Sunday, November 26, 2017

आंतरजातीय विवाह: कधी कॉमन होणार?

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही दशकांपूर्वी म्हटले होते की,'जोपर्यंत भारतात जातीप्रथा अस्तित्वात असेल,तोपर्यंत हिंदूंमध्ये आंतरजातीय विवाह आणि जातबाह्य लोकांशी क्वचितच संबंध प्राप्त होतील. जर येथील लोक अन्य प्रदेशांमध्ये,देशांमध्ये जातील,तेव्हा भारतीय जातीपातीची समस्या जगाची समस्या होईल.' भारतात आंतरजातीय विवाहाविषयीची सततची उदासिनता पाहूनच कदाचित डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की,भारतात आंतरजातीय विवाह अनिवार्य केले जाऊ शकत नाही.पण निदान कमीत कमी सरकारी स्तरावर आर्थिकपासून ते सामाजिक स्तरापर्यंत इतके प्रोत्साहित केले जायला हवे की, त्यामुळे आधिकाधिक लोक आंतरजातीय विवाह करण्यास प्रवृत्त होतील.

     स्वतंत्र भारतातले तीन मोठे राजकीय नेते या आंतरजातीय विवाहाच्या बाजूने उभे होते. डॉ. आंबेडकर, पंडित नेहरू आणि लोहिया ही तीन नावे आहेत. तरीही आपल्या देशात आंतरजातीय विवाहाची ठोस अशी संस्कृती विकसित झाली नाही. देशात स्वातंत्र्यानंतर आंतरजातीय विवाहाविषयी जी उदासिनता होती, ती आजही कायम आहे. याचा खुलासा प्रिंस्टन युनिव्हर्सिटीने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या एका अभ्यासामुळे होतो. दोन वर्षांपूर्वी 43 हजार 201 भारतीय कुटुंबांशी अगदी खोलवर जाऊन घेतलेल्या मुलाखतींवर आधारित हे संशोधन आहे.या अभ्यासानुसार वेगाने वाढणार्या शहरीकरणानंतरही भारतात फक्त 11 टक्के आंतरजातीय विवाह होत आहेत. आणि यातील 96 टक्क्यांपेक्षा अधिक विवाह हे प्रेमविवाह असतात. यामुळे हे लक्षात येते की,समाज स्वत: 4 टक्केदेखील अशा विवाहासाठी पूर्णपणे तयार नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होऊन गेली तरी याबाबतीत फारसा बदल झालेला नाही.
      आजही आपण जातीपातीच्या भरभक्कम बेड्यांमध्ये किती अडकून पडलो आहोत,हा त्याचा पुरावाच आहे. शास्त्रज्ञ पुन्हा पुन्हा सांगताहेत की, आंतरजातीय विवाह मनुष्याच्या चांगल्याच्या बाजूने आहे,तरीही याच्या विपरीत आपसातच विवाह करणे अस्तित्वासाठी घातक आहे. एकाच जातीत विवाह होत असल्याकारणाने काही जाती लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. आणि काही जाती तर लुप्त झाल्याही आहेत. अशा काही जाती आहेत, त्याही काही अज्ञात आजारांनी मरत आहेत. अंदमान-निकोबार बेटावरील आदिवासी जनजाती नेहमी संपूर्ण जगाशी अलिप्त राहून एका मर्यादित क्षेत्रातच राहत आहेत. त्यांचे वैवाहिक संबंध आपसातच बनले. यामुळे अनुवंशिक गडबडी झाल्या आणि ते सातत्याने अज्ञात अशा आजारांनी मरत आहेत. असे म्हणणे आहे भारतातल्या जीनोम फिंगर प्रिंटिंगचे जनक मानले जाणारे पद्मश्री शास्त्रज्ञ प्रा. लालजी सिंह यांचे! प्रा. सिंह यांच्या मतानुसार भारतात प्रारंभापासून समगोत्र विवाहाला विरोध केला गेला.पण नंतर लोकांनी जाती आणि समुहवादच्या चलतीमुळे या संकीर्ण विचाराला संपवून टाकले. याचा खुलासा प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाने होतो.
     प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार आज देशात फक्त 11 टक्के विवाह आंतरजातीय होतात आणि यातले सगळ्यात अधिक गोव्यात होतात. इथे होणारे विवाह एकूण विवाहाच्या 20.69 टक्के आहेत. गोव्यानंतर क्रमांक लागतो,तो सिक्कीमचा! इथे होणार्या एकूण विवाहांपैकी 20 टक्के विवाह आंतरजातीय होतात. यानंतर पंजाबचा (19.9) आणि केरळचा (19.65 टक्के) क्रमांक लागतो. आश्चर्याची गोष्ट अशी की, जो तामिळनाडू विकास आणि आधुनिकतेच्याबाबतीत देशातल्या अन्य राज्यांपेक्षा पुढे आहे, तो या आंतरजातीय विवाहात मात्र फारच मागे आहे.इथे फक्त 2.96 टक्के विवाह आंतरराजातीय होतात.मेघालयातही फक्त 2.04 टक्के विजातीय विवाह होतात. आंतरधार्मिक विवाह तर फक्त 2.1 टक्केच होतात. प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे भारतात जसजसे साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे, तसतसा लोकांचा दृष्टीकोन संकुचित होत चालला आहे. कारण 1958 मध्ये 51 टक्के भारतीय पालक मुलांसाठी आंतरजातीय विवाह योग्य असल्याचे समजत होते.पण आता 25 टक्क्यांपेक्षाही कमी आई-वडील असे आहेत, जे आंतरजातीय विवाहाच्या बाजूने आहेत. विशेष म्हणजे 1958 पासून ते आतापर्यंत शिक्षण,शहरीकरण आणि आर्थिक परस्थिती सुधारली आहे. त्यामुळे  शेवटी आपले शिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास आपल्या विचाराला पुढे नेत आहेत का मागे, असा प्रश्न उपस्थित होतो.

No comments:

Post a Comment