Tuesday, July 24, 2012

विज्ञान क्षेत्रातली पीछेहाट चिंताजनक

     शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या दृष्टीने हिंदुस्थान जगात तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत तो बराच मागासलेला आहे. स्वत: पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विज्ञान कॉंग्रेसच्या ९९ व्या अधिवेशनात चीनने हिंदुस्थानला या क्षेत्रात मागे टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विज्ञान संशोधनावरचा खर्च एक टक्क्यावरून दोन टक्क्यांवर नेण्याचा मनोदयही जाहीर केला आहे. पण केवळ खर्च वाढविल्याने देशातला विज्ञान विकास साधला जाणार नाही. यासाठी देशात विज्ञान शोध आणि आविष्काराचा माहोल बनविण्याची आवश्यकता आहे. रसायनात संयुक्तरीत्या नोबेल मिळविलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या शास्त्रज्ञांनी- वेंकटरमण रामकृष्णन- यांनी दोन वर्षांपूर्वी दिले हेाते. ते म्हणाले होते की, ‘हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना लालफीतशाहीच्या जाचातून मुक्ती आणि अधिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. देशातल्या वैज्ञानिक संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये नेमकं काय चाललं आहे हे पाहण्याचीही गरज आहे आणि जबाबदारी शासनाची आहे.
     देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि डॉ. होमीभाभा यांनी एक स्वप्न पाहिले होते, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खाद्यान्न आणि औद्योगिक उत्पादन वाढवून देशाला स्वावलंबी बनवू शकतो. या दोघांच्या प्रयत्नांमुळे आज आमच्याजवळ तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या विकासासाठी आधारभूत ढाचा तयार आहे. अवकाश, अणुऊर्जा क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय आहे. पण जगाला अभिमानाने सांगण्याइतका नवा मौलिक शोध किंवा आविष्कार आपल्याजवळ नाही. शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या संख्येच्या हिशेबाने हिंदुस्थान जगात तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. पण आपल्याकडे असलेले विज्ञान साहित्य पश्‍चिमी देशाच्या शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वानेच भरलेले आहे. त्यात एकाही हिंदुस्थानीचे नाव दिसून येत नाही. आपल्या देशात आजच्या घडीला एखादे रमण, खुराणा का निर्माण झाले नाहीत किंवा होत नाहीत?
     आपल्या प्राचीन देशाने जगाला बरेच काही भरभरून दिले आहे. अगदी सात-आठ दशकांपूर्वीपर्यंत आपल्या देशात आतासारखी परिस्थिती नव्हती. शिवाय इंग्रजांच्या राजवटीत अडचणी काही कमी नव्हत्या. वातावरण अत्यंत प्रतिकूल होते. तरीही हिंदुस्थानने मोठमोठे शास्त्रज्ञ निर्माण केले. रामानुजम, जगदीशचंद्र बोस, चंद्रशेखर व्यंकटरमण, मेघनाद साहा आणि सत्येंद्रनाथ बोस अशी अनेक नावे घेता येतील. पण स्वातंत्र्यानंतर आपण एकसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा शास्त्रज्ञ जन्माला घातला नाही याचा आपण कधी विचार केला आहे?
     अत्याधुनिक पाश्‍चिमात्य देश आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वांच्या पुढे आहेत. कारण तेथील वैज्ञानिक प्रगती अनिवार्यच होती. तिथला माहोल पहिल्यापासूनच पोषक राहिला आहे. स्वातंत्र्याच्या उन्मादात इथल्या लोकांनी साहसी प्रवासाला प्राधान्यक्रम दिला. विविध प्रकारच्या जाती, वर्ण, स्वभाव, रुढी-परंपरा आणि राजकीय व्यवस्था तिथल्या लोकांच्या आड आली नाही. मानवी हितास बाधा येईल अशी मनोवृत्ती इथे बोकाळली नाही. उलट हित जोपासण्याचीच धडपड सुरू राहिली. शिवाय त्यांच्या भटक्या वृत्तीमुळे त्यांचा संपर्क जगात काही तरी नवे शोधणार्‍या कारागिरांशी झाला, वाढला त्यामुळे ज्या काही अंधश्रद्धा, रुढी-परंपरा, सवयी किंवा सामाजिक मूल्ये होती ती तपासली गेली आणि कसोटीनुरूप बदलली गेली. विकासाची एक नवीच प्रक्रिया सुरू झाली. उत्पादनाच्या नव्या ‘आयडियाज’ आणि दळणवळण साधनांमध्ये सुधारणा ही इथली गरज बनली. त्यावेळेला युद्धेसुद्धा होत होती आणि युद्धात विजयासाठी नवनव्या साधनांची आवश्यकता होती त्यांचीही निर्मिती घडू लागली.
पश्‍चिमी युरोप व अमेरिकेत विज्ञान संस्कृती वाढली. ही संस्कृती आणि देशांनी स्वीकारली. त्यात जपान आघाडीवर आहे. जपानबरोबरच सोव्हिएत संघ आणि आता रशियानेसुद्धा विज्ञानालाच शासन आणि औद्योगिक एकात्मतेचा आधार बनविला. रशियानेसुद्धा विज्ञान शिक्षणासाठी जपानप्रमाणेच आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिले. योजनाबद्ध विकासाचा सिद्धांत रशियाने स्वीकारला. नोकरशाही आणि लालफीतशाही संपविण्यासाठी अनेक योजना राबवल्या. शिक्षण उत्पादनाच्या गरजेच्या हिशेबात दिले जाऊ लागले. कॉलेजमध्ये शिक्षण, आराखडा आणि निर्मिती या तिन्ही गोष्टी होऊ लागल्या.
जपान आणि रशियाच्या अनुभवाचा चीनला मोठा फायदा झाला. चीनचा आर्थिक चमत्कार कसा शक्य झाला याचा खरं तर अभ्यास करायला हवा. त्यामुळे आपल्या देशालाही लाभ होऊ शकेल. लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण प्रसार, आधारभूत विकासाबरोबरच आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणांचा अभ्यास करायला हवा. चीनमध्ये गेल्या दशकभरात जी भांडवली वाढ झाली त्यात विदेशी गुंतवणुकीचा वाटा केवळ सात ते आठ टक्केच आहे. तरीही त्यांची झेप वाखाणण्यासारखी आहे. आपल्याकडे जशी गरिबी, निरक्षरता आणि परंपरा आहे तशीच ती त्या देशांमध्येही आहे. पण आपण इंग्रज गेल्यानंतर विज्ञानाला वैज्ञानिक स्वरूपात विकसित केलेच नाही. आज देशात नऊशेपेक्षा अधिक वैज्ञानिक संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनाचे काम चालले आहे, पण तरीही जगातल्या विज्ञान क्षेत्रात आमचे नामोनिशाणही नाही आणि तंत्रज्ञानासाठी आपल्या देशाला दुसर्‍या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे व त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागते.
     आपण पंचवार्षिक योजनांची कल्पना रशियाकडूनच उचलली आहे. पण त्यांच्या अनुभवातून आपण काही शिकलेलो नाही. आपले शास्त्रज्ञ मोक्याच्या जागांसाठी राजकारण्यांचे उंबरठे झिजवताना दिसतात, तर विद्यार्थी विदेशी संस्थांचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी धडपडताना दिसतात. देशातले जे काही हुशार शास्त्रज्ञ आहेत ते आपल्या स्वत:च्या हिमतीवर काही करण्याची इच्छा बाळगून आहेत, त्याला आपली लालफितशाही अनेक कागदांच्या अटीं घालून खोडा घालत आहे. काही तरी करण्याची ऊर्मी मारण्याचे काम आपली नोकरशाही करीत असते. जगात आपण गरीब नाही. आपल्याजवळ प्राकृतिक खजिना आहे. जगातल्या पिकावू जमिनींपेक्षा सर्वाधिक जमीन आपल्याकडे आहे. स्वच्छ प्रकाश, उष्णता आहे. पोखरण अणुस्फोट, अवकाश, उपग्रह, अग्निबाण निर्मितीतील आपली श्रेष्ठता जगजाहीर आहे. मात्र तरीही आम्ही विज्ञान क्षेत्रात पीछाडीवर आहोत. आपण आपली प्राथमिकता निश्‍चित केलेली नाही. त्यादृष्टीने पावले उचलली गेली नाहीत. मग विकास कसा होणार? आपल्या राजकारण्यांना व नोकरशहांना जरा जरी राष्ट्राभिमान, चिंता असेल तर त्यांनी आतापासून या कार्यासाठी, या दिशेने पावले उचलायला हवीत.
- मच्छिंद्र ऐनापुरेainapurem_2390@rediffmail.com          dainik.saamana 24/7/2012

Sunday, July 15, 2012

बालकथा दुष्काळावर इलाज

        एकदा एका राज्यावर भयंकर दुष्काळ पडला. लोक अन्न-पाण्यावाचून  तडफडून मरू लागले. तिथल्या राजाने सर्व दरबारी मंडळींना बोलावून घेतले    म्हणाला," आपण काही काळजी करू नका. मी वैद्यांकडून अशाप्रकारचं एखादं औषध बनवून घेईन की, त्यामुळे लोकांना वर्षोंवर्षे  भूकच लागणार नाही."  सगळे मंत्री एकमेकांकडे पाहू लागले. कुणीच काही बोलेना.  पण एक वृद्ध मंत्री सुधन मात्र उठला आणि राजाला म्हणाला," महाराज, भुकेवरचे औषध बनवून दुष्काळावर मात करणं अशक्य आहे. जर सिंचन सुविधा अधिकाधिक दिल्या तर  देश हिरवेगार होईल. आणि भीषण  दुष्काळावर मात करता येईल." राजा त्या मंत्र्यावर खवळून ओरडला,"  भुकेच्या औषधाने  दुष्काळ कसा हटत नाही, तेच  मी बघून घेतो. तुम्ही मला शहाणपणा शिकवायला जाऊ  नका.'' 
     राजाने देशातल्या सगळ्या वैद्यांना बोलावून घेतले आणि भूक मिटवणारे औषध महिन्याभरात बनवून आणायला सांगितले. सगळे वैद्य राजाचे फर्मान  ऐकून चकित झाले. एक वैद्य सांगू लागला, "महाराज, अशा प्रकारच्या  कुठल्याच  औषधाचे वर्णन वैद्य-ग्रंथांमध्ये आढळत नाही." राजाला भयंकर चिडला. त्याने त्याच तिरमिरीत सर्व वैद्यांना तुरुंगात टाकण्याचा हुकूम सोडला. सगळे वैद्य घाबरून घट्ट झाले. तेवढ्यात एक वयोवृद्ध वैद्य पुढे आला आणि म्हणाला," महाराज, या सर्व वैद्यांना मुक्त करा. मी आपल्याला एका आठवड्याच्या आत  औषध तयार करून आणून देईन."
     राजाने सर्व वैद्यांना मुक्त केले. एका आठवड्यानंतर तो वयोवृद्ध वैद्य राजाकडे आला. आणि म्हणाला," महाराज, प्रत्येक माणसाने साखरच्या कणाएवढी ही गोळी खाल्यास आयुष्यात त्यांना कधी भूकच लागणार नाही." राजाला फार आनंद झाला. त्याने त्या गोळ्या संपूर्ण राज्यात वाटून टाकल्या. आता लोकांना भूक लागत नव्हती. ते आपला सगळा वेळ करमणूकीत, झोपा काढण्यात आणि आळसात मस्तपैकी दवडू  लागले. राजाला कळले पण 'चला, निदान भुकेचा तरी प्रश्न मिटला' असे तो म्हणू लागला. काही दिवसांनी राजाला कळले की लोकांनी कामधंदा सोडून दिला आहे. त्यामुळे अगोदर बाजारात धान्य तर मिळत नव्हते आता दुसरी एकसुद्धा वस्तू विक्रीला दिसत नव्हती. यानंतर आणखी काही दिवसांनी मंत्री येऊन राजाला सांगू लागला,' महाराज, आपल्या देशात अराजकता माजली आहे. आपल्या शेजारच्या राजानेही आपल्याला चारीबाजूने घेरले आहे."
     राजा संतापाने म्हणाला," सेनापतींना सांगा, सैन्य तयार ठेवायला." मंत्री  म्हणाला," महाराज, आता आपल्याकडे सैन्यसुद्धा राहिलेलं नाही."  हे ऐकून राजा पुरता घाबरून गेला.  तो म्हणाला," आता काय करावे, ते तूच सांग?" तेवढ्यात सेनापतीसोबत काही शत्रू सैन्य आत आले. त्यांचा प्रमुख म्हणाला," महाराज, आपण आमचे बंदीवान आहात. आपण आमचा सामना करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका."  शेवटी राजा म्हणाला," भुकेच्या गोळीने माझी अशी दीनवाणी अवस्था केली आहे. आता माझे राज्य तुमच्या अधीन आहे." इतक्यात वयोवृद्ध वैद्य समोर आला. त्याने आपला वेश बदलला. तो वृद्ध सुधन होता. तो म्हणाला," महाराज, आम्हाला आनंद आहे, तुम्हाला भुकेची गोळी सगळ्या अनर्थाचे मूळ आहे, याची जाणीव झाली. मला क्षमा करा.  पण आपण दुष्काळ हटवण्यासाठी चांगल्या योजना राबवाव्यात म्हणून  हा सारा खटाटोप केला. हे शत्रू सैन्य नाहीत, आपलेच सैन्य आहेत." राजाने आपली चूक स्वीकारली. आणि सुधनला आश्वासन दिले की तो आता त्याच्या सल्ल्यानुसार वागेल.       

Saturday, July 14, 2012

बालकथा ठकेवाडी घोड्याचा शोध

      फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक श्रीमंत व्यापारी होता. त्याचा व्यापार दिवसेंदिवस भरभराटीला पावत होता. त्याच्याने त्याला नेहमी दूरदूरचा प्रवास करावा लागे. त्याला एक चांगला चपळ, दणकट  घोडा हवा होता.
     तो घोड्यांच्या बाजारात गेला, पण त्याला एकही घोडा पसंद पडला नाही. लोकांनी सल्ला दिला,' तुम्हाला चांगला घोडा हवा असेल, तर मग ठकेवाडी घोडा घ्या. साधारण घोडा जितके अंतर कापायला आठवडा लावतो, तिथे ठकेवाडी घोडा एका दिवसात पोहचतो.'
     व्यापार्‍याने ठकेवाडी घोडा खरेदी करण्याचा निश्चय केला. तो घोड्यांच्या सगळ्यात मोठ्या बाजारात पोहचला. तो इकडे-तिकडे फिरत होता, तेव्हा त्याला एका ठकाने हेरले. तो भोपळा विकत होता. त्यानं ताडलं, हा माणूस नवखा आहे, अडाणी आहे. याला सहजपणे ठकवता येईल. व्यापारी फिरत फिरत त्याच्यासमोरूनच निघाला. त्याने आवाज दिला," काय हो मालक, काय शोधताय? काय हवंय का तुम्हाला? मी बराच वेळ पाहतोय, तुम्ही मोठ्या काळजीत दिसताय, मी काही मदत करू का?" ठकाच्या नम्रतेवर व्यापारी प्रभावित झाला. तो म्हणाला," हो रे बाबा! मला ठकेवाडी घोडा हवाय. कुठे मिळेल, सांगू शकशील?"
     " तुम्ही योग्य ठिकाणीच आला आहात, मालक! पण ठकेवाडी घोडा  असा-तसा मिळणार नाही आणि मिळालाच तर  त्यासाठी तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. तुम्ही असे करा, माझ्याजवळ ठकेवाडी घोड्याची अंडी आहेत. एक अंडे घेऊन जा. यातून लगेचच एक सुंदर आणि दणकट शिंगरू बाहेर येईल. "
     "किती पैसे पडतील एका अंड्याला?" व्यापार्‍याने विचारले.
     " फक्त एक हजार रुपये, मालक." ठक
     व्यापार्‍याने  मोठासा, पिवळासा एक भोपळा खरेदी केला. तो नाण्यांची मोजदाद करू लागला, तोच ठक सावधानतेचा इशारा देत म्हणाला," मालक, सावध असा. अंडे खांद्यावरूनच वाहून न्या. खाली ठेवलात तर घोडा पळून जाईल. ठिकाय, देव तुमचं कल्याण करो." असे म्हणून ठकाने हात जोडले. व्यापार्‍याने भोपळा उचलून खांद्यावर ठेवला आणि गावाच्या दिशेने चालू लागला. 
     सूर्य मावळला होता आणि अंधार दाटत चालला होता. व्यापारी तर चालून चालून थकला होता. आता त्याच्याने चालवत नव्हते. त्याने भोपळा एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवला. आणि तिथेच बसला. त्याने  चेहर्‍यावरचा आणि अंगावरचा घाम पुसून काढला. बसल्या बसल्या त्याला पेंग येऊ लागली. तो तिथेच आडवा झाला. डोळे मिटून घेतले. त्याचवेळी एक कोल्हा धावत धावत तिथे आला. त्यानं भोपळ्याला पाहिलं नी त्याच्यातलं कुतूहल जागं झालं. त्याने एक जोराचा पंजा मारला. भोपळा फुटला आणि कोल्हा घाबरून पळू लागला.
     आवाजाने व्यापार्‍याचे डोळे उघडले. त्यानं पाहिलं, अंडं फुटलं आहे आणि त्यातून घोडा बाहेर पडून पळू लागला आहे. त्याने त्याचा पाठलाग सुरू केला. स्वतःशीच म्हणाला,' हा जन्मताच इतक्या वेगाने धावू शकतो, तर मोठा झाल्यावर किती कमाल करेल.'
    
आजपर्यंत  कोणा माणसाने आपला असा  पाठलाग करताना  कोल्ह्याने कधी पाहिले नव्हते. तो घाबरून एका गवताच्या गंजीत घुसला. योगायोगाने त्याच ढिगार्‍यात एक वाघ लपून बसला होता. व्यापारी ढिगार्‍यावर काठीने मारायला लागला, तसा वाघ बाहेर आला आणि पळून जाऊ लागला.व्यापारी मोठा चकीत झाला. घोडा इतक्यात एवढा मोठा कसा झाला, असा मोठा  संभ्रम  पडला. तो वाघाचा पाठलाग करू लागला. व्यापारी या मौल्यवान घोड्याला असा हातचा जाऊ देणार नव्हता. तो जीव तोडून त्याच्या मागे लागला. शेवटी वाघ सापडला. तो त्याच्यावर स्वार झाला. वाघाला वाटलं, हा कोणी मोठा शिकारी असावा. म्हणून बिचारा घाबरून गप्प चालू लागला.
      चालता चालता पूर्ण रात्र सरली. सकाळी सूर्य चमकला. व्यापार्‍याने सकाळच्या प्रकाशात पाहिलं, की तो कशावर स्वार आहे ते! पाहताच त्याला धडकी भरली. आता तो जीव वाचवायचा विचार करू लागला. वाटेत त्याला एका झाडाची फांदी आडवी आली. त्याने ती पटकन उडी मारून पकडली. आणि तसाच  झाडावर लोंबकत राहिला. पाठीवरचे ओझे उतरताच, वाघ मागे वळून न पाहता धूम पळला. 
     व्यापारी काही वेळाने झाडावरून खाली उतरला. त्याच्या पायाला जखम झाली होती. तो लंगडतच घरी आला. आता त्याला ठकेवाडी घोड्याच्या नावाचीच चीड येऊ लागली. आयुष्यात पुन्हा  म्हणून कधी त्याने ठकेवाडी घोड्याचे नाव काढले नाही.  ( बांगला देश लोककथेवर आधारीत)          

ई- कचरा: विल्हेवाटीचे आव्हान

     नवीन घरगुती इलेक्ट्रॉनिक्स  वस्तू  विकत घेतल्यावर तुम्ही जुन्या वस्तू एक तर अडगळीत फेकून देता किंवा घरातल्या अन्य भंगार वस्तूंबरोबर भंगारवाल्या विकून टाकता. पण तुम्ही त्याची कुठल्याही प्रकारे विल्हेवाट लावली तरी ते वातावरणाला नुकसान पोहचवतच. आज आपल्या देशात जवळ जवळ ८३ कोटीहून अधिक लोक मोबाईलचा वापर करतात. आणि घरगुती वस्तूंचा वापर करणार्‍यांची संख्याही काही नाही. कारण प्रत्येकाच्या घरात कोणती ना कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेच. एका पाहणीनुसार भारतात दरवर्षी ४ लाख टन ई- कचरा गोळा होतो. त्यातल्या केवळ १९ हजार टन ई- कचर्‍याचे री-सायक्लिंग होते. २०२० पर्यंत या कचर्‍यात पाचशे पटांनी वाढ होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.  ई- कचर्‍याचा पर्यावरणीय धोका आणि वातावरणाचे नुकसान हे भयाण वास्तव लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्याच्या विल्हेवाटीसाठी नवा कायदा अस्तित्वात आणला आहे, जो १ मे २०१२ पासून लागू करण्यात आलेला आहे. यानुसार इलेक्ट्रॉनिक उपकरणांची, वस्तूंची निर्मिती करणार्‍या कंपन्यांना आपले उत्पादन ग्राहकांना विकताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार आहे.  गुटखा किंवा तंबाकूची विक्री करताना जसे त्यांच्या पाकिटांवर वैधानिक इशारा देण्यात येतो, तसा ई-कचरा कुठेही न फेकण्याचा  संदेश आपले उत्पादन विक्री करताना  बुकलेटद्वारा  ग्राहकांना  द्यावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर कंपन्यांना स्वतः एक्सचेंज ऑफर चालवून ई-कचरा गोळा करावयाचा आहे. अथवा ई- कचरा कलेक्शन सेंटर्स उभारावे लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक साधने भंगारात घालण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
     इलेक्ट्रॉनिक भंगार आपण भंगारवाल्याला देऊन अथवा कुठे तरी उकिरड्यावर फेकून आपले घर मोकले करत असतो. पण आपल्याला याची कल्पना नाही की या ई- कचर्‍यामुळे आपल्या आरोग्याचं, वातावरणाचं आणि पर्यायाने पर्यावरणाचं किती नुकसान होतं ते! या टाकाऊ, खराब झालेल्या वस्तू इकडे -तिकडे टाकल्याने, फेकून दिल्यानं माती आणि जमिनीतील पाणी खराब करतात. ई- कचर्‍यात टॉक्सिक गॅस, टॉक्सिक मेटल्स, ऍसिड आणि प्लॅस्टिकसारखे विषारी घटक असतात. या वस्तूंचे मातीत विघटन होत नाही. ते जाळल्यास हवेचे प्रदुषण होते. पाण्यात टाकल्यास पाणी प्रदूषित होते. शिवाय त्यातून नियमित उत्सर्जित होणारी घातक द्रव्येदेखील पर्यावरणाला हानीकारक असतात.
     ई- कचर्‍याचे चार प्रकाराने री-सायक्लिंग केले जाते. मॅनुअल, मॅकॅनिकल, मॅटुलार्जिकल आणि इलेक्ट्रो- केमिकल ट्रीटमेंट अशा प्रकाराने कचरा नष्ट केला जातो आनि त्यात वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिकचा कार्बन ब्लॅक आदी बनवण्यासाठी उपयोग केला जातो. जवळ जवळ ३०० पेक्षा अधिक नावाजलेल्या कंपन्या ई- कचर्‍याच्या री-सायक्लिंगसाठी पुढे सरसावल्या आहेत. पर्यावरणाला अत्यंत धोकादायक असलेल्या या ई-कचर्‍यावर अभ्यास करणार्‍या लोकांच्या म्हणण्यानुसार देशात दरवर्षी जवळ जवळ ४ लाख टन ई - कचरा गोळा होतो. यापैकी दहा टक्केसुद्धा ई-कचर्‍याचे री-सायक्लिंग होत नाही. ई- कचरा योग्य प्रकारे नष्ट न झाल्याने त्याच्या अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. 
     विकसित देशांमध्ये फार पूर्वीच ई-कचरा ऍक्ट लागू करण्यात आला आहे. भारतातसुद्धा ई-कचरा इंपोर्ट करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल, मायक्रोवेब, कॉम्प्युटर, लॅपटॉप, फॅक्स, फोन की बोर्ड, माऊस, सीपीयू, एलसीडी आदी विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणार्‍या कंपन्यांना ई-वेस्ट ऍक्ट्चे पालन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या ऍक्ट्नुसार इलेक्ट्रॉनिक कचरा भंगारवाल्याला विकण्यास मज्जाव  करण्यात आला आहे. देशात लागू करण्यात आलेला ई-वेस्ट ( मॅनेजमेंट अँड हँडलिंग) कायदा सेंट्रल इन्वायर्नमेंट अँड फॉरेस्ट मिनिस्ट्री ( एमओईएफ) ने तयार केला आहे.  आता खराब झालेले इलेक्ट्रॉनिक सामान भंगारवाल्यामच्या हाती सोपवण्याऐवजी कंपन्यांच्या कलेक्शन सेंतर अथवा रजिस्टर्ड डिस्मेंटलरपर्यंत पोहचवून आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.                                                                                                          

पाशवी मनोवृत्ती!

    कोलकात्यातील एका शाळेशी संलग्न असलेल्या हॉस्टेलच्या वार्डनने पाचव्या इयत्तेतल्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने स्वमूत्र प्यायला लावून केवळ मानवतेलाच काळिमा फासला नाही तर शिक्षण मंदिरांनाही कलंकित करून टाकले आहे. मानवतेचा संदेश देणार्‍या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या 'विश्वभारती विद्यापीठा'शी संलग्न असलेल्या एका हॉस्टेलमध्ये असा धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार घडावा हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. विश्वभारतीच्या पाया भवन येथील गल्र्स हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेणार्‍या या विद्यार्थिनीला रात्री झोपेत अंथरुण ओले करण्याचा विकार आहे. महिला वॉर्डनने तिच्या या विकारावरच्या उपचाराला मदत करण्याऐवजी या कुकृत्यामुळे संपूर्ण शिक्षक जमातीलाच बदनाम करून टाकले आहे. या विद्यार्थिनीच्या जागी त्या महिला वॉर्डनची मुलगीच असती तर तिने तिच्याशी असा व्यवहार केला असता का? असाही सवाल उपस्थित होत आहे. स्वत:च्या मुलीशी असे वर्तन तिने नक्कीच केले नसते. मग ती या अजाण बालिकेशीच अशी का वागली? याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे पाशवी मनोवृत्ती!
     अशा निर्दयी, बेशरम लोकांना ठाऊक असतं की मुलांना अशी अमानवीय वागणूक दिल्यानं त्यांचं काही बिघडत नाही. प्रकरण आणखी वाढलंच तर पालकांची माफी मागितली की विषय संपून जातो. शिवाय अशा पीडित मुलांच्या आई-वडिलांनाही ठाऊक असतं की अशा आरोपींविरुद्ध तक्रार केली तर आपल्या मुलांचं काय होणार? मुलाला तर त्याच शाळेत शिकवायचं असतं. त्याच हॉस्टेलमध्ये ठेवायचं असतं. त्यामुळे अशा अनेक अत्याचारांना सहन केलं जातं, मात्र इथल्या प्रकरणात पालकांनी धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली, याचे कौतुक करायला हवे. महिला वॉर्डनला अटक करण्यात आली, पण या वॉर्डनची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. कायदेशीर कारवाई करण्यास विलंब लागणार आहे. आज विश्वभारतीने तातडीने कारवाईची पावले उचलण्याची गरज आहे.
     वास्तविक अलीकडच्या काळात शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये अजाण विद्यार्थी-विद्यार्थिनींवर शिक्षकांच्या अत्याचारांच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आणखी एका सरकारी शाळेत शिक्षकांनी तीन विद्यार्थ्यांचे मुंडण केल्याची घटना घडली होती, तर आणखी एका खाजगी शाळेत कोल्ड्रिंक प्यायल्यानं शिक्षिकेनं विद्यार्थ्याची इतकी धुलाई केली की त्यात त्याच्या हाताची नस कापली गेली. देशभर बालकांच्या शिक्षणाचा अधिकार लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याला मारायचं तर राहिले बाजूला पण त्याला अपशब्दसुद्धा वापरायचा नाही, असे असताना शिक्षकांची ही पाशवी वृत्ती धक्कादायकच म्हणायला हवी.
     अशा घटनांमुळे शिक्षण संस्थांची प्रतिमा मात्र खराब होत चालली आहे. मुलांसाठी या शाळा, हॉस्टेल्स म्हणजे निव्वळ जनावरांसाठीचे कोंडवाडे होऊ लागले आहे. इथे कुठलीच दया-माया नसते. केवळ 11 ते 5 या वेळेत मुले सांभाळण्याची व व्यवस्थित न वागल्यास, काही चुका केल्यास अत्याचार करण्याची मुभा मिळाली असल्याचे शिक्षकांना वाटत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी शाळा-हॉस्टेलमध्ये मुलांवर अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच मुलांना शिक्षण मोकळ्य़ा वातावरणात मिळावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अशा विकृत लोकांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय त्यांच्या हात, छडी किंवा त्यांच्या पशुवृत्तीवर अंकुश बसणार नाही.
     मुलांना मोकळ्य़ा वातावरणात शिक्षण देणार्‍या अनेक शिक्षण संस्था आहेत. मुलांवर कोणतंही दडपण नसावं. मुलांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांच्या कलानुरूप शिक्षणाची मात्रा चालवावी लागते. आजकाल शिक्षक आपल्या घर-दाराचे टेन्शन घेऊन शाळेत वावरत असल्याचे चित्र मोठे आहे. त्यामुळेही रागाच्या भरात विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना घडतात. शिक्षकांनाही शाळेत तणावमुक्त वावरण्याचा प्रयत्न करायला हवा.
punya-nagari 14/6/2012

Saturday, July 7, 2012

बालकथा मूर्ख रंगनाथन

     तामिळनाडूच्या एका गावात रंगनाथन नावाचा सोनार राहत होता. तो खूप सुंदर दागिने बनवायचा. एक दिवस त्याचा मित्र सुंदरराजन त्याच्या दुकानावर आला. रंगनाथन तेव्हा काशुमल्लई ( सोन्याच्या लहान लहान नाण्यांचा हार) बनवत होता. सुंदरराजनला तो अलंकार फार आवडला. त्याने असाच हार आपल्या बायकोसाठी बनवायला सांगितला. रंगनाथनने हार बनवून झाल्यावर घरी पोहचते करण्याचे वचन दिले. मग दोघांनीही इकडंच्या-तिकडंच्या गप्पा मारल्या आणि सुंदरराजन निघून गेला.
     काही दिवसांनी हार बनवून झाल्यावर रंगनाथन तो घेऊन सुंदरराजनच्या घरी गेला. दोघांनीही त्याचा यथोचित आदर-सत्कार केला. काशुमल्लई सुंदरराजनच्या बायकोला फार आवडला. गप्पा बर्‍याच उशीर रमल्या. नंतर सगळे जेवायला बसले. रंगनाथनने एक पदार्थ न खाताच बाजूला ठेवला होता. सुंदरराजनची पत्नी म्हणाली," भाऊजी, या कोयकट्टईची ( भात, गुळ आणि ओल्या नारळापासून बनवलेला पदार्थ) तुम्ही चवसुद्धा चाखली नाहीत. खाऊन तर पहा, पुन्हा मागाल."
     खरोखरच कोयकट्टई  छान होती. त्याला तर ती  इतकी आवडली की, रंगनाथन घरी गेल्यावर बायकोला बनवायला सांगून खाण्याचाच विचार करू लागला. त्याने असा आणि इतका स्वादिष्ट पदार्थ यापूर्वी कधीच चाखला नव्हता. तिथून निघताना तो कोयकट्टईचे नाव घेतच रस्त्यावर आला. घरी जाऊपर्यंत पदार्थाच्या नावाचा विसर पडू नयेहाच  त्यामागचा हेतू होता. चालता चालता एके ठिकाणी तो घसरून पडला. समोरून एक व्यक्ती येत होती. तो रंगनाथनला उठवत म्हणाला," पोट्टाकडी!" ( तू तर पडलास!) आता तो कोयकट्टई शब्द विसरला आणि 'पोट्टाकडी'... 'पोट्टाकडी' म्हणत रस्त्याने चालू लागला.
     घरी पोहचातच तो बायकोला म्हणाला," सुलभा, मला पोट्टाकडी खावीशी वाटतेय. पटकन बनव बरं."  रंगनाथनची बायको म्हणाली," मला हा पदार्थ बनवायला येत नाही. मी तर या पदार्थाचे नाव पहिल्यांदाच ऐकते आहे." बायकोचा नकार ऐकून त्याला खूप  संताप आला. रागाच्या भरात तो बायकोला   ढकलून देत म्हणाला," त्या सुंदरराजनच्या बायकोला बनवायला येतं, मग तुला का येत नाही?तू काय विलायतेतून टपकलीस?"
     जोरात ढकलल्याने रंगनाथनच्या बायकोचे डोके भिंतीवर जाऊन जोरात आदळले. त्याला मोठा टेंगूळ आला. थोड्या वेळाने रंगनाथनची आई बाजारातून परतली. तिने टेंगूळ पाहिला आणि धावतच सुनेजवळ जात म्हणाली," अरं देवा, तुझं डोकं असं का कोयकट्टईसारखं सुजलंय?
     कोयकट्टई शब्द ऐकल्यावर रंगनाथनला आपली चूक लक्षात आली. त्याने आपल्या बायकोला सगळी हकिकत सांगितली आणि आपल्या दुर्वर्तनाबद्दल माफीही मागितली. बायको म्हणाली," मी तुम्हाला कोयकट्टई करून खायला घालीन, पण मला एक वचन द्या, यापुढं रागाच्या भरात कुठलाही दुर्व्यवहार करणार नाही." रंगनाथनने पटकन बायकोला वचन देऊन टाकले. मग तिने कोयकट्टई बनवली आणि रंगनाथनला मन भरून खाऊ घातली.

स्त्री भ्रूणहत्या: समस्या आणि उपाय

     ध्या महाराष्ट्रात बीड, कोल्हापूर आणि सांगली  जिल्हय़ातील स्त्री भ्रूणहत्येची प्रकरणे राज्यभर गाजत आहेत. स्त्री भ्रूणहत्याप्रकरणी यापूर्वीच राज्य व केंद्र सरकारांनी कायदे केले आहेत. मात्र आता त्याची तीव्रता पाहता सरकारची आरोग्य व पोलिस खातीही खडबडून जागी झाली आहेत, त्यांनी आपली कारवाईची मोहिम आणखी तीव्र केली आहे. त्यामुळेच आणखी काही प्रकरणे उजेडात येत आहेत. हा डॉक्टर आणि लोकांचा निगरगठ्ठपणाच म्हणावा लागेल. स्त्री भ्रूण हत्येचा विषय चांगला गाजत असताना पैशाला चटावलेले डॉक्टर आपले कोणी वाकडे करत नाही, अशा आविर्भावात स्त्री भ्रूण हत्या करण्याचे पाप करत आहे. खरे तर अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कायद्यातही सुधारणा करून कठोर कायद्याची तरतूद  करण्याची गरज आहे.

     मागच्या  दशकामध्ये सुमारे १२ लाख स्त्री-भ्रूण हत्येची प्रकरणं घडली आहेत. देशातील लिंग-गुणोत्तर प्रमाण कमालीचे घटत चालले आहे.  दशकभरापूर्वी, १००० मुलांमागे ९२७ मुली असे लिंग-गुणोत्तर होते, ज्यात घसरण होऊन १००० मुलांमागे ९१४ मुली अशा धोकादायक आकड्यावर येऊन हे लिंग-गुणोत्तर स्थिरावले आहे. यापूर्वी आश्चर्यकारकरित्या १००० मुलांमागे ९४५ मुली असे लिंग गुणोत्तर होते. सध्या असलेले स्त्री-पुरुष विषमता प्रमाण अनेक सामाजिक समस्यांना जन्माला घालणार आहे. त्याची सुरुवातही कधीची झाली आहे.  याने अराजकाताच माजणार आहे.
स्त्री भ्रूणहत्येमागील कारणे
मुली म्हणजे डोक्याला ताप ही मानसिकता अद्याप संपलेली नाही. हुंड्यासाठी होणारा छळ, ठराविक काळात मुलीची घ्यावी लागणारी काळजी या आगामी काळात होणार्‍या त्रासाला घाबरण्याबरोबरच आणखी कारणांमुळे  लोक मुलीला जन्माला घालण्याचे टाळत आहेत. मुलगी हे परक्याचे धन आहे. तिच्या वाढवण्यावर, शिक्षणावर होणारा खर्च वायफट जाणार आहे. ही एक मानसिकता तयार झाली आहे. हुंडय़ामुळे किंवा आणखी काही वेगळ्या कारणांमुळे समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोट, मानसिक, शारीरिक त्रास या वैतागाला कंटाळून स्त्रिया आत्महत्येला कवटाळत आहेत. त्यामुळे आणखी बर्‍याच समस्या निर्माण होतात. या समस्यांना सामोरे जाण्याची भीती माणूस बाळगत आहे. उलट मुलगा म्हणजे  आयुर्विम्यासारखा वाटत असतो. तो मोठा झाल्यावर सोबत राहून आधार देतो. मरणानंतर मोक्ष देतो आणि आपला वंश पुढे चालवत राहतो, असे लोकांना वाटत असते. वास्तविक, वंशाचा दिवा पाहिजे म्हणणार्‍याला आपल्या पणजोबाच्या अगोदरच्या कुणाचेच नाव सांगता येत नाही, तरीही वंशाच्या दिव्यासाठी हट्टाहास केला जातो.
सोनोग्राफी वरदान पण...
सोनोग्राफी यंत्राद्वारे बाळाची गर्भात कशी वाढ होत आहे? गर्भातील मूल गंभीर आजाराने ग्रस्त आहे का?, त्याच्यात काही जन्मजात व्यंग आहे काआदी गोष्टी कळतात. त्यामुळेच  काही चाचण्या अस्तित्वात आल्या- अल्ट्रासोनोग्राफी , अम्निओसेन्टेसीस, कोरिओनिक विल्लस बयोप्सी इ. आणि हानिकारकरित्या केल्या जाणाऱ्या गर्भापातामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भपाताचा कायदा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी एक्ट १९७१ पासून भारतात लागू झाला. पण.. या गोष्टींचा गैरफायदा घेऊन काही वैद्यकीय क्ष्रेत्रातल्या मंडळींच्या मदतीने लोक स्त्रीभ्रूण हत्या विनासायास करून घेतात. या सोयी प्रारंभ करण्यामागचा मूळ उद्देश कुठल्याकुठे हरवला आहे. गर्भात असणारे  मूल मुलगी आहे कळल्यावर कायद्याने संमत एखादे कारण निवडून गर्भपात केला जातो. डॉक्टर्सपण यात सामील असल्याने अपराध सिद्ध करणे अशक्य असते. या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्त्रियांनाही मुलगाच हवा असतो. कारण त्यांना सासरच्या मंडळींची भीती असते. त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून मान मिळवून घेण्याबरोबरच अशा एक ना दोन अनेक कारणांमुळे काही स्त्रिया मनाविरुद्ध का होईना पण गर्भपाताला तयार होतात. 

स्त्री भ्रूणहत्येचे परिणाम

स्त्री भ्रूण हत्या करण्याचे प्रमाण पुढे असेच सुरू राहिले तर अनेक कठोर समस्यांना,अराजकतेला  तोंड द्यावे लागणार आहे. एक वेळ अशी येईल स्त्रियांची द्रौपदीसारखी स्वयंवरे भरवावी लागतील. आणि  वर  वीरदक्षणा जाऊन वधूदक्षिणा पद्धत सुरू होईल. स्त्री भ्रूण हत्येमुळे  समाजात अविवाहित तरुणांची संख्या वाढते आहे तसेच लैंगिक अपराधांची संख्याही   वाढते आहे.  00 सालापर्यंत चीनमध्ये ३५ दशलक्ष अधिक पुरु ष असतील तर भारतात २५ दशलक्ष, असा सर्वे सांगतो. विवाहयोग्य मुलींची संख्या कमी असल्याने वयस्कर पुरुष तरुण मुलींशी विवाह करतात. याचा परिणाम - अधिक जनन क्षमता आणि  लोकसंख्याही वाढण्यात होत आहे.   
 स्त्री भ्रूणहत्येवर उपाय
आजच्या परिस्थितीचा विचार केला तर स्त्रियांचे कर्तृत्व मोठे असल्याचे दिसत आहे. असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही, ज्याचे स्त्रियांनी नेतृत्व स्वीकारलेले नाही. अगदी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्येही मुलीच आघाडीवर आहेत. असे असताना मुली नको म्हणणारे आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत, याची जाणीव त्यांना आलेलीच नाही.  समाज रुढीला चिकटून, समाजाला घाबरून मुलाच्या प्रतीक्षेत स्त्री भ्रूण हत्या करणार्‍या पालकांना सामाजिक संस्थांनी, कार्यकर्त्यांनी बळ देण्याची आवश्यकता आहे. गरीब घरातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अशा संस्थांनी घेतल्यास या प्रकाराला बर्‍याच प्रमाणात आळा बसेल.  परवा गुरु पौर्णिमेच्या निमिताने शिर्डी देवस्थानला तब्बल चार कोटी पेक्षा अधिक संपत्ती लोकांनी अर्पण केली. अशीच मोठी संपती देशभरातल्या देवस्थानांकडे आहे. ही संपत्ती देशाची आर्थिक दैना संपवून टाकू शकते.  ही संपत्ती फारशी वापरात येत नाही. त्याचा काही संस्था वगळता सामाजिक कार्यासाठी विनियोग करत नाही. या पैशातून बर्‍याच गोष्टी हो ऊ शकतात. परंतु यात म्हणावी अशी प्रगती दिसून येत नाही. अशा संस्थांनीही मुलींच्या समप्रमाणासाठी पावले उचलण्याची गरज आहे. शिवाय जी मंडळी मोठमोठ्या प्रमाणात देवस्थांना देणगी देतात. याच पैशातून अनेक गरीब मुलींचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाच्या सोयी होऊ शकतात. ही जबाबदारी त्यांनी घेतली तर बरेच साध्य होणार आहे. आगामी काळातील मोठ्या अराजकतेपासून देशाची सुटका होणार आहे. माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. देशसेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी वाक्ये केवळ पुस्तकातच राहिली आहेत. ती उपयोजनेत यायला हवीत.