पादने काढता येतात.
पंजाबात सध्या चंदन शेतीने चांगलाच वेग घेतला आहे. गहू-तांदूळ चक्रात होत असलेले जमिनीचे नुकसान, टाकाऊ कचरा जाळला जात असल्याने इथल्या लोकांना त्याचा होत असलेला त्रास. आर्थिक तंगीमुळे होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या अशा अनेक समस्यांना इथला शेतकरी तोंड देत आहे. चंदनाची शेती त्यांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह देईल, असे म्हटले जात आहे. अशीच परिस्थिती आपल्या राज्याची आहे. आपल्या राज्यातही या शेतीला प्रोत्साहन दिल्यास आणि यावर अधिक संशोधन झाल्यास चांगलाच लाभ होण्याची शक्यता आहे.यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
आंतरपिकातून उत्पन्न
चंदन अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत शर्विलक असे म्हणतात. शर्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जीवनसत्त्वे स्वत:च्या मूळांद्वारा शोषून घेतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी अन्य झाडांची लागवड करावी लगतात. याठिकाणी दीर्घायुषी,मध्यम आयुष्याची किंवा फळझाडे लावता येतात. साग, सादडा,लिंब,सुरू,पळस,करंज, नीलगिरी,बाभूळ, सुबाभूळ, काशिद आदी  दीर्घायुषी झाडे तसेच हादगा,शेवरी, शेवगा, बांबू,निरगुडी अशी मध्यम आयुष्याच्या झाडांची लागवड करता येते. याशिवाय आंतरपिकांमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, काळमेध,भुईरिंगणी, शतावरी, कोरफड अशी औषधी वनस्पतीही घेता येतात. एका माहितीनुसार एका एकरात चंदनाची 225 झाडे लावली जाऊ शकतात.याशिवाय शंभराहून अधिक आवळा व अन्य झाडांची लागवड करता येते.
रोगकीड नाही
चंदनावर शक्यतो नुकसानकारक जैविक किंवा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र काही किडीचा प्रादुर्भाव झालाच तर औषध फवारणीने तो आटोक्यात येऊ शकतोसाधारणत: खडकाळ,दगडयुक्त व कोरड्या भागातील चंदनापासून मिळणारे तेलाचे प्रमाण हे सुपीक जमिनीपासून मिळणार्या चंदनाच्या तेलापेक्षा अधिक असते.मात्र दोन्हीकडून मिळणारे तेल सारख्याच गुणवत्तेचे असते.चंदनाची शेती ठिबकमधून करता येते. कोकणातल्या लालमातीत तसेच लातूर जिल्ह्यातल्या काही शेतकर्यांनी चंदनाची यशस्वी शेती केली आहे. आज ओढापात्रात, शेतीच्या बांधावर बिया पडून झाडांची उगवण होत आहे.यातून चंदनाची तस्करी करणार्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. या गोष्टी टाळायला हव्यात. आपल्या राज्यात कायद्याचे नियंत्रण असल्याचे सांगण्यात येते. चंदन झाडांची लागवड व तोड यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते.शिवाय झाडांच्या संरक्षणासाठी रक्षकांची नियुक्ती करावी लागेल. मात्र या शेतीतून शेतकर्यांचे आयुष्य बदलणार असेल तर त्याला शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. खते,पाणी यांचा फारसा खर्च नसलेली ही शेती मागणीनुसार वाढण्याची आवश्यकता आहे. झाडे तयार झाल्यावर काही गोष्टींची रिस्क आहे. चंदन तस्करी गृहीत धरून काही उपाययोजना केल्यास शेतकर्याला फायदाच फायदाच आहे. त्यामुळे शेतकर्यांनी या शेतीकडे वळायला काहीच हरकत नाही.

No comments:

Post a Comment