Sunday, March 3, 2019

रोबोट, मुलांचा गृहपाठ आणि बेरोजगाराचे संकट


चीनमधल्या एका मुलीने जगाला एक मोठा संदेश दिला आहे. भविष्यात काय नाही घडू शकतं आणि रोबोट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन आपलं जीवन कसं  सुकर करू शकतं,पण त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण करून माणसाचं सर्वस्वदेखील कसं हिरावून घेऊ शकतं, याचा अंदाज यायला हरकत नाही. जग बदलत आहे, लोकांनीही स्वत:ला त्याप्रमाणे बदलायला हवं. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी प्रगती साधताना रोजगाराच्या नव्या वाटादेखील शोधाव्या लागणार आहेत. पारंपारिक रोजगाराला आता फाटा देण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातदेखील अमुलाग्र बदलाची गरज आहे. याचाही विचार झाला पाहिजे. बातमी आहे, रोबोटकडून आपला गृहपाठ लिहून घेणार्या मुलीची. या बातमीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काय आहे ही बातमी जरा आपण पाहू या.ही चीनची मुलगी आपला गृहपाठ एका रोबोटकडून लिहून घेत होती. हा रोबोट तिचे अक्षरवळण (हँडरायटिंग) शिकला होता. काय गृहपाठ लिहायचा आहे, तेही शिकला होता. ही मुलगी रोबोटला कामाला लावून निवांत होती.कारण शाळेतल्या गृहपाठला ती वैतागलेली होती. आणि त्यावर तिने उपाय शोधला होता.

गृहपाठाला वैतागलेल्या या मुलीने यावर उपाय शोधताना चक्क रोबोट खरेदी केला. नव्या वर्षाच्या निमित्ताने तिला काही पैसे मिळाले होते. यातील 800 युआन म्हणजेच जवळपास साडे आठ हजार रुपये खर्च करून तिने हा रोबोट खरेदी केला. हा तिच्या लिखाणाची नक्कल हुबेहुब करत होता. या मुलीने त्या रोबोटला फक्त आपले आक्षरवळण (हँडरायटिंग) शिकवले नाही तर त्याला काय काय लिहायचं आहे तेही शिकवून टाकलं. खरे तर हा गृहपाठ तिला महिनाभरात पूर्ण करायचा होता आणि या रोबोटने तो गृहपाठ दोन दिवसांत पूर्ण करून टाकला. अर्थात हा गृहपाठ शाळेने तिला का दिला होता? ती यातून काही शिकेल म्हणून! पण ती काय शिकली? शाळा तिला जे काही शिकवत होती, ती तिला निटसं कळत नसावं किंवा तिला ते मोठं बोअरिंग वाटलं असावं. पण ती याहीपुढे जाऊन बरच शिकली. रोबोटला तिने शिकवलं आणि त्याचा वापर करून घेतला. तिच्या आईला शंका आली म्हणून हे प्रकरण उजेडात आलं. तिच्या आईने तो रोबोट मोडून-फोडून टाकला असला तरी अख्खं चीन तिच्या कामगिरीचं कौतुक करत आहे.
ही घटना आपल्याला बरच काही शिकवून जाते. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आता रोबोट स्वस्तात उपलब्ध होत आहेत.(निदान चीनमध्ये तरी तशी परिस्थिती आहे. आणखी काही वर्षात ते सगळीकडे सहज उपलब्ध होतील.) मुलंसुद्धा ते सहज खरेदी करू शकतील. ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा मुलांना तरी ही गोष्ट फार कठीण नाही. जर अशा प्रकारचे रोबोट स्वस्तात उपलब्ध होत असतील तर त्याच्या धोक्याच्या दिशासुद्धा आपण पाहिल्या पाहिजे. या मुलीचे अक्षर हुबेहुब तो रोबोट काढत होता. याचा अर्थ आता स्वत:च्या लिखाणाला महत्त्व राहिलेले नाही. त्यामुळे आता डिझिटल हस्ताक्षराचा स्वीकार करणं भाग आहे. डिजिटल दस्ताऐवजची सुरुवात आपल्या देशात सुरू आहे,पण आता या सर्वच पातळीवर या डिझिटलचा वापर करणं अनिवार्य होऊन गेलं आहे. भारतात याचा वापर सर्वसाधारण घरच्या मुलांना शक्य नाही,पण ज्यांना यातून पैसा कमवायचा आहे, ते सहज असे रोबोट उपलब्ध करू शकतात. अशा आळशी, कंटाळा करणार्या मुलांची कामे ही मंडळी सहज करून देऊ शकतील. साहजिकच काहीही सहज उपलब्ध होणार असेल तर आपल्याकडे त्यासाठी गर्दी होत असते, हा प्रकार काही नवा नाही.
या बातमीने आणखी एका गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. जग बदलत आहे, पण आमच्या शाळा बदलाचे नाव घेताना दिसत नाहीत. या शाळा अजून जिथल्या तिथे आहेत. मूलभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर अजून आमच्या शाळेत उपलब्ध नाहीत. आजही मुले शिकायची असतील तर त्यांना खूप मोठा गृहपाठ दिला पाहिजे,हा आमच्या शाळांचा ग्रह झाला आहे. मुलांनी तो इकडून-तिकडून नक्कल करून पूर्ण करावा, असेच अपेक्षित आहे. त्याच्या वयाचा,कुवतीचा अजिबात विचार केला जात नाही. गृहपाठ दिला की, आपले काम संपले, असे शाळा सांगून मोकळे होतात. काही शैक्षणिक जाणकार सांगत आले आहेत की, गृहपाठ (होमवर्क) या मुलांच्या स्वाभाविक विकासाला बाधा ठरत आहे. त्यांना जे काही शिकायचं आहे, ते त्यांना शाळेतच शिकवलं जावं. इतर वेळी त्यांनी हे जग सहजरित्या समजून घ्यायला हवे. फक्त त्यांना अभ्यासात डोकं घालायला लावून अभ्यासकिडा नव्हे तर सर्वगुणसंपन्न व्यक्ती बनवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पण बहुतांश शाळांनी याचा स्विकारच केला नाही. कारण त्यांना त्यांच्या शाळेच्या गुणवत्तेचे पडले आहे. गृहपाठ हद्दपार करण्यात शैक्षणिक अभ्यासकांना,विचारवंतांना शक्य झाले नसले तरी या रोबोटने ते दाखवून दिले आहे. तंत्रज्ञान अशा लोकांनाही बदलवत आहे, ज्यांना बदल करायचा नाही. साहजिकच या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण पुढच्या पायर्या गाठल्या पाहिजेत.
रोबोटकडून काय काय करवून घेता येऊ शकते, याची कल्पना आता येऊ लागली आहे. रोबोट जर स्वस्तात मिळू लागले तर अनेक कामे सुलभ होण्यास मदत होणार आहे. मात्र यामुळे अनेकांच्या रोजगारावर कुर्हाड कोसळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या वाटा शोधाव्या लागणार आहेत. नव्या तंत्रज्ञानानुसार स्वत:ला तयार करण्याची गरज आहे. सरकार आणि शिक्षण संस्थांनी त्यादृष्टीने पावले टाकायला हवीत.

No comments:

Post a Comment