Friday, March 15, 2019

भरवशाचा मार्ग


आपल्या सर्वांच्या आयुष्यात बरेच चढ-उतार येत असतात. मात्र हेच चढ-उतार कुणासाठी प्रेरणास्त्रोत बनतात,तर कुणासाठी कदाचित दु:खदेखील देऊन जातात. माणसाला एखाद्या कामात मिळालेले अपयशच पुढे त्याच्या यशाची सिडी बनून जाते. त्यामुळे अपयशाला घाबरून जायचं नसतं.उलट त्याला आव्हान म्हणून स्वीकारायचं असतं. कॉम्प्युटरचा एक सिद्धांत आहे, गी गो. म्हणजे गार्बेज इन गार्बेज आऊट! याचा अर्थ आहे- पेरले ते उगवले. जसे पोसाल,तसे बनेल. कॉम्प्युटर आणि मनुष्य, दोन्हीही एकमेकांसाठी मिळते-जुळते आहेत.
परंतु,मनुष्य फारच दिलचस्प प्राणी आहे. हा नेहमी स्वत:ला दुसर्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्याचे सिद्ध करण्याच्या मागे लागलेला असतो. आणि असाही विचार करत असतो की, हा नियम स्वत:ला सोडून बाकी सर्वांसाठी लागू आहे. किती भ्रमात राहत असतो हा! आपण सर्वजण रात्री झोपण्यापूर्वी खिशातल्या सर्व वस्तू काढून टेबलावर किंवा कपाटात ठेवून देतो. याच धर्तीवर किंवा याच गोष्टीतून प्रेरणा घेऊन आपण दिवसभरात आपल्या डोक्यात जमा झालेला वाईट विचारांचा कचरा रात्री झोपण्यपूर्वी काढून टाकण्याची सवय लावून घ्यायला हवी. आज आपल्याजवळ जमा झालेला वाईट विचारांचा कचरा आहे, त्याचा  आपल्याला उद्या काहीच उपयोग नसतो.त्यामुळे तो रोज रात्री आपल्या डोक्यातून काढून टाकायला हवा.

Wednesday, March 13, 2019

खोट्या गुन्ह्यात गोवलेल्याने लिहिले मार्गदर्शक पुस्तक!


माणसाचं आयुष्य विचित्रच आहे. त्याला कधी काय भोगायला लागेल किंवा त्याला कधी कशाची लॉटरी लागेल सांगता येत नाही. पण परिस्थिती ओळखून जो आपला मार्ग सोडत नाही,त्याच्या पदरी यश पडतच पडतं. 7 जुलै 2006 मध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटात हात असल्याचा खोटा आरोप लागल्याने अब्दुल वाहिद शेख( वय 38) या युवकाने आयुष्याची नऊ वर्षे तुरुंगात काढली. सप्टेंबर 2015 मध्ये त्याच्यावरचा आरोप खारिज करण्यात आला. आज याच माणसाने बेगुनाह कैदी या नावाचे उर्दू भाषेत जवळ्पास 400 पानांचे पुस्तक लिहिले आहे. शिवाय तुरुंगवासात त्याने वकिली आणि पत्रकारितेचा कोर्सदेखील पूर्ण केला आहे.

Monday, March 4, 2019

सशक्त महिला,सुखी समाजासाठी बॅलेन्स फॉर बेटर


तुम्ही कुठल्याही खेड्यात, लहान शहरात किंवा महानगरात राहत असाल तर तुम्ही जरा बाहेरच्या जगावर दृष्टीक्षेप टाका.जाणीवपूर्वक पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, या जगात मोठा बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. रस्त्यावर सायकल, स्कूटी, बाइक आणि चारचाकी गाड्या चालवताना तुम्हाला तरुणी किंवा स्त्रिया पाहायला मिळतील. शाळा-कॉलेजात, दवाखान्यात डॉक्टर आणि नर्स यांच्या रुपात महिला दिसतील. खेळाच्या मैदानात बॅडमिंटन, कुस्ती,कराटे, हॉकी, क्रिकेट, टेनीस, नेमबाजी असे किती तरी  खेळ महिला खेळताना दिसतील. ऑफिसमध्ये, मॉल्समधल्या दुकानांमध्ये, सिनेमागृहांच्या काँऊटरवर इतकेच नव्हे तर टोल नाक्यावरदेखील पैसे गोळा करायला आपल्याला महिलाच दिसतील. हे चित्र आपल्याला हेच सांगत की, महिला आता कुठेच मागे नाहीत. त्या आपल्याला सर्वच ठिकाणी अगदी आत्मविश्वासाने काम करताना, वावरताना दिसतात. आता हेच चित्र पाचव्या किंवा सहाव्या दशकात जाऊन पाहिल्यावर आपल्याला काय दिसेल? त्यावेळेला आपल्याला मुली किंवा स्त्रिया काही मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळत होत्या.

Sunday, March 3, 2019

रोबोट, मुलांचा गृहपाठ आणि बेरोजगाराचे संकट


चीनमधल्या एका मुलीने जगाला एक मोठा संदेश दिला आहे. भविष्यात काय नाही घडू शकतं आणि रोबोट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन आपलं जीवन कसं  सुकर करू शकतं,पण त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण करून माणसाचं सर्वस्वदेखील कसं हिरावून घेऊ शकतं, याचा अंदाज यायला हरकत नाही. जग बदलत आहे, लोकांनीही स्वत:ला त्याप्रमाणे बदलायला हवं. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी प्रगती साधताना रोजगाराच्या नव्या वाटादेखील शोधाव्या लागणार आहेत. पारंपारिक रोजगाराला आता फाटा देण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातदेखील अमुलाग्र बदलाची गरज आहे. याचाही विचार झाला पाहिजे. बातमी आहे, रोबोटकडून आपला गृहपाठ लिहून घेणार्या मुलीची. या बातमीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काय आहे ही बातमी जरा आपण पाहू या.ही चीनची मुलगी आपला गृहपाठ एका रोबोटकडून लिहून घेत होती. हा रोबोट तिचे अक्षरवळण (हँडरायटिंग) शिकला होता. काय गृहपाठ लिहायचा आहे, तेही शिकला होता. ही मुलगी रोबोटला कामाला लावून निवांत होती.कारण शाळेतल्या गृहपाठला ती वैतागलेली होती. आणि त्यावर तिने उपाय शोधला होता.