एकदा एका राज्यावर भयंकर दुष्काळ पडला. लोक अन्न-पाण्यावाचून तडफडून मरू लागले. तिथल्या राजाने सर्व दरबारी मंडळींना बोलावून घेतले व म्हणाला," आपण काही काळजी करू नका. मी वैद्यांकडून अशाप्रकारचं एखादं औषध बनवून घेईन की, त्यामुळे लोकांना वर्षोंवर्षे भूकच लागणार नाही." सगळे मंत्री एकमेकांकडे पाहू लागले. कुणीच काही बोलेना. पण एक वृद्ध मंत्री सुधन मात्र उठला आणि राजाला म्हणाला," महाराज, भुकेवरचे औषध बनवून दुष्काळावर मात करणं अशक्य आहे. जर सिंचन सुविधा अधिकाधिक दिल्या तर देश हिरवेगार होईल. आणि भीषण दुष्काळावर मात करता येईल." राजा त्या मंत्र्यावर खवळून ओरडला," भुकेच्या औषधाने दुष्काळ कसा हटत नाही, तेच मी बघून घेतो. तुम्ही मला शहाणपणा शिकवायला जाऊ नका.''
राजाने देशातल्या सगळ्या वैद्यांना बोलावून घेतले आणि भूक मिटवणारे औषध महिन्याभरात बनवून आणायला सांगितले. सगळे वैद्य राजाचे फर्मान ऐकून चकित झाले. एक वैद्य सांगू लागला, "महाराज, अशा प्रकारच्या कुठल्याच औषधाचे वर्णन वैद्य-ग्रंथांमध्ये आढळत नाही." राजाला भयंकर चिडला. त्याने त्याच तिरमिरीत सर्व वैद्यांना तुरुंगात टाकण्याचा हुकूम सोडला. सगळे वैद्य घाबरून घट्ट झाले. तेवढ्यात एक वयोवृद्ध वैद्य पुढे आला आणि म्हणाला," महाराज, या सर्व वैद्यांना मुक्त करा. मी आपल्याला एका आठवड्याच्या आत औषध तयार करून आणून देईन."
राजाने सर्व वैद्यांना मुक्त केले. एका आठवड्यानंतर तो वयोवृद्ध वैद्य राजाकडे आला. आणि म्हणाला," महाराज, प्रत्येक माणसाने साखरच्या कणाएवढी ही गोळी खाल्यास आयुष्यात त्यांना कधी भूकच लागणार नाही." राजाला फार आनंद झाला. त्याने त्या गोळ्या संपूर्ण राज्यात वाटून टाकल्या. आता लोकांना भूक लागत नव्हती. ते आपला सगळा वेळ करमणूकीत, झोपा काढण्यात आणि आळसात मस्तपैकी दवडू लागले. राजाला कळले पण 'चला, निदान भुकेचा तरी प्रश्न मिटला' असे तो म्हणू लागला. काही दिवसांनी राजाला कळले की लोकांनी कामधंदा सोडून दिला आहे. त्यामुळे अगोदर बाजारात धान्य तर मिळत नव्हते आता दुसरी एकसुद्धा वस्तू विक्रीला दिसत नव्हती. यानंतर आणखी काही दिवसांनी मंत्री येऊन राजाला सांगू लागला,' महाराज, आपल्या देशात अराजकता माजली आहे. आपल्या शेजारच्या राजानेही आपल्याला चारीबाजूने घेरले आहे."
राजा संतापाने म्हणाला," सेनापतींना सांगा, सैन्य तयार ठेवायला." मंत्री म्हणाला," महाराज, आता आपल्याकडे सैन्यसुद्धा राहिलेलं नाही." हे ऐकून राजा पुरता घाबरून गेला. तो म्हणाला," आता काय करावे, ते तूच सांग?" तेवढ्यात सेनापतीसोबत काही शत्रू सैन्य आत आले. त्यांचा प्रमुख म्हणाला," महाराज, आपण आमचे बंदीवान आहात. आपण आमचा सामना करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका." शेवटी राजा म्हणाला," भुकेच्या गोळीने माझी अशी दीनवाणी अवस्था केली आहे. आता माझे राज्य तुमच्या अधीन आहे." इतक्यात वयोवृद्ध वैद्य समोर आला. त्याने आपला वेश बदलला. तो वृद्ध सुधन होता. तो म्हणाला," महाराज, आम्हाला आनंद आहे, तुम्हाला भुकेची गोळी सगळ्या अनर्थाचे मूळ आहे, याची जाणीव झाली. मला क्षमा करा. पण आपण दुष्काळ हटवण्यासाठी चांगल्या योजना राबवाव्यात म्हणून हा सारा खटाटोप केला. हे शत्रू सैन्य नाहीत, आपलेच सैन्य आहेत." राजाने आपली चूक स्वीकारली. आणि सुधनला आश्वासन दिले की तो आता त्याच्या सल्ल्यानुसार वागेल.
No comments:
Post a Comment