नुकत्याच राज्यात
ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यंदा प्रथमच सरपंच हा थेट लोकांमधून निवडून आला आहे.त्यामुळे ही निवडणूक तशी ऐतिहासिक ठरली आहे. आता अजून
महिनाभर जुनेच कारभारी ग्रामपंचायतीवर राहणार आहेत.त्यामुळे नव्यांना
काही काळ कामकाज पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र
या कालावधी सरपंच आणि सदस्यांनी ग्रामविकासाबाबत प्रशिक्षण वगैरे घेऊन ग्रामपंचायत
चालवण्यासाठी सक्षम व्हायला हवे. शासनाने आणि विविध सामाजिक संस्था,
राजकीय पक्षांनी त्यांना प्रशिक्षण द्यायसाठी पुढाकार घ्यायला हवा.
बहुतांश ठिकाणी सरपंच मंडळी कारभार कसा चालवायचा याचा अनुभव नसलेली निवडून
आली आहेत. विविध संवर्ग आणि पन्नास टक्के महिला आरक्षण यामुळे
चारचौघात वावरायचा अनुभव नसलेली मंडळीही ग्रामपंचायतीवर निवडून आली आहे. कित्येकांनी आरक्षणामुळे आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून आपली पत्नी,
आई,बहीण किंवा भावासह अन्य नातेवाईकांना निवडणुकीत
उतरवले होते. त्यामुळे या नव्या कारभार्यांचा कारभार साहजिकच जुनी मंडळीच पाहणार हे उघड आहे. मात्र असे न होता त्यांनी आपल्याच लोकांना प्रशिक्षित करून त्यांचे निर्णय
त्यांनाच घ्यायला उद्युक्त केले तर चांगलाच फायदा होईल. नाही
तर पहिल्यासारखे गटा-तटाचे राजकारण करत बसले तर गावचा विकास तिथेच
राहणार आहे. हार-जीत, पक्षीय राजकारण,गट-तट विसरून फक्त
गावाचा विकास त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे.
सत्तेच्या विकेंद्रीकरणात
गावाला अधिक महत्त्व आले आहे. गावाच्या विकासाला थेट निधी 14 व्या वित्त आयोगाच्यामाध्यमातून
उपलब्ध होत असल्याने बाकीचे राजकारण सोडून सत्ताधार्यांनी गावाचा
विकासात्मक कायापालट कसा होईल, हे पाहिले पाहिजे. निधी गेल्यावर्षीपासून मोठ्या प्रमाणात येत आहे,त्याचा
सुयोग्य वापर व्हायला हवा. सर्वांना घेऊन कारभार केल्यास नक्कीच
गावाचा विकास होणार आहे. आपल्या खरी गरज आहे,ती रोजगाराची! गावातल्या लोकांना गावातच रोजगार मिळायला
हवा. गावातली शेती उन्नतीकडे सरकली पाहिजे तरच गाव समृद्ध होणार
आहे. कुठे निधी कमी पडत असेल तर गाव उठावातून कामे करायला हवीत.
राळेगणसिद्धी, हिरवेबाजार,पाटोदा,निवळसारख्या गावांचा कारभार तिथल्या लोकांच्या
हातात आहे. ग्रामसभांना महत्त्व आहे.लोकांना
त्यात मोठ्या संख्येने सहभाग करून घेऊन गावाला काय हवे, काय नको
याचा ऊहापोह करत त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गावात अवैध धंदे,
दारू विक्रीला थारा देता कामा नये. व्यसनी लोकांमुळे
फंदफितुरी होऊन गावाच्या विकास कामात आडकाठी घालण्याचा धोका आहे. गावातले व्यसन कमी करण्यासाठी विशेषत: महिलांनी पुढाकार
घ्यायला हवा.
यापूर्वी गावाला
निधी तटपुंजा मिळत होता. घरपट्टी,पाणीपट्टीही गोळा होत नव्हती, असा अनुभव आहे. त्यामुळे गावासाठी राबणारे शिपाईसारखे
कर्मचारी पगाराअभावी दुर्लक्षित राहत होते. गावाला निधी आला आहे,
मात्र लोकांनी गावाचा कर भरून ग्रामपंचायत आणखी सक्षम करायला हवी.
आपले सरकार सारख्या योजनांमुळे लोकांना शेती, शिक्षण
अथवा विविध योजनांकामी विविध प्रकारचे दाखले हवे असतात. यासाठी
त्यांना तालुक्याच्या गावाला जावे लागते. यासाठी वेळ आणि पैसा
वाया जातो. आता हे दाखले गावातच मिळण्याची सोय झाली आहे.
इंटरनेट अथवा नव्या तंत्रज्ञानाचा वापर गावात करत राहिल्यास शेतीचे नवे
तंत्रज्ञान, माहिती उपलब्ध होणार आहेच शिवाय गावातल्या काहीजणांना
गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. समूहशेती,बचत गट यातून छोटे छोटे उद्योग,शेतीप्रक्रिया उद्योग
साकारता येणार आहेत. गाव एकदिलाने काम करत राहिल्यास काय अशक्य
नाही? म्हटलेच आहे, गाव करेल तिथे रावाचे
काय? त्यामुळे गावाच्या विकासाला चांगली संधी आली आहे.
त्याचे सोने करून घ्यायला हवे.
गावात विकास कामे
करायला अनेक खूप कामे आहेत. शिक्षण, आरोग्य, रस्ते,पाणीपुरवठा (ओढे,नद्या,पाण्याचे स्त्रोत इत्यादी सुव्यवस्थितपणा), बांधकाम,विविध दुरुस्ती, समाजविकास, वृक्षारोपण,
गावातील सण,उत्सव आदी गोष्टींवर काम व्हायला हवे.
विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जागरुकता महत्त्वाची
आहे. उत्तम लोकशाहीसाठी निवडणुका संपल्या की विरोधासाठी विरोध
न करता गाव माझा मी गावाचा या न्यायाने वर्तन आणि काम अपेक्षित आहे. सध्या सरपंचांची भूमिका फार महत्त्वाची आहे. विकास कामे
तर होतीलच पण गावाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी आणखी काय काय करायला हवे, याचा सतत ध्यास त्याने घ्यायला हवा.स्वच्छ गाव,
सुंदर गावसारख्या कल्पना सत्यात यायला हव्यात. पंचक्रोशीतील सरपंच आणि सदस्यांनी यासाठी महाराष्ट्रातील आदर्शगावांना भेटी
द्यायला हव्यात. त्यातून आपल्याला काय हवे, हे समजून येईल. एकच ध्यास,गावाचा
विकास,हेच सरपंच आणि सदस्यांच्या तनामनात रुजायला हवे.
No comments:
Post a Comment